अपर्णा ढोरे

Others

4.0  

अपर्णा ढोरे

Others

घुसमट

घुसमट

3 mins
23.7K


अनघा एका जागी खिन्न बसून शून्यात पहात होती.तिच्यात ना उत्साह होता ना उर्मी.पाच वर्षांपूर्वी तिचे लग्न होऊन जेव्हा ती या घरात आली. तेव्हा तिला आभाळच ठेंगणे झाले होते. प्रेमळ सासुसासरे, हौशी दिर, एकच नणंद, तिचेही लग्न झालेले! घर कसं गोकुळ वाटायचं तिला.अनघाच्या माहेरच्यांना सांगण्यात आले होते की मुलाला एका संस्थेत मोठ्या पगाराची नोकरी आहे.तिचे माहेर अगदी दूर होतं. तिने मनोमन ठरवले होते,की सासरच्याच माणसांना खूप प्रेम द्यायचं.तिचा नवरा सुमेशही खूप चांगला होता,प्रेमळ,काळजी घेणारा, हवं नको ते बघणारा.त्याचे राहणीमान तर एवढे टापटीप,रुबाबदार एखाद्या साहेबाला शोभेल असे.बोलण्याने तर समोरच्यावर मोहिनीच घालायचा.

अचानक एक दिवस संध्याकाळी दोन माणसे घरी आली ती जोराने बोलू लागली,"सुमेश कोठे आहे,आमचे पन्नास हजार घेतले आणि आता चाटा मारतोय!"अनघाच्या तर पायाखालची जमीनच सरकली.तिने म्हटले,"हे बघा हे ऑफिसला गेले आहेत,तुम्ही संध्याकाळी या."ती दोघेही हसली आणि म्हणाली"ऑफिसला गेला म्हणे लायकी तरी आहे का याची नोकरी करण्याची,तुम्हालाही फसवले वाटते नोकरी आहे असे सांगून!"हे ऐकून तिच्या डोळ्यासमोर काळोख पसरला.

सासूबाई तिला समजावत होत्या,"अगं, सरकारी नाही पण प्रायव्हेट कामे करतो ना तो?या माणसांकडे लक्ष नको देऊस!"तिने रात्री सुमेशला विचारले पण त्यानेही उडवाउडवीची उत्तरे दिली.नंतर अशी बरीच लोकं पैसे मागायला येऊ लागली.आणि सुमेशही घरी रात्री बेरात्री दारू पिऊन यायला लागला.अनघाने खूप समजावले, पण अशा पार्ट्यांमध्ये घ्यावीच लागते.असे म्हणून तो तिला उडवून लावत असे.

अशातच अनघाला दिवस गेले,घरात खूप आनंद झाला.आता या बाळामुळे तरी याचं व्यसन सुटेल हा एकच दिलासा तिला होता.सासरे निवृत्त झाले होते,लहाना दिर नोकरीला लागला होता पुण्याला,लहान जाऊ सीमा पण तेथेच नोकरीवर होती.एक दिवस दिराने पुण्याहून 50 हजार रुपये एका व्यक्तीला देण्यासाठी सुमेशच्या खात्यात टाकले.पण ते पैसे त्या व्यक्तीकडे न देता यानेच खर्च केले.नंतर त्या माणसाला खोटा चेक दिला.तो चेक वठलाच नाही.त्या माणसाने चारशेविशीची केस ठोकली.नाहक दिर आणि जावेला पण यातून भरडून निघावे लागले.अशा फसवणुकीच्या बऱ्याच केसेस त्याच्यावर लागल्या.सुमेशच्या वडिलांनी कित्येकदा त्याला या गर्त्यातून बाहेर काढायला पैसे दिले.पण पैसे इकडेतिकडे उडवून दारू,पार्ट्या,नवीन मित्र आणि पुन्हा याची टोपी त्याच्या डोक्यावर!

दिर आणि जाऊ तर कधीचेच दुरावले होते.अशातच सुमेशने तिच्या काकांना पण गंडा घातला. तिला याची सुतराम कल्पना नव्हती की तिच्या काकांकडून नोकरी लावून देतो या आमिषावर दोन लाख रुपये घेतले म्हणून आणि परत करायचे नावच नाही,तिला माहित झाल्यावर माहेरी तोंड दाखवायलाही तिला जागा उरली नव्हती.ती आतल्या आत कुढायला लागली.असे पन्नास ते साठ लाख त्याच्या अंगावर उचल झाली होती.एवढे पैसे परत करणे शक्यच नव्हते.कारण सुमेश काम कोणतेच करत नव्हता.आयते बसून खाणे,संध्याकाळी छान कपडे घालून बाहेर जाणे,रात्री मित्रांसोबत बार मध्ये बसणे हाच उद्योग त्याने अवलंबिला होता.निवृत्त बापाच्या जीवावर खाणारा सुमेश दिवसेंदिवस लतकोडगा होत चालला होता.

फसवणुकीच्या गुन्ह्याखाली त्याला एक दिवस अटक झाली.त्याला जमानतही मिळाली नाही.सासऱ्यांनी खूप प्रयत्न केले पण शक्य झाले नाही.घरातली सर्व कामे हिच्यावर टाकून सासूबाईंनी कामापासून संन्यास घेतला.नवरा तुरुंगात ही मात्र स्वयंपाक,धुणी, भांडी,फरशी आणि इतर अशा सर्वच व्यापात ही अडकून पडली.

हितचिंतकांनी तिच्या सासूबाईंना समजावले की अनघाला पायावर उभी करा तर,"अहो आम्ही तर सांगून थकलो पण तिलाच आवडत नाही नोकरी करणे."असे त्या सरळ सांगायला लागल्या.त्यांनाही हक्काची मोलकरीण मिळाली होती तिच्या रुपात!

लहान दिर जाऊ हिच्यावरच हुकूमत गाजवू लागले.सगळ्यांचे करतांना हिचे मुलाकडे दुर्लक्ष होऊ लागले.सगळेजण हसत,खिदळत आणि ती मात्र कामाला जुंपलेली दिवसरात्र.तिला वाटायचे आज जर माझा नवरा काही कमावता असता तर मला असे राब राब राबावे नसते लागले.सुमेशची शिक्षा संपली, तो घरी आला..आता तो दुसरे काम शोधेल,मार्गाला लागेल असे तिला वाटले.पण नाही.अनघाने नोकरी करते असे म्हटले तर तिच्यावरच भडकला. .दोन चार दिवस घरात राहिला नंतर पुन्हा त्याचे तेच रहाटगाडगे सुरू झाले.

आपल्या व्यक्तिमत्वाची छाप लोकांवर टाकायची आणि त्यांना गंडवायचे,रात्री बार मध्ये दारू ढोसायची. अनघा घरातली कामे,आणि याचे प्रताप यामुळे जाम वैतागून गेली होती.

रात्री हा बारा नंतरच घरी यायचा,आल्यावर हिला खूप त्रास द्यायचा.झोपायला उशीर व्हायचा पण तरीही ती पहाटे लवकर उठायची आणि तो मात्र दहा वाजेपर्यंत लोळत रहायचा.आधीच कृश असलेली अनघा हल्ली खूप खंगरलेली दिसू लागली होती.

या व्यापातून आपली सुटका मेल्याशिवाय तरी नाही हे तिला कळून चुकले होते.आता सुमेशला तुरुंगात जाणे,शिक्षा भोगणे हे नित्याचेच झाले होते.पण राज मोठा होत होता.त्याने विचारले की ,"आई ,...बाबा काय करतात गं?तर काय सांगायचे-की तुझे बाबा इतरांना फसवून तुरुंगात जातात,दारू पितात,सुशिक्षित असून बिनकामी, ऐतखाऊ आहेत."ती विचार करू लागली,आत्महत्या केलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या पत्नीला थोडीतरी सहानुभूती मिळते.पण अशा सुशिक्षित, ऐतखाऊ, फसवेखोर माणसांच्या बायकांना फक्त मिळते ती घुसमट!ह्या विचारांनी ती इतकी अस्वस्थ झाली आणि पुरती कोसळली.


Rate this content
Log in