Rajan Jadhav

Children Stories

4.0  

Rajan Jadhav

Children Stories

माझ्या बालपणीच्या आठवणी जैतिरच्या - भाग - १

माझ्या बालपणीच्या आठवणी जैतिरच्या - भाग - १

3 mins
211


   कोकणात विविध सणांचे महत्त्व फारच मौलिक असे आहे.जणू हे सर्व सण-उत्त्सव समाजशास्त्रीय सिद्धांतानुसार मानवातील समाजप्रियता वृद्धिंगत करणारे असे आहेत .ज्याचा आजच्या आधुनिकीकरणातील युगात लोप होताना दिसतोय .माझ्या बालपणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशाच एका उत्त्सवाचे औचित्त्य माझ्या पूर्ण आयुष्यातील एक अविस्मरणीय ठेवा आहे.ज्याच्या आठवणींने आजही मनाला निस्तब्ध शांतता लाभते आणि वसंतात झाडांना नवीन पालवी यावी , झाडे फुलावी , बहरावी आणि वाऱ्यावर डुलावी अगदी तसेच.

   

साधारणपणे मे महिन्यातील दर्श आमावस्येला साजरा होणारा या उत्सवाची चाहूल लागताच एक महिना अगोदरच आजूबाजूच्या गावातून गावकरी मंडळी तयारीला लागायची हे सर्व काही मूकटपणे पाहणे व त्याच अनुकरण करण एवढेच त्या कोवळ्या वयातील उद्योग ! मार्चला परीक्षा संपल्या की अगदी जून पंधरवड्या शाळेला सुट्टीच .मान्सूनची पूर्व तयारी म्हणजे कोकणातील " मिरग " .या मिरगाच्या पूर्व तयारीत घरची मोठी मंडळी व्यस्त असायची तर मी " जैतिर " उत्सवाला जाण्याच्या पूर्व तयारीला .त्यावेळी १ रुपयाला लिमलेटस् च्या तब्बल २० गोळ्या येत होत्या .म्हणजे स्वस्ताई होतीच परंतु , त्यातुलनेत घरच आर्थिक उत्त्पन कमीच होत.घरी कमवणारा एकटा मामा त्याच्या डोक्यावर १०-१२ माणसांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी .त्यामुळे सण-उत्त्सव व जत्रा वैगेरे यासाठी घरच्यांकडून २-३ रुपये मिळायचे .आजूबाजूचे कुणी पाहुणे मंडळी त्यानिमित्त घरी आलेच तर फार फार मिळून ५ रु. व्हायचे . पण हा पैशाचा साठा रामभरोशे असा होता.त्यामुळे जैतिर उत्सवाचा पुरेपूर आनंद लुटण्यास मर्यादा पडत होत्या .विशेषतः खेळणी वैगेरे घेण्यासाठी पैसे पुरत नसायचे.साहजिकच इतर मुलांच्या खेळण्यांकडे पाहून घरी परताव लागायचं . यावर्षी जे मिळाल नाही ते पुढच्या वर्षी घेऊ या आशेने मनातील नैराश्य झटकून नवउमेदीने पुन्हा एकदा जैतिर ची वाट बघावी लागे.याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता.पण समजूतीत आल्यापासून यात काही बदल होत नव्हता .


    मी आणि माझे मित्र हनुमंत , विलास , संतोष आणि मोठा मोठा कृष्णा वा मोठा संतोष जे आमच्यापेक्षा ३-४ वर्षांनी मोठी असणारी मुल. मग, इल्शा, संतो, हनग्या वैगेरे आम्ही मोठ्या मुलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाने "जैतिर उत्सव" साजरा करण्यासाठी येत असलेल्या आर्थिक टंचाईवर अखेरीस तोडगा निघाला .जैतिरच पावला म्हणायचं . मोठी मुल म्हणजे मोठा संतोष आणि मोठा कृष्णा शाळेत सतत गैरहजर आणि अभ्यासात " ढढ्ढोबा " होती .असे त्यांच्या वर्ग शिक्षकांचे मत होत.याचा अर्थ आमचा वयोगट फार टॅलेन्टेड होता असे नाही.माझ्या वडीलांच्या निधनानंतर अगदी वयाच्या ३ महिन्यांपासून माझे आजोळ मठ येथे मी मामांकडे राहायला होतो. माझे मामा मठ हायस्कूल ला शिपाई म्हणून तेथे कार्यरत होते .ते शालेय वातावरणात कामाला असल्यामुळे अभ्यासाच्या बाबतीत कोणतीही सूट नव्हती .त्यामुळे मामांचा अभ्यासाच्या बाबतीत मोठा धाक होता.त्यामुळे अभ्यास आटपून मामाच्या गैरहजरीत इतर गोष्टींसाठी मी वेळ काढायचो.


    माझी इ.४ थी ची वार्षिक परीक्षा आत्ताच संपली होती. मग आमच्या "जैतिर" ला जाण्याच्या आर्थिक टंचाईवर निघालेल्या तोडग्यात बऱ्याच गोष्टींची तरतूद करण्यात आली. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर " जैतिर " येईपर्यंतचे आठ दिवस अगोदर मिळेल ते काम एका गटाने करायचे अर्थातच ते काम आमच्या वयोगटाशी पेलणारे असे असायचे. कुणाचा शेणाचा गोवर भरणे, जळणाची लाकड घरपोच करण तर कधी गवत भरण्यास मदत करणे. या कामाची मजदूरी किंवा मोबदला पैसे स्वरुपात मागण्याच कुणालाही धाडस होत नसायचे कारण एक तरा समोरची माणस वडीलधारी असायची किंवा घरच्यांना पण हे कळू द्यायचे नव्हतं .त्यामुळे मिळतील ते २-३ रु.निमूटपणे घ्यायचे आणि डब्याच्या आत पैसे जातील ऐवढे खिळ्याने छिद्र पाडून त्यात साठवायचे. एप्रिलच्या पंधरवड्यानंतर आंबे झाडावर पिकायला सुरुवात व्हायची.कोकणातून परदेशात विक्रीसाठी जाणारा आंबा, ज्याने महाराष्ट्रासह भारताचे नाव सातासमुद्रापार नेण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे.कच्चा आणि पिकलेला अशा दोन्ही प्रकारचे आंबे बाजारात विक्रीसाठी यायचेच पण याव्यतिरिक्त आमच्या टोळक्याला फार मोठी बातमी लागली, ती म्हणजे माझ्या मामाच्या घरापासून साधरणपणे २-३ किमी अंतरावर आरोलकर यांची रोपवाटिका नर्सरी होती.जिथे विविध जातीची फुले-फळे इ. कलमांची बांधणी करुन ती कलमे विक्रीस ठेवली जायची .तिथेच प्रवेश द्वाराजवळ एक पाटी लावलेली होती. शेकडा ३.०० दराने पायरी विकत घेतली जाईल.पायरी ही हापूस आंब्याप्रमाणे आंब्याची एक दुसरी जात आहे. परंतु, इथे पायरीचा अर्थ आंब्याच्या आतील कोय किंवा बाटी. मोठ्या संतोषने ही "गुड न्यूज" आम्हाला देताच, आम्हा सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला. जणू अलिबाबाच्या गुहेची चावी मिळाल्यासारखे सर्वजण नाचू बागडू लागले.आता आम्ही सर्व निघालो "जैतिर उत्त्सव" मोहीमेवर .

---------------------------------------------     

(क्रमशः)


Rate this content
Log in