Jayshri Dani

Romance Tragedy

3  

Jayshri Dani

Romance Tragedy

वझेबाई

वझेबाई

10 mins
245


      रमाला आपल्या बॉसच्या, महेश पंडित यांच्या केबिनकडे जाताना पाहून मनात उठलेल्या कडवट विचारांच्या मोहोळाला वझेबाईंनी अलगद लपवले. तरीदेखील रमा ते विचार वाचेल व त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करेल असे त्यांना वाटले. 


"कळू दे माझ्या मनात काय चालले आहे ते रमाला, मला काय त्याचे?" 

नेहमीच्या तुसडेपणाने त्या स्वतःशीच पुटपुटल्या. बॉस माझा, ऑफिस माझे, ही कोण पोरटी मधेमधे करायला येते?


     ऑफिस माझे, बॉस माझा ही वझेबाईंची भावना काहीअंशी खरी होती. रमा तिथे त्यांच्या आधी नोकरीवर होती. तिने नोकरी सोडल्यावर तिच्या जागी त्यांची वर्णी लागली होती. एकदा नोकरी सोडल्यावर रमाला त्या ऑफिसमध्ये यायचे काहीच कारण नव्हते. 


     वझेबाई ज्या डॉ. सानप यांच्याकडे नियमित मधुमेहाची औषधे घ्यायला जात त्यांनीच एकदिवस ही नोकरी करणार का म्हणून विचारले. डॉ. सानप यांच्या मावसभावाला, महेश पंडित यांना दिवसभर ऑफिस सांभाळणारी प्रामाणिक व्यक्ती हवी होती. कामकाज फारसे नव्हते पण चेक, कॅशची देवाणघेवाण करायला एक चोख कार्यतत्पर व्यक्तिमत्व हवे होते. 


    'काम करणार' म्हणजे काय? करावेच लागणार! पती निधनानंतर वयाच्या बत्तीसाव्या वर्षापासून त्या अशाच छोट्या मोठ्या नोकऱ्या करत आपला चरितार्थ चालवत होत्या. पगार कमी असायचा. परंतु वडिलांनी अंगावरचे सगळे सोने विकायला लावून आलेला पैसा बँकेत जमा करायला सांगितल्याने त्यावर येणाऱ्या व्याजाची बरीच मदत होत होती.


    चार खोल्यांच्या घरात वडिलांनी दूरदृष्टीने तिन्ही मुलांच्या नावे एकेक खोली केली असल्याने रहायचा प्रश्न सुटला होता. लहान मोठ्या भावजयीच्या अनेक कटकटींपासून दहा ते सहाची अशी नोकरी पुष्कळ मुक्ती द्यायची. वडिलांनी आपल्या नावे केलेल्या खोलीत त्या मुक्तपणे उजागिरीने रहायचा प्रयत्न करत पण राजाराणीच्या संसारात भावजयींना ही उबार नणंद सहन होत नसे. 


    छोट्याशा घरात काय असे कोंबड्याच्या खुराडासारखे रहायचे असे मोठी भावजय तीनतीनदा म्हणे. तेव्हा वझेबाईंच्या मनात कळ उठे. ज्या भावंडांसोबत आपण लहानपणी मनसोक्त खेळलो, दंगामस्ती केली, एक खाऊ वाटून खाल्ला त्याच भावांना आता आपण डोळ्यासमोर सहन होत नाही ही कल्पनाच त्यांना भयंकर कुरतडत राही. 


     लहान भावाला तर त्यांनी आईच्या मायेने जपले होते. सतत हात धरून इथे तिथे नेले होते. आपली कोणतीही वस्तू त्याने मागितल्यावर कसलाही विचार न करता तात्काळ देऊन टाकली होती. तोच धाकटा भाऊ त्याच्या लग्नानंतर त्यांचा काळासारखा राग करत होता. त्याच्या बायकोला त्या, त्यांची लुडबुड, त्यांची उपस्थिती जराही खपत नव्हती. प्रिय पत्नीला आवडत नाही म्हणून मग त्यालाही थोरली बहीण डोळ्यापुढे नको वाटे. 

    

    वझेबाईंनाही कळत होते की त्यांच्यामुळे भावंडांना त्यांचे खाजगी क्षण तितकेसे मोकळेपणाने अनुभवता येत नाही. त्यांनाही एकदा लग्न करून माघारी येणे कुठे पटत होते?परंतु करणार काय? ऐन तरुणपणी 'येडा बुवा' म्हणजे त्यांचा नवरा जुगारात सारे गमावून एका अपघातात मृत्यूमुखी पडला होता. पोलीस महानिरीक्षक असलेले कर्तृत्ववान सासरे; बलरामपंत वझे, त्यांच्या लग्नानंतर पाचसात वर्षातच देवाघरी गेले होते. तर त्यांच्या नवऱ्याला सदोदित पदराखाली ठेवणाऱ्या सासूबाईही दहाबारा वर्षात मरण पावल्या होत्या. मग जाणार कुणाच्या आश्रयाला? 


     लग्न करताना बलरामपंत वझे या आपल्या व्याह्यांचा जोरदार प्रभाव पाहून नवरा मुलगाही असेच कर्तृत्व गाजवेल याविषयी वझेबाईंच्या वडिलांचे दुमत नव्हते. पण खरी गोम कळाली ती अक्षता पडून माप ओलांडल्यावर. बलरामपंत यांच्या पोलीस विभागातील धोकादायक नोकरीमुळे पंतबाई भीतीने दडपून गेल्या होत्या. त्या भीतीपायी त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाला अक्षरशः पदराखाली बांधून ठेवले. परिणामी धाडसी, धडाडीच्या महानिरीक्षक वझे यांचा मुलगा अतिशय बावळा, अशिक्षित, कर्तुत्वहीनच राहिला. 


    नोकरीतील दगदग, ताणतणावाने थकलेल्या महानिरीक्षकांनी रिटायर्ड झाल्यावर मुलाला व्यवसाय उभा करून दिला. परंतु आपल्याला काहीच करायची गरज नाही, यांनी सात पिढ्या बसून खाईल इतके कमावले आहे हे आईचे बोल कानात घुमत असणाऱ्या मुलाने अल्पावधीतच व्यवसायाला टाळे ठोकले. रिकामे डोके असे नाही तर तसे चालले. दिवसेंगणिक जुगार, गांजा, सिगरेटमध्ये अडकत गेले. वझेबाईंना दिसत होते सारे पण सासुपुढे बोलता येईना. 


     सण-वार, रोजची व्रतवैकैल्ये यातच पुरा दिवस निघून जाई. अंथरुणाला पाठ टेकल्यावर नवऱ्याची गोणी अंगावर येऊन आदळे. दोनतीन तासाची कशीबशी नीज होत नाही तोच पहाटेचा अलार्म खळखळे. सासुबाईंची जात्यावरची गाणी आधीच सुरू झालेली असल्याने त्यांना उठण्यासाठी चालढकलही करता येत नसे. गळ्यातल्या वजनी दागिन्यांना घट्ट पकडत, आडव्या तिडव्या पसरलेल्या नवऱ्याकडे एक नजर टाकून लगबगीने त्या न्हाणीकडे वळत.


    सासू-सासरे गेल्यानंतर सासऱ्यांनी जमा केलेला अनेक जमीनजुमला नवऱ्याने कवडीमोलात विकल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या सटपटल्याच. रोज काही ना काही गहाळ व्हायचे. येडा बुवा व्यसनांच्या अति आहारी गेला होता. अपघाताचे निमित्त होऊन बुवा परलोकवासी झाल्यानंतर चौदा दिवसातच राहता वाडाही त्याने चरस गांजासाठी कुपात्री दान केल्याचे कागदपत्रावरील सहीनिशी समोर आले आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अंगावरचे सोने दडवत कशाबशा त्या माहेरी पोहचल्यात.


    सुरुवातीला भाऊ भावजयींच्या टुकार बोलण्याने त्या खूप दुःखी व्हायच्या. लपून छपून रडायच्या. पण एक दिवस हे असेच चालणार, आपल्याला आता इथेच रहायचे आहे ही वस्तुस्थिती ध्यानात आल्यावर त्याही उत्तराला उत्तरे देऊ लागल्या. भांड्याला भांडे लागल्यावर समस्या अधिकच चिघळल्या. त्या टाळण्यासाठी मैत्रिणींच्या सल्ल्याने नोकरी करत मन रमवू लागल्या.


    मन गुंतवणे गरजेचे होते. तरुण वय, देहधर्म, इच्छा-आकांक्षा खायला उठायच्या. रात्री बेरात्री अंगावर आदळणारे धूड, सण समारंभात ठोकळयासारखा का होईना पण बाजूला उभा असणारा येडा बुवा बरा वाटायचा. कपाळावर रुपयाएव्हढा कुंकवाचा टिळा होता. बरोबरीच्या मैत्रिणींचे, भावंडांचे संसार पाहताना ही ठसठस अधिकच जाणवायची. संसार करावासा वाटायचा. 


    आपलेही एक घर असावे, आपणही तिथे मनासारखे पाय पसरावे, कोपरा न् कोपरा सजवावा असे आतवर वाटायचे. वडिलांच्या घरातील एक जरी वस्तू इकडची तिकडे केली तर भावजयी आकांडतांडव करत असे. मोठ्ठे भांडण होई. आई त्यांनाच नमते घ्यायला सांगे. शेवटी अंगाचे मुटकुळे करून घरात राहण्यापलीकडे त्यांनी आपला काहीच सहभाग ठेवला नाही. पण म्हणून शरीरात उचंबळणाऱ्या शेकडो मनसुब्यांना थोडीच खीळ बसणार होती?


     या ऑफिसमध्ये आल्यावर आपली स्वप्ने काहीअंशी खरी होणार असल्याचे लक्षणं दिसू लागताच त्यांचा मलूल जीव पालवला. मस्त चार खोल्यांचे प्रशस्त ऑफिस. त्यात एका खोलीत त्यांचा टेबल टाकल्यानंतरही भलीमोठी रिकामी जागा उरायची. त्यांना खूप नाचावेसे, कुदावेसे वाटे त्या मोकळ्या जागी. दुसऱ्या आतल्या खोलीत महेश पंडित यांची केबिन. महिन्यातून दोन दिवसासाठी ते या गावी येत तेव्हा झोपायला म्हणून तिसऱ्या खोलीत एक प्रशस्त कॉट टाकलेली होती. चवथ्या खोलीत छोटेसे स्वयंपाकघर तयार केलेले आणि कपाटात भरभक्कम किराणा भरलेला होता.


   आहा टाटा चहा ! 


"नाही सर, तुम्ही घ्या, मी चहा नाही पित"


खूप बाणेदारपणे त्यांनी पंडित यांना सांगितले होते. परंतु त्यांना रमासह मजेत घुटके घेत वाफाळता चहा पितांना पाहिले आणि चहा घ्यायची कधी नव्हे ते शीघ्र तल्लफ आली. पाचव्या दिवशी पंडित मुंबईला गेल्यावर ऑफिसमध्ये रमा यायची काहीच शक्यता नसल्याने त्यांनी मोठ्या पातलेभर दाट दुधाचा भरपूर आले टाकून चहा केला. मन भरतपर्यंत प्याला. पुढे त्यांना त्यात काहीच गैर वाटेनासे झाले. 


    गैरकृत्य तर पंडित करत होते. विवाहबाह्य संबंध, कार्यालयीन कामकाजादरम्यान आढळणारी लफडी, प्रेमप्रकरणे त्यांना आजवर ऐकूण माहिती होते. ते या ऑफिसमध्ये प्रत्यक्षच पहायलाही मिळाले. खुद्द त्यांच्या बॉसचे पूर्वी काम करणाऱ्या रमा हिच्याशी विवाहबाह्य संबंध होते. ते आले की रमा ऑफिसला यायची. एकमेकांना लागट स्पर्श करत दोघे मिळून स्वयंपाक करायचे. एका ताटात जेवायचे. वझेबाईंच्या वयाचा मान राखत बॉस त्यांनाही जेवायला बोलवत. तेव्हढ्यापुरते ते दोघे सावरून बसत. मग, "चल जरा पाच मिनिटं आराम करत बोलू" म्हणत बेडरूममध्ये घुसत. ते चांगले दोन अडीच तासाने बाहेर पडत.


   तोवर त्यांचा जीव खालीवर व्हायचा. दोघे आत काय करत असतील या कल्पनेने त्याच त्रस्त होत. दोघांनी आपापल्या जोडीदारांना फसवत असे काही करू नये असे त्यांना सांगावेसे वाटे पण सांगणार कुणाला? बॉसला सांगावे तर ते भडकण्याची भीती. रमाला सांगावे तर तिचा तोरा बॉसची बायको असल्यासारखा. 


    जाऊ दे आपल्याला काय करायचे म्हणून त्यांनी दुर्लक्ष करायचा खूप प्रयत्न केला. रमा आणि महेश पंडित यांच्या निमित्ताने त्यांना विविध चांगलेचुंगले खाद्यपदार्थ खायला मिळत. एकटे बसून फायलीत डोके खुपसण्यापेक्षा रमा मागे महेश आणि महेश मागे रमाचे फिरणे बघण्यात त्यांची भरपूर करमणूक होई. महेश पंडित सारखा नवरा आपल्यालाही असायला हवा होता असाही विचार येई पण पंडित हे त्यांच्यापेक्षा वयाने चौदा पंधरा वर्षे लहान असल्याने त्यांनी पंडित यांच्यावर धाकट्या भावासारखीच माया केली.


    कधी कधी फार विषण्ण वाटे त्यांना. वयाची साठी येऊन गेली. उभा जन्म इच्छा मारण्यात गेला. संसारसुख, ऐसपैस घराचे स्वप्न काही, काहीच पूर्ण झाले नाही. घरी कुणी कुणाशी बोलत नसे. सदा वाकड्यात नजर. संवाद साधायची त्यांची इच्छा अधुरी राही. इथे बॉस आलेत की त्या अक्षरशः झडप घालत. अविरत बोलू पाही. शब्दसुख, अक्षरसुख मिळवायचे असे त्यांना पण त्या बोलत असतांनाही पंडित यांची एक नजर रमा आली का म्हणून पहायला दाराकडे लागली असे. ती आली रे आली की पंडित स्वखुशीने आपला ताबा तिच्याकडे देऊन टाकत. त्यावेळी तो क्लेश सहन न होऊन त्या स्वतःशीच त्राग्याने पुटपुटत. त्यांची हीच सवय पंडितांना अजिबात आवडत नसे. 


"काय झाले मावशी?" ते जोरात ओरडत.

वझेबाई चपापून जात. वरकरणी म्हणत

"काही नाही सर." पण आतवर उसळून मनात बडबडत, "याच्यापेक्षा अशी किती मोठी आहे मी? मला मावशी म्हणतो?"


    त्यांना बिलकुल आवडत नसे 'मावशी' हे संबोधन. एक्स्पोर्ट इम्पोर्टचा तेजीत व्यवसाय करणारे पंडित त्यांच्याकडे कामाला असणाऱ्या प्रत्येक स्त्रीला मावशी म्हणूनच हाक मारत. तेच त्यांना पसंत नसे. पंडितांचे पाहून रमानेही त्यांना मावशी म्हंटल्यावर त्यांनी फटकारूनच दिले होते तिला. 


    "मिसेस वझे म्हणावे" पंडितांकडे येणारा जो तो त्यांना पंडीतांसारखा मावशी म्हणायला लागल्यावर त्या चिडून सूचना करत असे. कुणी त्यांची त्यावरून थेट किंवा पाठीमागे चेष्टाही करत. त्यांना त्याची पर्वा नसे. पंडितांनी मोठ्या विश्वासाने त्यांना ऑफिस सोपवले होते, त्या ऑफिसच्या दहा ते सहा या वेळेच्या त्या अनभिषिक्त सम्राज्ञी होत्या. त्यावेळी कुणाचाच मागमूस त्यांना नको असायचा. जीवनात खूप दुर्लभ असणारा शांत एकांत आणि चांगली मोठ्ठी जागा आत्ता कुठे त्यांना मिळाली होती. त्यात त्या कुणालाच शिरू देत नसे. पंडितांनी कितीतरी मार्केटिंगवाले मुले मुली, हाताखाली क्लर्क ठेवलेत पण वझेबाईंनी अशा गोट्या फिरवल्यात की महिनाभराच्या वर फारसे कुणीच टिकले नाही. त्यांना त्यांच्या या औटघटकेच्या संसारात कुणाचीच लुडबुड नको होती. 


    लग्नानंतर भला प्रशस्त वाडा बघून किती किती हौशीमौजी त्यांच्या मनात जाग्या झाल्या होत्या. हा कोपरा असा सजवायचा, तो तसा. पण परिस्थितीचे पारडेच विचित्र फिरले आणि मनातल्या इच्छा मनातच दडपाव्या लागल्यात. वयाच्या साठीत अचानक मोकळी जागा, पुरेसा एकांत लाभल्यावर त्यांच्या सुप्त इच्छांनी पुन्हा उचल खाल्ली. मोठ्या आवडीने त्या सहभागी होत ती मैत्रिणींसोबतची भिशी पार्टी इथे करता येऊ शकत होती. दुपारी काही वेगळे खावेसे वाटलेच तर इथे दोन सिलेंडरसह गॅस शेगडीही होती. 


    तशा त्या प्रचंड मानी, पदार्थाला लागणारे आपले साहित्य स्वतः घेऊन येत पण गेलेच समजा तूप तेल काही कमी तर इथे होत्याच शिगोशिग बरण्या भरलेल्या. विलायची, चारोळी, बेदाणे, काजू बदाम पासून रमाने पुलाव मसाला, बिर्याणी मसाला, विविध सॉसेस, बासमती तांदूळ, नाचणी पीठ असे सगळे आठवणीने आणून भरले होते. त्या बरण्या बघून त्यांच्या तोंडाला पाणी सुटायचे. थोडासा रवा काढला तर कुणाला कळणार आहे? लगेच रवा भाजायच्या त्या खमंग आणि शुद्ध देशी तूप टाकून दोन तीन प्लेट शिरा करून घ्यायच्या.  


    अजिबातच संकोच किंवा चुकीचे वाटत नव्हते त्यांना त्यात. पंडितांचे हे एव्हढे मोठे 'रमारहस्य' त्या त्यांच्या बायकोपासून लपवत होत्या. कित्येकदा पंडितांच्या नातेवाईकांचे अचानक येणे व्हायचे त्यावेळी आत न जाणो काय कृष्णकृत्य करणाऱ्या पंडित आणि रमाचा त्या अलगद बचाव करून टाकत. खोलीतून बाहेर पडलेल्या रमा आणि पंडित यांच्या चेहऱ्यावरची तृप्ती त्यांना भयंकर खटकायची. त्यांना तशी पूर्तता कधीच लाभली नव्हती. पण तेव्हढी एक अभिलाषा त्यांनी प्रयत्नपूर्वक सोडून दिली. हवे असलेले इतर संसारसुख त्यांना या नोकरीत व्यवस्थित मिळत होते. 


    आपल्या एकंदरीत दैनंदिनीवर कधी नव्हे ते समाधानी होत्या त्या. वर्ष दोन वर्षे अशी आलबेल लोटलीत आणि अचानक पंडित यांच्या ऑफिसमध्ये चकरा वाढू लागल्यात. त्यांना या महानगरात मोठे प्रोजेक्ट मिळाल्याचे त्यांच्या कानावर आले. पंडित खूष होते, नफा लमसम होता. रमाही पंडित यांच्या वारंवार मिळणाऱ्या सहवासाने फुलून निघाली होती. ते तिला रोज काही ना काही भेटवस्तू आणत. कापडचोपड असले तर आत्ता घालून दाखव म्हणत. ती कपडे बदलत असताना स्वतःही आत उभे रहात. वझेबाई अस्वस्थ अस्वस्थ होऊन जाई.


     एकदिवस झाले, दोन दिवस झाले; त्यांच्या या टाईमटेबलमध्ये काहीच खंड पडत नाही म्हंटल्यावर वझेबाईंचे मस्तक सणकले. पंडित यांच्या वास्तव्याविषयी त्यांना आक्षेप नव्हता. ऑफिस त्यांचेच ; केव्हाही यायचा जायचा त्यांना हक्कच आहे पण या उपटसुंभ रमाचे एकदा नोकरी सोडल्यावर ऑफिसमध्ये यायचे काय काम? आजकाल किराणा संपत आलाय, चहापत्ती तळाशी गेली याकडे रमाचे बारीक लक्ष असे. तिने ती गोष्ट पंडितांच्या कानावर घातली होती वाटतं, ते किचनला कुलूप लावून ठेवत. 


    हे, हे वझेबाईंना मंजूरच नव्हते. त्यांना त्यांचे स्वातंत्र्य हवे होते. खाण्यापिण्यात, दुपारच्या एसीमधील वामकुक्षीत बाधा येऊ लागल्याने त्यांना हादरा बसला. अनायसे हाती आलेला संसार गमवायची त्यांची मानसिक तयारी नव्हती. काय करावे? काय करावे? त्यांचे विचारचक्र जोरात फिरू लागले. रमाला घुसू द्यायचे नव्हते त्यांना या संसारात. तिचा अडसर नव्हता तोवर तिचा वावर त्यांनी खपवून घेतला होता. 


    स्वतःच स्वतःच्या मनाशी त्यांनी प्रचंड खलबते केली. थोडे वाईटही वाटले जो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी करताना. कारण एका स्त्रीला संसारसुख, योग्य पुरुषस्पर्श हवा असतो हे त्यांनाही माहिती होते. रमाच्या वैवाहिक जीवनात कदाचित याचीच कमी असल्याने ती पंडितांमध्ये अडकली असण्याची दाट शक्यता होती. ते सुख, तो अनुभव त्यांनी रमाला मनाप्रमाणे घेऊही दिला होता. पण आपल्या स्वातंत्र्याच्या मोबदल्यात नव्हे. तुझे तू जग बाई माझे मला जगू दे असे जेव्हा नीट पार पडत नाही हे लक्षात आले तेव्हा त्यांनी लावले दोन फोन. एक रमाच्या नवऱ्याला दुसरा पंडित यांच्या बायकोला.


     दुसऱ्या दिवशी "चल थोडे पाय लांब करून बसू, मग अर्धा पाऊण तासाने कामाला लागू" असे जेव्हा जेवण झाल्यावर पंडित रमाला म्हणाले आणि दोघे खोलीत गुडूप झाले त्यानंतर अगदी पंधरा मिनिटातच हातात दंडुका घेऊन रमाचा नवरा आणि सोटा फिरवत पंडितांची बायको दारात येऊन दाखल झाले. "माझे नाव सांगायचे नाही" हे वचन वझेबाईंनी आधीच घेऊन ठेवले होते. 


     पंडितांच्या बायकोने तर दारावर थाप मारून दार उघडायचीही वाट पाहिली नाही. सरळ लाथ घालून दरवाजा ढिला केला. "कौन है, कौन है" करत पंडितांनी दरवाजा उघडताच त्यांच्या बायकोने एक सणसणीत थोबाडीत त्यांच्या मुस्काडात मारली. रमाच्या नवऱ्याने कॉटवर आरामशीर पहुडलेल्या रमाच्या कंबरेत जोरदार दंडुका हाणला.


   पंडितांची बायको आणि रमाचा नवरा चांगले तास दोन तास लोकलज्जेची पर्वा न करता, पंडितांच्या कुठल्याच प्रतिष्ठेची तमा न बाळगता बेसुमार गोंधळ घालत होते. दोघांना अद्वातद्वा बोलत होते. आजूबाजूचेही लोक गोळा झालेत.


"हा भाभी ये ठीकही नहीं, पडोसमें सब अच्छे लोग रहते है, इस उमरमें भय्याको ये शोभा देता है क्या?" शेजारीपाजारी री ओढू लागले.


वझेबाई शांत बसल्या होत्या. अजूनतरी पंडित आणि रमाला त्यांचा संशय आला नव्हता.


   रमाला हाकलून पंडितांच्या बायकोने पंडितांचे गाठोडे बाहेर ढकलत तीव्र संतापाने ऑफिस सोडल्यावर वझेबाईंनी हळूच स्वयंपाकघरात चक्कर मारली. 


   उद्या आप्प्यात कोणकोणत्या डाळी टाकाव्या यासाठी त्यांनी भरलेल्या बरण्यांवर सावकाश नजर फिरवली. गरमागरम आप्पे व लज्जतदार हिरव्या नारळाची चटणी त्यांच्या नजरेसमोर तरळू लागली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance