AkshRahi world विजयसुत

Classics Others

4  

AkshRahi world विजयसुत

Classics Others

जोगवाडीचा बाबू

जोगवाडीचा बाबू

7 mins
219


बाबूच्या जीवनावर चरित्र लिखाण करायला बाबू काही सामाजिक नेता किंवा कार्यकर्ता नाही, की कुणी थोर यशस्वी पुरुष नाही. आमच्या जोगवाडीमध्ये त्याचं संपूर्ण नाव देखील कधी कुणी उच्चारलं नाही. सगळ्यांसाठी तो फक्त बाबू होता. वेडा बाबू..! वेडा म्हणून कुणी त्याची दया करावी, तर कुणी त्याला हिणववावं. पण आज जेव्हा चरित्र लिखाण करायचा विचार केला, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर पहिलं नाव आलं ते म्हणजे 'जोगवाडीचा बाबू..!'

असा हा बाबू, आमच्या जोगवाडीचा सार्वजनिक नमुना. सार्वजनिक म्हणजे वाडीतील प्रत्येक इसमाशी याचं नातं.

गावातील थोर मोठ्यांनी बाबूला आपलसं केलं होतं. आणि बाबू देखील कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ, कुणाचा काका तर कुणाचा मामा, कुणाचा मित्र तर कुणाचा अगदी शत्रू देखील होता. बाबू., नेहमी हसरा चेहरा घेऊन जोगवाडीमध्ये फिरणारा. तसा डोक्याने जरा कमी होता.

बापाच्या मृत्यूनंतर आईने सांभाळा केला. एके दिवशी पाणी आणायला जाते सांगून दुपारी गेलेली आई संध्याकाळ झाली तरीही घरी परतली नाही. पाय घसरून पांधीच्या बारवात पडली आणि बुडून मेली. एकमेव तेव्हढा आईचा आधार. तोही आता नाहीसा झाला.

आई सोडून गेली या जाणिवेने बाबू त्या संध्याकाळी ढसाढसा रडला होता. आई गेल्याचा धक्का बाबूच्या बालमनावर चांगलाच प्रहार करून गेला. बाबूला चक्कर बसला. तेव्हापासून बाबू आजवर पुन्हा कधी रडला नाही. आजही आपला हसरा चेहरा घेऊन बाबू कधी पिंपळाच्या पारावर बसलेला असतो, तर कधी देवळाच्या भोवती प्रदक्षिणा मारत असतो. माझ्या लहानपणी बाबू म्हणजे जोगवाडीतील सगळ्या लहान मुलांचं आवडतं व्यक्तिमत्व.! आम्ही मराठी शाळेतून घरी येताना बाबू हमखास पिंपळाच्या पारावर बसलेला असायचा. त्या दिवशी देखील तो तिथेच बसलेला होता..


"ए अरे तो पहा तिथे.. बाबू मामा..चला चला..गम्मत करुया त्याची.."

मी माझ्या चार पाच सवंगड्यांना बाबूची खोडी करायच्या विचाराने म्हणालो.


"हो.. हो.. चला चला..."

माझ्या कल्पनेला दुजोरा देत सवंगडी म्हणाले.


बाबू पारावर बसून वर पिंपळाच्या झाडाकडे पाहात हसत होता. मध्येच डोळे मिचकावत डोके खाजवत होता.


" काय बाबू मामा., काय पाहू राहिला तिकडे.?"

आमच्यातील एका खोडकर मुलाने पुढे होतं विचारले.


" ती कोकिळा माझ्यासाठी गाणं म्हणत नाही आहे. आईने तिला सांगितलं आहे गायला., पण ती आज गातच नाही.."

गालावर कुढेमुढे उगवलेल्या दाढीच्या खुर्ट्यांना खाजवत बाबू नाराजीच्या स्वरात बोलला.


"ए कोकिळे अगं गा की ग.. आमचा बाबू मामा रडल हा नाहीतर.."

मित्राच्या खांद्याला कोपराने ढुसनी देत मी जणू कोकिळेवर रागावतो आहे अशा आविर्भावात वर पाहत म्हणालो.

"बाबू मामा बघ, कोकिळा तर तुझ्यासाठी आज गाणं म्हणतच नाही रे.!"

मी तोंडावर हात ठेवून डोळे मोठे करीत उगीचच चेहऱ्यावर आश्चर्याचा भाव आणत बोलू लागलो.,

"बाबू मामा तू रड पाहू जोराने. तेव्हाच ही कोकिळा तुझ्यासाठी गाणं म्हणेल.."


तोच बाबू जोरजोराने रडल्याचा आवाज काढू लागला. नवीन खेळणी मिळावी म्हणून एखाद्या लहान मुलाने हट्ट करावा, तसा बाबू बसल्या जागेवर हात पाय झाडू लागला. मध्येच हाताच्या मुठी डोळ्यावर उलट्या धरून.,

"कोकिळा माझ्यासाठी गात नाही..sss"

असं म्हणत मोठ्याने सूर आळवून हुंदके देऊ लागला.


आम्ही बाबूला असं लहान मुलासारखं रडतांना पाहून जोरा जोराने हसू लागलो. तिथून जातांना मी मागे वळून पाहिले.

बाबू आमच्याकडेच पाहात होता. आत्ता काही क्षणापूर्वी हात पाय झाडून लहान मुलासारखं रडणाऱ्या बाबूच्या चेहऱ्यावर मात्र हसू पसरलेलं होतं. बाबूच्या डोळ्यात तेव्हाही पाणी आलच नव्हतं. बाबू रडलाच नव्हता..!


बाबूला कधी कुठल्या एका विशिष्ट धर्माचा स्पर्श झाल्याचे मला आठवत नाही. गावात कुणाच्याही घरी कशाचाही कार्यक्रम असो, त्या ठिकाणी सगळ्यात आधी बाबू हजर राहायचा. गावात लग्नाची सनई कुणाच्या घरी वाजणार आहे हे बाबूला दोन - चार दिवस आधीच माहीत असायचं.

बाबू गावातील खाजगी, सार्वजनिक सगळ्याच कार्यक्रमाला अगदी हक्काने हजर असायचा.

कुठे जेवणाची पंगत असेल तर बाबू आचाऱ्याला स्वयंपाकाच्या शेगड्या आणून देई, गॅसची टाकी काढून देई, पाणी भरून ठेवत, जागेची झाडलोट करी. या सगळ्यात काही लोकांच्या तोंडून त्याच्या प्रती निघालेले प्रशंसेचे चार बोल पचवत, तर कधी दोन शिव्या निमूटपणे सहन करीत बाबू ही सगळी कामे करायचा. गावकऱ्यांची जेवणं आटोपल्यावर खरकटी पत्रावळ उचलणे हे बाबूचे ठरलेले काम. सगळी पत्रावळ उचलून झाल्यावर बाबू एकटाच एका कोपऱ्यात बसून मांडव उतरविणाऱ्या पोरांकडे पाहून हसत हसत जेवायचा. एवढी धावपळ करून दोन घास मिळाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर उमटायचा.


बाबू वेडा होता. पण कधी-कधी त्याला शहाणपणाचे झटके यायचे. एकदा जोगवाडीमध्ये जादूगर आला. रात्री जादूगराचा खेळ पाहायला गावच्या वेशिजवळ गावातील पुरुष, महिला, लहान मुलं सगळे जमले. एका ओट्यावर उभा राहून जादूगर खेळ करत होता. जादूगराची कलाकारी पाहून प्रेक्षक गावकरी अचंब्याने तोंडात बोट घालून बसले होते. खेळ संपला. जादूगराने आपल्या डोक्यातील मोठी टोपी काढून हातात घेत कंबरेत वाकून गावकऱ्यांना नमस्कार केला. जादूगराच्या चेल्याने ''जादू आवडली असल्यास मोकळ्या मनाने, आणि ढील्या हाताने बक्षीस म्हणून रोख पैसे द्यावे'' अशी विनंतीवजा घोषणा केली. गावकऱ्यांनीही आपापल्या परीने शक्य होईल तेवढी रक्कम बक्षीस म्हणून जादूगराच्या थैलीत टाकली. बरीच रक्कम मिळाल्याने जादूगर खुश दिसत होता. तेवढ्यात बाबू लगबगीने ओट्यावर आला आणि त्याने कोपऱ्यात ठेवलेला माईक हातात घेतला.


"तर इथे जमलेल्या माझ्या गावातील बंधू आणि भगिनींनो.,"

बाबू एक हात कमरेवर ठेऊन दुसऱ्या हातात माईक धरत एखाद्या अस्खलित वक्त्या सारखा ठामपणे उभा राहून बोलू लागला.,

" आपण आज इथे जादूचा खेळ पाहायला मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार..!"

गावकऱ्यांनी देखील टाळ्या वाजवून बाबूला पुढे बोलण्यास अनुमती दिली. हात हवेमध्ये हलवत बाबूने सर्वांना शांत केले. या भल्या इसमाकडून आपली स्तुती होणार या आशेने जादूगर देखील आपलं अंग सावरून व्यवस्थित उभा राहिला. बाबू पुढे बोलू लागला.,

" हे जादूगर अत्यंत महान आहेत. यांनी आपल्या टोपितून कधी फुलं तर कधी खोटा ससा बाहेर काढला.! तसंही जिवंत ससा या टोपीतून आपल्याला कधी बाहेर काढतील याची वाट पाहत शांतपणे बसला नसता. असो..

जादू दाखविण्यासाठी आपल्या राम्या कडून घेतलेली दहाची नोट यांनी आपल्या जादूने बरोबर गायब केली.!

केली ती केलीच.! परत काही आणली नाही. असो.."

( जादूगराने आपली दहाची नोट जादूसाठी तात्पुरती घेऊन परत दिलीच नाही या विचाराने राम्याने आपला चेहरा पाडून उगीचच मान हलवली. )

हे ऐकून जादूगर जरा खजील झाला. गावकरी ''बरोबर आहे.. बरोबर आहे.." असं ओरडुन हसू लागले.

बाबूने आपल्या दोन बोटांनी माईकवर जरा टिचकी मारली आणि आपलं अर्धवट राहिलेलं मनोगत पूर्ण करण्यासाठी तो पुढे बोलू लागला.,

"असे हे महान जादूगर आपल्या जोगवाडीत आले आणि आपली वाडी धन्य झाली. त्यांनी त्यांच्या हुशारीने आपल्या सर्वांना चांगलंच वेड्यात काढून आज भरपूर कमाई केली आहे. पुढील गावात गेल्यावर तिथेही त्यांची अशीच भरपूर कमाई व्हावी अशी माझी इच्छा आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानावे ही विनंती करतो.."

सगळीकडे हशा पिकला. गावकऱ्यांनी टाळ्या वाजविल्या, शिट्टया वाजविल्या. जादूगर मात्र लगबगीने आपल्या सामानाची आवराआवर करू लागला. धावपळीत त्याच्या टोपीतून ससा पुन्हा बाहेर पडला. त्या खोट्या सस्याकडे पाहत बाबू आपली जीभ बाहेर काढून हसू लागला. जणू तो सस्याला म्हणत असावा., " कशी फजिती केली मग..!"

त्या रात्री जादूगराचा खेळ पाहतांना अचंब्याने तोंडात बोट घातलेल्या गावकऱ्यांमध्ये एकटा बाबूच मला तेव्हढा हुशार वाटत होता.


बाबूला कधी कुणी नाकारलं नाही. वेडा म्हणून कधी कुणी त्याचा तिरस्कार केला नाही. सणासुदीला गावातील धनाढ्य मंडळी बाबूला नवा कपडालत्ता करायची. दिवाळीला बाबूसाठी घराघरांतून फराळ जायचं. लहान सहान पोरं बाबूला फराळ नेऊन द्यायची. बाबू मामा.. बाबू मामा.. म्हणत त्याच्याजवळ बसून गप्पा मारायची, तर कधी त्याची चेष्टा करायची. गावातील लोकांनी आपल्या लहान मुलांना बाबूजवळ जाण्यापासून कधी रोखले नाही. मुलांना येताना पाहून बाबूला भलताच आनंद व्हायचा. वयाने जरी मोठा असला तरी त्याची बुद्धी आणि मन हे एका लहान मुलासारखं होतं. तो मुलांसोबत खेळायचा. कधी हसायचा तर कधी रुसायचा.


मागील वर्षात गावी जोगवाडीला जाण्याचा योग आला. कामाच्या व्यापातून वेळ काढून तब्बल दहा वर्षांनी जोगवाडीत पुन्हा आलो होतो. कंपनीच्या कामानिमित्त सुरवातीचे चार एक वर्ष विदेशात राहावं लागलं. आणि नंतर सहा वर्ष दिल्ली मध्ये. या सबंध काळामध्ये मानाच्या कोपऱ्यात जोगवाडी चिरंतर जपली होती. जोगवाडीला गेल्यावर जाणवलं, मनामधे चिरंतर जपलेली ती माझी जोगवाडी केव्हाच भूतकाळ बनली होती.

आता वाडीमध्ये पक्के रस्ते आले होते. गावाची काळ्या पाषाणातील भक्कम वेस जाऊन तिथे कुण्या राजकारणी नेत्याच्या नावाची लोखंडी कमान उभी होती. माझ्या लहानपणी आम्ही मासे धरायला जात असू तो ओढा बुजला होता. त्या ओढ्याच्या बुजलेल्या मुखावर क्रशर खडी फोडण्याचा कारखाना दिमाखात उभा होता.

समोर प्रशस्त ओसरी असलेले वाडीतील कौलारू घरं आता नामशेष झाले होते. माणसांचे जीवन स्वतःच्या अंतरामध्ये कोंडून ठेवणाऱ्या पक्क्या घरांची वाडीमध्ये गर्दी जमली होती. या परिवर्तनात वाडीतील शेतजमीन देखील सुशोभित झाली. ज्या शेतात बैल हाकले जायचे त्या शेतात आता ट्रॅक्टर धावत होते. शेताला तारीचे कुंपण आले. हक्काने शेजाऱ्यांच्या शेतात जाऊन चार तुरीच्या शेंगा तोडून तोंडात दाणे टाकण्याची किंवा ऊस मोडून खाण्याची आपुलकी आता कुंपणाच्या बाहेर जीव तोडत उभी होती. वाडीतील आमची मराठी शाळा नावाला तेवढी पंधरा - वीस विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी आपला शेवटचा श्वास मुठीत धरून उभी होती. वाडीत आता इंग्रजी माध्यमाची शाळा आली. गावातील मुलं आता शाळेच्या बस मध्ये बसून शाळेत जातात. तीच बस शाळा सुटल्यावर मुलांना घेऊन परतीच्या वाटेवरून धावतांना पिंपळाच्या पारावर धूळ उडवत जाते.

अजुनही बाबू त्याच पारावर बसलेला असतो.

बस मध्ये बसलेली मुले बाबू कडे पाहत नाही.

आता मात्र पिंपळावरील कोकिळा बाबूसाठी रोज गाते.! बाबू तरीही उदासीनतेच्या गर्तेत बुडालेला असतो.


जोगवाडीतील जुनी पिढी आता अंथरुणाला खिळलेली आहे. मुली लग्न लावून सासरी गेल्या. वाडीतील मुलांची लग्न झाली. वाडीमध्ये आता सुशिक्षित मुली नांदायला आल्या. आणि आता या नव्या सुशिक्षित वर्गाला वाडीच्या शहरीकरणाचे डोहाळे लागले. यात बाबू वाडीसाठी केव्हा परका झाला हे त्यालाही कळलं नसावं.

वाडीमध्ये कुठेही कार्यक्रम असल्यास अजूनही बाबू दबक्या पावलांनी हजेरी लावत असतो. मात्र बाबू वेडा आहे म्हणून त्याला मांडवाच्या दारातूनच परतवून लावलं जातं. बाबूला हल्ली नवीन कापडांची स्वप्नही पडत नसावी. त्याच्या अंगावरील कपडे जीर्ण झालेली आहेत. माती खाऊन तृप्त झालेले फाटके कपडे बाबू अंगावर बाळगून असतो. बाबूच्या डोक्यावरील केस आणि चेहऱ्यावरील दाढी देखील वेडीवाकडी वाढलेली आहे. 

बाबू आता कुणाचाही मामा राहिला नाही. वाडीतील लहान मुलं बाबूला पाहून घाबरतात. त्याच्या जवळ जात नाही. दिवाळीच्या फराळाची चव आता बाबू विसरत चालला आहे. बाबूला जोगवाडीने जेवढे दिले, जे दिले त्यात बाबू समाधानी राहिला. बाबूने कधीही कुणाला त्रास दिला नाही की मनामधे कुणाचा राग धरला नाही. आपल्यासाठी न गाणाऱ्या कोकीळेवर तेवढं बाबू रागवायचा.

परवाच गावातील एका मित्राचा फोन आला. हालचाल विचारून झाल्यावर बाबू गेल्याच त्याने सांगितलं. पिंपळाच्या पारावरच त्याने देह ठेवला होता. सकाळी वाडीतील लोकांनी बाबूला सरकारी स्मशान भूमीत नेऊन दाहसंस्कार केला. बाबूची चीता पेटली.! कुणाचेही डोळे पाणावले नाही.

दूर त्या पिंपळाच्या शेंड्यावर बसून कोकिळा गात होती. आज तिचा कंठ दाटून आलेला होता.

कोकिळेच्या व्याकूळ सुरासोबत बाबूच्या देहाची राख आसमंतात विरून जात होती. हसऱ्या बाबूला आपल्या कवेत घेतांना आसमंत भरून आले होते. हवेत गारवा जाणवायला लागला. काळ्या ढगांची दाटी झाली आणि आसमंताने आपल्या नेत्रांमध्ये अडवून धरलेल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली.!


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics