Dr.Smita Datar

Inspirational

1.4  

Dr.Smita Datar

Inspirational

मनीच्या कानी ९

मनीच्या कानी ९

4 mins
8.5K


हाय मनी,

            तुझ्या बॉलीवूड डान्स चे विडीयो पहिले. मस्त झालाय डान्स. निवड झाली तर ठीकठिकाणी शोज होणार ना तुमचे. मस्त. तू तर माझ्या पोटात असतानाच मी ओळखलं होत, तू चांगली डान्सर होणार म्हणून. अग, आम्ही पण संस्थेतर्फे एक नाटक करतोय. जुन्या मराठी नाटकांवर आधारित असलेलं. नाटकाच्या तालमी आहेत दादरला. आपले डांगे सरच बसवताहेत. त्यामुळे माझी पण हल्ली पळापळ असते. काल मजाच झाली. धावपळ रेज्ड टू इन्फिनिटी..असा प्रकार झाला.

          सकाळी पोह्यांसाठी भराभर कांदा चिरताना , मोबाईल च्या स्क्रीनला स्वयंपाकाची बोट लावत एकीकडे एम इंडिकेटर चेक करत होते.खर म्हणजे मी अतिशय शिस्तीची, स्वच्छ, अशी तेलातूपाची उष्टी खरकटी बोट इलेक्ट्रोनिक वस्तूंना लावण, माझ्या काटेकोर शिस्तीत बसत नाही. पण आज अडला हरी ...अशी परिस्थिती होती. नाटकाची रिहर्सल म्हणून सध्या मी पश्चिम रेल्वेला आपलं म्हटलं होत. आपल्या घरपासून जवळच कामाला जाणाऱ्या, त्यातून सेल्फ एम्प्लोयीड सुखी महिलांच्या गटात मी मोडते ना. कॉलेज संपल्यापासून ट्रेन शी संपर्क जवळ जवळ तुटलाच होता. पण नाटकाच्या तालमी दादरला, आणि सकाळी गाडी रस्त्यावर आणणे म्हणजे आ बैल मुझे मार अशी गत ...म्हणून गेले काही दिवस अस्मादिकांनी रेल्वेचा आश्रय घेतला होता.

         मी काहीतरी नवीन, चाकोरीबाहेरच,आणि जास्तीची धडपड करून सुरु करते न तेव्हा, “भरवश्याच्या म्हशीला टोणगा“ सारखं घरातल्या कामवाल्या बायका सुट्टी घेतात. ( back up प्लान म्हणून एखादी बाई जास्त ठेवली तरी ..इथे रडका स्माईली ...) त्यात तू ही नाहीस. आपल्या घरातल्या पुरुष उमेदवारांना काही सांगितल्याशिवाय ते हलतच नाही. बाई नाही वगैरे दादा आणि बाबा, दोघांच्याही मेंदू पर्यंत पोहोचतच नाही. त्यातून तूच कशी आम्हाला काम सांगत नाहीस म्हणून आरडाओरडा. मी नुसती चडफडत होते. नाटकाच्या तालमींचा ठोका गाठता गाठता माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते.

        सध्या माझ्याही बोलण्यात नऊ नऊ फास्ट , नऊ एकतीस लेडीज स्पेशल ..असे शब्द यायला लागले होते. स्वयंपाकाची बाई नसल्याने स्वतःचा डबा करून गाडी पकडणे, त्यात स्वतःला प्रवाहपतिता सारखे झोकून देणे, घरातल्यांची व्यवस्था लावणे,( इथे लाल तोंडाचा स्माईली ) , आडमुठ्या रिक्षावाल्याला विनवणी करून स्टेशन गाठणे, ई. दिव्य करायला लागले होते. स्टेशन जवळ साचलेल्या ट्राफिक मध्ये न हलणाऱ्या रिक्षात आपण असतो, स्टेशन दिसत असतं, पण उतरून चालण्या इतकं सुद्धा ते जवळ नसत., ट्रेन सुटेल या भीतीने खूप आधीच रिक्षावाल्याला पैसे देऊन, खड्डे असलेल्या रस्त्यातून, डबे..पाण्याची बाटली असलेल्या सुंदर पिशव्या गळ्यात घेऊन धावणाऱ्या बायकांच्या गर्दीत आता मी पण सामील झाले होते.

      इतकी हाश हुश करत हव्या त्या नऊ नऊ किवा नऊ सोळा च्या प्लेंटफॉर्म ला पाय लावले , तर आज ही गाडी अमुक अमुक प्लेटफॉर्म ऐवजी तमुक तमुक प्लेटफॉर्म वरून सुटेल , अशी रेल्वेचिचुंद्री ची घोषणा .. पुन्हा एकदा जीव खाऊन पळत सुटले . या नव्या जीवनक्रमाची महिनाभर तरी सवय करून घ्यायला हवी, अस मनाला बजावत होते. रेल्वे ने आतापुरत ठरवलेल्या प्लेटफॉर्म वर एकदाची सुस्थळी पडले. तिथेही सगळीकडे दगड माती टाकून, प्रवाश्यांना जास्तीत जास्त त्रास कसा देता येईल, याची काळजी घेतलेली होती. सह्प्रवाश्यांचा घामट स्पर्श सहन करत एकदाची दारात उभं राहण्यापुरती जागा मिळवली. दादरला इतरांनीच मला उतरवलं. हवेला सुद्धा भाजी, कोथिंबीरीचा वास येणाऱ्या रस्त्यावरून  काही जुन्या भाज्या अपरिहार्यपणे  पायदळी तुडवत चालले होते. तालमीच्या इमारतीत शिरले आणि तानाजी मालुसरेंसाठी बांधल्या असाव्या अश्या पायऱ्यांवरून तिसरा मजला गाठला. घाम पुसत पाण्याची बाटली तोंडाला लावणार, इतक्यात डांगे सरांचा फोन आला, “ पान क्रमांक चौदा वरचा वरून दुसरा डायलॉग जरा वाचून दाखवा. मी अर्ध्या तासात येतोय. डोक्यात जरा बांधणी करतोय सीन ची.” पिशवीत हात घातला आणि तेहतीस कोट देव आठवले. स्क्रिप्ट नव्हती. स्क्रिप्ट फक्त माझ्या एकटीकडेच होती, त्यात ते हस्तलिखित होत. कालच त्यात फेरफार करण्यासाठी ती घरी नेली होती. घरी फोन केला. दादाने स्क्रिप्ट घरात शोधली. मला आठवले, काल स्क्रिप्ट हातात असताना एक फोन आला, मी त्याच वेळी कपाटात खुडबुड करत होते, कपाट लावायला काढलेलं, आणि एकीकडे डायलॉग्ज पाठ करत होते. स्क्रिप्ट कपाटात ठेवली आणि कपाट बंद केले असणार, ज्याच्या चाव्या माझ्याकडे होत्या. मला परत घरी पळत पळत जाणं भाग होत. आलीया भोगासी असावे सादर...

        एक धडा शिकले, एका वेळी एकच काम करायचं. शांतपणे करायचं. स्वत:वरच हसले. चिडून सांगते कोणाला ? अशी माझी फजिती झाली म्हणून दादा, बाबाला पण खूप हसू आलं. कधीतरी अशी गम्मत पण घ्यावी, नाही का?

          आज स्काईप वर ये. दादा आणि बाबा तुला माझी गम्मत सांगायला उतावीळ झालेत. तू नव्यानेच ऐकते आहे अस दाखव. ( तोंडभर हसणारे माना वाकडे केलेले स्माईली......) 

         चल . बाय.

लव यू .

मम्मा . 

 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational