Nilesh Jadhav

Drama

4.0  

Nilesh Jadhav

Drama

अबोल

अबोल

10 mins
369


आज तिला जाऊन दहा दिवस झाले होते. खरतर ती हयात नव्हती पण मनातून मात्र तिचं जाणं होत नव्हतं. सकाळीच तिच्या दशक्रियेचा विधी उरकून मी घरी येऊन नुसताच लोळत होतो. दिवस अस्ताला जाताना मी एका मित्राला सोबत घेऊन मोटरसायकलला किक मारली आणि भारती विद्यापीठ गाठलं. कॉलेजरोड वर एका पान टपरी पाशी कट्ट्यावर बसून एक सिगारेट सुलगावली. पान टपरीवर सिगारेट ओढणाऱ्या पोरांची गर्दी तर होतीच त्याबरोबर मोठ्या घरातल्या पोरी पण दिसत होत्या. स्टायलिश कपडे घालून मोठमोठ्या बापजादयांची पोरं रस्त्याने हिंडत होती. कॉफी शॉप पासून वडापावच्या गाड्यापर्यंत सगळीकडेच गर्दी झाली होती. रस्त्यावर ठेवलेल्या बाकांवर कोणी उगाचच पुस्तकं चाळत होतं तर काही ठिकाणी कपल बसलेले दिसत होते. ग्राउंडवर मात्र वेगवेगळ्या खेळांची नेट प्रॅक्टिस चालू होती. मी मात्र सिगारेट ओढत हे सर्व बघत होतो. अजूनही तिचाच चेहरा माझ्या नजरेसमोर तरळत होता. तितक्यात त्या मित्राच्या आवाजाने मी भानावर आलो. 

"ये निल्या चल रे जरा पुढे चौकात जाऊन येऊ"

गडबडून मी त्याच्याकडे पहिलं खरंतर मी दचकून जागा झालो होतो कारण कसली तरी रुखरुख अजूनही मनात होती. थोड्याश्या सौम्य आवाजात मी त्याला विचारलं 

"काय रे काही काम आहे का...?"

त्यावर चेहऱ्यावर कमालीचा आनंद आणून तो उद्गारला 

"अरे बघ ना कसली पोरगी गेली यार..! मला बोलायचं आहे तिच्याशी"

चेहऱ्यावर उसनं हसू आणून मी फक्त हसलो आणि त्याला बाईक ची चावी दिली. आणि म्हंटलं 

"जा तू ये जाऊन मी बसतो थोडा वेळ इथे" 

वेळ न घालवता तोही निघून गेला. 


       मी आणखी एक सिगारेट घेऊन पेटवली. एक झुरका देत मी विद्यापिठच्या ग्राऊंड कडे दृष्टिक्षेप टाकला आणि मला ती पुन्हा एकदा आठवली. आम्ही दोघेही याच विद्यापीठच्या शाळेत शिकलो. इथेच रमलो आणि इथेच मोठे झालो. माझ्या एक वर्ष मागच्या वर्गात होती ती. धनकवडीच्या एका सोसायटी मध्ये बंगला होता तिचा. त्यांच्या इथे माझी आई धुनी-भांडी करायची. त्याच ओळखीवर त्यांच्याच बंगल्याच्या कोपऱ्यात एका छोट्याशा खोलीत आम्ही भाड्याने रहायचो. वडील पुण्यात कामाला होते. हात भार लागावा म्हणून आई धुनी-भांडी करायची. मी आणि माझा मोठा भाऊ असे आमचे कुटुंब होते. ती म्हणजे याच बंगल्याच्या मालकांची मोठी मुलगी. तिलाही एक भाऊ होता पण तो लहान होता. आम्ही एकाच शाळेत होतो फक्त ती सेपरेट मुलींच्या इंग्लिश शाळेत होती इतकंच. भारती विद्यापीठ म्हणजे तिथे सर्व प्रकारचे शिक्षण हे आलेच. घरी आल्यावर सुट्टीच्या दिवशी आम्ही एकत्रच खेळायचो. अगदी तेंव्हापासूनच मला ती खूप आवडायची. किती छान होती ती.. अगदी आत्तापर्यंत तिचं ते चाफेकळी नाक मला खूप आवडायचं. खेळताना जेंव्हा रुसायची तेंव्हा तेच नाक अगदी लाल लाल होऊन जायचं. पहिल्यापासून टापटीप रहायची सवय होती तिला. बोलणं पण किती नाजूक होतं. नव्वदच्या दशकातील काळ तो मग काय अगदी दिल तो पागल है म्हणत मी तिच्या मागे मागे फिरत असायचो. 


        बघता बघता दिवस सरत होते आणि आम्ही मोठे होत होतो. असं सर्व असलं तरी माझं तिच्यावरचं प्रेम हे एकतर्फी नव्हतं कारण या भावना तिच्याकडून सुद्धा आहेत असं सहज जाणवायचं. मी जेंव्हा दहावीत गेलो तेंव्हा आम्ही स्वतःच घर घेतलं होतं. मग आम्ही तिथे भाड्याने रहायचं सोडून स्वतःच्या घरी रहायला गेलो. मला आठवतंय जेंव्हा मी निघालो होतो तेंव्हा तिने गुपचूप मला बंगल्याच्या गच्चीवर बोलावून घेतलं होतं आणि तू नको ना जाऊ मला सोडून असा हट्ट करत ती खूप रडली होती. मुली लवकर मॅच्युअर होतात त्यातलाच हा भाग. मला मात्र ती का रडत असेल हे कळायला खूप उशीर लागला. आम्ही आता तिथे रहाणार नाही वाईट वाटण्याचं हे कारण असेल इतकंच मला कळत होतं. खरंतर शाळेत आमची भेट होणारच होती पण रोज नजरेसमोर असणारा मी तिला दिसणार नव्हतो हे ही तितकंच खरं होतं. 


      माझी दहावी झाली नंतर बारावी सुद्धा झाली. या सर्व वर्षात ती मला रोज किमान बाय म्हणून का होईना जात होती. मी पुढच्या शिक्षणासाठी कॉलेज बदललं आणि मग खऱ्या अर्थाने आमची ताटातूट झाली. आईनेही आता धुणी-भांडी करायचं सोडून दिलं होतं. माझा मोठा भाऊ जॉब करत होता आणि मी पण पार्टटाईम मिळेल ते काम करत होतो. माझी शिक्षणाबद्दलची जास्त आस नव्हती तरीही मी एम ए करायचं म्हणून करत होतो. ती मात्र पुढारलेल्या विचारांची होती. वडील पहिल्यापासुन गडगंज श्रीमंत त्यामुळे पैसा, राहणीमान, हे सर्वच त्यांचं वेगळं होतं. बारावी झाल्यानंतर तीने मेडिकल कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतलं. खरंतर त्या काळात आमची भेट ही कधी झालीच नव्हती. पण तिच्याकडे मोबाईल होता. मग मीच कधीतरी पी सी ओ बूथ वरून तिला फोन करायचो. आणखी दोन वर्ष सरली होती. फायनली मी एकदाचा जॉब वर रुजू झालो. मग मात्र माझं जग आणखी बदललं. नवीन मित्र मिळाले तशा मैत्रिणीही मिळाल्या. एव्हाना माझ्याकडेही मोबाईल आला होता पण सरत्या काळात मात्र तिचा मोबाईल नंबर माझ्याकडून गहाळ झाला होता. मी माझ्याच विश्वात हरवलो होतो. त्यांच्या बंगल्याच्या दारातून माझं कितीतरी वेळा जाणं व्हायचं पण का कोणास ठाऊक माझी आत जाऊन तिला भेटण्याची कधी इच्छा झालीच नाही. त्यालाही परिस्थिती पासून अनेक कारणं होती.


        आणि एक दिवस ती भेटलीच. त्या दिवशी सकाळी थोडा घाईतच मी ऑफिस ला जाण्यासाठी निघालो होतो. कात्रज चौकात ट्रॅफिक लागणार याचा अंदाज होताच मला म्हणून मी विद्यापीठ कडून शॉर्टकट घेत तिच्या दारातून जाणाऱ्या रस्त्यावरून बाईक घेतली. थोडंस लांबूनच ती बंगल्याच्या गेट मधून तिची स्कुटर काढताना मला दिसली. अगदी आहे अशीच होती ती. मध्ये जवळ-जवळ चार पाच वर्षांचा गॅप होता. तरीही फारसी बदललेली नव्हती ती. तोच नाजूकपणा तेच ते चाफेकळी नाक. क्षणभर मी घायाळच झालो होतो. तिच्याशी बोलू की नको हा विचार करतच मी तिच्यासमोरून माझी बाईक दामटली. आणि तितक्यात मागून जोरात आवाज आला. 


"निलेश" 

मी जोरात ब्रेक दाबून बाईक थांबवली आणि जीभ ओठांखाली दाबत डोळे बंद केले. तिची ती हाक एकदम काळजात शिरली होती. मी मागे वळून पाहिलं तर ती गडबडीने माझ्याकडे येत होती. जिन्स टॉप घातलेली पाठीवर बॅग घेतलेली आणि थोडीसी घाईतच असलेली. येताच तिने जोरात माझ्या पाठीवर फटका मारला आणि मोठ्याने हसत म्हणाली

"काय रे नालायका विसरलास ना मला..?"

मी गालातल्या गालात हसत तसाच बाईक वर बसून राहिलो. मला नेमकं काय बोलावं तेच कळत नव्हतं. 

"किती बदलला आहेस रे...! एकदम रदाळा होतास आता कसला दिसतोयस माहितेय का तुला..?

हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर आलेला आनंद कमालीचा सुखावणारा होता माझ्यासाठी. पण तरीही मी शांतच होतो. आणि ती म्हणालीच. 

"ये पण तुझं असं शांत रहाणं बदल बाबा याचीच भीती वाटते मला. लहानपणी सर्वांशी भांडायचा आणि माझ्यावर वेळ आली की शांतच बसायचास" 

त्यामागचं कारण मलाच माहीत होतं म्हणून मी थोडासा लाजतच तिला म्हणालो

"अग तसं काही नाही..."

"ये गप रे मला माहितेय सर्व आणि असं का वागायचास याचंही कारण माहितेय मला बहुतेक ते मलाच सांगावं लागणार आहे पण आता नाही नंतर कधीतरी सांगेन" माझं बोलणं मधेच तोडत ती बोलत होती.


कसा आहेस पासून काय करतोस घरचे कसे आहेत वगैरे सर्व बोलणं झालं तरीही मी आपला फक्त हम्म आणि हा इतकंच करत होतो. माझी नजर तिच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती. तसं पाहिलं तर लहानपणापासूनची आमची मैत्री मी कधीही तिला अगदी घरी जाऊन भेटलो असतो पण तिच्या माझ्या घरच्या परिस्थितीत अजोड आणि अकल्पनिय असं अंतर होतं. म्हणून मी कधी हिम्मत नव्हती केली. पण नशिबात वेगळंच काहीतरी होतं आणि म्हणूनच इतक्या दिवसानी का होईना ती माझ्या समोर आली होती. घरात येण्याचा तिने खूप आग्रह केला पण मीच उशीर झालाय असं सांगून टाळाटाळ केली. आम्ही एकमेकांना आमचे मोबाईल नंबर दिले आणि तिथून निघालो. निघताना मात्र रोज फोन करत जा मी वाट बघेल असं दरडावून सांगितलं होतं तिने. 


       वेळ घालवेल तो निलेश कसला आणि मैत्रीच्या बाबतीत तर नाहीच नाही. मी लंच टाईम मधेच तिला फोन केला. समोर असताना मी काहीच बोलू शकलो नव्हतो पण फोनवर मात्र भरभरून बोललो. त्यानंतर आमचं रोज न चुकता फोनवर बोलणं सुरू झालं होतं. कधीतरी ऑफिस ला जाताना मी मुद्दामहून वाट वाकडी करत तिच्या घरापासून जाऊ लागलो होतो. विद्यापीठाच्या आवारात अधून मधून आमचं भेटणं पण होऊ लागलं. लहानपणीच्या आठवणीत रमून जाताना आम्ही तास-तासभर गप्पा मारत बसायचो. आतापर्यंत जगलेल्या आयुष्यात काहीतरी हरवलेलं मला परत मिळालं होतं. खरंतर मी माझ्याही नकळत तिच्या प्रेमात पडलो होतो. पण जेव्हा तिच्या माझ्या स्टेटसची बरोबरी कशी होणार असा विचार मनात आला की खजील व्हायचो. तेंव्हा वाटायचं की नको यार आपली मैत्रीच ठीक आहे. कदाचित ती सुद्धा माझ्या नजरेतले भाव ओळखून गेली असावी. ती त्याबद्दल चकार शब्दही कधी बोलली नाही याउलट ती माझ्या बोलण्याची वाट बघत होती. ती माझ्या बोलण्याची वाट बघतेय हे मात्र मी कधीचाच ओळखून बसलो होतो. तरीही मी प्रेमाची कबुली देऊ शकत नव्हतो. 


        त्या दिवशी मला तिचा फोन आला होता. संध्याकाळी कात्रज चौकात भेट म्हणून सांगितलं होतं तिने. ठरल्याप्रमाणे ऑफिस वरून घरी जाताना मी कात्रज घाटलं थोड्या वेळाने ती सुद्धा आली तिथे.

"काय ग अचानक काय काम काढलंस.?"

"का.? तुझा वेळ वाया गेला का.?" तिच्या नेहमीच्या शैलीत ती बोलली.

"अरे तसं नाही पण अचानक बोलावलंस ना म्हणून विचारलं" मी म्हणालो.

"काही नाही अरे या विकेंडला पानशेतला फिरायला जतोय म्हंटलं तू येतोस का बघावं" ती बोलली.


खरंतर तिच्यासोबत जाण्यासाठी मी कधीही एका पायावर तयार असायचो. पण या वेळी मला थोडं काम होतं म्हणून मी नाही म्हणालो. त्यांचा कॉलेज ग्रुप फिरायला जाणार होता. त्यांच्या ग्रुपमधील काही मुलींना मला बघायचं होतं म्हणून मी त्यांच्यासॊबत जावं असा त्यांचा हट्ट होता. तिला कसतरी समजावत मी जाण्यासाठी नकार दिला होता. 


      रविवारचा दिवस होता तो. ती गेली तिच्या मित्रमैत्रिणी बरोबर फिरायला. सकाळी मला कॉल करून म्हणत होती की मी ना रुसलेय तुझ्यावर. वेडी..! हो वेडीच होती ती. किती बडबड करायची आणि कधीकधी अगदी सहज नुसत्या नजरेने बोलून जायची. ओठांवर कायम हसू असायचं तिच्या. प्रत्येक कामात मात्र खूप घाई असायची तिला. रस्त्यावरून जाताना बिनधास्त तिची स्कुटी पळवायची तेंव्हा मी बघतच रहायचो तिच्याकडे. दुपार नंतर संध्याकाळ होत आली तरीही तिचा एकही कॉल आलेला नव्हता जसजशी संध्याकाळ होत होती तसतशी माझ्या मनाची रुखरुख वाढत होती. का कोणास ठाऊक पण काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. साधारण साडेपाचच्या वेळात न रहाऊन मी तिला कॉल केला. मनाशी ठरवलं की आता ना आपणच भांडायचं तिच्याशी. पलीकडून कॉल रिसिव्ह झाला अंदाज घेत मी हॅलो म्हणालो तर पलीकडून तिची मैत्रीण घाबऱ्या आवाजात बोलत होती. ती सांगत होती की "अरे श्रद्धाचा अक्सिडंट झालाय तिला आता पुण्यात घेऊन चाललोय" माझ्या पायाखालची जमीनच सरकली.


हॉस्पिटलचं नाव विचारून मी तसाच निघालो. जाताना असंख्य विचार डोक्यात थैमान घालत होते. हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर तिचे आई-वडील आणि भाऊ होतेच तिथे. मी पण धडधडत्या काळजाने तिथेच भिंतीला टेकून उभा राहिलो. तिच्या मैत्रिणी एकसारख्या रडत होत्या. तिच्या भावाची पळापळ चालूच होती. तिची आई भिंतीला डोकं टेकून वर छपराच्या दिशेने बघत अश्रू गाळत होती. बऱ्यापैकी सावध होते ते म्हणजे तिचे वडील मग न रहाऊन मी त्यांच्या पाशी गेलो आणि त्यांना विचारलं. निर्विकार डोळ्यात कसलेच भाव न दाखवता पण आतून एकदम खचून गेलेल्या त्या माणसाने मला फक्त इतकंच सांगितलं की पुढची प्रोसेस चालू आहे बॉडी लवकरच हातात मिळेल. त्यावेळी माझ्या डोळ्यातून फक्त एकच अश्रू गळाला. आतून मात्र मन म्हणत होतं की निलेश मोकळा हो, मोठमोठ्याने रड पण मला रडताच आलं नाही. आजपर्यंत माझं तिच्यावर प्रेम आहे हे बोलण्यासाठी मला माझ्याच शब्दांनी साथ नव्हती दिली तशीच साथ आज मला माझ्या अश्रूंकडून मिळाली. मला काहीच सुचत नव्हतं. मी अगदी सुन्न झालो होतो. मी तसाच उठलो आणि घरी गेलो. घरी गेल्यावर मी आईला सर्व संगीतलं इथेही फक्त आईच रडली मी मात्र तसाच ढिम्म राहिलो होतो.


       गेले दहा दिवस मी असाच होतो. माझ्या चेहऱ्यावर कसलाच लवलेश दिसत नव्हता. आज तिचा दशक्रियेचा विधी उरकल्यानंतर थोडं सावध झाल्या सारख वाटत होतं. तरीही मला माझाच राग येत होता. पुण्याच्या रस्त्यावरून किती फिरलो मी तिच्यासोबत. याच विद्यापिठाच्या मैदानात बिनधास्त गप्पा मारत बसायचो मग या वेळीही मला तिच्यासोबत जाता आलं असतं की. पण मी नाही गेलो तिच्यासोबत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे तिच्याही मनात होतं अगदी लहानपणापासून तेही मी कधी तिच्याशी बोललो नव्हतो. असा कसा मी अबोल राहिलो होतो. मला बोलता आलं असतं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे जे सांगता आलं असतं पण दर खेपेला मी अबोलच राहिलो. आता या क्षणाला माझी स्वतःवरच किती चिडचिड होत होती हे मी शब्दात मांडू शकत नाही. मी का अबोल राहीलो होतो हा प्रश्न सतावत होता.


      अंधार पडत चालला होता. हळुवार येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीने माझे केस उडत होते. आजूबाजूच्या हॉटेल मध्ये पोरा-पोरींची गर्दी आणखी वाढत चालली होती. वडापाव, समोसा सारख्या फास्टफूड चा खमंग सुवास वातावरणात दरवळला होता. माझ्या हातातील दुसरी सिगारेट पण कधीचीच राख झाली होती. बराच वेळ झाला होता माझा मित्र काही अजून परतलेला नव्हता. मनोमन हसत डोक्यात विचार आला की हा त्या पोरीशी बोलूनच येतो वाटतं. आणि क्षणात मन नाराज झालं. परत एकदा वाटून गेलं की खरंच अबोल रहाणं वाईटच. माणसाने बोलायला हवं परिणामाची फिकीर न करता. बोलून मन हलकं होतं. अबोल राहून मनातल्या गोष्टी मनातच रहातात. फक्त एकदा हिम्मत करून मनातलं सांगायला हवं. खूप चिडचिड होत होती. डोक्यातले विचार काही केल्या जात नव्हते. तितक्यात एकदम गडबडीत माझा मित्र आला आणि जोरातच म्हणाला

"ये निल्या चल बस पटकन"

"अरे काय झालं असं अचानक काय..?" मी त्याला म्हणालो.

"अरे बाबा बस रे पटकन जाताना सांगतो" तो म्हणाला

मी पटकन गाडीवर बसलो. क्षणाचाही विलंब न करता त्याने बाईक कात्रज डेअरी च्या दिशेने दामटली. पुणे सातारा हायवेला लागून कात्रजच्या चौकात आल्यावरच तो माझ्याशी बोलला.

"अरे निल्या काय सांगू तुला त्या पोरीच्या मागे गेलो आणि तिला बोललो सुद्धा पण तिचा भाऊ चौकातच बसलेला होता ना"

"मग..! मग काय झालं?"आश्चर्याने मी विचारलं

"मग काय आला ना धावून माझ्यावर मी वळवली पटकन बाईक आणि आलो पळून" जणू काही खूप मोठा पराक्रम केला आहे अशा आविर्भावात तो सांगत होता.

"अरे पण हे असले उद्योग करायचेच कशाला.?" मी म्हणालो.

"ये गप रे मनात येईल ते बोलावं बिनधास्त... मला ती मुलगी आवडली आणि मी तिला सांगितलं. पण तिचा भाऊ होता तिथे म्हणून थोडक्यात सर्व बिनसलं" तो सांगत होता.


एव्हाना गाडी मुंबई बायपासला लागलेली होती. मी एक नजर आकाशाकडे पहिलं "मनात येईल ते बोलावं बिनधास्त" माझ्या मित्राचा हा शब्द माझ्या मनात घर करत होता. खरंतर तासंतास गप्पा मारताना ती सुद्धा कैक वेळा मला म्हणाली होती की तू मनातलं कधी बोलणार आहेस. पण मी कधीच बोलू शकलो नव्हतो. समोरून येणारा वाऱ्याचा झोत केसांना उडवत होता. माझी नजर अजूनही आकाशाकडे होती. जणू काही मी आकाशात दाटून आलेल्या चांदण्यांमध्ये तिलाच शोधत होतो. मनात आणखी कालवाकालव झाल्यासारखी वाटत होती. डोळ्यांच्या कडांवर भरून आलेले अश्रू ओघळण्याच्या प्रतीक्षेत होते. माझ्या मित्राची बडबड चालूच होती आणि मी..! मी मात्र अजूनही अबोलच होतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama