Vasudev Patil

Others

3  

Vasudev Patil

Others

फितुर आभाळ

फितुर आभाळ

7 mins
737


लाल डब्बा गाडी घरघर करत झर्रेवाडीच्या स्टॅण्डवर रात्रीच्या आठला पडत्या पावसात थांबताच वाहकानं 'चला झर्रेवाडी,उतरा पटापट'म्हणतच आरोळी ठोकली.दुलबानं छोट्या सुमीला व बालाला दरवाज्याकडं ढकलत एका हातात काठी,छत्री व दुसऱ्या हातात आपलं कपड्याचं गठुळं घेत 'थांब रे बाबा,आम्हाला उतरू दे'म्हणत उतरू लागला.मुलं व म्हातारा उतरताच वाहकानं झटक्यात दरवाजा लावत टिणटिण डबल बेल दिली.गाडी पडत्या पावसात पर्रेवाडीकडं सुसाट निघाली.दुलबा छत्री उघडत दोन्ही मुलांना सांभाळत सोनेवाडीच्या रस्त्याला लागला.गठुळं बालाकडं देत सुमीला कडेवर घेत चिखलातून वाट धरली.झर्रेवाडीपासुन सोनेवाडी दोन मैलावर तापीकाठावर वसलेली.शेवटची मुक्कामाची बस पावसाळ्यात सोनेवाडीला जात नसे.म्हणुन आता दोन मैल दुलबाला पायीच जावं लागणार होतं. झर्रेवाडी मागे टाकतांना अंधारात कुत्री भुंकत होती.माणसं झडीमुळं जेवण आटोपून घरात झोपण्याची तयारी करत होते.पाच वर्षाची सुमी बाबाच्या कडेवर गपचीप बसुन लुकलुकत्या भेदरल्या डोळ्यानं अंधाराकडं पाहत होती तर नऊ वर्षाचा बाला गठुळं धरुन बाबाच्या मागंमागं चालत होता.गाव ओलांडलं तसं पावसानं जोर धरला.पाऊस सैनधार बरसु लागला.धाराच्या आवाजात रातकिड्यांचा आवाज मिसळू लागला .त्यात वारा भरारा वाहत असल्यानं दुलभाचीही हिम्मत बसु लागली.अंधाऱ्या पावसाळी रातीत पायी जावं की थांबावं?थांबावं तर एवढ्या राती कुणाकडं?

"बाबा भिती वाटतेय ,शिवाय पाऊस ही.थोडं थांबू ना झाडाखाली"बाला विनवू लागला.

 दुलबा रस्त्याच्या कडेला वडाच्या झाडाखाली पोरांना घेऊन बसला.वडाखाली झर्रेवाडीतले वीर, मुंजे हारीनं मांडलेले.एरवी दुलबा असल्या वावदुक जागी लहान पोरांना घेऊन थांबलाच नसता.पण आता नाईलाज होता.जिथं पोटच्या पोरांनं दगा दिला म्हटल्यावर आणखी या दगडाच्या मुर्त्या काय वाईट करणार.पोरांना जवळ घेत त्याच्या आटलेल्या डोळ्यात आसवं वाहू लागली.

  झर्रेवाडीकडंनं बैलांचे घुंगरू ऐकू येऊ लागले.दुलबाला हायसं वाटलं.कुणाची तरी बैलगाडी येत होती.दुलबानं पोरांना उठवत छत्री गठुळं घेत रस्त्यावर आला.

"आरं बाबा सोनेवाडीला चालला का?आम्हालाही बसव रे बाबा.हात जोडतो."दुलबा किलावण्या करु लागला.गाडीतल्या मारत्याला अंधारात ओळखीचा आवाज येताच त्यानं बैलाचे कासरे ओढत गाडी थांबवली.

"आरं कोण? 'बा'तु!आणि या वक्ताला इथं कसा?जळगाववरनं कवा आलास?

मारत्यानं खाली उतरत दोन्ही पोरांना उचलत गाडीवर बसवलं,दुलबाला खांद्याचा आधार देत चढवलं व गाडी हाकलली.

"मारत्या देवासारखा आलास बाबा एवढ्या अंधाऱ्या रातीत!नाहीतर पोरांचे हाल झाले असते.तुझे उपकार झालेत बघ"

"बा!तुझ्या अन्नावर तर हा मारत्या वाढलाय.आता बोलून मारू नको.आता रातभर माझ्याकडंच चला"

दुलबाला ही मनात एक प्रश्न सतावतच होता की दिड दोन वर्षानंतर आपण गावात परततोय.घर बंदच .मग पोरांना ?पोरं तर सकाळपासून उपाशी.पण तरीही मारत्या हातावर पोट असलेला.त्याच्याकडं कसं जायचं?

"मारत्या पोरा, असं कर आधी किसनादा कडं जावू.तिथं सोय झाली नाही तर तुझ्याकडं येईन"

मारत्याला माहित होतं बा आपल्याकडं येणार नाही म्हणुन त्यानं गाडी किसनदा कडं नेली.अंगणात गाडी उभी करत किसनदाला साद घालत उठवलं.किसनदा झोपण्याच्या बेतातच होता.एवढ्या राती पावसाचं कोण आलं ?असा विचार करत बाहेर आला.

"दादा आपले बा आलेत,दुलबा बा!"मारत्यानं पोरांना गाडीतून उतरवतच सांगितलं.

"आरं लेका,माझा दुलबा!मग अंगणातून काय विचारतोय!आण की वर.पावसात काय भिजवत ठेवलंय"

किसनादा नं भिजलेल्या दुलबाला ओट्यावरच मिठी मारली.मारत्यानं पोरांना घरात नेलं.नी मग रजा घेत निघाला.सोजरताईनं तेवढ्या राती चूल पेटवून स्वयंपाक केला.साऱ्यांना आग्रह करून करून वाढू लागली.पोरांना अधासीपणानं जेवतांना पाहताच दुलभाचा संयमाचा बांध फुटला.त्यानं ताटाचा पाया पडत तसाच उठला व बाहेर हात धूत रडू लागला.किसनाला कुणकुण होतीच तरी बा अचानक उठलेला पाहताच त्याला कळेना .त्यानं सोजरला "पोरांना भरपेट खाऊ घाल"सांगत ओट्यावर बा कडं आला.

"किसना,मी काय पाप केलं असेल की माझ्या पोटी धनासारखी अवलाद जन्माला यावी.चांगली सर्व सोडून जात आहेत.मी पण केव्हाच गेलो असतो रे पण या चिल्ल्या पिल्ल्यात जीव अडकलाय रे !"

किसनाला काही तरी पक्कं बिनसलंय हे कळू लागलं.

"बा,जे काही असेल ते आपण सकाळी बोलू.मी आहे ना"

"आरं भावा तुझ्याकडं पाहुनच मोठ्या आशेनं परत गावात आलोय!नाहीतर जळगाव वरनं सकाळी निघतांनाच पक्कं ठरवलं होतं की आधी या बछड्यांना....नी मग...."

"बा!गप्प आता .रातीच्या वक्ताला असलं वंगाळ बोलू नकोस.आलास ना माझ्या भरोशावर .बस् मग तुला माझी आण हाय."

म्हणतच किसनानं बा ला आपल्या छातीशी लावलं.

दुलभा यमुना गेली,आपला संता पोरगा व सुन गेली तेव्हाही रडला नसेल एवढा रडू लागला.किसनादा आपल्या जिवाभावाच्या मित्राच्या पाठीवर हात फिरवत त्याचा दुःखाचा भर ओसरू देत होता.

पोरांनी जेवण आटोपलं व दुलबाकडं आली.पोरांना पाहताच दुलबा शांत झाला.पोरं दिवस भराच्या प्रवासानं थकल्यानं लगेच आजोबाजवळ झोपी गेली.मग दुलबा व किसना बरीच रात्र बोलत बसली.

 किसना दा आपल्या मित्राला धीर देत होता पण तरी या पोरांचं भविष्य काय?या विचारानं किसनादाच्या काळजातही धस्स होत होतं.कारण दुलबा उतरत्या वयाचा,त्याचा भरोसा नाही व धना,त्याचा सासरा हणमंतराव व साडू रंजननं दुलबाचं सारं होतं नव्हतं ते हडप केलं होतं.नऊ-दहा एकराचं पाणी पितं रान त्यांनी घशात घातलंय.आता या पोरांचा वाली कोण?

बाजी?

कुठाय तो?

जिवंत आहे की नाही ते ही कुणास ठाऊक नाही?

पण काही झालं तरी आपला जिवात जीव आहे तो पर्यंत तरी आपल्या या मित्रास हिम्मत देत सांभाळायचं पुढे पोरं नी त्यांचं प्रारब्ध असा विचार करत किसनादा झोपला.

 पण दुलबास झोप येईना.तो या कुशीवरून त्या कुशीवर तर कधी बाला व सुमीला कुशीत घेत अंथरुणात तळमळू लागला. त्याला आपलं आयुष्य पटलावर दिसू लागलं.

          १

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::


सोनेवाडी गावापासुन एखाद मैलावर तापी माय तट्ट फुगलेली व बॅक वाटर उसासा टाकत दोन्ही काठावर फैलत होतं.हणमंत राव आज एकदम खुशीत होते.दोन्ही जावयांना हाताशी धरत आपण दुलबाचं नऊ एकर एक ठावी जेवनाच्या थाळ्यागत रान कुठलीही तोशीश लागू न देता कसं हस्तगत केलं,यानं ते भलतेच रंगात होते.धाकट्या जावयानं-रंजननं त्या रानात मत्स्य शेतीचा प्लाॅंट,म्हशीचा तबेला टाकलाय.निनिराळ्या जातीची आंब्यांची कलमं लावलीय.नदीवर खालच्या अंगावर चार-सहा मैलावर बांधलेल्या बॅरेजचं पाणी नदीत तुडुंबलंय.आता इथंनं सोनं गोळा करायचंच काम.पण मळ्यात माणसं टिकत नाही.हाच मोठा पेच झालाय.

झालं ही तसंच होतं.

रंजननं मत्स्य तलाव कोरण्यासाठी जेसीबी आणले.जेसीबी चालवणारे पोरं बिहारी होते.चांदण्या रातीत ते जेसीबी चालवू लागले.रात्र चढू लागली तसं जोरानं काम सुरु झालं.बारा वाजले.पोरांनी काम थांबवलं व जुन्या विहीरीवर पाणी पिण्यासाठी जाऊ लागले.चंद्रप्रकाशात त्यांना विहीरीच्या धावेवर कुणी तरी पाठमोरं बसलेलं दिसलं.त्यांना वाटलं गावातलंच कुणी तरी असावं म्हणुन ते जाऊन गुपचुप पाणी काढू लागले.

 तोच त्या माणसानं मागून येऊन धाडदिशी विहीरीत उडी मारली.पाणी चिबडाक⚡✨⚡✨चुबुडुबु डुबुक करत भिंतीवर उडालं.पोरं आरोळ्या मारत "बचाव, बचाव"आरडू लागली.पण तोच माणुस धावेवर मागं बसलेला पुन्हा दिसताच पोरांनी पळ काढत जेसीबीवर बसत पोबारा केला.

रंजनने दुसरे जेसीबी लावुन दिवसा तलावाचं काम केलं.

म्हशीसाठी व पोल्ट्री फार्म साठी शेड बांधण्याचं काम सुरु केलं.भिंती चढू लागल्या.वरती जाळ्या ठोकल्या जाऊ लागल्या लागल्या.राहिलेलं काम माणसांनी रात्री करायचं ठरवलं.सध्याकाळी साऱ्यांनी नदीत मनसोक्त डूंबत अंघोळी केल्या .मासे घेतले व मव्हाची आणून पीत पीत भरपेट मासे हाणले.रात्री पत्रा ठोकू लागले.गप्पा सुरु काम सुरु.त्यात त्यांना कुणीतरी एक जण वाढलेलं दिसलं.मव्हाच्या धुंदीत प्रत्येकाला आपल्याला चढलीय व भास होतोय असंच वाटत राहिलं.नी मग पुरी रात्र हे ठोकत राहिले व तो माणुस पत्रा उतरवत राहिला.पहाटे पहाटे थंड हवेने अंगातली उतरू लागली नी मग त्यांना प्रसंगाचं गांभिर्य लक्षात आलं.हळू हळू ते खाली उतरले.तोच तो माणुस आता जाळ्या काढत भिंती लाथ मारून मारुन पाडू लागला.आठ दहा दिवस एवढ्या मजुरांनी दिवसा राबुन उभारलेलं काम त्यानं सारं जमीन दोस्त केलं.माणसांनी वाट सापडेल तिकडं पळायला सुरुवात केली.मागून त्यांच्या कानावर सारख्या आरोळ्या येत राहिल्या"सुक्काडीच्यांनो माझ्या रानात शेड उभारतात?तेही मला न विचारता?"

माणसांनी कामास सपशेल नकार दिला.मग रंजनने स्वत:उभं राहत नविन माणसं आणुन काम पुर्ण केलं पण दिवसाच.

 काम पुर्ण होताच तबेल्यात चाळीस म्हशी आणल्या.पोल्ट्रीत कोंबडीची पिल्लंही त्याच दिवशी आणली.व म्हशीच्या देखभालीसाठी व पोल्ट्री साठी सहा-सात माणसं त्याच रात्री मुक्कामाला थांबली.आमोशाची रात्र.मळ्यात म्हशींचा व कोंबड्यांच्या पिलांचा चिवचिवाट सुरू झाला.पण तरी साऱ्या मळ्यात स्मशान शांतता वाहत होती.तापी काठानं जणू भयाण अंधार वाहत येत असावा.माणसांनी ट्रक्टरवर आणलेला हिरवा घास कापुन म्हशींना टाकला.पिलांना मक्याचं खाद्य टाकलं.व तिथेच बसली.तोच त्यांना विहीरीजवळच्या जुन्या आंब्यावर खुडबूड जाणवली.त्यांनी दचकून बाहेर येत पाहिलं.जवळच तापीकाठावर जुनी स्मशान भुमी होती जी आता पाण्याखाली गेली होती. बॅरेज बनण्याआधी आजुबाजूच्या आठ दहा खेड्याची प्रेतं या ठिकाणीच दहनासाठी येत.पुरी तापी कोरडी व्हायची पण इथं पाणी आटायचंच नाही.सारे या जागेला विश्वतिर्थ म्हणायचे.पण आता बॅक वाटरनं ही जागा पाण्याखाली गेल्यानं काही लोक दुसरीकडं प्रेत नेऊ लागले तर काही इथंच आणत वरती काठावर दहन करू लागली.आजही प्रेत जळत होतं त्या माणसांना दिसलं.पण ती सारी नवीन असल्यानं त्यांनी तिकडे दुर्लक्ष करत परत मध्ये आली.तोच साऱ्या म्हशी अचानक उठत बांधलेल्या साखळ्यांना हिसका देऊ लागल्या व जोर जोरानं रेकू लागल्या.माणसांनी जोजारत म्हशींना शांत करण्याचा प्रयत्न केला.थोड्या वेळानं कावऱ्या बावऱ्या पाहत म्हशी शांत उभ्या राहिल्या.तोच म्हशीसाठी आणलेले तीन रेडे आता ताड ताड उड्या मारत लाथा झटकू लागले व डिरक्या फोडू लागले.शिंगांनी भिंतीला धडका मारू लागली.माणसं घाबरली.आंब्याची हालचाल, म्हशी-रेड्यांची हालचाल काही तरी बिनसल्याची घंटा देत होतं.करावं काय?बराच अवधी मग शांततेत गेला.

माणसांच्या छातीची धडधड स्थिरावू लागली. ते तबेल्यातच बाजेवर बसु लागली.तोच पोल्ट्रीकडं पिलांनी जोराचा चिवचिवाट सुरु करत आकांत मांडला.माणसं भांबावून उठली व सर्वजण एकत्र होत तिकडे जाऊ लागली.पोल्ट्रीत जाताच पुन्हा आवाज जादू केल्यासारखा शांत.जुन्या जाणत्या माणसानं पुरतं ओळखलं कुणी तरी इथं वावरतंय जे या जनावरांना हुल भरतंय पण आपणास दिसत नाही.

  तोच त्याच्यातला एक पोरसवदा बोबड्या बोलात हातानं ढुसी देत तबेल्याकडं पहायला इशारत करू लागला.

तबेल्यातल्या लाईटच्या उजेडात त्यांना स्पष्ट दिसू लागलं.

बाई म्हशीची धार काढत होती तर एक माणुस म्हशीचं पारडू सोडत होता.

"लवकर करा हो ,माझी सुमी ,बाला उपाशी आहेत.एवढं म्हशीचं निरसं दुध देऊन या त्यांना घरी"

बाईचा आवाज ऐकताच माणसांनी सुंबाल्या करत काट्याकुट्यातून झरपडत सोनेवाडीऐवजी रंजनकडं रांजणेवाडी गाठत सारा प्रकार सांगितला.दुसऱ्या दिवशी मळ्यात एक ही म्हैश वा पिलू जागेवर नव्हतं.साऱ्या म्हशी शिवारात उंडारत होत्या ..

त्या दिवसापासून रंजन , धना व हणमंतरावांनी रात्री मळ्यात जायचंच नाही .जे करायचं ते दिवसाच हे पक्कं ठरवलं.म्हशी ऐवजी मत्स्य तलाव राहू दिला व इतर फळ झाडांची लागवड केली.

पण ज्या रानासाठी संता व जना चा जीव गेला ते यांना कितपत सुखानं राहु देणार?


  क्रमश:.....



Rate this content
Log in