मायमराठी
मायमराठी
माय मायेची प्रेमाची
तिला वाखाणावे किती!!
अलंकारे सुशोभित
म्हणी सांगाव्यात किती
दर कोसाला बदले
ढंग न्यारा तिचा असे
विविधता बोलीमधे
कुणी चकित भांबावे
ज्ञानेश्वरी भागवत
परमार्थी आगारच
इथे गीता श्रीकृष्णाची
गीताईही सुकरच
नाटकात संवादांची
फेक अचूक साधती
नाट्यपदे रसपूर्ण
मनोमनी तोषविती
महाराष्ट्र जन्मभूमी
लाभो मज जन्मोजन्मी
घ्यावे जन्म अगणित
माय मराठी उदरी