व्यायामाचा विमा
व्यायामाचा विमा
पैशामागे धावता धावता
व्यायाम होतोय धीमा
आयुष्य होतंय रीस्की
म्हणून काढावा लागतोय विमा
जगण्यासाठी खाण झालं
खाण्यासाठी जगणं
तोंडाला सुटलं पाणी अन्
विसरलो शरीराकडे बघणं
ओल्या सूक्या पार्ट्या जेव्हा
ओलांडतात येथे सीमा
आयुष्य होतंय रीस्की
म्हणून काढावा लागतोय विमा
पोळीभाजी मागे पडली
पुढे पिज़्ज़ा आणि बर्गर
जंकफूड च्या मोहापायी
बिघडत गेली फिगर
चमचमीत जगण्याचा
डायबेटिसने केलाय खीमा
आयुष्य होतंय रीस्की
म्हणून काढावा लागतोय विमा
बिझीपणाच्या नावाखाली
पोटाचं होतंय पोतं
गोळ्या औषधांशी मात्र
घट्ट झालंय नातं
शुगर बीपी जोडीने इथे
केलाय मोठा ड्रमा
आयुष्य होतंय रीस्की
म्हणून काढावा लागतोय विमा
शरीरासाठी झटण्याचा
कसला आलाय त्रास
दीर्घायुषी जगण्यासाठी
व्यायाम हवा हमखास
सुदृढ निरोगी जगण्याची
यांना थोडी बुद्धी देरे रामा
आयुष्य होईल झकास
मग कशाला लागेल विमा