Amruta Shukla-Dohole

Fantasy

3  

Amruta Shukla-Dohole

Fantasy

मैत्री

मैत्री

5 mins
8



    तीन दिवस झाले तो बोलत नव्हता. रोज उत्साहाने थुईथुई नाचणारा विलास आज तर एकदम गप्प गप्प. काहीतरी नक्कीच बिनसलं होतं. हॉस्टेलमधे सर्वांशी मिळून मिसळून वागणारा, सर्वांची मिष्कीलीने यथेच्छ चेष्टामस्करी करणारा अचानक अबोल होऊन जाईल हे अचंबित करणारंच.

    तसं आमचं हे कॉलेजचं शेवटचं वर्ष. त्यात प्रिलिम तोंडावर आलेली. लगेच दोन महिन्यानंतरच्या फायनल परीक्षेचा फॉर्म भरण्याची तारीख ही उद्यावर येऊन ठेपलेली. फायनल झाली की सगळे आपापल्या गावी जाण्यासाठी पांगणार. मग पुन्हा कधी एकत्र येणं होईल न होईल, तेव्हा ‘जी भर के जी लो’ हे हॉस्टेल लाईफचं ब्रीदवाक्य सगळे अक्षरशः जगत होते.

    आमची बॅच तशी दंगामस्ती करण्यासाठी नावाजलेली. त्यातही विलास तर नेहेमीच आघाडीवर राहणारा. तो जसा कॉलेजातला क्लासमेट तसा हॉस्टेलमधला रूममेट. गेली साडेचार वर्षांचा सहवास. सगळं करायचं तर एकत्र करायचं हा शिरस्ताच. दंगामस्ती असो वा अभ्यास. इतर रूममेट्सही त्यात सहभागी. मस्तच झालेलं, चाललेलं जगणं. शेवटच्या परीक्षेबद्दलही तसे सगळे अपबीट. कधी एकदाची देतो परीक्षा आणि फडशा पाडतो पेपरचा हा अभिगम. एकूण तसं काहीच कारण नव्हतं विलासचं उदास राहण्याचं.

    आज सकाळपासूनच तो मला टाळायचा प्रयत्न करत होता. कॅन्टिनमधे जाऊन सकाळचा नाष्टा एकट्याने केला. नंतर कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन वाचत बसला. लंचलाही कॅन्टिनमधे उगवला नाही. दुपारचे क्लास तर बुडवलेच. नेहेमी सिन्सिअर राहणाऱ्या विलासकडून ही अपेक्षा नव्हती. नेहेमी उत्फुल्ल व उल्हासित असणारा विलास मलूल चेहेरा घेऊन वावरत होता. गेले दोन दिवस ‘राहू दे त्याला एकटं! आपोआप ताळ्यावर येईल!!’ असं ठरवलं होतं. अजिबात बोललो नाही त्याच्याशी. तोही तुटक तुटकच वागत असलेला. जणू मला नाकारतच होता.

   आज सगळं मलाच असह्य व्हायला लागलं. दुपार टळून गेल्यावर त्याला गाठण्यासाठी मी लायब्ररीत गेलो तर तो तिथे नव्हता. इतर मित्रांकडे चौकशी केली तर तो कॅम्पसमधे दिसलाच नसल्याचा निरोप मिळाला. आता मात्र मी अस्वस्थ. हे जे काही घडत होतं ते तितकंसं चांगलं तर निश्चित नव्हतं. काहीतरी बिनसलं होतं व ते नक्की काय? याचा छडा लावण्याचा मी निर्धार केला. सगळ्यांना मग मी विचारत सुटलो. बहुतेकांनी काही माहित नसल्याचं सांगत कानावर हात ठेवले. एकादोघांनी त्याचं वागणं खटकल्याचं बोलून दाखवलं, पण असेल वैयक्तिक कारण म्हणून विचार करणं सोडून दिलेलं. उलट मीच त्याचा रूम पार्टनर म्हणून मलाच खोदून खोदून विचारायला लागले की मामला काय आहे?

