Gauri Kulkarni

Drama Inspirational

4  

Gauri Kulkarni

Drama Inspirational

शुद्ध बिजापोटी

शुद्ध बिजापोटी

5 mins
382


नुकतीच एक गोष्ट वाचण्यात आली एका राजाची आणि चंदनाच्या व्यापाऱ्याची. व्यापारी त्याचा धंदा होत नसतो म्हणून राजाच्या मरणाची अपेक्षा करत असतो. त्यामुळे होतं काय राजाच्या मनातही त्याला न बघता , न भेटता फाशीवर लटकवायचा विचार येऊ लागतो. गोष्टीचं तात्पर्य अस होतं की आपण मनात ज्या व्यक्तीबद्दल , जसे विचार करत असतो तशीच प्रतिक्रिया त्या व्यक्तीकडून नकळत आपल्याला दिली जाते. कारण आपल्या विचारांचे व्हायब्रेशन्स त्या माणसाच्या मनात आपल्याबद्दल विष किंवा साखर पेरण्याचं काम करत असतात. पेरलेले उगवतेच फक्त ते आपल्या फायद्याचे ठरते की नाही हे वेळ ठरवते. 

सरिता ला सुद्धा अशीच सवय होती. कुठल्याही नवीन ठिकाणी नवीन लोकांना भेटायचं अस ठरलं की तिच्या मनाचे घोडे नको त्या दिशेने उधळायचे. अशातच तिच्या नवऱ्याची बदली दुसरीकडे झाली. सध्या ज्या गावात ते राहत होते तिथे सासर माहेर जवळच होतं. त्यामुळे अडीअडचणीला मदत वगैरे सहज मिळत होती. पण आता नवीन गाव, नवीन लोक म्हटलं की सरीताच सुरू झालं नेहमीप्रमाणे. नवऱ्याने तिला आधीच सांगितलं होतं की प्रत्यक्ष कुणाचा अनुभव आल्याशिवाय कुठेही काहीही बोलू नकोस. पण ऐकेल ती सरिता कसली नवीन ठिकाणी आली की तिने नुसत्या हाय हॅलो वरून सगळ्या शेजारच्या लोकांबद्दल बोलायला सुरुवात केली. पाटील असे, पवार तसे वगैरे वगैरे. हळूहळू ज्या शेजारणी तिच्यासारख्या होत्या त्यांच्याशी तिचं गुळपीठ मस्तच जमलं. रोज मुलं, नवरा शाळा ऑफिसमध्ये गेले की एकमेकींना आवाज देत त्या सगळ्या जमू लागल्या. बायको रमली म्हणून नवराही काही म्हणत नसे. अशातच सोसायटी मध्ये एक नवीन कुटुंब राहायला आलं. नवरा बायको दोघेचजण 2,3 दिवस घर लावण्यात गेले मग तीही ह्या सगळ्या जणींमध्ये मिसळू लागली. ह्या काळात सरिता नवरा आणि मुलासोबत गावी गेली होती त्यामुळे तिला काहीच कल्पना नव्हती. गावाहून आल्यानंतर जेंव्हा सरिता नेहमीप्रमाणे गप्पा मारायला आली तेंव्हा नव्या शेजारणीचा विषय निघाला. कुणीतरी म्हणत होते किती छान राहते न ती, घरही टापटीप असतं. कौतुक सुरू होतं. तितक्यात सरीताची जिवलग मैत्रीण वनिता म्हटली त्यात काय मुलं होस्टेलवर आहेत म्हटल्यावर हे राजराणी मज्जाच करणार ना?  तितक्यात ती नवीन शेजारीण म्हणजे नीता तिथे आली आणि सगळ्याजणी शांत बसल्या. तीही सगळ्यांशी बोलत होती. तस बघायला गेलं तर तिने अजून कुणालाही घरची पार्श्वभूमी सांगितली नव्हती पण म्हणतात न रिकाम डोकं सैतानाच घर त्या नुसार ह्या सगळ्यानी मिळून ऐकीव माहितीवर आपले अंदाजच खरे अस ठरवलं होतं. सरिता मॅडम तर त्यात सगळ्यात पुढे गेल्या अजून पुरेशी ओळख न होताच तिला म्हणाली तुमची मज्जा आहे न मुलं होस्टेलवर.. सासुसासरे पण लांब... आमचा इथं काम करून करून जीव जातो. नीता शांतपणे हसली आणि म्हटली अस काही नाही हो उलट कुणीच नाही त्यामुळे घर खायला उठत पण नोकरीही महत्त्वाची आहे त्यामुळे काही करता येत नाही. नीता दुखावली पण तिने स्वतःला कंट्रोल करत तिथून निघून जाणच निवडलं.

सरीताने ह्यावरून काहीतरी शिकायला हवं होतं पण जित्याची खोड मेल्याशिवाय कुठली जाणार ती अजून अजून कुरघोड्या करु लागली नीताला त्रास देण्यासाठी. नीता आणि तिचा नवरा दोघेही जॉबच्या धावपळीत ह्या गोष्टींकडे लक्ष देत नव्हते. त्यातच सरीताच्या नवऱ्याने तिला बातमी सांगितली की त्याचे कुणीतरी बॉस त्यांच्या सोसायटीत राहण्यासाठी आले आहेत. तर त्यांच्या घरच्यांशी नीट वाग आणि मला अजून नाव कळले नाही त्यामुळे कुणीही नवीन असतील तर तोंड उघडून घाण करु नकोस माझं प्रमोशन जवळ आल आहे. पर्सनल गोष्टींमुळे मला ऑफिसमध्ये कुणाशी शत्रुत्व नको आहे. आता तुम्ही म्हणाल की अस का बोलला तो तर सरीताने आधीच्या बॉसच्या आईसोबत असाच नको त्या काड्या करून पंगा घेतला होता आणि त्यामुळे ह्याला स्वतःच्या प्रमोशन वर पाणी सोडावे लागले होते. कारण प्रत्येक जण सहन करेल किंवा दुर्लक्ष करेल अस होत नाही. आणि चूक सरीताची असल्याने त्याला काही बोलताही आलं नाही. बॉसच्या आईला सरीताच्या मुळेच खूप त्रास झाला होता. असो तर त्यामुळे नवरा आता सतत तिला सूचना देत होता पण सुधारेल ती सरिता कसली. 

फायनली कंपनीच्या नेहमीच्या पार्टीची सूचना आली. सरीताच्या नवऱ्याचे ऑफिशियल रेकॉर्ड उत्तम असल्याने ह्या वर्षी प्रमोशन मिळणार अस त्याला वाटत होतं. त्याच पार्टीत कंपनीचा नवीन हेड कोण आहे कळणार होत. सरीतासोबत तो पार्टीत पोहोचला. सगळ्यांशी ओळख करून देत असतानाच अचानक सरीताला दोन ओळखीचे चेहरे दिसले आणि ती विवेकला म्हटली हे इथे काय करतात? तो काही बोलणार इतक्यात स्टेजवरून त्याच दोघांच्या नावाचा पुकारा झाला मि. अँड मिसेस जाधव प्लिज स्टेजवर या. आणि विवेकचे बॉस बोलू लागले मला तुम्हांला सर्वांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो आहे की जाधव यांनी आपली xyz गावाची ब्रँच यशस्वीपणे हाताळल्यामुळे आता कंपनीने त्यांना आपली ब्रँच सांभाळण्यास इथे बोलावले आहे. गेले काही महिने ते अगदी सामान्य कामगारांमध्ये मिसळून सगळं निरीक्षण करत होते. पण आता येणाऱ्या 1 तारखे पासून दोघेही आपापल्या डिपार्टमेंट ची जबाबदारी घेतील. हे सगळं ऐकत असताना सरीताला मात्र दरदरून घाम फुटला होता. आणि त्याचं कारणंही  तिला माहीत होत. कारण होतं मि अँड मिसेस जाधव दुसरं तिसरं कुणी नसून नीता आणि तिचा नवरा होते  आणि नीता विवेकची बॉस म्हणून जॉईन झाली होती. विवेकला सरीताची अवस्था पाहून अंदाज आला होता पण त्याने फक्त इतकंच विचारलं हे आपल्या सोसायटीमध्ये राहतात? सरिताने होकारार्थी मान डोलावली. तसा तो म्हटला तुला मी घरी गेल्यावर बघतो. आता सरीताची अवस्था अजूनच अवघड झाली. 

स्टेजवरून आभारप्रदर्शन झाल्यावर नीता खाली उतरून सगळ्यांशी बोलू लागली. ती विवेकसमोर आली आणि हात मिळवत म्हटली कसे आहात मि अँड मिसेस काळे? मिसेस काळे तर फार चांगलं ओळखतात आम्हाला हो ना? सरीताला काय बोलावे सुचत नव्हते ती कसनुस हसली. नीता पुढच्या कपलशी बोलू लागली. पार्टीच्या शेवटच्या भागात प्रमोशन कळणार होते. त्यानुसार एकेक नाव घेतले जात होते. नीता आणि तिचा नवरा अभिनंदन करत प्रत्येकाला बुके देत होते. सगळ्यात शेवटी विवेकच्या डिपार्टमेंटची नावं घेतली जाऊ लागली जसजशी लिस्ट पुढे सरकत होती तसतशी सरिता अस्वस्थ होत होती. आणि शेवटी जे व्हायला नको होते तेच झाले पुन्हा एकदा विवेकचे नाव वगळले गेले. पार्टी पुढे सूरु राहील म्हणत सगळे जिकडेतिकडे गेले. नीता सरिता समोर आली आणि म्हटली तो वरचा असतो न सरिता सगळ्यांना संधी देतो व्याजासह परतफेड करण्याची. आम्ही आमच्या परीने दुर्लक्ष करत तुला खूप संधी दिली सुधारण्याची पण तू आमचं कुटुंब जे इथे नसत त्यांच्याबद्दलही वाईट बोललीस तेही तुला काही माहीत नसताना आणि आम्हा दोघांच्या चरित्र्यावरही नको नको ते आरोप केलेस तुझा काही संबंध नसताना, आम्ही शांत होतो कारण सत्य परिस्थिती आम्हाला माहीत आहे. आता हे सगळं आम्हाला कुठून आणि कसं कळलं ह्याचा विचार करण्यापेक्षा तुझ्यामुळे तुझ्या नवऱ्याचं किती नुकसान होत आहे याचा विचार कर. शहाणी असशील तर सुधारशील नाहीतर जे हातात आहे ते ही गमावशील विवेककडे नजर टाकत नीता निघून गेली.


ह्या सगळ्यातून सरिता काय शिकली ते आपण ठरवायचे आहे. अशा अनेक सरिता आपल्याला पावलोपावली भेटतात ज्या काहीही संबंध नसताना पुरेशी माहिती नसताना इतरांबद्दल गरळ ओकत असतात. ही जी जमात असते ती असमाधानी असते स्वतःच्या आयुष्यात अगदी त्यांचे दोन्ही हात सुखानी भरलेले असले तरी त्यांना इतरांना त्रास दिल्याशिवाय, दुखावल्या शिवाय घास घशाखाली उतरत नाही. त्याबतीत आपण ऊँ इग्नोराय नमः हाच मंत्र वापरू शकतो. कारण अस वागून हे लोक स्वतःचं काय नुकसान करून घेत आहेत हे त्यांना कळत नाही. आणि सांगून सुधारण्या इतकी अक्कल त्यातल्या फार कमी लोकांकडे असते.

बाकी नीता म्हणाली तसं तो वरचा संधी देतो आणि कधी कधी तर तोच आपल्या बाजूने परतफेडही करतो. बघण्याची दृष्टी हवी फक्त.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama