Smita Bhoskar Chidrawar

Inspirational

3  

Smita Bhoskar Chidrawar

Inspirational

आणि आयुष्य सप्तरंगी झाले...

आणि आयुष्य सप्तरंगी झाले...

4 mins
248


आज खूप वर्षांनी रमाताई ला भेटणार होते....ही तशी माझ्यापेक्षा वयाने थोडी मोठी , स्वभावाने खुपचं साधी , फारशी न शिकलेली अशी ही माझी दूरची बहीण....तिच्या घरी पोचल्याबरोबर तिने छान स्वागत केलं .काही वर्षांपूर्वी अगदी काकूबाई दिसणारी रमाताई आज मात्र खूपच नेटकी आणि टापटीप दिसत होती .तिचं वय वाढण्याऐवजी कमीच दिसत होतं ! तिच्या सासूच्या चेहेऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती पण तिकडे दुर्लक्ष करून आमच्या गप्पा सुरु होत्या.


थोड्या वेळाने आम्ही रमाताईच्या रूम मध्ये गेलो , आणि बघते ते काय , अनेक पैंटिंगस , शो पिसेस , विणकाम , भरतकाम केलेल्या वस्तू आणि बाल्कनी मध्ये सुंदर नक्षीदार कुंड्यांमध्ये विविधप्रकारची झाडे ! इतक्या सुंदर सुंदर वस्तू पाहण्यात मी दंग होते . तितक्यात रमाताईने एक आमंत्रण पत्रिका हातात ठेवली निशाताईच्या ' रमास् क्रीएशन्स ' च भव्य प्रदर्शन ! "नक्की ये ग" या रमाताई चा शब्दांनी मी पुरती गोंधळून गेले होते .अनेक प्रश्न डोक्यात गुंता होऊन ओठापर्यंत येणार तेवढ्यात रमाताई गोड हसली ! म्हणाली , अग हो हो अशी बावरून जाऊ नकोस मी तुझी तीच ताई आहे ,पण आता स्वतःसाठीही जगतेय, त्याचीच ही सुंदर भेट मला मिळाली आहे .देवानं दिलेलं आपलं आयुष्यं आपण नेहेमी दुसर्यांसाठीच जगतो पण स्वतःसाठी थोडासा वेळ मी काढू लागले आणि बघ किती छान झालंय माझं आयुष्य ...


माझा गोंधळ काही संपत नव्हता तेव्हा ताई म्हणाली,    " आता ऐक तुझ्या 'काकूंबाई ' रमाताई पासून ' रमास् क्रीएशन्स ' च्या ओनर पर्यंतच्या प्रवासाची गोष्ट...

"माझं लग्न झालं तेव्हा सुरवातीचे काही दिवस खूपच कठीण गेले.माहेरी खूप मोकळं वातावरण पण इकडे सगळा आनंदी आनंद ! सगळ्यांची तोंडं वेगळ्या दिशेला , खाण्या पिण्याच्या आवडी निवडी वेगळ्या,स्वभाव निराळे आणि एकुलती एक सून म्हणून ते सगळं सांभाळण्याची जवाबदारी माझीच .मुलगा झाल्यावर तर अगदी तारेवरची कसरत व्हायची माझी पण कोणाला त्याचं काही सोयरसुतक नव्हतं .संसाराच्या चक्रात अशी काही अडकून गेले की आपण एक स्वतंत्र व्यक्ती आहोत ही भावनाच संपली.पण काही वर्षांनी मुलं मोठी झाली आणि खूप एकटं एकटं वाटू लागलं .फारशी शिकलेली नाही त्यामुळे नोकरी वगेरे करण्याचा प्रश्नच नव्हता ! नैराश्याने पुरती ग्रासून गेले होते .काय होतंय काही कळत नव्हतं .संसार अगदी सुखाचा होता ,कशाचीही ददात नव्हती ,पण असं का होतंय हे समजत नव्हतं...


एक दिवस सहज एक कविता सुचली मी ती काही मैत्रीणींना पाठवली ,त्यांनी खूपच प्रोत्साहन दिलं आणि माझं लिहिणं हळूहळू सुरू झालं .माझ्या छोट्याशा बागेत खूप झाडं होती मग त्यातल्या कुंड्यावर मी काहीतरी कलाकुसर करू लागले .वेळ छानच जाऊ लागला पण घरातील कामात दुर्लक्ष होऊनही चालणार नव्हतं, म्हणून मी रोज स्वतःसाठी फक्त एक तास काढायचा ठरवला. सुरुवातीला अवघड गेलं, कारण खरंच आपण स्वतः साठी कधीच वेळ काढत नाही. पण ठरवलं की होतं या नियमाने रोज मी फक्त 1 तास स्वतःसाठी काढला.


कधी पेंटिंग्ज, कधी भरतकाम नक्षीकाम असं करत गेले आणि थोडंफार लिहिणं ही सुरू होतं .एक दिवस माझ्या मुलाने मला स्वतः चा ब्लॉग सुरू करण्याची प्रेरणा दिली. मग काय जोरात कामाला लागले आणि छान प्रतिसाद मिळू लागला. भरतकाम आणि इतर शो पिसेस च्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात झाली... आणि अचानक सगळ्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलुनच गेला ! सगळ्यांच्या कौतुकाच्या बरसातीत मी अगदी न्हाऊन गेले आणि खरंच आयुष्य बदलूनच गेलं ...


आता ना मला सासूबाईच्या टोमण्यांचं काही वाटत ,ना नावरोबाच्या रागाचं , मी ही माणूसच आहे ना काही चुकलं आणि कोणी काही बोललं तरी त्यांचा राग नाही येत .म्हणतात ना ' स्वतः बदला जग बदलेल! ' आता खरंच मी बदललेय , स्वतः साठीही जगायला शिकले आहे . खरंच सांगतेय यामुळे जो आदर सन्मान मिळतोय ना तो अवर्णनीयच आहे .आपल्या मुलाच्या , नवऱ्याच्या डोळ्यात हा आनंद आणि अभिमान पाहण्याचं सुख काही वेगळंच!

आपण स्त्रिया नेहेमी आपल्या घरच्यांच्या आनंदात आपला आनंद मानतो आणि आपणही आनंदी आहोत , हे स्वतःला पटवत राहतो .


पण खरंच प्रत्येकाची एक वेगळी स्पेस नक्की असायला हवी , आपणही एक स्वतंत्र व्यक्ती आहोत हे विसरून कसं चालेल ? आणि एक नेहेमी लक्षात ठेव आपण जर आनंदी असलो ना तरच आपलं घरही आनंदी राहतं बरं का ! ह्याची प्रचिती मला जरा उशिराने का होईना पण आलीये !आणि तेव्हापासूनचा हा प्रवास रोज वेगळी अनुभूती देणारा आहे आणि स्वतःवर प्रेम करता करता बाकीच्यावरही आपण जास्त प्रेम करतो आणि आपल्याही नकळत आपण बदलून जातो ...छान घरासोबतच स्वतःलाही छान रूपातच पाहून ..."


मी भारावून रमाताईच्या बोलण्यात आणि सोबतच माझाही असा बदलेला भविष्यकाळ रंगवण्यात दंग असतानाच काही बायका आणि मुली तिथे आल्या. एकंदरीतच त्या सगळ्या झोपडपट्टीतल्या वाटत होत्या .रमाताईने त्यांचं तोंडभरून स्वागत केलं आणि मला म्हणाली आजचा तास ह्यांच्यासोबत, मी ह्यांना शिकवते लिहिणे वाचणे आणि काही कलाही ! अगं ह्या सगळ्या माझ्या च्या मदतनीसम्हणून ही माझ्या सोबत असतात .आम्ही सगळ्या मिळून मोठे मोठे एक्झिबिशन भरवतो आणि त्यामुळे चांगली कमाई ही होते! 


रोज सगळ्या मिळून आमच्या या एका तासात नवीन नवीन गोष्टीही एकमेकींना शिकवतो .असे माझे अनेक ग्रुप्स आहेत .महिन्यातून एकदा सगळ्या एकत्र येतो ,हिंडतो फिरतो आणि मज्जा ही करतो.सोबतच मी आता माझ्यासरख्या नैराश्याच्या छायेत जाऊ पाहणाऱ्या अनेक सख्याना कौन्सिलिंग करून त्यांनाही त्यांची नवीन स्पेस मिळवून देण्याचा चंग बांधलाय ! अगदी भारावून मी रमाताईचा निरोप घेऊन घरी निघाले , एक वेगळीच ऊर्जा घेऊन ...

सहज मागे वळून पाहिलं , त्या सगळ्या जणी अगदी तल्लीन होऊन आपला आनंद जपत होत्या ! एका साध्याशा कमी शिकलेल्या स्त्रीने स्वतःला ओळखलं होतं ....आणि स्वतःच अस्तित्व जपत आता इतरांनाही आनंदाने आणि मानाने जगण्याची प्रेरणा देत त्यांचही आयुष्य घडवण्यासाठी मदत करते आहे....

आज मला रमाताईची बहीण असल्याचा खूप आनंद आणि अभिमान वाटतोय ! तिच्यासारखं स्वतःच अस्तित्व जपण्याचा आणि इतरांनाही होईल तशी मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे...!!


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi story from Inspirational