Vasudev Patil

Others

2.5  

Vasudev Patil

Others

नानू

नानू

5 mins
444


आषाढी एकादशीची पहाट सलवाडीत उगवली ती सैनधार बरसातीतच.जणू पंढरीच्या विठूरायाच्या वारीनंतरच खंड पडेल या बेतानं वरुण राजा बरसू लागला होता.सखा दाजीनं आळस झटकत गोधडी फेकली.अंगावर ढेपेच्या खाली गोणपाटाची घोंगडी चढवत बादली घेत त्यांनी थंड झडकनात खळ्याची वाट धरली.लोकं अजुन उठलीही नव्हती.पण ज्याच्याकडे गाई-म्हसरं होती ती घरं उलीच खुळबुळ करत होती.गाव विहीर,त्या जवळचा वड मागे टाकत खळवाडीच्या चिखलपाण्याच्या वाटेनं धोतर आवरत ते आपलं खळं जवळ करू लागले.नागोरावाच्या खळ्याजवळ पावसाच्या पाण्यानं गुडक्याच्या वर डाब (डबकं)भरली होती.त्याच्या काठावर बिळातनं सात आठ महिन्यातून प्रथमच बाहेर निघत बेडकं तारस्वरात डराव डराव करत होते.सखा दाजीनं अनुभवानं ताडलं की ही पिवळीधम्मक बेडकं गळ्याखाली मस्त फुगारे काढत असतील.पण एकादशीचा चांद मावळल्यानं व ढगाळ झगारीनं अंधारात काहीच दिसत नव्हतं.


त्यांनी हातातली बादली खाली ठेवत करगोट्याची किल्ली सोडत अदमासानं झापड्याच्या कुलुपात घुसवत फिरवली.वरचा मेढ्यात अडकवलेला रबरी बेल्ट काढत पायानं झापं आत ढकललं.खालचं पुलीचं चाक 'कुई कुई ' वाजताच खळ्यातली गाय हंबरत उठली.वासरू 'हम्बाsss' करत आरडत अंग झटकू लागलं.पिलपत्ती खाऊन टम्म फुगलेल्या पोटाची बैलं जागेवरच एका कानी (बाजुला)होत चारही पाय ताणू लागले.सखा दाजीनं गव्हाणीतल्या कडीचा दोर सोडत गाईच्या गळ्याभोवती गुंडाळला.व पाठीवर होत मारत गाईला पुढं हाकललं.लगेच वासरू सोडत एका हातात दोर व दुसऱ्या हातात पळता पळता बादली घेत ते पडत्या पावसात बस स्टॅण्डकडं निघाले.वासरू आईच्या कासेला लागण्यासाठी दोर ताणत ओढू लागलं.सखा दाजीची पाण्यात फरफट होऊ लागली.


सलवाडी गिरणा काठचं सधन खातं-पितं गाव.गावात ऊस ,केळी.म्हणून गोकूळ पतपेढीनं गावातील बऱ्याच लोकांना गाई-म्हशी कर्जानं वाटलेल्या.चाऱ्याची वाणवा नसल्यानं लोकांनी गाई म्हशी घेत दूध 'श्रीकृष्ण दूध डेअरीत ' लावू लागले.तालुक्यावरून दूधगाडी पहाटे साडेचारलाच येत आधी सलवाडीतलं दूध उचले मग इतर वाडीचं घेत घेत तालुक्याला परते.म्हणून सलवाडीतल्या लोकांना पहाटेच उठून साडेचारच्या आत बस स्टॅण्डवर आपली जनावरं आणून मापाडीस उलटी बादली दाखवत पाणी टाकलं नसल्याची खातरजमा देत दूध काढून मोजावं लागे. दहा दिवसांतून बॅंकेचा हफ्ता वजा करत सेक्रेटरी पेमेंट करी.

गावात त्यामुळं काही जोडधंदा म्हणून तर काही लोक रोजीरोटी म्हणून गाई म्हशी पाळत.

 पण मागच्या एकादशीच्या किस्स्यानंतर सलवाडी पहाटे लवकर उठायला कचरतच होती.आज एक वर्ष उलटून ही दहशत कमी झाली नव्हती. लोक चारनंतरच येऊन भराभर धार काढत एकदम दूध मोजण्याची गर्दी करत.

 

सखा दाजीनं गाव विहीरीचा वड ओलांडला.वडाजवळच्या किसन तात्याच्या खळवाडीकडं लक्ष जाताच त्यांच्या अंगावर झडकनातही काटा सरसरला.'हॅक,चॅक'आवाज करत त्यांनी गाईचा वेग वाढवला.वाटेतल्या मारतीच्या देवळातल्या दिव्यातलं तेल संपत आलं असावं वा दिवा काजळला असावं की काय मरणासन्न माणसाच्या श्वासागत तो त्यांना भासला.त्या उजेडात मात्र पावसाच्या बरसणाऱ्या धारा दिसल्या.रस्त्यात त्यांना कुणीच दिसेना .यावरून आज झगारीत व पावसात वेळ आपणास न कळल्यानं आपण लवकर आल्याचं त्यांनी ताडलं.

 

बस स्टॅण्डवर येताच सर्व खुंटे रिकामेच होते.विचारतंद्रीत गाय उभी राहताच त्यांनी वासरूचा दोर सोडत गाईच्या गळ्यातला दोर काढत खुट्यास अडकवला.वासरू ढुशी मारत चुरु चुरू कास चोसू लागलं.दाजीनं गाईच्या पायात बाहुलं(दोर)अडकवलं.वासरूच्या तोंडातले स्तन पलटवत गाय पान्हा सोडण्याची ते वाट पाहतांना आपण गाय बांधली तो खुंट किसन तात्याच्या विठोबाच्या गाईचा असल्याचं लक्षात येताच सखा दाजीस ओल्या कापडातही घामोट्यानं गरमाई भासू लागली.त्यांनी वासरास खुटीला अडकवलं.आच बादलीतल्या पाण्यानं स्वच्छ दूत बादलीची कडी वाजत"पोपट्या फेकलं रं पाणी बघ की बादलीsssssss"अंधारातच हाकाटी भरली.कॅनीच्या हारीआड खुर्चीत पेंगाळलेल्या पोपट्यानंही अंधारातच "दाजी चालू द्याsss"म्हणत दुजोरा दिला.


चर्रचर्र आवाज व फेस करत दूध बादलीत पडू लागलं.गाय वासराला चाटू लागली.तोच गाईनं बाहुलं दिलेले पाय झटकत कान हरणीगत तट करत हंबरडा फोडत कावरी बावरी होऊ लागली.वासरू ही खुंट्यास हिसका देत शेपटी वर करत गोंडा ओंजारू लागलं.गुडघ्यातली बादली हातात घेत उभं राहून मागं सरकत चक चक करत सखा दाजी गाईला अचानक काय झालं पाहत चुचकारू लागले.गाय कावरीबावरी होत शांत होताच दाजी पुन्हा खाली बसत धार काढू लागले.पुन्हा तेच.आता तर गाईनं मागचे दोन्ही पाय आळीपाळीनं झटकत उंडारत बाहुल्यातून पाय मोकळे केले.दुधाची बादली डबकता डबकत पडल्याची राहिली.दाजीनं गाईवर संतापत हाताच्या कोपरानं दणकारलं.पण तोच सात आठ फुटावर त्यांनी अंधारात जे पाहीलं त्यानं त्याच्या हातातली दुधाची भरत आलेली बादली खाली दाणकण पडत चिखलात दूध वाहू लागलं.गाईनं दोर तुटत नाही पाहताच असा काही हिसका दिला की विठोबाच्या गाईचा खुटाच उखळला.गाय दोराला लटकलेला खुटा ओढत चौकात चौखूर उधळू लागली. 

" दाजी मी धरून आणू का गाईला? मग तुम्ही धार काढा हवं तर!"


डोक्यावरच्या उपड्या बादलीत तोंड दिसत नव्हतं.पण दहा बारा वर्षांच्या पोराची पांढऱ्या कपड्यातली आकृती जवळच उभी होती.दाजी घामानं लथपथ होत जागच्या जागी सुमडीत मख्ख उभे.वासरू खुट्याला जीव तोडून हिसका देत होते.गाय चौकात धावतच होती.

"दाजी डोक्यातली बादली काढानं एवढी मग मी गाय धरतो."बादलीतच आवाज घुमला.

"आरं सखा दाजी काय झालं.गाय का उधळली? पोपट्या जागेवरनंच विचारता झाला पण सखा दाजीला काय बोलावं, काय करावं सुचेचना.डोक्यात बादली अडकवलेली ती पांढरी आकृती दहा बारा वर्षाचं पोर पुढं सरकू लागताच "पोप...पोप..पोपट्या"किंचाळत सखा दाजीनं गावात धूम ठोकली. थोड्या वेळानं गाय धावत धावत हळूहळू सुस्तावत वासराजवळ आली.वासरू कासेला लागलं व पोट भरून दूध प्यालं.पण सखा दाजी का पळाला हे पोपट्याला कळालंच नाही.चार वाजेपर्यंत गावातले लोक आपापल्या गाई म्हशी घेऊन येऊ लागले.पण गाई म्हशीना काय दिसत होतं हे सखा दाजीशिवाय कुणालाच कळेना पण एकाही गाई म्हशीनं पुरती धार काढू दिली नाही.साडे चार पर्यंत गाई म्हशी फुसफुसत तटातट दोर तोडत होत्या तर काही खुंटच उखळत होत्या.दुध गाडी आली पण वीस कॅन नेणारी गाडी आज चार पाचच कॅन घेऊन परतली."पोपट आज दूध का कमी रं?" विचारल्यावर "पावसानं आज जनावर उधळलीत की ? दूधाची धारच काढू दिली नाही!"असं थातुरमातुर उत्तरत पोपट तपकीर लावत दुधाचा डबा घेत घरी परतला.


सहा वाजता सूर्य उगवताच रात्रीच मुक्कामाला आलेले किसन तात्याची मुलगी बानाई आक्का व जावई आपल्या कारनं गावाला निघाले. पण स्टॅण्डवर येताच गाडी बंद पडली.सेल मारूनही गाडी स्टार्ट होईना. जावयानं दार उघडत पावसात गाडीच बाॅनेट उघडलं. वायर हलवत, चाळत इकडं तिकडं बोटं फिरवली. बाॅनेट लावत त्यांनी गाडीत बसत सेल मारला. गाडी भुरु्ंर्रुंग करत सुरू झाली.तोच पुढे बसलेल्या बानाईचं मागच्या दरवाज्याकडं लक्ष गेलं.दरवाजा उघडा दिसताच

"अहो मागचा दरवाजा उघडाच आहे इंडीकेटर पहा"

"कोणी उघडला तो?तू का?" पतीनं विचारताच बानाईंनं नकारार्थी मान हलवली. दरवाजा लावत गाडी निघाली.पण बानाईला प्रवासात मागच्या सीटवर कुणी बसल्यागत वारंवार हालचाल व भास जाणवू लागले. तिनं नवऱ्यास तसं सांगितलं ही. पण "रात्री तात्यासोबत उशीरापर्यंत गप्पा मारत जागली म्हणून जागरणानं तुला भास होताहेत"म्हणत तिच्याकडं दुर्लक्ष केलं. पण बानाईला मात्र मागच्या सीटवर कुणी तरी बसल्याचं जाणवतच राहिलं......


Rate this content
Log in