Pratibha Tarabadkar

Abstract Others

3  

Pratibha Tarabadkar

Abstract Others

जावे त्यांच्या वंशा -सुमेधा भाग -३

जावे त्यांच्या वंशा -सुमेधा भाग -३

3 mins
183


भाग -३


   'सुमेधा, चहा...', सुधीर ऑफिसमधून आला आणि फ्रेश होऊन त्याने बेडरुममधून हाक मारली.आजकाल सुधीर चहा, नाश्ता बेडरूममध्येच घेत असे.सुमेधा चहा घेऊन बेडरूममध्ये गेली.सुधीर बेडवर बसून टीव्ही ऑन करत होता.सुमेधाने चहा टेबलावर ठेवला आणि त्याच्याजवळ बसली.

   'आज आईला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते.डॉक्टर म्हणाले, अजून तिची तब्येत पूर्णपणे सुधारली नाहीये.थोडी औषधं बदलून दिलीत...'

   'च्यायला,या रिमोटला काय झालंय? सेल बदलायला हव्यात ',सुधीरचे बोलणे ऐकून सुमेधा थक्क झाली.इतक्या महत्वाच्या गोष्टीपेक्षा सुधीरला टीव्ही रिमोटची पडलीये? माझी आई, तिचं गंभीर दुखणं याबद्दल काहीच फिकीर नाही?

   मला निदान भाऊ तरी आहे.ज्या मुलींना भाऊ नाही किंवा जी एकुलती एक मुलगी आहे अशांच्या आईवडीलांचे म्हातारपणी कसं होणार?

   सुमेधा उठली.तिच्या गुडघ्यातून कळ आली.तशीच लंगडत ती स्वयंपाकघरात आली.इतके दिवस बसल्या बसल्या भाजी निवडून दे,ताक करून दे,सामान डब्यांत भरुन ठेव अशी छोटी मोठी कामं सासूबाई करायच्या, तिचं तेव्हढंच काम हलकं होत असे पण आता मात्र त्या एक तर त्या बेडरूममध्ये पाय दुखतात म्हणून विव्हळत तरी असतात किंवा टीव्ही समोर ठाण मांडून बसतात.आतासुद्धा कुठलीतरी भिकार मालिका लावून बसल्या होत्या.सुमेधाच्या डोक्यात तिडीक गेली.ती तरातरा आत गेली आणि मेथीची जुडी सासूबाईंसमोर ठेवली.

   'निवडून दिलीत तर उद्या भाजी करता येईल .'ती वळली. सासूबाईंनी पुटपुटलेले शब्द तिच्या कानावर पडलेच.

   'स्वत: च्या आईला मखरात बसवून ठेवायचं आणि सासूला कामाला लावायचं '

   सुमेधा गर्रकन मागे वळली.'काय म्हणालात?'सुमेधाचा आवेश पाहून सासूबाई सटपटल्याच. मान खाली घालून त्या भाजी निवडू लागल्या.

   संतापाने सुमेधाच्या अंगाची लाही लाही झाली. कधीनव्हे ती आई माझ्या कडे आली तेसुद्धा आजारपणामुळे नाईलाजाने तरी यांना एवढं खुपतं? अर्थात 'माझ्या कडे 'असं म्हणण्याचा तरी काय अधिकार आहे म्हणा मला?हे तर सांगवलेकरांचं घर आहे. माझं थोडीच आहे? मी इथली केवळ नामधारी....

   'चला सगळ्यांनी मदत करा मला, यश चल ताटं वाट्या पेले मांड, पाणी घे. अहो आई तुम्ही वाढायला घ्या तोपर्यंत मी आईला घेऊन येते ', असं म्हणून सुमेधा आईला आणायला गेली.आईला धरुन हळूहळू आणून तिने अलगद खुर्चीवर बसवलं.आईच्या चेहऱ्यावर अवघडलेपण स्पष्टपणे दिसत होतं.

   'अगं आई, अजिबात संकोच वाटून घेऊ नकोस.स्वत: च्या मुलीकडे रहाण्यात कसला आलाय संकोच?हो की नाही हो आई?'सुमेधाने बेसावध असलेल्या सासूबाईंना गुगली टाकली.सासूबाई गडबडल्या.

   'अगं आई,तू मला जन्म दिलास,खस्ता खाल्ल्यास, मोठं केलंस,शिक्षण दिलंस आणि व्यवस्थित लग्न करून दिलंस मग आता तुझं करायची वेळ आली तर मी जबाबदारी टाळणं योग्य आहे का? हो की नाही सुधीर?'

   अर्धं लक्ष जेवणाकडे आणि अर्ध लक्ष मोबाईलकडे असणारा सुधीर भांबावला.

   'आप्पा ,सुधीरचे वडील, दोन वर्ष अर्धांगवायूने अंथरुणावर होते , मी विनातक्रार त्यांची सेवा केली.आता सुधीर तुझ्या आजारात मदत करायला नाही थोडीच म्हणेल...हो की नाही सुधीर? फिट्टंफाट!'

   आज सुमेधाला अचानक काय झालं आहे कळेना.सुधीर आणि सासूबाई चक्रावून गेल्या होत्या.आईचा मूड बघून यश गुपचूप जेवत होता.

   'आईला वाईट वाटत होतं, जावयाला अधिकाचं वाण देता आलं नाही म्हणून!'

    'अजून वेळ आहे अधिक मास संपायला ', सुधीर अनवधानाने बोलून गेला. सुमेधाने त्याच्याकडे रोखून पाहिले. तिच्या मनात आलं, आजारपणात किती खर्च झाला याची एका शब्दानेही चौकशी न करणारा आपला नवरा अधिकाचं वाण घ्यायला एका पायावर तयार आहे!

    'अगं सुमेधा, या रविवारी आईला घेऊन जातो. ती खूप कंटाळली आहे, कधी घरी नेतोस म्हणून सारखं विचारतेय,महिनाभर राहिली तुझ्याकडे आता बरीच सुधारणा झाली आहे तब्येतीत तिच्या.'

    'बरं', म्हणून सुमेधाने फोन बंद केला.या एका महिन्यात सुमेधाला मुखवट्याआडचे चेहरे दिसले होते.निव्वळ भावनिक राहून चालणार नाही तर व्यावहारिक पातळीवर जाऊन आपल्याला विचार करायला पाहिजे याचा साक्षात्कार सुमेधाला झाला.

    सुमेधा आता विचारपूर्वक वागते आणि निर्णय घेते.जग हे भावना प्रधान माणसांसाठी नाहीये हे तिला आता कळून चुकलं आहे.

    अशी ही सुमेधाची कहाणी सफल संपूर्ण!




Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract