Ranjan Deshpande

Classics

3.4  

Ranjan Deshpande

Classics

चंद्र आहे साक्षीला

चंद्र आहे साक्षीला

3 mins
231


अनिल आणि सुखदा मुलांबरोबर महाबळेश्वरला फिरायला आले होते. खूप वर्षानंतर असे ते बाहेर पडले होते. आयुष्यभर नोकरीमुळे, मुलांच्या शिक्षणांमुळे, नंतर मुलांची लग्न वगैरे अशा कारणांनी ते कधी बाहेर पडले नव्हते. आता मुलांची लग्न झाली होती. जबाबदाऱ्या संपल्यासारख्याच होत्या.

आता अनिल नुकताच रिटायर झालेला. मुलांनी सगळ्यांचीच अशी ट्रिप ठरवली होती. सगळे खुश होते. जवळपासची ठिकाणं फिरायची ठरली. प्रतापगड झाला. मॅप्रो गार्डन झाले. खूप फिरले सगळे. सगळ्या तरुणांच्यात अनिल आणि सुखदा सुद्धा तरुण होऊन वावरत होते. त्यांनाही खूप वर्षांनी असं मनमुराद फिरायला मिळालं होतं.

असेच एका रात्री बाहेर लॉनवर सगळे गप्पा मारत बसले होते. गप्पाना चांगलाच रंग चढला होता. मुलं नातवंडांचं असं खुशीत असलेलं पाहून अनिल आणि सुखदाला कृतकृत्य झाल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे तेही खुश होते.

एवढ्यात कुणीतरी गाण्याच्या भेंड्या खेळायची टूम काढली. वातावरणही खूप छान होते. आकाशात चंद्र, भोवताली झाडी, सुखद गारवा! त्यामुळे सगळे रोमँटिक होऊन गात होते. वातावरण एकदम भरून टाकलं गेलं होतं. सुरुवात नातवंडांनी केली. एकदम दंग्याची गाणी गात होते सगळे. बरोबरीने नाचतही होते. मधूनच त्यांचे आई वडील सुद्धा भाग घेत होते. त्यांनीही जुन्या नव्या गाण्यांचा मेळ साधला. खूप दंगा, मस्ती चालू होती. हा सगळा हंगामा अनिल आणि सुखदा डोळे भरून पाहत होते.

अनिल सुखदाला म्हणाला, "किती छान वाटतंय ना या सगळ्यांना असं एन्जॉय करताना बघून. मुलं किती खुश आहेत नाही! नशीब आहे त्यांचं. मी मात्र इतक्या वर्षात तुला कुठेही बाहेर नाही घेऊन जाऊ शकलो गं. तुझं माहेर, आपले सगळे नातेवाईक आपल्याच गावात. त्यामुळे कुठल्याच कारणाने बाहेर नाही जायला मिळालं. तू सुद्धा माझ्या आईवडिलांच्यात, मुलांच्यात गुंतून गेली होतीस. तुही कधी बाहेर जाऊ या असं डोक्यात आणलं नाहीस. मुलांची शिक्षण, त्यांचं मार्गी लागणं यातच आपलं आयुष्य गेलं गं."

सुखदा अनिलच्या तोंडाकडे बघतच बसली. "आज इतक्या वर्षांनी यांना कसं काय हे जाणवलं असेल! पण ठीक आहे, अजूनही वेळ गेली नाहीये." तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. ते पाहून अनिल विचारतो,

"आता हे सगळं सुचतंय म्हणून हसते आहेस ना? असू दे गं. अजून काही वेळ गेली नाहीये. आता उलट अगदी योग्य वेळी हे सगळं लक्षात येतंय. आता आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या आहेत. सुना घर सांभाळत आहेत. इथून पुढे आता आपण आपल्यासाठी जगायचं. फक्त एकमेकांसाठी. भरपूर फिरू या. आयुष्यात जे जे काही करायचं राहिलंय ते सगळं करू या आता. राहशील ना अशीच कायम माझ्या सोबत?"

सुखदा... "अहो मी आजपर्यंत कधी तुम्हाला कुठल्यातरी गोष्टीत विरोध केलाय का? मी कायम तुमच्याच बरोबर असणार आहे. इथून पुढेही तुम्ही म्हणाल तसंच होईल."

तेवढ्यात नातवंडं आली आजी आजोबांना बोलवायला. सगळे मिळून आजी आजोबांना गाणं म्हणून त्यावर डान्स करायचा आग्रह करत होते.

आजोबा उठले आजीचा हात हातात घेऊन! तिच्या भोवती फिरत गाणं गाऊ लागले,


शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी

चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातुनी

आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा

तू अशी जवळी रहा....

गाणं गात गात ते त्यांना आवडेल तसं नाचत होते. वातावरण एकदम धुंद होऊन गेले होते. आजी आजोबांना असं गाताना नाचताना पाहून मुलं नातवंडं खूप मजा घेत होती. सगळेच जण खूप समाधानात होते. सगळी मस्ती, दंगा करून झाल्यावर दमून सगळे हिरवळीवर बसून निवांत झाले.

अनिल बोलू लागला, "आज आपण खूप मज्जा केली. खूप फिरलो. मनसोक्त एन्जॉय केलं. आता मी ठरवलंय, वर्षातून एकदा तरी आपण सगळ्यांनी मिळून चार दिवस तरी असं बाहेर पडायचंच. सगळ्यांनाच अशा विश्रांतीची गरज असते. बोला तुमचं काय म्हणणं आहे?"

मुलं एकसुरात ओरडली,

"बाबा, आम्हाला मान्य आहे! चंद्र आहे साक्षीला! आणि इथून पुढे प्रत्येक ट्रीपला तोच साक्षी असणार!"

रूमवर गेल्यावर सुखदा गाणं गुणगुणत होती,

पान जागे, फूल जागे,

भाव नयनीं जागला

...

चंद्र आहे साक्षीला,चंद्र आहे साक्षीला


चांदण्यांचा गंध आला

पौर्णिमेच्या रात्रीला

चंद्र आहे साक्षीला,चंद्र आहे साक्षीला


खूप समाधानात त्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला होता!



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics