शुभांगी कोतवाल

Abstract Children Stories

2  

शुभांगी कोतवाल

Abstract Children Stories

माझे गाव

माझे गाव

3 mins
44


मी आज बागेत छाटणी करत होते , खूप जास्त वाढलेल्या फांद्या तोडून टाकाव्या लागतात आणि मग त्यामुळे त्या झाडाला नवी पानं फुटतात . त्यातलं एक झाड मला असं वाटलं आपण तोडून टाकावं म्हणून मी ते उपटवण्याचा प्रयत्न केला पण त्याचं मूळ इतकं जमिनीत खोलवर गेलं होतं की ते झाड उपटायला जमलच नाही.

असच असत आपलं पण जिथे आपलं मूळ असतं, जिथे आपण बालपणी नेहमी सुट्टी घालवलेली असते , जिथे आपले पूर्वज राहिलेले असतात त्यामुळे आपल्यालाही तिथली लोकं ओळखतात , मान देतात , आपुलकीने आपल्याशी वागतात ते आपलं मुळ गाव आपण कसं विसरणार ? त्या आठवणी नेहमी मनाला सुखावून जातात. 

तसं ते शहरच होतं पण आमचं वडिलोपार्जित घर म्हणजे आमचा मोठा वाडा , ज्या भागात होता तो शहराचा जुना भाग असल्यामुळे तितका विकसित झालेलं नव्हता म्हणून तो गावा सारखाच होता . म्हणजे लाईट नव्हते त्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाक व जेवण तसं लवकर होत असे .कंदील वापरावा लागत असे . मग बरेच वर्षांनी लाईटाची सोय झाली .

पाणी भरायला सुध्दा एक सार्वजनिक नळ होता जिथे बरेच जण संध्याकाळी पाणी भरत असत . तशी आमची विहीर असल्यामुळे पाण्याची काही कमतरता नव्हती. बरं तिथे बरीच वर्ष उघड्या गटारी म्हणजे ते आमच्यासाठी खूप त्रासदायी होतं पण ते वाड्यातून बाहेर पडल्यावर , कारण वाड्यात दगडांनी बंद करून व्यवस्थित केल्यामुळे आम्हाला त्रास नव्हता.

माझी आजी त्या घरात रहात होती आणि वाड्यात आमचे इतरही भाडेकरू होते . आम्ही शाळेच्या सुट्ट्यांमध्ये तिथे जात होतो . घर मालकांची नातवंडं म्हणून आमच्याशी खूप प्रेमाने वागत असत. चहा फराळाला एकदा तरी आमच्या घरी या असा आग्रह असायचा त्यांचा . 

रात्रीचं जेवण आटोपल्यावर आम्ही आजी सोबत तिथल्या राम मंदिरात जात असू , कथा ऐकायला व दर्शन करायला . अंधारातच आजीचा हात धरून घरी येत असू . आणि मग त्या मातीने सारवलेल्या घरात कधी बाहेरच्या ओट्यावर खाट टाकून मस्त झोपून जात होतो .

सकाळी तशी ऊन्ह येत असत त्यामुळे लवकर जाग येत असे . चहा स्नान आटोपून कधी थोडा अभ्यास करायचा किंवा अजीला स्वयंपाकात मदत करायची m तिथे गॅस नसल्यामुळे चुलीवर स्वयंपाक करावा लागत असे . तिथली भाजी मात्र खूप चवदार असे . हिरवे काटेरी वांगे , टमाटे , पांढरे शुभ्र कांदे , कोणतीही भाजी असो खूप चविष्ट बनत असे . आणि रोज संध्याकाळी आजी बरोबर आम्ही भाजी बाजारात ताजी भाजी आणायला जायचो . येताना बरीच ओलखीची लोकं भेटत असत , विचारपूस करत असत.

आमचं किराणा साठी दुकान ठरलेलं होतं तिथे आजी आम्हाला काही लागलं तर आणायला पाठवत असे , पैसे लिहून ठेवा म्हणून आम्ही त्या लागणाऱ्या वस्तू आजीला आणून देत असत . तिथे जवळच पाटीवर लिहायला लागणाऱ्या पेन बनवणारा कारखाना होता तो कारखाना माझ्या आजोबांच्या मित्राचा होता त्या त्यामुळे ते आम्हाला बोलवून बऱ्याचशा पेन देत असत .आणि त्या साध्या पेन नसतं तर पाच-सहा रंगाच्या त्यात रेघा असत त्यामुळे रंगीबेरंगी अक्षर उमटत असे. ज्या रंगाच्या बाजूने पेन धरू त्या रंगाची अक्षर उमटत .आम्ही त्या पेन घरी गेल्यावर शेजारी मित्र मैत्रिणींना दाखवायचो. त्यांनाही कुतूहल वाटायचं . आम्ही त्यांच्यासाठी पण जास्तीच्या पेन घेवून जात असू .

आजी आम्हाला कधी बागेत फिरायला घेवून जात असे तर कधी कोणी नातेवाईक , ओळखीचे यांच्या घरी सहज भेटायला नेत असे . घरोबा असलेले कोणी शेजारी कधी जेवायला बोलवत असत . बऱ्याच नवीन ओळखी व नवीन मित्र मैत्रिणी मिळत असतं . 

आमच्या गावात केळी, बोरं, पेरू खूप छान मिळायचे . अगदी गोड आणि ताजी फळं. आम्ही तिथे असताना बरीच फळं खायला मिळत असतं आणि परत आल्यावर आजी कुणी येणाऱ्या बरोबर बोरं पेरू पाठवून देत असे .

आमच्या गावात एक नदी पण होती , तशी आमच्या घरापासून दुर होती पण तिथे असताना एकदा तरी आम्हाला आजी नदीवर घेवून जातं असे . तिथे अगदी मनसोक्त खेळून , नदीच्या थंडगार पाण्याचा आनंद घेवून मान भरलं की घरी परत येत होतो .

आमची सुट्टी खूप मजेत जात असे आमच्या गावात . शहरा सारख्या बऱ्याचशा सोयी नसुनही ती कमतरता भासत नसे . तिथून खूप काही चांगल्या आठवणी घेवून आम्ही घरी परत येत होतो . आणि पुन्हा कधी सुट्टीत परत जायला मिळेल याची नेहमी वाट बघत असायचो .

असं आमचं गाव , त्या गावातल्या आठवणी , तिथली लोकं , त्यांची आपुलकी , पाहुणचार आणि नवीन मित्र मैत्रिणी सगळच कधी न विसरता येणारे. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract