शाळेची सहल
शाळेची सहल
अशी गंमत-जंमत
आणि मौजमजा भारी,
माझ्या शाळेची सहल
संगतीला हवी यारी...
सर श्रावणी बरसे
साज शृंगार निसर्गा,
तन-मना पुलकीत
जणू एकरूप स्वर्गा...
माझ्या शाळेची सहल
अशा दिनी डोंगरावर,
मोती झिरपती थेंब
मोरनृत्य दृष्टीवर...
हिरवाई पांघरूनी
माथा साज चढविला,
दृष्टी पारणे फिटले
पाखरांनी नटविला...
वन भोजन करीता
बाल-गोपाळ जमले,
रानमेवा चाखायला
मन उताविळ झाले...
मनसोक्त पहूडूनी
किती हुंदड्या मारूनी,
अशी सहल साजरी
गेली अजब होऊनी...