Rahul Shinde

Classics

4.1  

Rahul Shinde

Classics

कर्मफळ

कर्मफळ

3 mins
2.0K


प्रणवच्या घरी आज सत्संग आणि प्रवचन द्यायला विश्वजित गुरुजींना बोलावण्यात आलं होतं. विश्वजित गुरुजींना ऐकण्यासाठी चेतन खास प्रणवच्या घरी आला होता. प्रवचनानंतर त्याला गुरुजींना भेटायचीही इच्छा होती. खरं तर विश्वजित गुरुजी ज्ञानोदय संस्थेचे विश्वस्त (ट्रस्टी) असूनही त्यांना अध्यात्मिक ज्ञान अफाट आहे,अशी त्यांची ख्याती होती. प्रपंच आणि भक्ती यांचा बरोबर मेळ साधलेले गुरुजी, सत्संगाला येताना धोतर,पांढरा सदरा असा साधा पोशाख परिधान करतात म्हणून लोकांना गुरूजींचे फार कौतुक वाटायचे. 

आज गुरुजी प्रणवच्या घरी सत्संग करत असताना आणि नंतर जीवनोपयोगी विचार सांगत असताना घरी जमलेले श्रोते तल्लीन झाले होते. दीड-दोन तास कसे निघून गेले ,याचं भानच नव्हतं ऐकणार्यांना.

"दर महिन्याप्रमाणे आताही सर्वानी महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचे नाही. " गुरुजींच्या प्रवचनानंतर प्रणवने सर्वाना विनंती केली.


" चेतन, गुरुजींभोवतीची लोकांची गर्दी कमी झाली आहे. आपल्याला व्यवस्थित बोलता येईल आता त्यांच्याशी . ते संस्थेचे ट्रस्टी असले तरी माझ्यासाठी गुरुजीच आहेत.डाउन टू अर्थ. तुला लेक्चररशिप मध्ये इंटरेस्ट आहे हे समजल्यावर ते तुला नक्की गाईड करतील. "इतर मंडळी महाप्रसाद खाण्यात आणि गप्पागोष्टी करण्यात व्यस्त असताना, विश्वजित गुरुजी एकटे बसलेले बघून चेतन आणि प्रणव त्यांच्याजवळ गेले.

"गुरुजी,हा माझा मावस भाऊ चेतन .त्याला तुम्हाला भेटायची आणि ऐकायची इच्छा होती, म्हणून खास आला आज. " प्रणवने चेतनची ओळख गुरुजींना करून दिली, तेव्हा गुरुजींनी  आनंदाने स्मितहास्य केले. 

"तुमचं आयुष्याबद्दलचं तत्वज्ञान ऐकून खरंच मी भारावून गेलो." चेतन म्हणाला. 

"वाचा परमात्म्याची. मी फक्त त्याचे विचार पोहचवतो. " गुरुजी नम्रपणे म्हणाले. 

"गुरुजी,चेतनला टीचिंगमध्ये आवड आहे. दोन वर्षांपूर्वी त्याचं M.tech In Mechanical झालं आहे. " प्रणव म्हणाला. 

"काय सांगतोस,अरे वा... माझ्यापरीने होईल तितकी मी मदत करेन."

"थँक्स गुरुजी.... तुम्ही मघाशी प्रवचन दिले,त्याबद्दल एक प्रश्नही विचारायचा आहे मला ." चेतन. 

"विचार, तुझ्या शंका दूर करण्यात मला आनंदच होईल." गुरुजींकडून आता काहीतरी सुंदर ऐकायला मिळणार म्हणून प्रणवही उत्सुकतेनं दोघांचं बोलणं ऐकत होता. 

"तुम्ही म्हणालात की सगळ्यात मोठी शक्ती ही एक 'ईश्वरी' शक्ती अस्तित्वात असतेच."

"बरोबर,आणि आपण जे काही कर्म करतो त्याचे उत्तर इतरांना नसले तरी त्या ईश्वरी शक्तीला द्यावेच लागते. "गुरुजींनी चेतनच्या बोलण्याला दुजोरा दिला. 

"तुम्ही ज्या इन्स्टिटयूटचे ट्रस्टी आहात गुरुजी, तिथे मी लेक्चररशिपसाठी अर्ज केला होता. माझी निवडही झाली होती,पण मला नोकरी मिळण्यासाठी पाच लाख इतकी रक्कम मागण्यात आली, वरून रेकॉर्डला जो पगार असेल त्याच्या साठ टक्के पगार हातात मिळेल असं सांगण्यात आलं. माझे शिक्षण घेण्यातच इतके पैसे गेले आता पाच लाख कुठून आणू गुरुजी?"

"हे चुकीचं आहे. बरं झालं मला सांगितलंस. मी करतो काहीतरी." गुरुजी म्हणाले .

"गुरुजी,मला नाही वाटत तुम्ही काही कराल.... आणि आता फक्त पितळ उघडं पडू नये म्हणून करणार असाल तर तेही उपकार नको आहेत मला. "चेतनच्या या बोलण्याने गुरुजींच्या चेहऱ्याचा रंग उडाला. आश्चर्यचकित झालेला प्रणवही ,चेतनचा गुरुजींबद्दल काहीतरी गैरसमज झाला आहे म्हणून काही बोलणार इतक्यात चेतनच पुढं बोलू लागला,

"हाच विषय घेऊन मी तुम्हाला भेटायला आलो होतो गुरुजी, पण माझं तोंडही न बघता तुम्ही मला तुमच्या केबिनबाहेर बसवून ठेवलं . .. तुमच्या पी.ए. सोबतचं तुमचं बोलणं मला ऐकू आलं ,'असल्या फालतू कारणासाठी कोणालाही अपॉइंटमेंट देऊन माझा वेळ खर्च करता? यांच्याकडून पैसे नाही घेतले तर infrastructure कुठून उभारणार, माझा नवीन मंदिर बांधायचा प्लॅन आहे,त्याला पैसे कुठून येणार?' असं तुम्ही तुमच्या 'पीए'ला म्हणालात. .... मला ती नोकरी मिळाली नाही . नंतर मला 'पाच लाख कुठूनही जमा करून भरायला हवे होतेस. अरे सगळीकडे असंच चालतं. 'असं बोलून अनेकांनी वेड्यात काढलं. अजूनही मी बेरोजगार आहे. .. आणि माझ्या जागेवर कदाचित माझ्यापेक्षा कमी प्रतिभा असणारा, पाच लाख भरून नोकरीलाही लागला असेल. ... माझ्यावर असा अन्याय करून,असा भ्रष्टाचार करणारे तुम्ही आणि तुमच्यासारखे त्या ईश्वरीय शक्तीपुढे या कर्माचे काय उत्तर देणार गुरुजी?" .चेतनचे हे बोल आजूबाजूच्या कल्लोळात इतर कोणालाही ऐकू गेले नाहीत.

उत्तराची अपेक्षाही न करता चेतन तिथून निघून गेला. ही गोष्ट प्रथमच कळल्यानंतर अस्वस्थ झालेला प्रणव स्तब्धपणे गुरुजींकडे पाहत होता. गुरुजींना प्रणवच्या डोळ्यात बघण्याची हिंमत होत नव्हती. 

 


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics