Hanamant Padwal

Others

2  

Hanamant Padwal

Others

आठवण एका पत्राची

आठवण एका पत्राची

3 mins
947


       आठवण एका पत्राची

परवा सुट्टीचा दिवस होता. माझी आवराआवर चाललेली होती. सर्व फाईल,कागद आणि बरंच कांही आवरत होतो. जुनी सुटकेस उघडून कांही कागद त्यात ठेवावे म्हणून ती उघडली आणि काय, माझ्या जुन्या आठवणीच जणू मी उघडल्या होत्या. आज मोबाईलच्या जमान्यात हरवत चाललेली पत्र, पुन्हा तशी कधी दिसतील का नाही. हा अचानक प्रश्न माझ्या मनात उभा राहिला, कारण माझ्या सुटकेसमध्ये मला आलेली माझ्या विद्यार्थ्यांची आणि मित्रांची शेकडो पत्र मला दिसली. हो अगदी शेकडो लगेच मी त्या काळात जाऊन पोहचलो.. एकेक पत्र उघडत होतो, वाचत होतो... आजही तेच पत्र हाताला लागले जे तेव्हापासून माझ्या मनावर कोरलेले आहे.पत्र माझ्या विद्यार्थ्याचे होते...

 स.न.वि.वि.पत्रास कारण की......

मनातलं वादळ मनात किती दिवस राहणार म्हणून गुरुजी मी आपणास पत्र पाठवत आहे.

आचार्य देवो भवं असा वेदांचा आदेश,तमसो मा ज्योतिर्गमय असा उपनिषदांचा उपदेश तर नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते असा भगवद्गीतेचा

संदेश. या संदेशाची जीवनभर उपासना करणाऱ्या गुरुनां माझं वंदन.....,

गुरुजी ,तुम्ही बदलून तुमच्या गावी गेलात आणि आमच्या गावात तुमच्या आठवणीचं वादळ ठेवलात. मी तुमच्या बदल चांगलं बोलणारच, कारण मी तुमचा आवडता विद्यार्थी होतो नं. पण गुरुजी तुम्ही गावातही खुप रमला होतात. सर्वांच्या मदतीला धावणं मी तुमच्याकडूनच शिकलो आहे. आज मी स्वतःच्या पायावर उभा आहे. मी तुम्हाला डोळ्यापुढं ठेवून माझं आचरण करत राहिलो. पुस्तक तर सर्वजन शिकवतात. तुम्ही पुस्तकाबरोबरच बाहेरचं जगही कसं असतं ते शिकवलात. जगात अनेक तऱ्हेची माणसं असतात. चांगलं कोणाचं होताना न खपणारी कांही असतात तर कांही कपट विचारधारेची पण असतात. पण आपण आपली नैतिकता सोडायची नाही. तुम्हीच शिकवलत गुरुजी. गुंडगिरी आणि धाकदडपशाही ही पाहुणीसारखी असते ती जास्त दिवस नाही राहत हे तुम्ही पटवून दिलत गुरुजी. माणसानी सरळ मार्गी असावं. सर्वांशी मिळून मिसळून वागावं. एकमेकाच्या मदतीला धावून जावं. गरजवंतास हवी ती मदत करावी. दुसऱ्यांच्या सुख दुःखात सहभागी व्हावं. आपलं ध्येय निश्चित करुन मार्गक्रमण करत राहावं. सारंच आठवतय गुरुजी मला, तुम्ही जे जे सांगितलं ते सारं सारं साठवून ठेवलं आहे मी मनात आणि ध्यानात. शिक्षक कसा असावा हे मी तुमच्याकडूनच शिकलो आणि का कोणास ठाऊक पण माझ्या मनात आगदी तेव्हापासूनच शिक्षक होण्याची सुप्त इच्छाशक्ती रुजत गेली. वर्गातील तो धडा ती चालबध्द व तालबद्ध कविता, वातावरण कसं सुंदर आणि प्रसन्न असायचं. हुरुप यायचा आम्हालापण.

रुक्ष माळरानावर हिरवळ पेरीत जाणं हे सर्वांचाच नशिबी कुठं असतं, तुम्ही ती हिरवळ पेरलीत. आमच्या जीवनाचं नंदनवन केलत. गुरुचं महात्म्य आणि महत्व न जाणणारी दुरान्वयानेच कोणी दिसतील. आपल्या संस्काराची शिदोरी आयुष्यभर पुरेल येवढी आहे गुरुजी.. आपण लावलेली शिस्त मी अंगात अशी परिधान केली आहे की ती कायम माझ्यासोबतच राहिल. आपण आमच्याशी ज्या मायेनं वागलात त्याची आठवण नित्यनियमाने येते.

आपली भिती कधीच वाटली नाही गुरुजी. नाही तरी

आईची भिती मुलाना का वाटते....?त्यामुळंच की काय..... " गुरु ईश्वर तात माय

       गुरुविण जगी थोर काय " असं म्हणतात हे कळून आलं.पण गुरुजी तुमच्या बद्दल जो आदरभाव होता, त्याचा भंग होऊ नये याचीच खरी भिती वाटत असायची. आणि मग कळून आलं की आदरयुक्त भिती कशास म्हणतात. गुरुजी खरं सांगतो मला आज खूप खूप बोलावसं वाटतय तुमच्याशी. तो काळ ते दिवस आठवून मी एक रस्ताच तयार केला आहे. आणि त्याच रस्त्याने चालतो आहे. चालणार आहे. "खऱ्या शिक्षकाचं स्मासक का कुठं समूर्त असतं..?शेकडो मुलांमुलींच्या मनात सच्या गुरूंच्या आठवणीची निरांजन अक्षय उजळलेली असते. त्या प्रकाशात तर काळोखातल्या पाऊलवाटा क्षितिजाशी संवाद साधतात. "

आज परिस्थिती बदललेली आहे गुरुजी. मान सन्मान हा लायक लोकांसाठी राहिला नाही. त्यासाठी आसुसलेल्याना तो मिळतो आहे. पण खंत याची वाटते की गुरुजींना गुरुजी न ठेवता आता सर बनविण्यात आले आहे. मी पण सरच आहे आता.. आधुनिकतेचे वारे येवढे वेगाने वाहत आहे की आदरभाव परका झाला. हवं तर पोरका झाला म्हणा. खिचडी, बांधकाम,सर्व्हे या आणि आशा डझनावर कामामुळं शिकवणं कमी पण आवांतर सोंगे जास्त झाली आहेत. गुरुजी, समोरच्या मुलांच्या मनात उतरायला सर्व बाह्यकामं संपल्यावर

वेळ मिळतोय. काय करणार.....?पण एक निश्चित आहे .गुरुजी,आपण नाकर्ती माणसं कारणं सांगत असतात हे बिंबवलेले आमच्या मनावर. म्हणूनच पाय रोवून उभं आहोत कोणतेही आणि कसलेही वादळ थोपवायला. आपला आशीर्वाद कायम सोबत असतोच. पण यापुढेही आवश्यक तिथे मार्गदर्शन कराल ही भूक ठेवतो आहे.

सर.... अं ...स्वारी ,सर नाही गुरुजी, आज खूप बोलूनही कांही राहिलेच वाटते. परत बोलेणच पण पत्रातून नाही समक्ष भेटूनच. काळजी घ्या, घरात बाईंना सस्नेह नमस्कार. तसेच दोन्ही ताईंना शुभआशिष.

         कळावे

              आपला आज्ञाधारक विद्यार्थी

 


Rate this content
Log in