Smita Vivek Agte

Others

4  

Smita Vivek Agte

Others

गोष्टी गावाकडच्या (भाग 2)

गोष्टी गावाकडच्या (भाग 2)

10 mins
314


" सुभद्रा, ये गsss, ऊन ऊन मेतकूट भात खायला, नाहीतर निऊन जाईल तो, आणि शिरप्यालाही बोलावं, गरम आहे तोवर खाऊन घ्या, मी भाऊंना सुद्धा देऊन येते भात"...

"आले माई sss, थोडीच कोकमं राहिली आहेत सोलायची, आणि माई तुम्ही कशाला बनवला भात, मी केला असता ना?

उगीच त्रास घेता तुम्ही माई".

"राहू दे गss, सगळं तर तूच करते आहेस, तू आणि शिरप्या दोघेच तर बघता आहात घरचं सगळं, आणि मुलं कुठे आहेत, शाळेत गेली का गं sss?

" हो माई आज शनिवार ना? म्हणून सकाळची शाळा आहे!!"

"बरं, ये अगोदर, नंतर सोल ती कोकमं, आणि शिरप्या कुठे आहे?"

" ते भाऊंजवळच आहेत माई ss, त्यांचं अंग पुसून घेत आहेत, गरम पाण्याने".

"खरचं ग ss बाई सुभद्रे, तुम्ही दोघे नसता तर मी एकटीने कसं केलं असतं देव जाणे"......

यशोदा ताई!! म्हणजेच माई आणि भाऊ गेले चाळीस, पंचेचाळीस वर्ष तरी राहत आहेत, ह्या वेंगुर्ल्याच्या त्यांच्या घरात!!

घर तसं बऱ्यापैकी मोठं आहे, चार पाच खोल्यांचं, मागे छोटीशी वाडी, अन पुढे अंगण...

मागे वाडीत, दोन चार आंब्यांची झाडं, दोन तीन नारळी आहेत, फणस आहे...

पुढच्या अंगणात रातआंबा, जांभूळ अन प्राजक्त ह्यांची झाडं आहेत.

तसे घरात म्हणाल तर माई आणि भाऊ दोघेच, मुलगा नीरज इथेच लहानाचा मोठा झाला...

पण तो गेल्या पंधरा एक वर्षांपासून लंडनलाच असतो, भाऊंनी आणि माईंनी त्याला छान शिकवलं, अगदी उच्च शिक्षणासाठी लंडनला पाठवलं, शिक्षण झाल्यावर त्याने तिकडेच नोकरी धरली, मग दोन एक वर्षात लग्नही केलं त्याने, मुलगी तिकडचीच असल्यामुळे दोघेही तिकडेच रमले, यथावकाश माईंना आणि भाऊंना नातही झाली, पण फक्त फोटो बघण्यातच आनंद मानला होss त्या दोघांनी, कारण नोकरी निमित्ताने नीरज काही इकडे येऊ शकत नव्हता, किंवा आता त्यालाच इकडे यावं असं वाटत नसेल म्हणा ना!!

"आमचा नीरज फार व्यस्त असतो होss कामामध्ये त्यामुळे त्याला काही वेळ मिळत नाही, आम्हाला पत्र लिहायला किंवा इकडे यायला", असं माई नेहेमीच म्हणत असत.

शिरप्या आणि सुभद्रा दोघेही ह्याच गावातले, पण माई आणि भाऊंच्या मदतीला ते दोघे दिवसभर इथेच असायचे.

आधी आधी ते दोघे रात्रीचे तरी त्यांच्या घरी जायचे, पण तीन चार वर्षांपासून ते माईंच्या सांगण्यावरून इथेच येऊन राहिले होते, माईंच्या मदतीला..

गेले दहा एक वर्ष तरी ते दोघे आहेत माई आणि भाऊंकडे, शिरप्या आणि सुभद्रा दोघेही अगदी मनापासून काम करत माईंकडे..

माईंना आणि भाऊंना एकट्यानं काही सगळी कामं होत नव्हती, त्यामुळे गावातल्या ओळखीनेच शिरप्या आणि सुभद्रा इथे कामाला यायला लागली, ती दोघे आणि त्यांची मुलं ही.

खूप कष्टाळू कुटुंब आहे शिरप्या आणि सुभद्रा म्हणजे. अगदी स्वतः च्या घरासारखीच सगळी कामं करत दोघेही. कधी कोणत्याही कामाचा कंटाळा म्हणून नाही, अगदी घरच्यासारखेच मिसळून गेले ते, माई आणि भाऊंच्या घरात, माई ही खूप प्रेम लावायच्या होss त्यांना, त्यांच्या मुलांनाही माईंनी जवळच्याच शाळेमध्ये घातले होते, सगळा शाळेचा खर्चही माईच करायच्या.

नीरज इकडे आलाच नाही, कधीतरी वर्षातून एखादं पत्र असायचं त्याचं..

इकडे पैसे वगैरे अजिबात पाठवू नकोस, असं पहिल्यापासूनच सांगून ठेवलं होतं माईंनी नीरजला, कारण भाऊंची पेन्शन, थोडे आंबा नारळाचे पैसे ह्यात दोघांचं अगदी छान चालत होतं, बरंss कोकणात काही फार पैशाची गरज नसायची, त्यामुळे दोघांना असे किती पैसे लागणार? त्यांचा सगळा खर्च भागूनही, आणि शिरप्याला थोडे पैसे देऊनही, भाऊ थोडी शिल्लक ठेवत होते बँकेमध्ये.

शिरप्या, सुभद्रा आणि मुलं इथेच जेवायची माईंकडेच, माईंच त्यांना म्हणायच्या, "इथेच जेवत जा, नाहीतरी आम्हाला कोण आहे आता दुसरं? तुम्ही दोघेही आम्हाला मुलासारखेच तर आहात....

भाऊंचा स्वभाव पहिल्या पहिल्यांदा थोडा तापट होता, माईंशीही ते विचित्रच वागत, पण माई सगळं निभावून नेत होत्या.

पण जसा भाऊंना कंपवाताचा त्रास सुरू झाला तसे ते शांत होत गेले.

माईंनी नीरज ला ही पत्र पाठवून कळवलं होतं, भाऊंच्या आजारपणाचं..

पण त्यालाही त्याने पत्रानेच उत्तर दिले, की वेळ मिळाला तर येऊन जाईन, पण नाही मिळाला तर रागावू नका, पैसे हवे असल्यास सांगा, मी मनी ऑर्डर करतो.

" अरेss नको येऊ म्हणावं, आणि पैसेही पाठवू नकोस, आम्हाला पैशाची नाही तर तुझी, पोटच्या मुलाची गरज होती, ज्या आईबापाने तुला वाढवलं, शिकवलं आणि आता त्यांनाच भेटायला यायला वेळ नाही का तुला?".

भाऊंच्या रागाला त्या दिवशी सीमा उरली नव्हती, "आता हाss बाप मेला तरी येऊ नकोस म्हणावं, माझं सगळं करायला इथे माझा शिरप्या आहे". भाऊंच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं होतं..

त्या नंतर मात्र भाऊ खचले, पण एक झालं, की त्यांचा विचित्र स्वभाव बदलत गेला, त्यांनी आता सगळंच माईंवर सोपवून दिलं, पैशांचे व्यवहार, घर सगळं तेव्हापासून त्यांनी माईंच्या हातात दिलं.

हळूहळू कंपवात जास्तच बळावू लागला, आणि ते अंथरुणाला खिळले गेले...

तेव्हापासून त्यांचं आंघोळ, साफ सफाई सगळंच शिरप्या करू लागला, अगदी पोटच्या पोराप्रमाणे तो भाऊंची सगळी सेवा करत होता!!

शिरप्या आणि सुभद्राची मुलंही माई आणि भाऊंना आजी आजोबाच म्हणत होती, त्यांना प्रेम लावत होती.

माई आणि भाऊंच जग आता फक्त सुभद्रा, शिरप्या आणि मुलं ह्यांच्या पुरतच उरलं होतं....

एक दिवस भाऊंची तब्बेत जास्तच बिघडली, ही शेवटची घटका आहे, हे त्यांनाही कळून चुकलं होतं..

भाऊंनी माईंना जवळ बसवलं आणि त्यांना म्हणाले," यशोदा माझं आता काही खरं नाही, पण जाता जाता मला तुझी माफी मागायची आहे, माझ्या विचित्र वागण्यामुळे तुझ्यावर खूप अन्याय होत गेला, मी अपराधी आहे तुझा, जमलं तर मला क्षमा कर".

