Vasudha Naik

Others

1  

Vasudha Naik

Others

माझे उपक्रम

माझे उपक्रम

2 mins
499


मी वसुधा गेली एकतीस वर्ष शिक्षिका म्हणून सेवा करत आहे.  अरण्येश्वर विद्यामंदिर, सहकारनगर पुणे इथे गेली २२ वर्ष सेवा करत आहे. तसेच 'कीर्ती विद्यालय ,निगडी" इथे ९ वर्ष सेवा केली. "लहान मुले ही देवाघरची फुले" या उक्तीनुसार मुले खरचच लाघवी असतात,प्रेम लावले खूप प्रेम करतात आणि त्यांचे बालवय संस्कारक्षम असते. आपण जसे वागू, बोलू त्यावर विश्वास ठेवणारे वय, अनुकरण करणारे हे बालवय. या वयातील मुलांना शिकवायला मला खूप आवडते. संस्कारांचे योग्य खतपाणी घालून या मुलांच्या विचारांची योग्य मशागत करून मुलांचा सर्वांग विकास करणे हे मी माझे कर्तव्यच समजते. हेच कार्य मी गेली एकतीस वर्षे मन लावून करतीय. बोधकथेतून मुलांवर संस्कार रूजवतेय.

   

मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी साहित्य निर्मिती करणे हे माझ्या अत्यंत आवडीचे काम आहे. तर माझी चित्रकला जरा बरी असल्याने स्वसाहित्य निर्मिती यालाच मी प्राधान्य देते. मग खर्चाचा विचार करत नाही. मुलांना हाताळता येईल असे साधेच पण आकर्षक साहित्य बनवल्याने मुले खूश असतात. मुलांची मुळाक्षरे वाचन, लेखन तयारी घेताना मुळाक्षरांचा खेळ, फ्लॅशकार्डस, मुळाक्षरांचीगाडी, पट्ट्या, मुळाक्षरांचे झाड, मुळाक्षरांची बाग, उडी, संगीत परडी इत्यादींचा वापर केल्याने मुलांना मुळाक्षरे अगदी महिन्याभरात ज्ञात झाली.

   

मुलांना अंक, संख्या वाचताना, ओळखताना जरा अडचणी दिसून आल्या. मग या मुलांसाठी शैक्षणिक पत्ते तयार केले. प्रत्येक चित्राची १ ते १० अंक असे ४० पत्ते बनवले. त्यात बदाम, बाॅल, सफरचंद, इस्पिक अशा आकाराचे चित्रे काढली. या पत्त्यांचा वापर शैक्षणिक साधन म्हणून केला. प्रत्यक्ष वस्तू, झाडाची पाने, झाडाच्या पडलेल्या बिया, आईस्क्रिमच्या काड्या, मणी, काडेपेटीतील काड्या इत्यादीचा वापर अंक, संख्या ओळखण्यासाठी केला. यामुळे झालेले फायदे असे...

१) अंक अचूक ओळखता यायला लागले.

२) चित्रे मोजून अंक, संख्या लेखन जमू लागले.

३) बेरीज संकल्पना स्पष्ट होवू लागली.

४) वजाबाकीची कल्पना स्पष्ट होवू लागली.

५) लहान, मोठी संख्या ओळखता येवू लागली.

६) पुढची, मागची, मधली संख्या ओळखणे सोपे झाले.

 

इंग्रजी विषयासाठी Aa Bb... Zz शिकवताना, A for apple... apple चे लाल गाल, B for ball... ball आहे हो लाल... अशा यमक जुळणार्‍या शब्दांतून गाण्याच्या स्वरूपात शिकवल्यामुळे मुलांना समजायला वेळ लागला नाही.

गाण्यातून शिकवल्यामुळे आनंद मिळाला. मुले A to Z सहज लिहू लागली.


शाळा सुटताना ही छोटी आई बाबांची वाट पाहतात. कधी रडतात तर कधी खूप त्रास देतात. वर्गातच पळापळी चालते. अशा वेळी मला एक युक्ती सुचली. मी मुलांच्या हातात रंगीत खडू देते. चित्र काढायला सांगते. मुले आनंदाने चित्र काढतात. यातून मुलांची खालील प्रगती दिसून आली.

१) सभाधीटपणा वाढला.

२) आत्मविश्वास वाढला.

३) फळ्यावरील लेखन सुधारू लागले.

४) चित्रकला सुधारली.

५) मुख्य बदल म्हणजे मुले शांत झाली.


अशा रितीने नियमित उपक्रम, प्रकल्पातून माझी मुले शिकत असताना मला जो आनंद होतो तो जीवनात मला कुठेही मिळत नाही आणि तो शब्दांत वर्णन करता येत नाही.


Rate this content
Log in