पंचक - भाग पहिला

पंचक - भाग पहिला

6 mins
995


पाचच्या सुमारास कुंपनाला लागुन असलेल्या जाई-जुई व गारवेल मधून येणाऱ्या थंडगार हवेत लिंबाच्या सावलीत झोपलेल्या चव्हाण सरांची झोप हलगीच्या आवाजानं चाळवली. सकाळ सत्राची शाळा बाराला सोडत जेवण आटोपून वाचन करता करता ते नुकतेच झोपले होते. तोच अचानक हलगीचा ठराविक चालीचा आवाज कानावर रेंगाळू लागला. गुरुजी उठत गेटबाहेर येऊन स्टॅण्डवर उभ्या टाळक्यांना इशारानंच विचारते झाले. 


"काही नाही गुरुजी, तात्याराव नेहेतेंच्या हवेलीतला जायाजी गेला! त्याचीच हलगी बडवली जातेय. एका दृष्टीनं बरंच झालं. तो तर सुटलाच पण वच्छाताईनी सुंता बाईसाहेबांचाही जाच कमी झाला!"

'जायाजी' नाव ऐकताच सदा गुरुजी भानावर आले. त्यांनी लगोलग शाळेत येत हात पाय तोंड धूत कपडे बदलवत ते हवेलीकडे निघाले.

 

हवेलीत गर्दी जमलेली असली तरी मरण घरी असणारी रडारड जाणवते तशी नव्हतीच.वच्छा ताई महा मुश्कीलीनं लहेर घेत घोगऱ्या आवाजात हेल काढत होती.सुंता मॅडमचा तर आवाजच येत नव्हता.हवेलीच्या जोत्यावर उतरल्या चेहऱ्यानं सयाजीराव भावाच्या दु:खानं शांत बसला होता. तोच दत्ता भटाकडंनं आलेला महादबा सयाजीच्या कानाशी लागत हळू आवाजात कुजबुजला.

"सया बापू आपला जया पंचकात सदगती झालाय. आज शनिवार चंद्रदेव कुंभ व मीन राशीत असल्यानं पंचक योग असल्याचं भटाचा दत्ताजी म्हणतोय.आणि विधी करावा लागेल असं ही सांगतोय".

दत्ता भटाचं नाव ऐकताच सयाजीची नस तडकली.आठ दहा दिवसांपासून ज्या हालचाली घडत आहेत त्यात हा दत्ताच पुढारपण करतोय हे आठवताच सयाजी कडाळला.

"त्या दत्त्या भटाला ठेंगा समजत नाही.कसला उठलाय पंचक बिंचक नी कंचक! माझ्या जयाप्पा जाचातून मुक्त झालाय नाही करायचा विधीबिधी!"

महादबा नमतं घेत त्यास समजवत "बापू ऐक जरा डोकं शांत ठेव,दु:खाचं तोंड आपलं!नी विधी म्हणजे काय तर पाच कणकेचे बाहुले घडवून अग्नीडाग देताना दहन करायचे एवढंच .त्यात काय जातंय."

"महादबा! नाही सांगितलं ना.नाही म्हणजे नाही.पाच बाहुल्यानं काय बला टळणार ?त्या दत्ताला म्हणावं पाच काय दहा बाहुले जाळू आम्ही पण त्यानं जया परत येण्याची हमी घे म्हणावं!" सयाजी संतापत फुत्कारला.

"आरं बापू तसं नाही पण जुनी जाणती म्हणत्यात की पंचकात माणुस गेला तर पाचदा त्याची पुनरावृत्ती होऊन त्याच्या जवळची माणसं नाहकच बळी जातात.म्हणून धोका पत्करण्यापेक्षा विधी केलेला बरा."

महादबा व गावातली जुनी टाळकं सयाजीला समजावत होती पण सयाजी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. सदा चव्हाण सर एका कोपऱ्यात बसले होते.मध्यंतरी सयाजीचं लक्ष सदा गुरुजीवर गेलं.तरी सयाजीराव रागानं धुमसत आपल्या कडं पाहत आहेत असंच गुरूजींना वाटलं. कारणही तसंच होतं. 


दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत गावाजवळील नदीवर बांधल्या जात असलेल्या धरणाकडं जयाजीला सयाजीनं चार वर्षाच्या आपला पुतण्या बाल्यास कडेवर घेत भडाग्नी दिला.साऱ्यांनी पुन्हा विनवत पाच कणकेच्या गोळ्यांना जयाजीच्या चितेत छातीजवळ ठेवायला लावलं.पण सयाजीनं दत्ता चा उध्दार करत कणकेचे गोळे लाथेनं तुडवले. ज्वाला आकाशात झेपावल्या.तिकडं दत्ता भटाला हे समजताच "आता नेहेतेंच्या कबिल्यात किती सुतक लांबतं याचं काही खरं नाही.व पाच जाणारे बळी कोण हे ही सांगता येत नाही.सुक्काळीच्यांनो येणारा परिणाम भोगायला तयार रहा!त्या सयाजीनं जे केलं ते चांगलं नाही केलं."

 गावात विशेषता नेहेतेंच्या भाऊबंदकीत भितीचं वातावरण पसरलं.

 

दुपारनंतर पडल्या पडल्या सदा गुरुजींना महिन्यापूर्वीचा प्रसंग आठवला.त्यातल्या त्यात विरंगुळत ते मागं मागं घुसू लागले. सातारहून एवढ्या लांब नोकरी स्विकारून या 'तारणी'त आपण आलो.शाळा फार रया गेलेली.आधीचे दोन्ही सहकारी निवृत्तीला आलेले .म्हणून नुसतं आलेला दिवस ढकलणं.ना पट ,ना उपस्थिती ना काही. सदानं फिर फिर फिरून एकेक पोरं जमवली.साऱ्यांचं एकच पालुपद ठरलेलं."गुरूजी का एवढा आटापिटा करता,शाळा धरणात तर बुडणार मग का उगाच ध्याई करता जिवाची एवढी!"

"आरं बाबांनो धरण होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत तर पाठवा पोरांना.नी धरणात ही इमारत बुडेल शाळा नाही बुडणार काही.ती तर कुठं तरी बांधली जाईलच.मग शिकलेलं कुठं वाया जाणार."

 त्यात शिक्षण प्रवाह बदलला, डिजीटल चं नविन वारं आलं.प्रशासन लागलं गुरूजींमागं.लोकवर्गणी गोळा करा ,स्वत: टाका ,फिरा काहीही करा पण शाळा डिजीटल करा.नुकतीच रुपडं धरू पाहणारी शाळा सोडून हे नविनच फ्यॅड आलं नी सदा गुरूजी वयस्कर व उमेद हरलेल्या सहकाऱ्यांना घेऊन गावात फिरू लागले.पण लाखाचा प्रश्न.देणार कोण.फिरुनही हाती काहीच लागेना.कुणीतरी वच्छा ताईंना भेटायचं सुचवलं.

सदा गुरुजींनी वच्छाताईंची भेट घेण्यासाठी हवेली गाठली.

"कोण हवंय?" अंगणात उभ्या सयाजीनं गुर्मीतच विचारलं पण काही ऐकण्याआधीच घाईत निघून गेले.

साठी पार केलेल्या वच्छा ताईंनं सदास बसवून चहापान करत ऐकून घेतलं.

"ताई तात्यारावांच्या स्मर्णार्थ काही मदत करता आली तर पहा.पुण्याचं कामही होईल व तात्यांचं नावं ही"

"गुरुजी ! जाणारा जे द्यायला हवं होतं ते सोडून भरपूर देऊन गेला व जाच ही लावून गेला.तरी असो.शिक्षणासाठी आलात मी विन्मुख करणार नाही.पण तरी मी सुनिताला विचारते नी मग ठरवते"

"ताई लवकर करता आलं तर पहा!वरून सारखा तगादा आहे म्हणून"

"गुरूजी मग तुम्ही जिल्ह्याला जरी तिला भेटलात तरी हरकत नाही.माझी ना नाही पण तिला एक शब्द विचारावा तर लागेल!"

सदा सरांचं अनायासे जिल्ह्याला प्रशिक्षण लागलं.ते गेले.हा विषय डोक्यातून तात्पुरता बाजूला झाला.

 प्रशिक्षणात दोन दिवसानंतर नाश्ता करतांना एक चेहरा सारखा आपल्याकडं पाहतोय याची सदा सरास जाणीव झाली.ते नजर जाताच नजर वळवू लागले पण पुन्हा त्यांचीही नजर जाऊच लागली. संध्याकाळी प्रशिक्षण सुटलं .

"जरा थांबता का!आपण सदा चव्हाण का?"

आपल्या नावाचा उल्लेख होताच सदा सर बावचळले.

"हो.का?"

"नाही तसं काही नाही पणं तुम्ही तारणीला आहात ना! ते आमचं गाव.व ताईंचा निरोप होता की..."

"अरे हो.आपण सुनिता मॅडम का? आलं लक्षात." सदा सर आता बेफिकीर झाले. 

"तुम्ही असं करा परवा हवेलीवरच या. मी पण येतेय तारणीला .मग ताईंसमोरच वर्गणीचं बोलू"

"मॅडम , ताई तर मदत करणार आहेतच फक्त तुमची परवानगी हवीय त्यांना"

"सर तुमचं डिजीटल क्लास होईल एवढी मदत खचितच करेन मी! पण तरी ताईंच ठरवतील! म्हणून या परवा.नी तेवढीच पुन्हा भेट ही होईल त्या निमीत्ताने!"

सदा सरांना नजर का शोधत होती ते कोडं उडघडलं पण तरी ताई या बयेचं नाव सांगता तर ही बया ताईंचं नाव सांगत आहे.मदत देणार की नुसती टोलवा टोलवी साठी आपणास ..!


प्रशिक्षण आटोपून सदा सर हवेलीवर पुन्हा गेले. या वेळेस जोत्यावर बाज पडली होती व बाजेवर नुसता हाडाचा सांगाडा किंवा अस्थीपंजर देह म्हणावा तसा पडलेला होता.अंगावरचं मांस पूर्ण क्षिणलेलं. तोच हा जयाप्पा ज्याला आपण पहिल्यांदाच तेव्हा बघितलं.

"काय दिना मास्तर !काय काम वैगेरे करता की नाही का नुसत्या चकाट्या पिटत घरं धुंडाळता!" हाफत हाफतच जयाप्पाने सोबत असलेल्या दिनकर गुरूजीवर हल्ला चढवला.

"अप्पा ताईंना भेटायचं होतं म्हणून आलोय!" नरमाईंनं दिनकर गुरूजी उत्तरले.

सदा गुरूजींना राग आला पण तितक्यात सुंता मॅडम हसतच बाहेर आल्या.

"या बसा!" म्हणत त्यांनी खुर्च्या मागवल्या.ताईपण आल्या.

"दिना मास्तर काय काम ते तरी सांगशील की नाही?" जयाप्पा खोकल्याची उमळ दाबत विचारता झाला.

"अप्पा वर्ग डिजीटल करायचाय.त्यासाठी तात्यांच्या स्मरणार्थ मदत हवीय!"

"अरे मग थोडं थांबा ना.तात्याच्या नावानं वर्ग होईल.पण थांबलात तर माझ्या स्मरणार्थ ही सुंता आख्खी शाळाच डिजीटल करेल .फक्त काही दिवस कळ मारा ना!"

 सदा सरांना ऐकूनच गरगरायला झालं.क्षणात सारं वातावरण बदललं.सुंता मॅडमांच्या कपाळावर आठ्याचं जाळं पसरलं.ताईंना मेल्याहून मेल्यागत झालं.सदाला उठावं का थांबावं हेच कळेना. दिनकर गुरूजी तर मारक्या बैलागत सदाकडं पाहत 'यालाच सुधारणाचा मोठा पुळका आला होता.घे आता.' या बेतानं खाऊ की गिळू करू लागले.

ताईंनं कोंडी फोडली.

"गुरूजी जयाप्पाचं बोलणं मनावर घेऊ नका.एका वर्गाचं बजेट काढा व तितकी रक्कम घेऊन सुनिता ला मदतीला घेत साहित्याची खरेदी करा"

 सदा सर उठले.

