Jyoti gosavi

Others

4.0  

Jyoti gosavi

Others

दोन चिंचा आणि बांगडीच्या काचा

दोन चिंचा आणि बांगडीच्या काचा

10 mins
328


नेहमीप्रमाणे सुनिता दुपारच्या उन्हातानात हातामध्ये दोन पिशव्या सांभाळत बस स्टॉप वर ती उभी होती.रिक्षा करावी का नको? अजून महिना जायचा आहे.रिक्षाला पैसे परवडणार नाही, त्यापेक्षा बस ची वाट बघू या.असा विचार तिने मनामध्ये केला आणि ती पुन्हा घामाच्या धारा पुसत, नेटाने बस स्टॉपवर उभी राहिली.अचानक तिच्या समोर एक चांगली लांबलचक एसी कार उभी राहिली.


हॅलो सुनीता! गाडीत बस. 


गाडीचा दरवाजा उघडला.आत मध्ये पाहते तर एक बाॅब कट केलेली, स्लीव्हलेस घातलेली, तिच्याच वयाची परंतु यांच्या यंगचॅप दिसणारी कोणीतरी बाई होती. सुनिता भांबावली.


अरे ही कोण? ही कशाला मला गाडीत बसवते? कदाचित ती मला दुसरं कोणीतरी समजत असेल.माझ्यासारखे दिसणारे कोणी तरी हिच्या ओळखत असेल.असा विचार तिने मनात केला.


अग अजूनही विचार कसला करतेस ?बस ,बस गाडीत बस. नाहीतर मला तुझे दोन चिंचेचे दोन आकडे, 15 चिंचोके ,आणि बांगडीचा रंगीत काचा एवढा ऐवज माझ्यावरती ड्यू आहे ना? बाई मला तुझं देणं यायचंय ना? मग आता बस माझ्या गाडीत.


त्याबरोबर सुनीताची ट्यूब पेटली .अगं अंजू तू? किती वर्षांनी भेटतेस? गाडी कोणाची ?तुझी? तू कुठे असतेस? काय करतेस?


 अगं हो एवढे सगळे प्रश्न? इथे बस स्टॉप वरच विचारणार का? आता गाडीत बस .त्याबरोबर सुनीताने आपल्या हातातल्या दोन ब्यागा गाडीच्या मागच्या सीटवर ठेवल्या आणि ती पण मागे बसू लागली.


अगं तू पुढे ये !आपण गप्पा मारू या.सामान राहू दे पाठीमागे, सुनिता तिच्याजवळ बसली.अंजू आपल्या डोळ्यावरचा गॉगल काढून तिच्याकडे बघून हसली.आणि तिने सफाईदारपणे गाडी सुरू केली.पाच ते सात मिनिटाच्या अंतरावरती तिचं कॉम्प्लेक्स होतं.त्यात ती सतराव्या माळ्यावर राहत होती .चांगला प्रशस्त थ्री बीएचके फ्लॅट होता. रस्त्याने दोघी गप्पा मारत मारतच आल्या.जुन्या आठवणी, शाळेतली भांडण, खेळणे, मारामाऱ्या, सारं काही आठवलं . काहीही म्हण सुने तू पण हुशार होतीस माझी एवढीच, सुनिता कसंनुसं हसली.


पहिले प्रश्नांची सरबत्ती सुनीता ने केली होती .त्याची उत्तरे अंजुने दिली .अंजू परदेशात राहत होती.तिचा नवरा कॉम्प्युटर इंजिनिअर होता.एक मुलगा आणि मुलगी होती.आणि अंजू पुढे दहावी नंतर शहरात जाऊन ग्रॅज्युएट झाली.नवऱ्याबरोबर परदेशामध्ये तेथील शाळेमध्ये संस्कृतीची शिक्षिका होती.छान चाललं होतं अंजूचे ,वडील पेशाने शिक्षक ,त्यांना शिक्षणाचे महत्त्व चांगलच कळत होतं.म्हणून त्यांनी मुलीला शिकवलं होत.

आता ते आजारी होते, हॉस्पिटल ला ॲडमिट होते, म्हणून अंजू एकटीच त्यांना बघायला आली होती.आता ती हॉस्पिटल वरूनच गाडी घेऊन आपल्या घराकडे चालली होती.आणि रस्त्यामध्ये बस स्टॉप वर तिला सुनिता दिसली .

आता तुझ्याबद्दल सांग, तुझं कसं चाललंय? तू काय करतेस? तुझे आई बाबा काय कसे आहेत? अंजू म्हणाली 


माझं काय सांगायचं? आता विशेष अस माझ्याबाबत काही नाही.मी दहावी पास झाले, पण मला पुढे शिकवलं नाही.एक तर आमची शेती होती उत्पन्न तोकडं, शिवाय पाठीमागे दोन बहिणी एक भाऊ ,मला शिकवत बसणं बाबांना परवडणारं नव्हतं.तरी मी जीव तोडून सांगत होते, मला पुढे शिकू द्या !मी नोकरी करेन, मी घराला हातभार लावेन पण त्यांनी काय माझ ऐकलं नाही.आमच्या नात्यातलचं स्थळ आलं ,मुलगा कोणत्यातरी प्रायवेट कंपनी मध्ये कामाला होता.असं नाही म्हणण्यासारखं काही नव्हत.त्यामुळे मी हो म्हणाले.माझं लग्न झालं ,या  

मुंबईसारख्या अफाट नगरीत आल्यानंतर, मी पुढे अकरावी बारावी बाहेरून बसून दिली.तरीपण घरदार, संसार ,खाणं-पिणं एक बाळंतपण सगळं सांभाळत मी साठ टक्क्यांनी पास झाले.पुढे कॉम्प्युटरचा कोर्स केला आणि एका पतपेढी मध्ये कामाला लागले.चाललय माझं चांगलं पण तुझ्या सारखं काही मी सांगण्यासारखं माझ्याकडे विशेष काही नाही. असं काही नसतं जो तो आपल्या जागी सुखी असतो.आणि मैत्रीमध्ये कमी-जास्त, श्रीमंत-गरीब असं काही नसतं.


घरी पोचल्यावर ती तिने छान थंडगार पियुष बनवलं,फ्रीज मधून थोडी फळं काढली आणि प्लेटमध्ये सजवून तिच्यासमोर ठेवली.एसी लावला रणरणत्या उन्हातून गेल्यामुळे सुनिताला ते सारे छानच वाटलं . चांगल्या दोन तास दोघींनी गप्पा मारल्या तरी त्यांच्या गप्पा संपत नव्हत्या.मराठीचे सर कसे छान होते, गणिताचे सर कसे मारकुटे होते, दुपारच्या सुट्टीत आपण कसं खेळायचो, शेजारच्या कंपाऊंड मधल्या चिंचा कशा पाडायचो, त्याच्यासाठी भांडणं व्हायची, काचाकवड्या खेळायच्या एकमेकींवर बांगडीच्या रंगीत काचा चिंचोके उधार राहायचे.गाण्याच्या भेंड्या, शाळेची सहल, दहावीचा सेंड ऑफ साऱ्या काही जुन्या आठवणी निघाल्या.दोन तास झाले तरी काही गप्पा संपत नव्हत्या.शेवटी सुनीता म्हणाली "जाते ग बाई !घरात मुले वाट बघत असतील" पुन्हा भेटू या. परंतु माझ्या घरी ये असं निमंत्रण काही सुनीताने अंजुला दिलं नाही . सुनिताला त्याचं आश्चर्य वाटलं.

शाळेमध्ये असताना अंजली नेहमी सुनीताच्या घरी जात असे किंवा सुनिता तिला जबरदस्ती आपल्या घरी घेऊन जात असे .घरात जे पण काय असेल ते भाकरी चटणी खायला घालत असे. पण आज मात्र ती ये म्हणाली नाही. दुसऱ्याच दिवशी अंजुने फोन केला, अगं मी अजून जास्तीत जास्त पंधरा दिवस आहे, मला तुझ्या घरी यायचे आहे. भावजींना भेटायचे आहे, तुझ्या मुलांना बघायचे आहे. तू मला तुझा पत्ता व्हाट्सअप कर. पण सुनिताने काही रिस्पॉन्स दिला नाही. अंजू तिला दर दोन दिवसाने पत्ता पाठवायची आठवण करायची आणि सुनीता नुसती हो म्हणायची. अंजुला यामध्ये काहीतरी विचित्र वाटलं ,काहीतरी वास आला .शेवटी एक दिवस ती तिच्या खनपटीलाच बसली. अग अंजू माझं घर ना छोट्याशा चाळीत आहे. तुझी पाॅश गाडी त्या गल्लीत सुद्धा येऊ शकणार नाही .तुला भेटायचं होतं तर मी पुन्हा तुझ्या घरी येते ,पण तू काही माझ्या घरी येऊ नको. 


ते काहीही असू दे, तू मला पत्ता पाठव .यायचं का नाही ते माझं मी ठरवेल. असं जेव्हा अंजुने निक्षून सांगितलं तेव्हा कुठे सुनीताने पत्ता पाठवला. भांडुपच्या चाळीत कोकण नगरला कुठल्याशा डोंगरावर ती राहत होती. म्हणजे तशी चाळच होती ती पण इतर चाळींच्या तुलनेने अजून थोडी मागास. सुनिता नेहमी फ्लॅटमध्ये राहण्याचे स्वप्न बघत असे, कुठेही बांधकाम चालू असेल तिथे ती उगाचच चकरा मारत असे. बिल्डर च्या ऑफिस मध्ये जाऊन किंमत काढून येत असे. तिला माहीत होतं ही काही आपल्या आवाक्यातली गोष्ट नाही, परंतु चला निदान मनाचं समाधान. कधी ना कधी आपण फ्लॅट मध्ये जायचं. त्यासाठीची बचत करत असे, तिने बँकेच्या पोस्टाच्या आर् डी देखील काढल्या होत्या. परंतु तेवढ्या रकमेने काही होणार नव्हतं. तिने केलेल्या बजेटमध्ये लांब कुठेतरी पनवेल, विरार अशा ठिकाणी जाऊन कदाचित एखादा वन आरके मिळाला असता. पण म्हणून कोणी स्वप्न बघण सोडतं? शेवटी आत्ता भांडुप मध्यावर्ती होतं, तेथे सुधारणा होत होत्या. बिल्डर्स येत होते. त्यामुळे आज ना उद्या आपल्याला फ्लॅटमध्ये राहायला मिळेल अशी आशा तिला होती. 

अंजू चा फ्लॅट बघून तिचे डोळे फिरले होते अरे बापरे एवढा उच्चभ्रू वस्ती मधला फ्लॅट तिने इतका देखणा सजवला होता किती च्या घरा पुढे आपली चाळीतली दोन रूम ची खोली म्हणजे तिला इंद्राचा ऐरावत पुढे शाम भट्टाची तट्टाणी  वाटत होती. म्हणजे तिला काही मनातून जेलस होत नव्हती, पण मैत्रिणीला आपल्या घरी बोलवायला लाज मात्र नक्की वाटत होती. तिने पत्ता दिला खरा, पण तिला काही वाटलं नाही की, अंजली आपलं घर शोधत एवढ्या कोपऱ्यामध्ये येईल. पण अंजली तिचं घर शोधत गेली. 


सुनीताला अंजलीला घरात ये म्हणताना अगदी लाज वाटत होती. पण अंजलीच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. ती अगदी प्रसन्न मनाने त्यांच्या घरामध्ये गेली, बसली, या छोट्याशा घरांमध्ये गप्पाटप्पा मारल्या. तिच्याकडून झालेला पाहुणचार स्वीकारला. तिने आपल्या मध्यमवर्गीय लोकांप्रमाणे चहा आणि बिस्किटे समोर ठेवली. अंजलीने मनापासून त्याचा आस्वाद घेतला. तिला म्हणाली चल आवर! आपण बाहेर जाऊया.अंजलीने सुनीताला बाहेर काढले. 


पाच ते सात मिनिटं डोंगर चढल्यावर ती सुनीताची चाळ लागत होती. तेवढेच अंतर उतरून दोघी खाली आल्या.  अगं आमचं घर ना, जरा कोपर्‍यातच आहे. म्हणून तर मी तुला बोलावलं नव्हतं. म्हणून मी तुला घरी ये म्हणत नव्हते. एक तर तू परदेशात राहते, इथे सुद्धा तुझा एवढा सुंदर फ्लॅट आहे. तुला माझ्या एवढ्याशा घरामध्ये कसं तरी वाटलं असतं. माझ्या ऑफिस मधील माणसं, मुलांचे मित्रमंडळी मी कधी घरी बोलवत नाही. मुलांनासुद्धा वाढदिवसाला वगैरे बाहेर जाऊन पार्टी द्या म्हणून सांगते. परंतु मी घरी कोणाला बोलत नाही. म्हणूनच मी तुला बोलावलं नव्हतं, मी तुला पत्ता देत नव्हते. माझ्या मनात बाकी काही नाही ग! 


अगं सूने आपली शाळेपासून ची मैत्री, माझ्या मनात असं काही नाही. आणि मला तुझं घर बघून देखील असं काही वाटलं नाही. तू का वाईट वाटून घेतेस,आणि फ्लॅटमध्ये जाण्याचा विचार का करत नाहीस? 


अग काय झालं, लग्न झालं तेव्हा जबाबदाऱ्या होत्या. आमचे हे मोठे, घरात सासू सासरे होते, दिर होता, नणंद होती. त्यामुळे पाठीमागे पैसा असा शिल्लक ठेवता आला नाही. लग्नाची पहिली दहा-बारा वर्ष सगळ्यांच करण्यात गेली. शिवाय सुरुवातीला मी देखील नोकरीला नव्हते. त्यानंतर सासू-सासऱ्यांचे आजारपण नणंदेचं लग्न, दिराच शिक्षण, हे सगळं करून आताशी कुठे मोकळे झालो. तोपर्यंत आमची मुलं मोठी झाली, आता त्यांची शिक्षण, त्यामुळे माझ्या आयुष्यात तरी मला काही फ्लॅट मध्ये जायला मिळेल असे वाटत नाही. मी माझ्याकडून बचत करते, आता माझा सगळा पगार मी बाजूला टाकते. यांच्या पगारावरती घर चालवते. मुले अजून शिक्षण घेत आहेत. त्यांना हाताशी येण्यासाठी अजून चार-पाच वर्षे तरी लागतील. काय नशिबात असेल ते असेल, पण मला आयुष्यातली शेवटची वर्षे तरी फ्लॅटमध्ये राहायचेआहे, त्यातले सुख उपभोगायचे आहे. 

अंजू तिला आपल्यासोबत मॉल मध्ये येऊन गेली. नवऱ्यासाठी आणि मुलांसाठी थोडीशी खरेदी केली. तिच्या बाबांची तब्येत आता सुधारत होती. त्यांना दोन चार दिवसांमध्ये डिस्चार्ज मिळाला असता. त्यानंतर अंजली पुन्हा बाहेरगावी निघून जाणार होती. त्यामुळे तिने थोडेसे शॉपिंग केले. एक छानसा पंजाबी ड्रेस मैत्रिणीसाठी देखील घेतला. सुनिता नको नकोच म्हणत होती. पण ती म्हणाली अग माझी आठवण म्हणून तरी ठेव, मी इतकी खरेदी केली त्यात मला एक पंजाबी ड्रेस काही भारी नाही. सुनीताला मात्र या गोष्टींचे एवढे वाटत होते की, तिचा मध्यम वर्गीय संकोची स्वभाव आडवा येत होता. आणि फाजील स्वाभिमान दुखावला जात होता. ती मनात विचार करत होती मी हिला घरी आल्यावर काय दिलं? मी एक साधी आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे ओटी भरली. ही मात्र मला एवढा महागडा ड्रेस घेऊन देतेय. शेवटी तिने बोलूनच दाखवलं, अगं माझ्या घरी आल्यावर मी तुला काय दिलं? एक साधी ओटी भरली. तू मला इतका भारी ड्रेस कशाला घेते? मी याची परतफेड कधी करणार ? 


अगं प्रत्येक गोष्टीला असा विचार करायचा नसतो. आज माझ्याकडे आहे, देवाने मला भरपूर दिले आहे, आणि शिवाय असं ऊठसूट काही कोणालाही मी देत नाही. तू माझी लहानपणापासूनची जिवाभावाची मैत्रीण, त्यामुळे मला असं वाटलं की एखादी आठवण म्हणून तुला ड्रेस घ्यावा .त्यासाठी तुला एवढा संकोच बाळगण्याची गरज नाही. आणि परतफेडीचा तर विचारदेखील करू नकोस. 


तिने सुनीताला तिच्या घराजवळ कॉर्नरला सोडलं. आणि ती आपल्या घरी गेली. अंजुचे बाबा डिस्चार्ज घेऊन घरी आले. आता त्यांना बरं वाटत होतं. घरांमध्ये कामासाठी एक मावशी आणि एक माणूस ठेवलेला होता. 

बाबा इकडे एकटेच राहत असत. 


तिकडे चला म्हटलं तर त्यांना तिकडचे वातावरण मानवत नाही. तिकडे करमत नाही, आई गेल्यानंतर अंजूने  त्यांना आपल्या बरोबर नेलं होतं. परंतु ते चार महिन्यातच पुन्हा भारतात आले. तिकडच्या थंड हवेत ते सारखे आजारी पडत, अंजू ने इकडे त्यांची चांगली व्यवस्था लावली. 

घरामध्ये 24 तासासाठी एक बाई आणि वर कामाला एक गडी ठेवून दिला. 


अंजूचे आत्ता जाण्याचे दिवस जवळ आले. ती साधारण पंधरा दिवसाची सुट्टी काढून आली होती. तिच्या सुदैवाने तेवढ्या कालावधीमध्ये बाबा बरे होऊन घरी आले. दोन दिवसाने अंजू जाणार होती. तिने पुन्हा एकदा सुनीताला भेटण्याची इच्छा प्रकट केली. नेहमीप्रमाणे सुनीताला न्यायला गाडी घेऊन आली. त्यानंतर एका चांगल्या पाॅश हॉटेलमध्ये मैत्रिणीला घेऊन गेली. आपल्या मनाप्रमाणे काय त्या डिश मागवल्या, सुनिता अशा पाॅश उंची हॉटेलमध्ये आयुष्यात पहिल्यांदाच येत होती. तिची नजर सगळीकडे भिरभिरत होती. एसी चा गारवा जीवाला सुखावत होता. अंजुने मागवलेल्या काही पदार्थांची नावे ती आयुष्यात पहिल्यांदाच ऐकत होती.


तिने तिला मागच्यावेळी सांगितलं होतं जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत मी तुझे लाड करणार, तू एकही शब्दाने मला अडवायचं नाही. मी काय देईल ते घ्यायचं, मी काय करेल ते करून घ्यायचं .त्यामुळे सुनीता फक्त टकामका बघत होती. शुभ्र कापड्यातील  वेटर्स ने समोर सगळ्या डिश आणून ठेवल्या. दोघी देखील चाखत माखत ,आस्वाद घेत घेत सावकाश खात होत्या. सावकाश जेवत होत्या. एखादा पदार्थ अंजू कशी खाते हे बघून सुनिता खात होती. बिल देऊन झाल्यानंतर  अंजू म्हणाली सुनिता आज मी तुला एक गोष्ट देणार आहे, ती तू नाही म्हणू नकोस. मी काही उपकार करत नाही .माझा देखील स्वार्थ आहे. आपण माझा घरी गेलो होतो ना, त्याच कॉम्प्लेक्समध्ये माझा अजून एक टू बीएचके फ्लॅट आहे .त्याची चावी मी तुझ्या हातात देत आहे. 

माझा स्वार्थ असा की माझी जीवाभावाची मैत्रीण माझ्या बाबांची काळजी घेईल. अडीअडचणीला धावून जाईल. तिकडे सातासमुद्रापलिकडे मला जीवाला घोर राहणार नाही. तुझ्या जीवावर मी निश्चिंतपणे तिकडे जाईल. अट एवढीच आहे की तू दररोज माझ्या घरी चक्कर मारायची. 

बाबा कसे आहेत बघायचं, मला कळवायच, तुझ्यामुळे कामवाल्या मावशी आणि मामा यांच्यावर देखील वचक राहील. शिवाय तुझ फ्लॅटमध्ये राहण्याचं स्वप्न पूर्ण होईल. बर मी काही तुला टेम्पररी राहायला देत नाही. तुझे पैसे ,तुझ्या पगाराचे पैसे जे बाजूला टाकतेस ते दरमहा माझ्या अकाउंटला भरायचे. आणि आत्ताच्या बाजारभावाने जी काय किंमत असेल, त्यामध्ये वीस टक्के कमी करून बाकीची रक्कम हळूहळू तू मला पेड करायची . तुझे फ्लॅटमध्ये राहण्याचे स्वप्न साकार होईल . माझं काम होईल. शिवाय मी काही फुकट देत नाही, त्यामुळे कोणताही संकोच बाळगू नकोस. 


अगं पण आमचा पगार एवढासा, आमच्या नोकऱ्या प्रायव्हेट ,


अगं इतके वर्ष करते आहेस ना? मग जमेल. 


पण तुझे हप्ते सुटले नाहीत तर? 


असं होणार नाही, मला माहित आहे आपण मध्यमवर्गीय माणसं आपल्या शब्दाला खूप पक्के असतो. आपला स्वाभिमान खूप मोठा असतो. आपण कधीही कोणाला बुडवत नाही. काय वाटेल ते झाले तरी तू जीवाचे रान करून माझे पैसे मला परत करणार मला माहित आहे. त्याची चिंता तू करू नको, अगं आपण दोघी कधी काळी एकाच परिस्थितीमधून गेलेलो आहोत .परंतु माझ्या नशिबाने मला हात दिला मी पुढे शिक्षण घेतलं ,नवरा चांगला मिळाला आणि माझी आर्थिक परिस्थिती सुधारली. तू मात्र आपल्या परिस्थितीशी झगडत राहिलीस, म्हणून कदाचित परमेश्वराने तुझी आणि माझी भेट घडवून आणली. जेणेकरून तुझी ही चिंता मिटेल आणि माझी ही चिंता मिटेल. ही माझ्या घराच्या कागदपत्र ,ही घराची किल्ली आणि पॉवर ऑफ अॅटरणी मी तुला देत आहे. मी येथून निघण्यापूर्वीच तू तुझ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होशील, माझ्यासमोरच सर्व सामान शिफ्ट करशील म्हणजे मी निश्चिंतपणे बाहेर जाईन सुनीताच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या आज तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं आणि तिला तिची हरवलेले मैत्री देखील गवसली होती शिवाय तिला खूप आनंद झाला होता ते खूप आनंदात होते वातावरण थोडे गंभीर होतं अंजुने तिच्या खांद्यावर ते हात ठेवले अगबाई इतकी वर्ष झाले तुझ्या  दोन चिंचा पंधरा चिंचोके आणि काही काचेच्या बांगड्याचे तुकडे माझ्यावरती उधार होते ना! आज त्याचं ऋण फेडलं असं समज. त्याबरोबर सुनीता खळखळुन हसली आणि तिने अंजुला घट्ट मिठी मारली. आणि मैत्रीचा बसंती रंग त्यांच्यामध्ये उधळला गेला.

*************************"


Rate this content
Log in