Nishigandha Upasani

Abstract Classics Others

4.1  

Nishigandha Upasani

Abstract Classics Others

माज पैशाचा

माज पैशाचा

3 mins
271


    एका नावाजलेल्या शहरात जहागीरदार नावाचे एक कुटुंब राहत होते. शरद हा घरातील कर्ता पुरुष. घरात तसे ४ जण म्हणजेच शरद, शरदची बायको कल्याणी, मुलगा गौरांग आणि मुलगी अनामिका वास्तव्यास होते. शरद अतिशय हुशार, तल्लख बुद्धीचा, सुशिक्षित व चांगल्या कंपनीत कामाला असा. आता चांगल्या कंपनीत कामाला म्हणजे पगार पण तसाच रग्गड. मुलगी कॉलेजात आणि मुलगा दहावीला व बायको गृहिणी असा एकूण छोटेखानी पण सुटसुटीत परिवार. सगळे कसे आनंदी. अशी परिस्थिती असताना राहायला पण उंच उच्चवर्गीय इमारतीत प्रशस्त असा फ्लॅट. अर्थात फ्लॅट कसला हवेलीच म्हणा की.

   सुरुवातीला तसे सगळे बरे होते. रोजचे दैनंदिन कामे, मुलांचा अभ्यास, थोडी करमणूक म्हणून छंद जोपासणे, बायको मुलांसोबत मित्र परिवारासोबत वेळ घालवणे, नातेवाईकांशी आपुलकीने बोलणे हा शरदचा ठरलेला उपक्रम होता. शरद इतका उदार की रस्त्यात साधा भिकारी दिसला तरी त्याची दया येऊन १च्या ऐवजी ५० रुपये भिक म्हणून देणारा. उच्चवर्गीय या प्रकारात मोडत असल्याने बाकी लोक या स्वभावामुळे शरदला कायमच नावे ठेवायचे, पण तरीही आपले संस्कार म्हणून शरद त्याकडे दुर्लक्ष करायचा.

    सगळ कसं सुरळीत चालू होत. अशातच एक दिवस शरद घरी आला ते म्हणजे त्याच्या बढतीची बातमी घेऊनच. आता सगळ पालटलं उच्च हुद्दा, उच्च पगार, उच्च राहणीमान आणि सोबतच वाढलेली प्रतिष्ठा व मानमर्यादा. या सगळ्यात शरदला रोज घराखाली न्यायला आणि सोडायला गाडी. या सगळ्यात शरद आणि कुटुंबीय खूपच हुरळून गेले. वैभव आणि ऐश्वर्याचा गर्व वाटू लागला. पैश्याची श्रीमंती मोठी वाटू लागली. संपूर्ण जगात आमच्यासारखे कोणी नाही असे वाटू लागले. मग काय लोकांना कमी लेखायला लागले, ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांना नीच्च समजायला लागले,अचानक सर्व मित्रपरिवार,नातेवाईक, शेजारी या सर्वापासून लांब गेले. जो माणूस भिकाऱ्याला पैसे देवू करायचा तो त्याच्याकडे बघेनासा झाला आणि हे सगळे कशामुळे तर फक्त पैसा आणि वैभवाच्या माजाने.

    पण म्हणतात ना देव सगळ बघत असतो आणि इथे केलेल्यांची शिक्षा इथेच भोगायला लावतो अगदी तसेच झाले. एक दिवस गडबडीतच शरद आला ऑफिसहून थोडा बसला, पाणी प्यायला आणि अचानक त्याच्या हातातून पाण्याचा पेला सटकला, त्याला तरारून घाम फुटला. हे सगळ बघून त्याची बायकामुले जवळ आली आणि विचारू लागली "काय झालं काय होतय नेमक तुम्हाला?" पण शरद एक अक्षरही बोलू शकत नव्हता फक्त छातीला हात लावून बसला होता. त्याला कसलीच शुद्ध नव्हती.

    इतक्यात कल्याणी गेली आणि शेजाऱ्यांची दारे ठोठाऊ लागली व ओरडू लागली,"बघा हो माझे यजमान कसे करताय, काय होतय त्यांना, कोणीतरी या हो मदत करा, चला हो आम्हाला त्यांना घेऊन दवाखान्यात घेऊन चला". पण सगळेच उच्चभ्रू, कधी साधे एकमेकांचे शेजाऱ्यांचे चेहरेही न बघितलेले, आणि काही ओळख असून यांच्या अचानक बदललेल्या वागण्यामुळे दुरावलेले कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. तेव्हढ्या वेळात अनामिकेने बाबांच्या काही मित्रांना फोन लावले पण कोणीही मदत केली नाही.

    कसे बसे नंतर अखेर प्रयत्नांती एका मित्राच्या मदतीने शरदला जवळच्याच नामांकित हॉस्पिटलमध्ये भरती केले. उपचारही झाले पण डॉक्टर मात्र बोलले की "अजून एक मिनिट जरी उशीर झाला असता तरी तुमचा माणूस हातातून निघून गेला असता. तीव्र हृदयविकार झटक्याने त्यांची तब्येत खालावली आहे निदान काही दिवस तरी पूर्णतः आराम आणि नियमित समतोल आहार सर्व सांभाळावे लागेल." 

    हे सगळ ऐकले आणि सर्वांनाच जाणीव झाली की, पैसा होता, वैभव होत, ऐश्वर्य होत पण जवळची माणसे नव्हती म्हणून हा गंभीर क्षण बघावा लागला. हे का झालं? तर पैसा, श्रीमंती आणि अचानक मिळालेला मान व वाढलेली प्रतिष्ठा यामुळे. पण एक गोष्ट विसरलो की पैसा जवळ करता करता जवळ असलेल्यांना दुरावून बसलो तेही इतके की गरजेच्या वेळीही मदतीला कोणी आले नाही.

    या जाणिवेने शरदसकट सगळ्यांनी ठरवलं की दोन पैसे कमी असेल तरी चालतील पण आधीसारख सुखी आयुष्य जगावं. पैसा काय आज आहे उद्या नाही पण चिरकाल टिकतील ती जोडलेली माणसे. याच विचाराने प्रेरित होऊन पुन्हा पाय जमिनीवरच ठेऊन मिळून मिसळून वागण्याचा शरद व कुटुंबीयांनी निर्धार केला व पैशाचा माज सोडून सर्वसाधारण पूर्ववत आयुष्य जगण्यास प्रारंभ केला.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract