Sandip Khurud

Others

2  

Sandip Khurud

Others

आई

आई

2 mins
137


   त्यावेळेस माझी बारावीची परीक्षा नुकतीच संपली होती.उन्हाळयाच्या सुट्टया चालु होत्या. आम्ही मित्र-मित्र घराजवळयाच्या पिंपळाच्या झाडाखाली कॅरम खेळत बसायचो. कॅरम खेळण्यापुढे भुक लागलेली सुद्धा जाणवत नव्हती. आई जेवायला चल म्हणून थकून जायची. मी म्हणायचो थांब थोडया वेळाने येतो. आणी मी जातच नव्हतो. एके दिवशी वडील कामावर न जाता घरीच होते तेव्हा आईने त्यांना मी नुसता कॅरम खेळतो. कॅरम पुढे जेवणाचं पण विसरतो असं सांगीतले. तेव्हा वडील मला खवळले. थोडया वेळाने वडील बाहेर गेले. आईने माझ्याबद्दल वडीलांना सांगीतल्यामुळे मी खुप चिडलो होतो. आईने मला जेवायला वाढले होते. मी रागातच ताट फेकून दिले आणी रागं रागं बाहेर आलो. आई मला जेवायला चल म्हणून विनवत होती पण मी तिच्यावर चिडलो होतो. मी रागाच्या भरात पाण्याचा माठ फोडून टाकला. मी आणखीन रागातच होतो. तेवढयात मला वाडयाच्या मातीच्या भींतीमध्ये एक बोळ दिसले. त्या बोळामध्ये गांधण्यांनी पोळे केल्याचे दिसले. त्या बोळामधून एक-एक गांधीण ये-जा करत होती. मी माझा राग त्यांच्यावर काढायला सुरुवात केली. मी बॅडमींटनच्या बॅटने एक-एक गांधीण मारु लागलो. बघता-बघता मी अकरा-बारा गांधणी मारल्या. आई मला म्हणत होती "गांधणी मारु नको, चावतील." पण मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन गांधणी मारतच होतो.


     मी बऱ्याच गांधणी मारल्या होत्या. अचानक गांधणी चवताळल्या. आणी सात-आठ गांधणी माझ्यावर तुटुन पडल्या. दोन-तीन गांधणी कचाकच चावल्या. मी मोठयाने ओरडत घरात पळालो. माझ्या डोक्यात, कानाला, तोंडाला गांधणी चावल्या. आई धुणे धुत होती.तिने माझ्याकडे पाहीले. माझ्या अंगावरील गांधणी पाहून तिने स्वत:ची पर्वा न करता हातानेच गांधणी बाजूला झाडल्या. माझ्या अंगावरील गांधणी निघून गेल्या होत्या. मात्र माझा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. चावलेल्या ‍ठिकाणी चांगलीच आग होत होती. आईने पटकन तुळशीतील माती आणली आणी मला चावलेल्या ‍ठिकाणी लावली. गांधणी मला चावल्या होत्या पण वेदना तिला होत होत्या. हे तिच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट जाणवत होतं. आपल्या लेकरावर संकट आल्यावर आई कोणत्याही संकटाला घाबरत नाही. मग ती त्यावेळी स्वत:च्या जीवाचीही पर्वा करत नाही.याचा प्रत्यय मला त्यावेळी आला. त्यामुळेच आईला देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान आहे.


Rate this content
Log in