" अहो हे काय बडबडता आहात तुम्ही, अरे शिरप्या sss, सुभद्रा ss इकडे या रे, हे भाऊ बघा कसे करायला लागले आहेत".

" यशोदा, मी गेल्याचं चुकूनही नीरज ला कळवू नकोस, हे घर, पैसा सगळं मी तुझ्या नावावर कायदेशीर करून ठेवलं आहे.

माझ्या मागे तू ह्या सगळ्याच काय करायचं ते ठरव, हा अधिकार फक्त तुला असेल, परत एकदा मला माफ कर"...

इतकं बोलून भाऊंनी प्राण सोडला....

भाऊंचं सगळं शेवटचं कार्य मुलगा म्हणून शिरप्याने केलं...

तेव्हापासून तर सुभद्रा, शिरप्या आणि माईंची नातवंडं!! हो ss सुभद्रा ची मुलं हीच माईंच्या आता अजून जवळची बनली होती...

नीरज च काय बिनसलं होतं ते काही माईंना कळालं नाही, पण नंतर नंतर तर माई पत्र व्यवहारही करेनाश्या झाल्या, पण मनातून नीरज ची वाट मात्र त्या पाहात राहायच्या...

त्यांना नेहेमी वाटायचं की, माणसं परदेशात गेली की इतकी बदलू शकतात का? की त्यांना आपल्या आईवडिलांची आठवण सुद्धा येऊ नये?.......

भाऊ गेल्याच त्यांनी पत्रातून नीरज ला कळवलं होतं, त्यावर त्याच एकच पत्र आलं होतं, की मला कामामुळे येता आलं नाही, त्याबद्दल क्षमा मागतो. पण नंतरही तो कधी आलाच नाही...

भाऊंच्या माघारी माई सगळे व्यवहार करत होत्या, भाऊंचे पैसे मात्र त्यांनी जसे च्या तसे बँकेतच ठेवले होते, सुभद्रा, शिरप्या आणि मुलं

ह्यांच्यामध्येच त्यांचा सगळा वेळ जात होता, ते ही सगळे माईंना हवं नको ते बघत होते....

आता मात्र काही दिवसांपासून माई सुद्धा थकल्या होत्या, नीरज ला त्या पत्र पाठवत नव्हत्या, त्याचच कधीतरी एखादं पत्र येत होतं, पण माई त्याकडे आताशा दुर्लक्षच करत होत्या...

माई अंथरुणातच झोपून असायच्या, शारीरिक आणि मानसिक दोन्हीकडूनही त्या थकत चालल्या होत्या...

एक दिवस मात्र त्यांनी एक भलं मोठं पत्र लिहिलं होतं नीरजला...

"प्रिय नीरज,

आज जे मी तुला पत्र लिहिते आहे ते लक्ष पूर्वक वाच, कारण हे माझं शेवटचं पत्र आहे असं समज, आता हल्ली माझीही तब्बेत बरी नसते, त्यामुळे माझा शेवट आता जवळ आला आहे हे मला कळते आहे.

तू असं का वागलास, किंवा का वागतो आहेस ह्याचा जाब मी विचारत नाहीये, पण माणसं इतकी का बदलतात ह्याचं आश्चर्य वाटतं.

शेवटी शेवटी खूप वाट पाहिली तुझी,भाऊंनी, त्यांना वाटलं होतं की तू कधीतरी येशीलच, पण तू नाहीच आलास, अगदी पोटचा मुलगा असूनही.....

सुभद्रा अन शिरप्या आमचे सख्खे, पोटचे नसूनही त्यांनी खूप केलं आमच्यासाठी!!!

भाऊंना काही बोलायचं होतं तुझ्याशी, काही प्रश्न विचारायचे होते..

ते नेहेमी म्हणायचे..

नीरजला जन्म दिला ही माझी चूक झाली का?

नीरज चे सगळे लाड पुरवले, त्याला उत्तम शिक्षण दिलं, परदेशी पाठवलं ही माझी चूक होती का?

मग का नाही त्याला आपल्या बद्दल ओढ?

कोणते संस्कार करायचे राहिले ज्यामुळे तो आपण जिवंत असूनही आई बाप मेले आहेत अश्या प्रकारे वागतो?

नीरज!!! मी ही तुझ्या जन्मापासून तुला कधी अंतर दिलं नाही, तुझे सगळे लाड केले, प्रेम दिलं, पण ह्या सगळ्यांचे उपकार तू अश्या प्रकारे फेडशील असं भाऊंना कधीच वाटलं नाही.

माझ्या नाही! पण भाऊंच्या तर पोटचाच मुलगा होतास ना तू?.....

हे वाचून कदाचित तुला आत्ता धक्काच बसला असेल ना?...

मी ठरवलं होतं, की ही गोष्ट तुला कधीच कळू द्यायची नाही, पण ती वेळ तू आणलीस.

तर...

माझं आणि भाऊंचं लग्न झालं, पहिल्यापासूनच त्यांचं विचित्र वागणं मला खटकायचं, पण ते इतके चिडके होते की, बोलायची सोयच नव्हती.

आणि भरीत भर म्हणून की काय पण मला काही मूल होऊ शकत नव्हते, त्या गोष्टीचाही ते राग राग करायचे..

नंतर मला समजलं, आमचं लग्न त्यांच्या मनाविरुद्ध करून देण्यात आलं होतं, त्यांचं वेंगुर्ल्या मधल्याच एका मुलीवर प्रेम होतं, त्या लग्नाला भाऊंचे आई बाबा तयार नव्हते म्हणे!

तर.. आमचं लग्न झालं तरी त्यांचं आणि त्या मुलीचं प्रेम प्रकरण सुरूच होतं, तिनी तर लग्नच केलं नव्हतं.

आणि एक दिवस भाऊंनी एक छोटंसं बाळ, नुकतंच जन्मलेलं, माझ्या मांडीवर ठेवलं, अन सांगितलं की ह्याला आता आई म्हणून तू वाढव, ह्याचे वडील मीच आहे, ह्याच्या आईवर माझं मनापासून प्रेम होतं, आमच्या प्रेमाचं हे प्रतीक आहे, मूलाला जन्म देऊन ती हे जग सोडून गेली, कायमचीच!!!

माझ्या मांडीवर ठेवलेलं ते बाळ पाहून खरं तर तेव्हा मला राग यायला हवा होता, नाही का?!!

पण ह्या सगळ्यामध्ये त्या इवल्याश्या बाळाची काय चूक? हाच विचार मी केला, आणि आता तर ती बाई ही हे जग सोडून गेली होती...

मी त्याला मांडीवरून उचलून छातीशी कवटाळले, आणि मनाशी ठरवलं की माझ्या पोटचं नाही म्हणून काय झालं? पण आता मीच त्या इवल्या जीवाची आई होणार...

भाऊंचा मात्र तुझ्यावर इतका जीव होता की काही विचारू नकोस!

आमच्या दोघांच्या आवडीने आम्ही बाळाचे नाव ठेवले, नीरज!!

तुझ्या प्रत्येक आवडीनिवडी जपण्याचा आम्ही दोघे पुरेपूर प्रयत्न करत होतो. खेळणी, कपडेलत्ते, उच्च शिक्षण, कशातही कमतरता ठेवली नाही.

तू मात्र लंडनला गेलास आणि तिकडचाच झालास, नोकरी, लग्न, मुलं ह्या सगळ्यामध्ये तुला एकदाही घराची, माई, भाऊंची आठवण सुद्धा येऊ नये का रे?

तू जसा स्वार्थी निघालास, तसा स्वार्थ आम्ही बघितला असता तर रेss?

तुला पोटचा नसतानाही, पोटच्या मुलासारखं प्रेम दिलं मी, माझी चूकच झाली काss रे ही?...

पण खरं तर, अगदी पोटच्या मुलांनीही असं वागावं का रे? ज्या आई वडिलांनी मुलांना वाढवण्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी इतक्या खस्ता खाल्लेल्या असतात, त्या आई वडिलांना परदेशात गेल्यावर मुलं अशी विसरून जातात का?..

तुला मुलगी आहे नाss, तिचं लग्न झाल्यावर तिनेही तुमच्याशी संबंध ठेवले नाहीत तर तुला वाईट वाटणार नाही का?

आणि वाईट वाटणार नसेल ना, तर तुमची ही पिढी भावनाशून्य आहे असेच म्हणायला हवे.

भाऊंनी तुला वाढवताना जीवाचं रान केलं रेss..

हे जे तू आत्ता परदेशात पैसे कमावतो आहेस ना, ते कोणाच्या जीवावर रे?

त्यांनीच तुझा परदेशाचा पाया जर रोवला नसता त्यावेळी, तर तुझं हे आजच लंडनच रोपटं उभं राहू शकलं असतं का रेss?

तू मात्र सगळं मिळाल्यावर माई, भाऊ आणि स्वतः मध्ये एक भिंत तयार केलीस...

भाऊंना वाटलं होतं, त्यांच्या आजारपणात तरी तू बघायला येशील..

नाही! नाही!त्यांना तुझ्याकडून सेवेची किंवा पैशांची अपेक्षा नव्हती रे ss, पण डोळे भरून तुला बघायचं होतं एकदा तरी...

हे पत्र वाचल्यावर मला भेटायला म्हणून तू येशील कदाचित, तेव्हा मी नसेन ह्या जगात तेव्हा.

पण जरी तू आलास ना तर येण्याआधीच तुला माहिती असावी म्हणून सांगते, ज्या शिरप्या आणि सुभद्रा ह्यांनी सख्खे नसतानाही भाऊंना आणि मलाही शेवटपर्यंत साथ दिली, त्यांच्याच नावावर हे घर मी केलं आहे...

हाss! तसे भाऊंचे जे पैसे आहेत बँकेत, ते मात्र तुझे असतील, तू आम्हाला जरी विसरलास तरी आम्ही असा कृतघ्नपणा नाही करू शकणार..

मी आता पत्र संपवते, कधी आठवण आलीच ह्या माई अन भाऊंची, तर तुझ्या मनात तरी थोडी जागा ठेव आम्हाला.

काही कमी जास्त बोलले असेन तर क्षमा कर बाबा..

तुझीच म्हणू काss? हे ही मला समजत नाहीये"...

माई ..

माईंचं हे पत्र वाचता वाचता मात्र नीरजच्या डोळ्यांत घळा घळा अश्रू यायला लागले, खूप अक्षम्य चुक झाली होती त्याच्याकडून, लगोलग त्याने घरी जायची तयारी केली...

तो घरी पोचला तर घराला कुलूप होते, गावात चौकशी केल्यावर शिरप्या अन सुभद्राच्या घरापाशी तो पोचला.

" मीss नीरज, माईss कुठे ???....त्याचे शब्द अर्धवटच राहिले.

" माई गेल्या नीरजदादा, आपल्याला सगळ्यांना सोडून माई आणि भाऊ दोघेही गेले".

शिरप्या आत, घरात गेला आणि काही कागद हातात घेऊन बाहेर आला,

" हे घराचे कागद आहेत नीरजदादा, माईंनी आमच्या नावावर घर केलं होतं, पण आम्ही ह्या अपेक्षेने त्यांच्याकडे राहात नव्हतो..

एका वकीलाकडून दुसरा कागद तयार केला आहे, आम्ही ह्या घरावरचा आमचा हक्क काढून घेतला आहे, रिकामं घर नकोच हो आम्हाला, माई अन भाऊंनी दिलेलं प्रेमच आयुष्यभर पुरेल आम्हाला, पण तुमची मात्र खूप वाट बघत असायचे दोघे".

शिरप्याने घराचे कागद नीरजकडे दिले.

"नाही, हे घर तुम्हालाच मिळालं पाहिजे, मी त्या घराच्या लायकीचा नाही होss". नीरज म्हणाला.

" हे घराचं कोडं तुमचं तुम्ही बघा नीरजदादा, त्याचं काय करायचं हा तुमचा प्रश्न आहे, पण माई अन भाऊ नसलेल्या त्या घरात आम्ही नाही राहू शकणार, माफ करा"....

शिरप्याने हात जोडले, अन अश्रूंनी अनावर झाल्यामुळे तो घरात गेला.

सुभद्रानेही नीरजला हात जोडले,"काही काम असेल तर जरूर कळवा, माई, भाऊंच्या प्रेमाखातर आम्ही अर्ध्या रात्रीही धावून येऊ".

नीरज ह्या सगळ्या प्रकरणानी हवालदिल झाला होता. त्यालाही समजत होतं की ह्या घरावर, पैशांवर आपला हक्क नाही, आपण ह्या लायकीचेच नाही....

शेवटी लंडनला जायच्या आधी त्यानी घराचे सगळे पेपर्स आणि पैसे कायदेशीर रीत्या, गावात, माई अन भाऊंची आठवण म्हणून छोटी शाळा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतिकडे सुपूर्द केले....


Rate this content
Log in