Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Achala Dharap

Others

4  

Achala Dharap

Others

दिन दिन दिवाळी

दिन दिन दिवाळी

4 mins
265



  दिवाळी जवळ आली होती. छोटी मुले फुलबाजा पेटवुन 'दिन दिन दिवाळी' असं गाणं म्हणत आतषबाजीचा आनंद लुटत होती.  

   त्यावेळी पाच वर्षाचा दिपक आणि नऊ वर्षाची दिपा मात्र केविलवाण्या नजरेने त्यांच्या घराच्या खिडकीतून फुलबाज्यांकडे बघत होते. ते बघून त्यांची आई ज्योतीच्या डोळ्यातही पाणी आले.मग ज्योतीने दोन्ही लेकरांना जवळ घेतले आणि म्हणाली, ' उदया पासुन आपण पणत्या विकायला जायचय. पणत्या विकुन पैसे आले की मग दिपक साठी फटाक्यांची बंदुक, रोल , केपा आणि दिपा साठी लवंगी फटाके नक्की आणायचे.' 

आईने समजावल्यावर मुले खुश झाली.

   दुसर्‍या दिवशी ज्योतीने सकाळीच सगळ्या पणत्या टोपल्यांमधे भरल्या. मुलांना सांगितल की तुम्ही पण माझ्याबरोबर पणत्या विकायला यायच. तिने सैपाक केला.तिघे जेवले. दुपारी चार वाजता ज्योती पणत्या विकायला निघाली. पण बघते तर काय ती जिथे पणत्या विकायला बसणार होती तिथुन जवळच एका माणसाने चायनीज पणत्या विकायला आणल्या होत्या.

  ज्योती पणत्या विकायला बसली. पण चायनीज पणत्यांचे भाव कमी असल्याने लोकं त्याच्याकडेच पणत्या खरेदिला जात होती. संध्याकाळचे सहा वाजले तरी ज्योतीकडे फक्त दोन गिऱ्हाईक येऊन गेले होते. ज्योती बेचैन झाली. तिच्या डोळ्यातुन पाणी यायला लागलं. एवढी मेहनत करुन पणत्या केल्या होत्या नि गिऱ्हाईक नाही. दिपालाही चैन पडेना.ती हळुच त्या चायनीज पणत्यांचे भाव विचारुन आली.

  दिपा आईच्या जवळ आली नि आईला म्हणाली, 'आई, तू घरी जाऊन चहा पिऊन ये. तुला बरं वाटेल.'

ज्योती घरी गेली. तिला खूप रडू येतं होतं. मुलांना फटाके कसे घ्यायचे? दिवाळी कशी साजरी करायची? हे तिला प्रश्न पडले होते.ती चहा पिऊन आली. टोपल्या पणत्यांनी भरलेल्याच होत्या. आठ वाजल्यावर ती मुलांना घेऊन घरी आली. तिचं कशातच लक्ष लागतं नव्हतं. तिनी मुलांसाठी वरणभात बनवला. 

  दिपा आणि दिपक खिडकीतुन मुलांची आतषबाजी बघत होते. दिपक दिपाला म्हणाला, ' ताई, आपल्या पणत्या आज विकल्या गेल्या नाहित. आता आपल्याला फटाके मिळणार नाहीत. मी माझ्या मित्राकडे फटाके मागु का ? त्याच्याकडे खूप फटाके आहेत. तो मला काल म्हणाला की तुला मी फटाके देईन.'

मग दिपा त्याला समजावत म्हणाली, 

' असं नको करुस. आईला वाईट वाटेल. काहीतरी करुया.तुला फुलबाजे नक्की मिळवुन देईन.'

  ज्योतीने मुलांचा हा संवाद ऐकला. तिला खूप वाईट वाटलं. तिला भुक नव्हतीच. मुलांना वरणभात वाढुन ती गप्प बसली. मुलांच जेवण झाल्यावर ती मुलांना घेऊन झोपायला गेली. तिला झोप लागतच नव्हती. ती रडतं होती. मुलांची साधी फटाक्यांची हौस करु शकतं नाही याच तिला वाईट वाटत होतं. 

   दिपाला पण झोप लागतं नव्हती. पण आपल्या पणत्या कशा विकता येतील याचा ती विचार करतं होती. विचार करता करता तिला झोप लागली.

  सकाळी जाग आल्यावर दिपाला एक युक्ती सुचली. ती तिच्या ओळखीच्या काकांकडून छोटे छाप घेऊन आली. घरी येऊन तिने वाॅटर कलरने टोपलीतल्या पणत्यांवर दिपकच्या मदतीने रंगाने श्री, 卐, ॐ असे छाप उठवले. आता पणत्या छान दिसत होत्या. त्या पणत्या बघुन ज्योतीला पण आश्चर्य वाटलं. 

दिपा आईला म्हणाली, ' आई, आज आपल्या पणत्या नक्की संपतील. मी आणि दिपक पणत्या घेऊन पुढे जातो.तू जेवण बनवुन ये.'

ज्योतीला तिच्या लेकरांच कौतुक वाटलं.  

  दिपा कालच्याच ठिकाणी पणत्या विकायला बसली. हातात पणत्या घेऊन रस्त्यावर उभी राहून ती ओरडू लागली 

 ' दोन वर एक पणती फ्री'

'खास लक्ष्मीपुजनासाठी श्री लिहिलेली लक्ष्मीच्या आशीर्वादाची पणती.'

'मांगल्याच प्रतीक असलेली 卐,ॐ ची पणती.'

'स्वदेशीचा अभिमान बाळगा.आपल्या देशातील मातीने बनलेल्या पणत्या वापरा.'

मग दिपक पण ओरडू लागला,

' या इकडे ! दोन वर एक पणती फ्री.'

   या लहान मुलांचे कौतुक वाटुन

लोकं दिपाकडे पणत्या घ्यायला लागली. स्वदेशीचा या लहान मुलांना अभिमान आहे तर आपण पण स्वदेशीचाच वापर केला पाहिजे असे लोकांना वाटले आणि मुलांच्या कल्पकतेचे पण कौतुक वाटले.

  ज्योती सैपाक करुन दाराला कुलुप लाऊन घरातुन बाहेर पडली. ती तंद्रीत रस्त्यातन चालतं येतं होती. एकदम तिच्या कानावर तिच्या मुलांचा आवाज ऐकू येऊ लागला. ती भरभर आली. बघते तर काय अर्ध्या अधिक पणत्या संपल्या होत्या. तिच्या इथे गर्दी झाली होती. तिला आश्चर्य वाटले. आई आल्यावर मुलांना आणखी उत्साह आला. तिघे मिळुन पणत्या विकू लागले.

  संध्याकाळी दिपाच्या शाळेतल्या बाई पणत्या घ्यायला आल्या होत्या.दिपाच्या मेहनतीचे त्यांना कौतुक वाटले. दिपा आणि दिपकचा पणत्या विकतानाचा त्यांनी व्हिडिओ काढला आणि शाळेच्या गृपवर टाकून दिपा कडून पणत्या विकत घ्यायच सगळ्यांना आवाहन केलं. 

   बघता बघता दिपाच्या पणत्या घ्यायला खूप गर्दी झाली.घरी असलेल्या सगळ्या पणत्या ज्योती घेऊन आली.दिपकने त्यावर पटापटा छाप उठवले. रात्री आठ वाजता सगळ्या पणत्या संपल्या होत्या.

  पणत्यांच्या रीकाम्या टोपल्या आणि पैशाचा भरलेला डबा पाहुन ज्योतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने मुलांना जवळ घेतले आणि म्हणाली, ' आज तुमच्या मुळे हे शक्य झालं. तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे घेऊन फटाके आणा. उरलेल्या पैशातुन मी दिवाळीचा फराळ बनवीन.'

त्यावर मुलं आईच्या जवळ जाऊन म्हणाली, ' आई , आम्हाला फक्त एक फुलबाज्याची पेटी, नि एक लवंगीमाळचा बाॅक्स हवाय.बाकी पैसे तू साठवुन ठेव. कोरानाने बाबा गेल्या पासुन तू खूप मेहनत घेतेस. आज आम्हाला मेहनतीच महत्व कळलं.तुझ्या कष्टाची जाणीव झाली.'

  घरी येऊन ज्योतीने पणत्या विकुन मिळालेले पैसे देवापुढे ठेवले.मुलांना बाजारात नेऊन फुलबाज्या आणि लवंगी माळ आणल्या.दोघांच्याही चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता.ज्योतीने दोन्ही लेकरांना जवळ घेतलं. दिपा आणि दिपकच्या रुपाने मिळालेल्या दिव्यांनी ज्योतीच घर प्रकाशमान झालं होतं. दिपक आनंदाने फुलबाजी ओवाळित ' दिन दिन दिवाळी' असं गाणं म्हणत होता आणि ज्योतीला या वर्षीची दिवाळी सप्तरंगात न्हाऊन आल्यासारखी वाटली.



Rate this content
Log in