सदा सरांना सारं आठवताच एका अर्थानं जयाप्पा गेला हे बरंच झालं.असा विचार करत ते उठून बसले.पण मनातले विचार काही थांबेतना मग त्यांनी चहा घेत दत्ता भटांचं घर गाठलं.

"गुरूजी,नेहेते खटलं आता सुतकातून लवकर मोकळं होणारच नाही.लिहून ठेवा.पाच बळींची पुनरावृत्ती जया करेलच.या सयाजीस पाच बाहुले जाळण्यात काय अडचण होती?आता हा भोगणारच" गेल्या गेल्या दत्ताजीनं तोंडाचा पट्टा सुरू केला.

"गुरूजी मी सांगतोय हा मेला तो जया जिवंत असेपर्यंत साऱ्यांना छळला तर पंचकात मेल्यावर काय सोडणार?"

 नी दत्ता भटानं जयाचं पुराण सुरू केलं.

 त्यांनी जया व सयाबाबत इत्यंभूत कथन केलं.


वच्छाताईंनी जयाजीला दत्तक घेत सुंताला सून म्हणून आणलं.पण हा जया पक्का बदफैली व व्यसनी.सुंताबाई हळदीच्या अंगानं परतली ती दोन तीन महिने आलीच नाही.याला ही सुंता नकोच होती.पण वच्छी काकीची जमीन मिळावी म्हणून यानं होकार दिलेला.दारूत तर्र राहणाऱ्या दोन्ही भावास खूपच चरबी होती.सालगड्याच्या भाकरी शेतात द्यायला जातांना घोड्यावरून फेकायचे हे!अन्नदेवतेचा घोर अपमान.शिवाय मजुरांनाही घोड्यावर बसूनच लाथेनं तुडवायचे.पण नियतीनं बदला घेतलाच.लग्नानंतर दोन महिन्यातच किरकोळ आजारी पडल्याचं निमीत्त झालं.ताप उतरेच ना.साऱ्या तपासण्या झाल्यावर डाॅक्टरांना शंका आली व चाचणी पाॅजीटिव्ह आली.जयास एड्सचं निदान झालं.तो तर हादरलाच पण वच्छा ताईपण.सुंताला मात्र काहीच फरक पडला नाही.ती येतच नव्हती.पण तिचीही मजबूरी नी नाक घासत तिला यावं लागलं.बाल्या झाला.पण आता चार पाच वर्षात सुंतानं जयाला फडकूच दिलं नाही.जया दिवसेंदिवस क्षिण होत गेला.असा जयाजी जाण्याचीच सारी वाट पाहत होते.पण जो जितेपणी साऱ्यांना नडला तो मेल्यावरही पंचकात गेल्यानं नडेलच.


भटाकडंनं सदा गुरुजीला बरच काही नविन कळालं.सदा गुरूजी शाळेत आले व जेवण करून सुंता बाईचाच विचार करत झोपले.दुसऱ्या दिवशी दहा वाजत नाही तोच शाळेत दत्ता भट धापा टाकतच आले.

"सदा गुरू,मी सांगितलं होतं ना! लेका हो पंचक आहे विधीवत अत्यंविधी करा. पण दीडशहाणे ऐकत नाही.भोगा म्हणावं आता!"

"सदाला काय झालं समजेना.

"अहो दत्ताजी झालंय तरी काय ते तर कळू द्या!"

"काय होणार आणखी! जयाजीचा मुलगा 'बाल्याला' झोळीच्या दोराची फाशी लागली व पोरगं गेलं. नेहेते खटल्याचं सुतकं लांबलं. पंचकाचा पहिला बळी!"

"काय! बाल्या गेला?पण फाशी लागली म्हणजे नेमकं काय?"

सदा सरांना धक्काच बसला.

.

.

"सदा सर एवढ्यात बिचकू नका.अजुन तर असे चार धक्के झेलायचेत तारणीला! नी नी तो बाल्या जयाचा नव्हताच! त्याचा तोंडावळा नीट निरखून पाहिला का कधी?"

दत्ताजी धक्क्यावर धक्के देत राहिले. (क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama