Ranjan Deshpande

Classics

4  

Ranjan Deshpande

Classics

आगळीवेगळी राखीपौर्णिमा!

आगळीवेगळी राखीपौर्णिमा!

4 mins
368


रियाचं नवीनच लग्न झालं होतं. नवीन नवरी होती अजून. वाड्याच्या जागी नवीन इमारत झाली होती. त्यामुळे तिथे वाड्यातलेच सगळे राहत असल्याने वाड्यातलेच वातावरण होते इमारतीत. साहजिकच रिया नवीन नवरी असल्याने सगळ्याच घरातून तिचे कौतुक होत होते. इमारतीत सगळे सणवार एकत्र साजरे केले जायचे. लहान मोठे सगळे एकत्र असायचे. उन्हाळ्यात वाळवणं सगळ्या बायका एकत्रच करायच्या. रियाला हे सगळं खूप आवडायचे. रिया आपली नोकरी सांभाळून या सगळ्यात जमेल तशी सहभागी व्हायची.

रियाचा पहिला राखीचा सण आला. त्यासाठी ती माहेरी जाणार होती. शेजारी राहणाऱ्या साठे काकूंनी तिला आवर्जून बोलावून सांगितले की "राखी झाली की लगेच ये बरं का. राखी नंतरच्या लगेचच्या रविवारी आमच्याकडे यायचंय तुला." रियाला वाटले राखीच्या निमित्ताने आपल्याला फराळासाठी बोलावणार असतील. म्हणून तिने माहेरी गेल्यागेल्या त्याप्रमाणे पुढचे कार्यक्रम ठरवले. आणि राखी झाल्याच्या लगेचच्या दुसऱ्या दिवशी रिया सासरी परत आली.

रियाच्या सासूबाईंना ती एवढ्या लवकर आली म्हणून छान वाटलं कारण आता सगळीकडे जाताना त्यांना हक्काची सोबत मिळाली होती. रियाने सासूबाईंना साठे काकूंनी बोलावलं आहे ते सांगितले आणि विचारले, "काय कार्यक्रम आहे त्यांच्याकडे? कशासाठी बोलावलं आहे त्यांनी आपल्याला?"

सासूबाई म्हणाल्या, "त्यांच्याकडे एक वेगळी रखीपौर्णिमा साजरी करतात!" रिया म्हणजे काय असं विचारते.

सासूबाई सांगू लागल्या...

"तेव्हा आम्ही सगळ्या नवीनच लग्न होऊन या वाड्यात साधारण एखाद्या महिन्याभराच्या अंतराने आल्या असू. सगळेजण आपापल्या नव्या संसारात आणि नोकरीत व्यस्त असायचे. नवरे कामावर गेले की आम्ही बायका एकत्र असायचो. गप्पा, शॉपिंग, फिरायला एकत्र जाणं असं चालायचं आमचं. एकमेकांची सुखदुःख वाटून घ्यायचो. थोड्याफार अंतराने आम्हाला मुलंही झाली. सगळ्यांची मुलंही एकत्रच मोठी होत होती.

साठे काका एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होते. तिथे ते कामगारांचे युनियन लिडर होते. तर एकदा तिथे काही मागण्यांसाठी कामगारांनी संप पुकारला. साठे काका युनियन लिडर असल्याने ते कंपनीत रोज जायचे. तिथे काही जणांनी उपोषणाला बसण्याचे ठरवले. साठे काका ही उपोषणाला बसले. साखळी उपोषण चालू होते. म्हणजे सगळ्यांनी ठराविक वेळासाठी उपोषणाला बसायचे. तीन दिवस हे चालू होते. चवथ्या दिवशी साठे काकांचा नंबर जेव्हा होता, तेव्हा नेमके ते जाऊ शकले नाहीत. त्यांचे काका गेले होते. तिकडे ते अडकले होते. त्या काळी एवढे फोन नसल्याने ते कंपनीतल्या आपल्या सहकार्यांना निरोप काही देऊ शकले नाहीत. याच संधीचा फायदा घेऊन मॅनेजमेंटने कामगारांना साठे काकांबद्दल खोटं काही सांगून त्यांना काकांविरुद्ध भडकवून दिले. इतके की सगळे कामगार काकांना शोधत घरी आले. पण घराला कुलूप होते. साठे काकांच्या शेजारी तेव्हा पाटील काकू राहायच्या. त्यांनी त्या आलेल्या लोकांकडे चौकशी केली तर त्यांना कंपनीत घडलेला सगळा प्रकार कळला. साठे काकांना या लोकांपासून धोका आहे हे त्यांनी ओळखले. त्यांनी साठे काकांच्या काकूंकडे आपल्या मुलाला पाठवून ते कधी येणार आहेत ते विचारून घेतले. साठे काकांच्या काकांचे सगळे दिवसकार्य पार पडले आणि ते सगळे घरी आले.

कंपनीतल्या उपोषणाला बसलेल्या कामगारांना काका आल्याची कुणकुण लागली आणि ते काकांवर हल्ला करायला घोळक्याने आले. पाटील काकूंना हे आधीपासूनच माहीत होते की साठे काका आलेले कळले की लगेच ही लोकं येतील त्यांना मारायला म्हणून. त्यामुळे त्या सावधच होत्या. बाहेरच्या नळ कोंडाळ्यावर पाटील काकू काहीतरी काम काढून जात होत्या जेणेकरून ती लोकं आली की आधी त्यांना कळेल.

नेमकी ती माणसं यायला आणि समोरून पाटील काकू यायला एकच गाठ पडली. काकूंनी त्या सगळ्या लोकांना अडवले. त्यांना साठ्यांच्या घरापर्यँत पोहोचूच दिले नाही. त्या ठाम उभ्या होत्या आणि साठे काकांची बाजू समजावून सांगत होत्या. ती माणसं पूर्ण तयारीनिशी आली होती काकांना मारायला. पण पाटील काकू घरातून एक मोठा स्क्रू ड्रायव्हर घेऊन गेल्या होत्या. त्या आलेल्या लोकांना अडवून उभ्या होत्या आणि बोलत होत्या, "तुम्ही साठे काकांची बाजू ऐकून घ्या आधी. त्यांची काहीही चूक नाहीये. आणि तरी तुम्हाला त्यांच्यावर हल्ला करायचा असेल तर माझं शव ओलांडून जावं लागेल. हा स्क्रू ड्रायवर आहे तो मी माझ्या पोटात घुसवेन अन माझा जीव घेईन मी. आणि त्याला तुम्ही सगळे जबाबदार असाल." वाड्यातले सगळे गोळा होऊन चाललेला तमाशा बघत होते. पाटील काकूंनी रणचंडिकेचा अवतार धारण केला होता. साठे काका आणि त्यांच्या घरातले सगळेजण सगळं ऐकत होते पण ते बाहेर पडू शकत नव्हते. पाटील काकूंनी त्यांच्या घराला बाहेरून कुलूप घालून बंद करून घेतलं होतं. पाटील काकुंचा अवतार पाहून साठे काकांना मारायला आलेली माणसं बराच वेळ हुज्जत घालून "परत येऊन पाहून घेऊ" अशी धमकी देऊन निघून गेली.

झाला प्रकार पाहून साठे काकांनी पोलीस स्टेशन गाठले. पुढचे सगळे सोपस्कार झाले, कामगारांना काकांची खरी बाजू कळली, मॅनेजमेंटने कामगारांच्या मागण्या मान्य केल्या, संप मिटला. थोड्याच दिवसात सगळं काही व्यवस्थित सुरू झालं.

साठे काका आणि काकूंनी पाटील काकूंचे अक्षरशः पाय धरले. काका म्हणाले, "तुम्ही होतात म्हणून माझा जीव, माझे कुटुंब वाचले. तुमचे हे उपकार कधीही फिटणार नाहीत. आजपासून तुम्ही माझी बहिण! आपल्यातले हे नाते मी आणि माझ्याघरचे सगळेजण आयुष्यभर पाळू!"

तेव्हापासून दरवर्षी राखीपोर्णिमेसाठी राखी झाल्यानंतर साठे काकू पाटील काकूंच्याकडच्या सगळ्यांना जेवायला बोलावून काकूंना राखी बांधून आणि साडीचोळी देऊन त्यांची ओटी भरून राखीचा हा सण साजरा करतात. बारा वर्षे झाली या गोष्टीला पण दोन्ही घरातली सगळी माणसं मुलं, मुली, सुना, जावई, नातवंडं या आगळ्यावेगळ्या सणासाठी एकत्र येऊन साजरा करतात. तुमचं नवीन लग्न झालंय, तुमचा हा पहिला राखीपोर्णिमेचा सण! तुम्हालाही त्यांना त्यानिमित्त बोलवायचंच होतं. मग त्यांनी हाच मुहूर्त साधला. आणि त्या निमित्ताने तुम्हाला नवीन आदर्श बघायला मिळावा हा उद्देश!

यातून साठे काकू सगळ्यांना दाखवून देतात की, कुठल्याही स्त्रीला कमी लेखू नका वेळ आली तर रक्षणाला पण उभी राहते!"

हे सगळं ऐकून रियाच्या डोळ्यात पाणी साचून राहिले. तिने साठे काकूंकडे गेल्यावर पाटील काकूंना मनःपूर्वक नमस्कार केला आणि म्हणाली "काकू, तुमच्यासारखी हिम्मत मलाही मिळू दे असा आशीर्वाद द्या!" पाटील काकूंनी पण तोंडभरून आशीर्वाद दिला रियाला आणि म्हणाल्या, "आपल्या प्रत्येकीच्या मनात दुर्गा देवी असतेच गं. फक्त वेळ आली की तिला आपण बाहेर पडू द्यायला हवं! खंबीर राहा! सुखाने संसार करा!"

रियाला आज एक वेगळेच व्यक्तिमत्व भेटले होते. ती खूप समाधानी झाली होती. एक नवीन सणाची, रिवाजाची तिला माहिती मिळाली होती. त्या व्यक्तिमत्वाला त्रिवार वंदन करत ती झोपी गेली!



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics