Durvesh Bari

Abstract Inspirational Children

4.0  

Durvesh Bari

Abstract Inspirational Children

बिरबलाचे बुद्धीचातुर्य

बिरबलाचे बुद्धीचातुर्य

3 mins
983


एकदा बादशाह अकबराच्या दरबारात बादशाह अकबराने त्याच्या सर्व दरबाऱ्यांना व बिरबलासहित सर्व नवरत्नांना एक प्रश्न विचारला, 


अकबर :- तुमच्यापैकी अस कोण-कोण आहे ज्याने आजपर्यंत एकदाही खोटे बोलले नाही किंवा त्याने आतापर्यंत एकही चूक केलेली नाही ? 


बिरबलाला सोडून सर्व नवरत्नांनी व सर्व दरबाऱ्यांनी हात वर करत आपले मत दर्शवले की त्यांनी आपल्या जीवनात आजपर्यंत एकदाही खोटे बोलले नाही किंवा आतापर्यंत एकही चूक केली नाही. 


सर्वांचे हात वर पाहून बादशाह अकबर खुश झाला परंतु त्याच क्षणी बिरबलाचा हात खाली पाहून अकबर थोडा नाखूश होऊन बिरबराला म्हणाला, 


अकबर :– काय झाले बिरबल ? तू हात का नाही वर केलास. 


बिरबल :- बादशाह मी हात वर न करण्याचे एक कारण आहे, ते असे की मी जीवनात एकदाही खोटे बोललो नाही असे नाही किंवा मी आतापर्यंत एकही चूक केलेली नाही असेही नाही. कारण प्रत्येक व्यक्तीकडून त्याच्या जीवनात कळत–नकळत काही न काही चूक ही घडत असते किंवा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्याला खोटे हे बोलावे लागत असते. त्यामुळे मी हात वर केला नाही. 


अकबर :- म्हणजे बिरबल तुझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, बाकी सर्व दरबारी ज्यांनी–ज्यांनी हात वर केला त्या सर्वांनी त्याच्या जीवनात कधीतरी खोटे बोलले असेल. 


बिरबल :- होय बादशाह. 


बिरबलाचे 'होय' ऐकताच सर्व दरबारी बिरबलाच्या नावाने ओरडू लागतात की, तू हे चुकीचे बोलत आहेस आम्ही आमच्या जीवनात आतापर्यंत कधीही खोटे बोललो नाही किंवा कधी कोणती चूक केली नाही. तू स्वतःचे चूक व खोटे बोललेले लपवण्यासाठी आम्हालासुद्धा खोटे ठरवत आहे. 


सर्व दरबाऱ्यांचा बिरबलाच्या बोलण्याला विरोध झालेला पाहून बादशाह अकबर बिरबलाला दरबारातून जाण्यास सांगतात. 


दुसऱ्या दिवशी बिरबल दरबारात एक सोन्याचे आंब्याचे बी घेऊन येतो. 


सर्व दरबारी आश्चर्याने बिरबलाकडे व त्याच्या हातातील सोन्याच्या आंब्याचे बी कडे बघत असतात तेवढ्यात बादशाह अकबराचे आगमन होते हातातील सोन्याचे बी कडे आश्चर्याने बघत असतात बादशाह अकबर बिरबलाला विचारतात.


अकबर :- बिरबल हे काय आहे ? 


बिरबल :- बादशाह हे सोन्याच्या आंब्याचे बी मला एका महान संताने दिले आहे. त्यांनी मला हे बी देऊन सांगितले की, हे जादूचे बी आहे. हे अशा व्यक्तीकडून रोपण व्हायला हवे ज्या व्यक्तीने आज पर्यंत जीवनात एकही चूक केलेली नाही किंवा जीवनात एकदाही खोटे बोलला नाही. जर हे बी अशा व्यक्तीकडून रोपण झाले तर या बी पासून जे वृक्ष उगवेल त्याला सोन्याचे आंबे येतील. जर असे झाले नाही तर जो हे बी रोपेल त्याने जर काही चूक केली असेल किंवा कधी खोटे बोलले असेल तर त्या व्यक्तीवर फार मोठे संकट येईल. 


अकबर :- मग बिरबल हे तू इथे का आणलेस ? 


बिरबल :- बादशाह काल घरी गेल्यावर मला आठवले की मला त्या महान संताने हे बी दिले आहे व आपल्या दरबारात अनेक असे व्यक्ती आहेत जे आजपर्यंत एकदाही खोटे बोललेले नाही किंवा आजपर्यंत त्यांनी एकही चूक केलेली नाही. म्हणून मी हे इथे आणले. कारण हे बी मी जर रोपण केले तर, हे उगवणार तर नाही परंतु माझ्यावर फार मोठे संकट येईल. आणि मी मूर्ख तर नाही जो माहीत असूनही स्वतःवर संकट ओढवून घेईल. 


अकबर :- हम्म... 


बिरबल :- तर बादशाह माझी ही विनंती आहे की, आपल्या दरबारातील ज्याने एकही चूक केली नसेल किंवा कधीही खोटे बोलले नसेल त्याने हे बी रोपण करावे. 


मग सर्व दरबारी चिंतेत पडतात की, आता हे बी कोण रोपण करणार. बिरबल सर्वांना विचारत असतो तुम्ही हे बी रोपण करणार का परंतु सर्वजण ते बी रोपण करायला नकार देतात कारण सर्वांना माहीत असते की आपण आपल्या संपूर्ण जीवनात केव्हा न केव्हा काही ना काही चूक केली असेल किंवा कळत नकळत खोटे बोलले असेल. व हे जाणून आपण बी जर रोपण केले तर आपल्यावर फार मोठे संकट येईल. नंतर सर्व दरबारी मान्य करतात की, प्रत्येक व्यक्तीकडून जीवनात कधी न कधी कळत नकळत काही न काही चूक ही होत असते. 


त्यानंतर बिरबल सांगतो की, हे सोन्याचे बी काही जादूचे नाही. हे तर मी कालच एक सोनारकडून बनवून घेतले होते. 


सर्वजण बिरबलाच्या चतुराईवर खुश होतात व स्वतःवर खजील होतात. बादशाह अकबर बिरबलाला शाबासकी देतात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract