Ishwari Shirur

Others

4.0  

Ishwari Shirur

Others

जी ले जरा!

जी ले जरा!

7 mins
257


      आटपाट नगरीतील वाकडी चाळ म्हणजे विनोदाचं माहेर घर. आणि या चाळीतला सन्या खुद्द विनोद घराण्याची आठवी आधुनिक पिढी. येथे रोज काहीतरी नवीन उचलकूद हास्याला आलिंगन देत असते. आज तर या आलिंगनाचा शुभारंभ ब्रह्ममुहूर्तापासून झालेला दिसतोय. चला तर मग वळूया या वाकड्या चाळीतल्या वाकड्या हरकतींकडे... 

       उद्या आॅफिसमध्ये महत्त्वाची मिटिंग आहे, जरा लवकरचा गजर लाव अस बाबा आईला सांगून झोपी जातात. पण गजरच्या आवाजाने बाबा कधी उटतच नाही हे आईला माहित असल्याने आई विचारात पडते. तेवढ्यात सन्या तिथे येतो आणि उद्या बाबा, गजर आरवला की उठतील याची खात्री देतो आणि आईला निर्धास्त झोपायला सांगतो. सगळे साखर झोपेत असताना पहाटे चार वाजता अचानक चोरऽऽऽ चोरऽऽऽ चोरऽऽऽ असा आवाज येतो आणि समस्त चाळ खडबडून जागी होते. पाच पाच मिनिटांच्या अवधीने हा आवाज सतत चौफेर घुमत होता. चाळीतल्या बायका हा आवाज ऐकून हातात येईल ते घेऊन दारावर पदर कोचून तग धरून बसल्या होत्या. त्यातल्या एकीला वाटलं, चोरला पाहून बघणार्‍याला घाबरून घाम फुटला असेल म्हणून तो पाच पाच मिनिटांची विश्रांती घेत आहे. बाजूची सुलभा काकी तर हातात काही मिळालं नाही म्हणून घरची मांजर अशी धरुन उभी होती की,चोर सापडल्या सापडल्या त्याच्या अंगावर ती मांजर सोडलीच म्हणून समजा.. सोडली कसली फेकलीच म्हणून समजा..या सगळ्या गदारोळात सन्याचे बाबा देखील उठतात आणि बाबा उठले हे कळताच सन्या, दर पाच मिनिटांनी येणारा आवाज हा केवळ एक गजरचा आवाज होता. शिवाय बाबा गजरच्या आवाजाने उठावेत म्हणून मीच मोबाईल स्पीकरला लावून हा गजर सेट केला होता असे सांगतो. हे ऐकून चाळीतल्या बायका डोक्याला हात मारून घेतात आणि सन्याची आई तर गालातच हसते आणि आता मिटिंगसाठी उशीर होणार नाही असे बाबाला समजावते. 

(सन्या उर्फ सचिन. हे कारटं.. साॉरी सॉरी. हे गुणी बाळ या चाळीतल अत्यंत हुशार आणि बुद्धिवान व्यक्तिमत्व.. हो पण अभ्यासाच्या बाबतीत नाही बर! फक्त आगाऊपणा आणि खोडी काढण्यात. जिथे जाईल तिथे काहीतरी कल्ला हा नक्कीच होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघच म्हणता येईल.)

        बाबा सगळ आवरून आॅफिसला निघत असताना दाराजवळ बसलेला सन्या हात मागे करुन उभा असतो. बाबांनी वाट सोड सांगितल्यावर सन्या हातात मागे लपवलेल गांडूळ बाबांना दाखवून त्यांची थट्टा करतो आणि त्यांना डोळा मारत खिदळत खिदळतच आईकडे जातो. बाबा गेले ना आॅफिसला? आता तु पण आवरुन घे शाळेत जायचय ना? अस आई सन्याला सांगते. पण सन्याचा हुंकार देखील आईच्या कानी येत नाही. आता आपल्या बाजूला असलेला हा मुलगा अचानक कसा दिसेनासा झाला? अस स्वतःशीच पुटपुटत आई कासावीस होऊन अक्क घर डोक्यावर घेते. इतक्यात मागून सन्या कासवाच्या गतीने येतो आणि भोऽऽ....करुन घाबरवतो. आई क्षणभर दचकून, सन्याऽऽऽऽ...कारट्या किती हा वात्रटपणा. चल आता आवर पटकन; शाळेत जायला उशीर होईल. असे सांगते. 

        सन्या शाळेत जायला निघाला असताना आईला आठवत की, घरातल दूध संपलय. घरात ऐनवेळी कोणी पाहुणे आले तर निदान एक वाटी दूध तरी असाव या हेतूने ती सन्याला सांगते, जाता जाता जरा सुलभा काकूंना विचारशील? दूध आहे का म्हणून? यावर सन्या दात काडून जोरजोरात हसतो आणि आईला म्हणतो, काय आई; सुलभा काकूंची मांजर त्यांच्या घरी दूध शिल्लक ठेवेल का? पुन्हा जोरजोरात हसायला लागतो. ते ही तितकंच खरयं म्हणा... एक काम कर त्या ३ नं. च्या घरात विचारुन बघ बरं. अस सांगून आई दाराकडेच थांबते. सन्या सुलभा काकुंच्या मांजरीला, पुठ्याचा उंदीर दोऱ्याला बांधून हिणवत हिणवत ३ नंबरच्या घरापर्यंत नेत असतो. या घरात नुकतच नवीन लग्न झालेल जोडप रहायला आलेलं असतं. विशाखा आणि कुणाल अस या दाम्पत्यांच शुभ नाव. नवरा पहिल्यांदा आपल्या बायकोच्या डोक्यात प्रेमाने गजरा माळत असतो इतक्यात ३ नंबरच्या काकू, ३ नंबरच्या काकू आईने विचारलय दूध आहे का? विशाखा पटकन नवर्‍याचा हात बाजुला करुन सांगते; हो आहे ना? कोणाला हवय? किती पाहिजे? एवढं सगळं ऐकण्याची क्षमता सन्या मध्ये नसते त्यामुळे तो हो दुध आहे एवढंच उत्तर ऐकून घराबाहेर पडतो. आणि तिथूनच आईला ओरडून सांगतो, आई ३ नंबरच्या घरात दूध आहे म्हणे.....आई डोक्याला हात मारत ओरडते कारट्याऽऽ अरे आहे तर आणणार कोण?? जरा वरच्या सुरात आई ओरडते. त्यावर सन्या तिथूनच उद्गारतो, आये तु फक्त विचारायला सांगितलं होतं बरं का! आईच पुढे काही ऐकण्याआधीच सन्या वाऱ्याच्या वेगाने तिथून पसार झालेला असतो. कठीण आहे या मुलाचं असं मनातच बोलत आई बाकिच्या कामाला लागते. 

       सन्या आपल्या चड्डी यार दोस्तांसोबत याची त्याची खोडी काढत शाळेत नेहमीप्रमाणे उशिराच पोहचतो. 'औकात चार चौघात' अस शाळेचं नावच असल्याने गुरुजी आपल्याला आत घेणार की नाही या चिंतेने सन्याच्या मित्रांना आधीच घाम फुटतो. पण सन्या मात्र बिनधास्त असतो. तो मित्रांना धीर देत म्हणतो, काय भिता रोजच्या सारखं आज पण आत घेईन तुम्हाला..आणि तसही प्रमुख पाहुणे उशिराच एन्ट्री मारतात. सो यु गाइज चिल् मी आलोच. असं बोलून सन्या पुढे जातो. दप्तरातील पाण्याची बाटली काढून डोळ्याला लावतो, केस थोडे विस्कटतो आणि अत्यंत रडवेला चेहर्‍याने, गुरुजी आत येऊ का? असे विचारतो. गुरुजी जरा वरच्या सुरात.. कुठे होतास सन्या? पुढे गुरुजी काही विचारणार इतक्यात सन्या उत्तरतो. गुरुजी काही विचारूच नका.. (रडत रडत) आणि मग स्वतःच, अहो गुरुजी काय सांगू तुम्हाला. तो बाहेर उभाय ना पिंट्या त्याची आजी लय सिरियस आहे असं कळालं. त्याच्या आजीची शेवटची इच्छा होती नातवाच तोंड बघूनच श्वास सोडायचा. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आणि बबन पिंट्याला आजीकडे घेऊन गेलेलो. आजीने लय वेळ घेतला म्हणून शाळेत यायला उशीर झाला. यावर गुरुजी फार भावूक होतात. आणि उत्तरेस पाहून जरा बारक्या स्वरात म्हणाले, आजींच्या आत्म्याला शांती मिळो... गुरुजींच्या या शोकरहित वाक्यावर सन्या क्षणाचाही विलंब न करता... आहो गुरुजी हे काय बोल्लात तुम्ही? गुरुजी क्षणभर विचारात पडतात आणि 'पिंट्याची आजी दिवंगत झाल्या ना म्हणून शोक व्यक्त केला' असं सांगतात. त्यावर सन्या तोंडावर हात ठेवून हसू आवरतो आणि बोलतो, आहो गुरुजी, पिंट्याला भेटून आजीची जगण्याची इच्छा आणखी वाढली. आता आजी तशी ठीक आहे. (बाहेर उभे असलेले सन्याचे दोस्त या कृतीशी पुर्णतः अपरिचित असतात. गुरुजी भावूक झालेले पाहून सन्या दरवाजात जाऊन त्याच्या मित्रांना डोळा मारुन आत बोलावतो.)तिघेही आत आल्यावर गुरुजी जरा साशंक मनाने... सन्या तु खरं सांगतोय ना?असं विचारतात. सन्या केविलवाणा चेहरा करून, हो सर १०१%. तुमचा अजूनही माझ्यावर विश्वास नसेल तर तुमची शपथ घेऊन मी पुन्हा सांगू शकतो. सांंगू का?

       गुरुजी विषय बदलून... चला मुलांनो पाण्याचे रेणूसु्त्र काय आहे सांगा बर? सन्या हात वर करून..गुरुजी H2ch3n3hbih6o8O. असे उत्तर देतो. हे ऐकून गुरुजी सन्याला ओरडून सांगतात.. उत्तर चुकीच आहे. h2o is the correct answer. त्यावर सन्या गुरुजींना म्हणतो, हे तर मला माहीत होत. पण मी तुम्हाला गढूळ पाण्याचं सुत्र सांगितल. आजकाल शुद्ध पाणी पाहायला मिळत नाही ना गुरुजी म्हणून... सन्याच्या या प्रत्युत्तरावर गुरुजींनाच शिक्षक असल्याची लाज वाटते आणि ते चालू वर्ग सोडून निघून जातात. 

       शाळा सुटल्यावर पिंट्या सन्याला विचारतो, आज तु गुरुजींना काय सांगून आम्हाला आत घेतलं? पिंट्याचे वाक्य संपताच बबन देखील उत्सुकतेने विचारतो, हाऽऽ हाऽ सांग ना सन्या! आज तर गुरुजी जराही ओरडले नाही. असं काय सांगितलस तु? सांग ना सांग ना! बंद करा रे तुमचा चिवचिवाट. सन्या जरा मोठ्या स्वरात त्याच्या दोस्तावर चिढतो. मग आपले मित्र नाराज झालेले पाहून तो संध्याकाळी भेटू तेव्हा सांगेल. आता भूक लागली आहे. चला ना! हा गाडीवरचा वडापाव खायचा का? असं विचारतो. खवय्या बबन लगेच होकार कळवतो. पण हरिश्चंद्र पिंट्या बोलतो, मला नको. आईने बाहेरच खायचं नाही असं सांगितलं आहे. पिंट्याच्या या उत्तरावर बबन डोक्याला हात मारतो आणि स्वतःशीच पुटपुटतो, शिंकली... माशी. चतुर सन्या मात्र यावर शक्कल लढवतो. अरे पिंट्या, एक काम कर वडापाव घे, त्याच्यावरचा पाव फेक, बाहेरचा आवरण पण फेक आणि मग आतली भाजी खा. म्हणजे तुझा वडापाव ही खाऊन होईल आणि आईने सांगितल्याप्रमाणे तुला बाहेरच खाव लागणार नाही. असा सल्ला देतो. हे ऐकून बबन पोटावर हात ठेवून ओक्साबोक्शी हसतो. 

       हे हसणं खिदळणं चालू असतानाच पिंट्या अचानकच सन्याला प्रश्न करतो, सन्या आज कुठे भेटायच आपण? सन्या काही बोलणार इतक्यात बबन म्हणतो, आज आपण सन्याच्या घरी भेटू. असही हा सन्या आपल्याला कधीच घरी बोलवत नाही. सन्याला मात्र दोस्तांना चाळीतल्या घरात बोलावणं कमी पणाच वाटतं. त्यामुळे सन्या एक युक्ती करतो. मित्रांनो, माझ घर ते तुमच घर तुम्ही कधीही या. अस सन्या आपल्या मित्रांना सांगतो. त्यावर पिंट्या विचारतो, अरे सन्या, पण तु राहतोस कुठे? आम्हाला कस कळणार? मग सन्या जवळच असलेल्या एका जुनाट, कोणीही रहात नसलेल्या बंगल्याकडे बोट दाखवत सांगतो. हे काय मी इथेच रहातो. बंगल्यात राहतो हे सांगून सन्याची काॅलर तर टाईट होतेच. शिवाय मित्रांनाही सन्याचा हेवा वाटू लागतो. मित्रांनो आज तुम्ही जेवायलाच या. रात्री जरा उशीराने आलात तरी चालेल असे सन्या दोस्तांना सांगतो. बंगला बाहेरून एवढा भव्य आहे तर आतुन कसा असेल. त्यांची उत्सुकता आणखी तीव्र होते. अच्छा सन्या भेटू रात्री असे सांगून ते दोघे जोशाजोशातच घरी जातात. 

       सन्या मात्र संध्याकाळी लवकर येऊन त्या बंगल्यामध्ये वेगवेगळे भयाण आवाजाचे रेकॉर्डिंग असे काही फिक्स करतो की, बंगल्यात शिरल्या शिरल्या हे आवाज कोणालाही सळो की पळो करून सोडतील. या सगळ्यात सन्याला वेगळाच असुरी आनंद मिळतो. रात्री त्याचे मित्र बंगल्यावर येऊन प्रचंड घाबरतात. पण हे दृश्य टिपण्यासाठी सन्या तिथे हजर नसतो. तो बाबांच्या धाकामुळे बाबा घरी येण्यआधीच घरी पळतो. परंतु बाबा घरी आलेले असतात आणि सन्याला हसू अनावर होतं म्हणून तो आतल्या खोलीत जाऊन तोंडावर हात ठेवून हसत असतो. बाबांना, सन्या कुठेतरी जाऊन नक्कीच आगाऊपणा करुन आलाय याची खात्री पटते. बाबांनी खूप ओरडून झाल्यावर सन्या सगळ खरखर सांगतो. हे सगळं ऐकून बाबा खूप संतापतात आणि 'हे सर्व करुन तुला काय मिळत' असा जाब विचारतात. सन्या उत्तरतो, बाबा सध्या प्रत्येक जण घड्याळ्याच्या काट्यावर धावताना दिसतं, कोणालाही आपल्या माणसांसाठी वेळ नाही. म्हणून या धकाधकीच्या जीवनात साध्या मुखाचे हसतमुख कसे करता येईल याचा मी केवळ प्रयत्न करतो. सन्याचे हे उत्तर बाबांना हळवं बनून सोडते. 'तुझ्या या छोट्या तोंडाने तु खुप मोठं बोलून गेलास बाळा.' अस बाबा सन्याच्या डोक्यावर हात भिरवून सांगतात. सन्या हे गंभीर वातावरण बघून बाबांना सांगतो, बाबा यासाठी अधून मधुन याची त्याची खोडी काढावी लागते. म्हणून मला शाळेतून नेहमी अधोगती पुस्तक मिळत. मला तर कदाचित प्रगती पुस्तक माझ्या खोडकर वृत्तीच मिळू शकेल. असे सांगून सन्या जोरजोरात हसत बाहेर धावत जातो. 


Rate this content
Log in