नासा येवतीकर

Thriller

2.1  

नासा येवतीकर

Thriller

रमेशचे शौर्य

रमेशचे शौर्य

5 mins
2.4K


रमेशचे शौर्य


पारगावाच्या रमेशने पाण्यात वाहून जाणाऱ्या दोन मुलांचे जीव वाचविले दैनिकांत ही बातमी प्रकाशित झाली तशी रमेशचे पंचक्रोशीत नाव झाले. प्रत्येकजण रमेशचे तोंड भरून कौतुक करू लागले. पारगावाच्या ग्रामपंचायतीने देखील त्यांच्या शौर्याची दखल घेऊन त्याला सन्मानित केले. सर्वत्र त्याच्या नावाचा जयजयकार सुरू होता. रामपूरच्या प्रशालेने देखील त्याचा परिपाठात यथोचित सन्मान करण्यात आला ज्या ठिकाणी तो आठव्या वर्गात शिकत होता. रमेशला आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटत होते. रमेशच्या आईबाबांना देखील त्याच्या या शौर्याने अभिमानाने छाती फुलून आली होती. मित्रांनी देखील त्याचे फुल देऊन अभिनंदन केले. हळूहळू ही गोष्ट तालुक्याच्या कार्यालयामार्फत मंत्रालयापर्यंत पोहोचली. सोशल मीडियाने रमेशचे कार्य खूप व्हायरल केले. विविध दैनिकांनी देखील त्याची ती शौर्य कथा प्रकाशित केली. म्हणूनच पंतप्रधान कार्यालयातून रमेशला अभिनंदनाचा एक पत्र मिळाले, ज्यात त्यास यावर्षीचा बाल शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे कळविले होते. ते पत्र वाचून त्याला खूप आनंद झाला. रमेशने जे कार्य केले ते खरोखरच अभिनंदनीय आणि स्तुती करण्यासारखे होते. असे काम करायला धाडस लागते आणि स्वतःचे जीव धोक्यात घालण्याची धमक लागते. 

पावसाळ्याचे दिवस होते. सायंकाळचे तीन वाजले होते. सर्वत्र काळा कुट्ट अंधार व्हावा असं आभाळ भरून आलं होतं. शाळा सुटायला अजून एक तास शिल्लक असतांनाच जोराचा पाऊस सुरू झाला. पावसाळा सुरू होऊन एखादा महिना उलटला होता आणि एक दोन पाऊस पडून गेले होते. आज मात्र खूप पाऊस पडणार असे संकेत दिसत होते. सलग एक तास जोराचा पाऊस पडला. सर्वत्र पाणीच पाणी झाले. घंटा वाजली आणि शाळा सुटली तसे पारगावचे सर्व पोरं गावांकडे जाण्यास निघाली. काही सायकलवर होती तर काही पायी चालत निघाले होते. रमेशजवळ सायकल नव्हती. त्याचे वडील गावात रामराव पाटलांच्या मळ्यात सालगडी म्हणून काम करत. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे सायकल घेणे अशक्य होते. पारगाव पासून रामपूरची शाळा तीन किमी अंतरावर होती. पोरं हसत खेळत अर्ध्या तासात जात. सायकल वर जाणारी पोरं पंधरा मिनिटात जात. रमेश आपल्या मित्रांसोबत पायी निघाला तर बाकीचे मित्र सायकलवर पुढे निघाले होते. पारगाव आणि रामपूरच्या मध्ये एक छोटा नाला होता. जेथे की पाऊस पडला की पूर येतो. आज ही पूर येण्याची भीती होती म्हणून सरांनी मुलांना सक्त सूचना दिली होती की, पुलाच्या वरून पाणी वाहत असेल तर पाण्यातून जाऊ नका, थोडा वेळ थांबा, पूर ओसरू द्या मग जा. मुलांनी सर्वांनी होकार देऊन निघाले. सायकलवरची मुले वेगात पुढे गेली आणि नाल्याजवळ जाऊन थांबली. पाऊस खूप पडल्याने त्या नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. कोणीही पुढे जाण्याची हिंमत करत नव्हते. मात्र कृष्णा आणि सचिन हे दोघे या पाण्यातून तिकडे जाऊन दाखवणारच म्हणून शर्यत लावत होते. इतर सर्वजण त्यांना तसे करू नका, पाणी खूप जास्त आहे आणि पुराचा वेग ही जास्त आहे, तेंव्हा अशी शर्यत काही कामाची नाही. असे मुले म्हणू लागले तोपर्यंत त्या दोघांत शर्यत लागली आणि दोघे ही त्या पुराच्या दिशेने निघाले. पाऊस थांबला होता मात्र वरच्या दिशेतून पाण्याचा जोर जास्त होता म्हणून पुरातले पाणी खूप वेगाने खालच्या दिशेने फेकले जात होते. त्या पुरात पूल कोठे आहे याचा अंदाज देखील घेता येत नव्हते. कृष्णा आणि सचिन हातात सायकल धरून त्या पुरात घुसले. चार पाच पाऊल टाकले न टाकले पाण्याने त्या दोघांनाही आत ओढून घेतले आणि दूरवर ढकलण्यास सुरुवात झाली. त्याबरोबर ते दोघे वाचवा वाचवा म्हणून ओरडू लागले. बाजूला उभे राहिलेले त्यांचे मित्र हे सारे पाहत होते मात्र कोणी ही त्यांना वाचविण्यासाठी पुढे आले नाहीत. त्याच वेळी रमेश व त्यांचे मित्र चालत चालत त्या नाल्यापर्यंत आले. कृष्णा आणि सचिनचा आवाज कानावर पडता क्षणी रमेश क्षणाचाही विचार न करता हातातील दप्तर मित्रांकडे दिला आणि त्या पुराच्या दिशेने उडी मारली. अगोदर कृष्णाच्या गळ्यातील शर्टाचा कॉलर हातात धरून त्याला बाहेर काढलं आणि त्यानंतर त्याच पद्धतीने सचिनला देखील काढलं. पाण्याचा प्रवाह खूप वेगात होतं मात्र रमेश पोहण्यात खूपच हुशार होता त्यामुळे त्याने ही जोखीम उचलली आणि दोघांचेही जीव वाचविला. थोड्या अंतरावर त्यांच्या दोन्ही सायकल झाडाजवळ अडकले होते. पूर ओसरल्यावर सर्व मुले गावाकडे सुखरूप परत आली. हा हा म्हणता ही बातमी संपूर्ण गावात पाहोचली. काही पत्रकार मंडळीनी फोनवर सर्व माहिती घेतली आणि दैनिकांत प्रकाशित देखील केली. कृष्णा आणि सचिनचे आईवडिलांनी रमेशच्या घरी येऊन धन्यवाद दिले. वास्तविक पाहता कृष्णा आणि सचिन या दोघांनी रमेशला नेहमी चिडवित असत. कधी त्याच्या कपड्यावरून तर कधी त्याच्या चपलावरून ते दोघे रमेशची खिल्ली उडवयाचे मात्र यावर रमेश काही न म्हणता सोडून देत असे. हे दोघे मला नेहमी चिडवितात तेव्हा मी कशाला यांना वाचवू असे त्याच्या मनात कधीच आले नाही. एक माणुसकी म्हणून रमेशने हे कार्य केले. त्याची गरीब परिस्थिती पाहून कृष्णा आणि सचिनच्या घरच्यांनी त्याच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली. हे सर्व आनंदाच्या गोष्टी होत असताना रमेश मात्र सुरेशचे आभार मानत होता. 

उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत होता. शाळेला सुट्या लागल्या होत्या. सकाळी क्रिकेट खेळणे, आंब्याच्या झाडाला दगड मारून आंबे पाडणे आणि मीठ लावून खाणे, चिंचा पाडणे, सूरपारंब्या खेळणे आणि गावाच्या बाजूला असलेल्या नदीमध्ये पोहायाचे हा सुट्टीतील रमेशचा वेळापत्रक. सोबत त्याचा मित्र सुरेश देखील असायचा. रमेश आणि सुरेश यांची खूप दाट मैत्री होती. कारण पहिल्या वर्गापासून ते शेजारी शेजारी बसायचे आणि त्याचा हजरी क्रमांक देखील मागोमाग असायचे. सर्व खेळ खेळायचे मात्र नदीत पाण्यात पोहायचे म्हटले की, रमेश नदीच्या काठावर बसायचा आणि सर्व मित्रांचे कपडे सांभाळायचे. एके दिवशी असेच सर्व मित्र पोहण्यासाठी गेले. रमेश नदीच्या काठावर बसून राहिला होता. मात्र रमेशला काही कळण्याच्या आत त्याचा मित्र सुरेशने त्याला पाण्यात ढकलले. पाणी चांगले मानेपर्यंत होते. पण रमेशला पाण्यात भीती वाटत होती. सुरेशने त्याला पोहण्यास शिकवितो असे म्हटल्यामुळे तो पाण्यात उभा राहिला. पाण्यात पाय वर करण्याचा प्रयत्न केला की त्याला डुबल्यासारखेच होऊ लागलं. पोट खाली करून पोहणे तर जमतच नव्हते. शेवटी सुरेशने त्याच्या कमरेचा कडदोरा धरला आणि त्याला हातपाय हलविण्यास सांगितले. तेंव्हा कुठे पोहता येऊ शकते असे वाटले. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी रमेश स्वतःहुन पाण्यात शिरला, सुरेशने त्याला पोहायला शिकवित होता. काही दिवसांत रमेश छान पोहू लागला. आता नदीत मध्येपर्यंत जात होता आणि एक एक तास पाण्यात राहत होता. काही दिवसांत तो पट्टीचा पोहणारा झाला. सुरेशने पोहणे शिकविल्यामुळेच मागे पुढे जरा देखील विचार न करता रमेशने पुरात उडी घेतली आणि दोघांचे जीव वाचविले होते. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतीच्या हस्ते बाल शौर्य पुरस्कार देऊन राष्ट्रपती त्यांचा सत्कार केला त्यादिवशी सुरेश देखील सोबत होता. तो त्याचा वर्गमित्र होता पण पोहणे शिकविण्यात तो त्याचा गुरू होता. उन्हाळ्यात पोहणे शिकलेल्याचा कुठे तरी फायदा झाला याचा आनंद रमेश आणि सुरेशच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller