Nilesh Bamne

Others

2  

Nilesh Bamne

Others

बांडगुळ...

बांडगुळ...

4 mins
1.5K


माझं मन मला सांगत होत, विजय ! बाहेर पड तिच्या प्रेमातून ! तिचा जन्म कदाचित तुझ्यासाठी झालेला नाही आणि तुझ्या जन्म कशासाठी झालेला आहे हे तुला अजूनही कळले कसे नाही ? तुझा जन्म जर असाच कोणाच्यातरी प्रेमात पडून झुरण्यासाठी झालेला असता तर तुझ्या आयुष्यात इतक्या अकल्पित घटना घडल्याच नसत्या आठव तुझे बालपण,आठव तुझी गरिबी, आठव तुझी हुशारी, आठव तुझ्यातील चैतन्य आठव तुझा उत्साह आठव आठव तुझ्यात ठासून भरलेले असंख्य कला-गुण, जगात अशी कोणती गोष्ट आहे जिचे तुला ज्ञान नाही ? असामान्य आणि अतिशय सुंदर असणाऱ्या असंख्य तरुणींना आपल्या ध्येयासाठी लाथाडणारा तू त्या एका सामान्य तरुणीच्या जिला स्वतःची अशी काही स्वप्ने नाहीत, ना तिच्यात कोणते कला-गुण, एखाद्या बांडगुळासारखे जीवन जगत आली ती आणि यापुढेही ती तसेच जीवन जगत राहणार ! पण तू तसा नाहीस, तू वाघ होतास जंगलचा राजा ! राजासारखं जीवन जगत आलास मग आज तुझी अशी बकरी कशी झाली ? प्रेम वैगरे गोष्टींना तुझ्या आयुष्यात कधीच ठार नव्हता . तुझ एकच स्वप्न होत जगात आपली छाप सोडून जाण्याचं ! सिकंदाराच्या हातावर असणाऱ्या रेषा तू तुझ्याही हातावर घेऊन जन्माला आला आहेस. तू जग जिंकण्याच स्वप्न सोडून एका सामान्य स्त्रीच्या मोहात गुंतून पडलास ? तू तिच्या मोहात पडावस असे आहे तरी काय तिच्यात ? विसरलास का तुझ्या आयुष्यात आलेल्या त्या कित्येक तरुणींना ? त्यांचे अप्रतिम सौंदर्य इतक्यात विसरलास ? त्यांच्यात असणारे कला - गुण विसरलास ? त्याच्यातील एकीसमोर जरी आपलं प्रेम व्यक्त केले असतेस तर आयुष्यभर ती तुझी दासी बनून राहायला तयार झाली असती ! आणि तू अशा मुलीच्या प्रेमात पडलास जिच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम तर नाहीच पण तिरस्कारही नाही ! अरे तुझ्या प्रेमात पडण्याचा ती स्वप्नातही विचार करू शकणार नाही. कारण तुझी प्रेयसी मैत्रीण आणि पत्नी बनण्याचे सामर्थ्य तिच्यात कधीच नव्हते. ती फक्त दुसऱ्याची

स्वप्ने जगू शकते आणि दुसऱ्यांसाठीच झिजू शकते. तू ही झिजतोय दुसऱ्यांसाठी पण तुझ्या झिजण्याला अर्थ आहे. ती बांडगुळ असतानाही तिला साऱ्या गोष्टी सहज मिळणार आहेत त्यामुळे ती तिच्या भविष्यबाबत बेफिकीर आहे पण तुझे काय ? राजसारखं जीवन जगणाऱ्या तुझ्यावर भिक्षुकी करण्याची वेळ आलेय त्याचे काय ? आता तीच काय कोणी तुच्छ तरुणी ही तुझ्या प्रेमात पडणार नाही ! आहे काय आता तुझ्याकडे कोणी तुझ्या प्रेमात पडावं असं ? म्हणूनच तू तिच्या प्रेमात पडला आहेस हे माहीत असतानाही ती तुला झुळवू आणि झुरवू पाहतेय आणि तू झुळतोयस आणि झुरतोयस एखाद्या प्रेमवेड्यासारखा...तीच सोड जगाच्या दृष्टीने आता तू ही एक बांडगुळच आहेस ! फक्त जग तुला तुझ्या तोंडावर बोलत नाही इतकंच ! तिचा तर विचारच सोड ती तुझ्या आता प्रेमात पडणार नाहीच पण तू अजून किती दिवस हे असं जगाच्या नजरेतील बांडगुळाच जीवन जगत राहणार आहेस ? मी स्वतःच स्वतःला विचारलेल्या या प्रश्नाने भानावर आलो खरा ! पण बांडगुळ बांडगुळ हे शब्द माझ्या कानात घुमुन माझा डोकं बधिर करू लागले आणि मी माझं डोकं माझ्या मांड्यांच्या मध्ये घालून रडू लागलो... जगाच्या भल्यासाठी वटवृक्ष होण्याचं स्वप्न जगणारा मी त्याच वटवृक्षाच्या कडेला उगविणाऱ्या बांडगुळाच जीवन जगू लागलो. माझ्याच आधाराने उभे राहिलेले आज माझ्यावर दात काढून हसत होते आणि मी ते निमूटपणे पहात होतो कारण तसं करण्याखेरीज आता माझ्या हातात काहीच शिल्लक उरले नव्हते. कित्येकांचे भविष्य घडविण्याचे मोठेपण मला हवे होते ना ? पण ते मोठेपण मिळाले नाहीच उलट माझे मोठेपण मी गमावून बसलो.

माझ्या आई- बापाने मला जन्माला घालून माझ्यावर उपकार केले की स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला ते देवच जाणे ! पण त्याच्या पोटी जन्माला येण्याचा अभिमान मात्र मला कधीच वाटला नाही कारण तस काही वाटावं असं माझ्या बाबतीत त्यांच्या हातून काही घडलं नाही. वयाच्या तेराव्या वर्षापर्यत त्यांनी माझी काळजी घेतली त्यानंतर माझी मीच घेतली. कथा कादंबऱ्यांत आई- वडिलांचे रंगविलेले प्रेम आम्हाला स्वप्नातही अनुभवता आले नाही. गरिबी, कुपोषण मानसिक त्रास यामुळे वयाच्या तेराव्या वर्षीच माझे केस पांढरे झाले आणि जगाच्या दृष्टीने आणि माझ्या नजरेत मी तेव्हाच म्हातारा झालो होतो. माझ्या आई - बापाकडे देव जाणे कोणतं सिंहासन होत म्हणून चार पोरांना जन्माला घातलं. कर्म त्यांचं पण फळ माझ्या वाट्याला आलं. सारंच अर्धवट असताना प्रेम मात्र पूर्ण माझ्या वाट्याला आलं होत पण ते गमावलं मी मोठेपणासाठी माझ्या कुटुंबाला सावरण्यासाठी ! माझ्या आयुष्यातील तो सर्वात मोठा झुगार आणि गाढवपणा ठरला. तो गाढवपणा केला नसता तर कदाचित आजच हे बांडगुळाच जीवन जगणं माझ्या वाट्याला आलं नसत. दोन्ही हाताने जेव्हा कमावत होतो तेव्हा दोन्ही हाताने देत गेलो, वाटलं होत एक हात तरी साथ देईल पण तो माझा गोड गैरसमज होता. माझ्या निस्वार्थी त्यागाची जगात किंमत शून्य होती. वाटलं होत कोणीतरी माझ्यातील गुणांवर, संस्कारावर मोहित होऊन माझ्या प्रेमात पडेल पण कसले काय प्रेमात पडल्या त्याही माझ्या देखण्या शरीरावर मोहित होऊन त्यांना माझा भोग घ्यायचा होता पण मला आपला करायचा नव्हता. आज माझे ते शरीरही डागाळले आणि माझ्या वाट्याला आले बांडगुळाचे जगणे , कधी नव्हे तो माझा बाप या बांडगुळाचा आधार ठरला पण मला बांडगुळ करण्यात माझ्या बापाची भूमिका महत्वाची होती. माझ्या बापाने नेहमीच छोटी स्वप्ने पाहिली आणि मोठी स्वप्ने पाहणाऱ्या माझी पंख छाटली, माझी आई तिने नेहमीच मोठी स्वप्ने पाहिली पण बांडगुळ बनून... माझी भावंडे ती तर बांडगुळाला खाऊन जगणाऱ्याच्या भूमिकेत होते.


Rate this content
Log in