   मामला नक्कीच गंभीर होता. जीवलग म्हणवणारा मित्र अचानक तुटतो व आपण दोन दिवस त्याला वाऱ्यावर सोडून देतो याचा अपराधीपणाचा भाव मला छळू लागला. मी त्याच्यावर रागवायला हवं होतं. असा का वागतो याचा जाब विचारायला हवा होता. दोन मुस्कटात दिली असती तरी चाललं असतं पण तो दुरावला नसता असा! प्रकरण तसं गंभीर असल्याशिवाय तो असा वागणार नाही याची तशी खात्री होती पण ते नेमकं प्रकरण काय? हे बघायला हवं होतं.

    सुदैवाने विलासने त्याचा घरचा फोन नंबर मागे शेअर केला होता. साधं सरळ ख्यालीखुशालीची चौकशी केल्यागत मी कॉल लावला, तर समोर विलासच्या आईनेच तो उचलला. रोज रात्री विलास घरी फोन करून, त्यावर घरच्यांशी जुजबी का होईना बोलून मगच झोपत असे. गेले दोन दिवस त्याने घरी फोनच केला नव्हता! हे मला नेमकं त्याक्षणीच उमगलं. समोरून विलासची आई तर फोनवर भडभडून बोलू लागली. बोलत असताना ती आसवं ही गाळत असावी हे मला स्पष्ट जाणवत होतं. मी तिला बराचवेळ बोलू दिलं. शेवटी काळजी करू नका असं सांगून फोन ठेऊन दिला.

    हे सगळं होताना माझ्या डोळ्यात आसवंच आली. तसा मला रागही आला, प्रचंड राग आला विलासचा व मला माझाही. त्याला गुद्दे मारावेत, ठोसे द्यावेत, झोडपून काढावं, काहीबाही बोलावंसं वाटलं पण त्या घटकेला मला गावी असलेली माझी आईच आठवली.

   माझी आई तशी पोक्त व धोरणी, कुणाचंही अंतरंग तिला सहज कळत असे. लहानपणी तिने शिकवलेला धडा तर कायमचा लक्षात राहणारा. त्यावेळेस आम्ही चाळीत रहात होतो. सगळा मध्यमवर्गीय शेजार. सगळे खाऊन पिऊन सुखी होते. तरीही महिना संपत आला की प्रत्येकाची ओढाताण होत असे. एक तारखेला झालेला पगार महिना अखेरीस पुरत नसे.

   त्याकाळीही महागाई पाचवीलाच पुजलेली. आईबाबांच्या काटकसरीच्या व बचतीच्या सवयीमुळे कुणा पुढे हात पसरण्याची पाळी निदान आमच्यावर येत नसे. बाबांनी नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी गंगाजळी साठवून ठेवली होती.

    त्यावेळी चाळीतलं वातावरण आपुलकीचं व खेळीमेळीचं होतं. अडीअडचणीला एकमेकांचं बघणं हा स्थायीभाव. महिना अखेरीस शेवटचा आठवडा काढताना एकमेकांकडे एक वाटी साखर, दही, तेलतूप प्रसंगी स्वस्त असलं तरी मीठही हे मागणं सहज होत असे. यात संकोच वाटत असला तरी हा देवघेवचा व्यवहार असे.

    शेजारपाजारी मागणं याची पाळी आमच्यावर क्वचितच येत असे, पण आईच्या शहाणपणाने आम्हांस जो धडा घालून दिला तो काळ्या दगडावरची रेघ ठरलेला. कायमचा मनावर कोरला गेलेला. घरात गरज नसतानाही ती शेजारीपाजारी एक वाटी साखर मागायला पाठवत असे. मग मी सांगायचो. “आई साखर तर आहे घरात मग ती कशाला मागत फिरायचं?” बाबा त्याकाळी रेशनकार्ड चालू रहावं म्हणून रेशनच्या लाईनीत उभे राहून साखर आणायचे. तीही स्वस्त मिळते म्हणून.

    माझ्या प्रश्नावर आई गंभीर होत सांगत असे “हे बघ जयु, सगळी बोटं सारखी नसतात. प्रत्येकाला सगळं मिळूनच राहतं असं नाही. इतरांकडे मागण्याची पाळीही येते. ती आपल्यावर येत नाही हे आपलं नशीब. आपल्याकडे आहे म्हणून आपण शेजाऱ्यांना देत असतो, नाही म्हटलं तरी मागताना शरम, संकोच हे वाटत असतंच. आपल्याला गरज नसली तरी आपणही क्वचित मागत राहिलो तर शेजाऱ्यांना हा संकोच वाटणार नाही व आपल्यालाही त्यांची गरज आहे हे त्यांना पटत राहील, जाणवत राहील. तसेच मागण्याने आपल्यातही आपल्याकडे सगळं आहे याचा गंड निर्माण होणार नाही. तेव्हा जा आणि साखर घेऊन ये!” आईचं म्हणणं त्यावेळेस अनाकलनीयच वाटत होतं पण आता ते अक्षरशः पटत होतं.

    विलासच्या आईने सांगितलेली हकीकत विलक्षणच होती. कोरोना काळात विलासच्या वडिलांची नोकरी गेली. पन्नाशी उलटलेली असल्याने दुसरी नोकरी कोणी देईना. नवीन उत्पन्नाची साधनं उभी करण्यात प्रॉव्हिडंड फंडची रक्कम गमावली. थोडीफार बचत होती त्यावर दोन वर्षं घरखर्च व विलासच्या शिक्षणाचा खर्च निभावलेला, धाकटी बहिणही घरी असलेली ती कॉलेजच्या पहिल्या वर्षात. तिचं सगळंच बाकी असलेलं. ‘आमच्याकडचे सगळे पैसे संपलेत, तुला पाठवण्याइतपतही नाही. सगळा भार तुलाच उचलावा लागेल. परीक्षा दे व लवकर कमवता हो म्हणजे आमची काळजी मिटेल.’ असं विलासला मागच्याच आठवड्यात सांगून झालं होतं.

    केविलवाण्या स्वरात हे सगळं विलासची आई सांगत होती तेव्हा काळीज पिळवटून निघत होतं. सुन्न करणारीच बातमी ही. जी आजपर्यंत विलासने आमच्यापासून लपवून ठेवली होती. तो काही बोललाच कसा नाही याचं आश्चर्य, विलक्षण राग, संताप, सगळं मनात उमटत राहिलं. विलासने आम्हाला परकं मानलं हे जिव्हारी लागणारं. त्याला तातडीने शोधलं पाहिजे. उद्या तर परिक्षेची फी भरण्याचा शेवटचा दिवस. त्याला गाठून कुणालाही कुठलीही कुणकुण न लागू देता तिढा सोडवावा लागेल.

    बाबांनी लावलेली बचतीची सवय आज कामास येत असलेली. गेल्या साडेचार वर्षात बाबा पैशे पाठवायचे, त्यातून वाचवलेले पैसे आता उपयोगी पडणारेत. विलास कुठे असेल याचा अंदाज, खात्रीच म्हणाना, मला आलेला. गावाबाहेर तळ्याकाठी गणपतीचं मंदिर आहे. तेथे कट्ट्यावर आम्ही तासनतास बोलत बसत असू.

    मी त्याला गाठलंच. शून्यात पाहत असल्यासारखा बसून होता. मी हाक मारून पाकीट त्याच्या हाती ठेवले. पाकिटात वीस हजार रुपये होते. परिक्षेची फी व दोन महिन्याचा त्याचा खर्च यातून निभाऊन जाईल.

   विलासने पाकिट हातात घेत मिठीच मारली व घळाघळा रडू लागला. मग मी त्याला एक वाटी साखरेची गोष्ट सांगत बसलो.



Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy