Avdhoot Bhatwadekar

Fantasy Inspirational Others

3  

Avdhoot Bhatwadekar

Fantasy Inspirational Others

निरिक्षक

निरिक्षक

13 mins
35


ते अरण्य फार मोठ्या भागात विस्तारलं होतं , घनदाट आणि सदाहरित वृक्षांनी वेढलेल्या त्या अरण्यात औषधी वनस्पती, परजीवी लता वेली,विविध प्रकारची रंगांची आणि चवीची फळं फुलं होती . त्याशिवाय अनेक ज्ञात अज्ञात वृक्ष, रोपटी किती असतील त्यांची तर गणनाच नाही . त्यांच्या फळा फुलांचे अनेक सदुपयोग किंवा दुरुपयोग केवळ निष्णात आणि तज्ञांनाच करता येऊ शकतील.अशा वैविध्य पूर्ण वृक्षराजी शिवाय अनेक वेगवगळ्या जाती प्रजातींचे पशू पक्षी त्या अरण्यात राहत होते. हिंस्त्र आणि मांसाहारी पशू -पक्षी इतर लहान सहान प्राण्यांना मारून आपली पोषणप्रकीया करत होते. तर शाकाहारी प्राणी पक्षी विविध प्रकारच्या फळा - फुलांवर पोट भरत होते .हेच पशू पक्षी मृत झाल्यानंतर त्यांना कृमी कीटक फस्त करून टाकत असत . जीवन चार, आठ आणि असंख्य पायांनी आणि पंखांनी स्वैर विहार करत होतं, त्याच बरोबर अनेक पाळं - मुळांच्या साहाय्याने स्थिर राहूनही जमिनीत मुरलेली जीवन द्रव्य , पोषक तत्व शोषून घेऊन आपलं पोषण करत होतं . सर्वत्र एक नैसर्गिक समतोल राखला गेला होता.सदाहरित वृक्ष असल्याने अर्थातच पर्जन्यमान फार उत्तम होते किंवा पर्जन्यमान उत्तम असल्याने इथे सदाहरित वृक्ष फार होते असंही म्हणता येईल, जमीन त्यामुळे फार सुपीक बनली होती ,कोणतंही बीज पडूदे अंकुर फुटून त्याची वाढ होणारच . त्यामुळे फळझाडं फुलझाडं तर अमाप होतीच पण अनेक रानटी , जंगली झाडं सुद्धा फोफाट्याने रुजली आणि वाढली देखील होती. ना कोणी त्यांची निगा राखण्यासाठी होतं, ना कोणी त्यांची वाढ खुंटण्यासाठी होतं.उत्पत्ती स्थिती आणि लय यांचं नियमित आणि गतिमान चक्र सतत सुरू होतं .अनेक ऋतु आले आणि गेले , नवीन प्रजाती निर्माण होत गेल्या, जुन्या प्रजाती नष्ट होत राहिल्या पण हे चक्र ना अडखळलं ना कधी थांबलं , एका विशिष्ट गतीने त्याचं परिभ्रमण होतंच राहिलं , हे सर्व असंच राहिलं असतं जर , जर ती घटना घडली नसती , तसं पाहिलं तर एक प्रकारे परिभ्रमण होतंच राहिलं केवळ त्यात काही अनपेक्षित परिवर्तने होत गेली. या सर्वांचा मी केवळ एक निरीक्षक आहे म्हणून मला हे सर्व ज्ञात आहे, घडणाऱ्या घटनांचे केवळ निरीक्षण करणे माझ्या हातात आहे , मी स्वतः कोणत्याही प्रकारे त्यात सहभागी होऊ शकत नाही, माझ्या निर्मात्यानेच तशी नियमावली तयार केली होती,आणि मी जरी अनेक वर्षे अस्तित्वात राहू शकलो किंवा स्थळ काळाची बंधनं मला नसली तरी निर्मात्याची नियमावली उल्लंघून मी काही करू शकत नाही , त्या ठराविक चौकटीत राहूनच मी कार्यरत राहू शकतो. 

 मला आजही तो दिन आठवतो , जेव्हा माझ्या निर्मात्याने माझी निर्मिती पूर्ण झाल्यानंतर मला सर्व नियमावली समजावून सांगितली आणि माझ्या कर्मभूमी जो एका तारा प्रणालीतील एक ग्रह होता आणि या ग्रहावर त्याच्या ताऱ्याच्या भोवतीच्या भ्रमण कालामुळे जीवनासाठी आवश्यक वातावरण होते तेथे प्रस्थान करण्यास सांगितलं. माझ्यावर एक मोठं कर्तव्य सोपवण्यात आलं होतं, ते म्हणजे माझ्या कर्मभूमीवर होणारे बदल नीट निरीक्षण करून त्यांची नोंद करणे आणि निर्मात्याकडे त्यांचे वृत्तान्त पाठवणे . गेली अनेक वर्षे मी हे कर्तव्य अव्याहत पार पाडतो आहे, मी या भूमीवर झालेला जीवनाचा उगम पाहिला आहे . अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या रासायनिक आणि भौगोलिक प्रक्रिया पाहिल्या आहेत. वृक्ष, वेली यांच्याबरोबरच पशू पक्ष्यांच्या सृजनाचा मी साक्षीदार आहे ,वृक्ष वेली सर्वप्रथम निर्माण झाले होते त्यानंतर येथे विविध सजीवांची निर्मिती होऊ लागली , प्रथमत: केवळ जलचर अस्तित्वात आले , त्यातील काही साहसी आणि बुद्धिमान जलचरांनी हळू हळू भूमीवर येऊ लागले त्यामुळे नवीन प्रजाती निर्माण होण्यास प्रारंभ झाला . त्यानंतर येथे महाकाय ,अक्राळ विक्राळ स्वरूपाचे प्राणी पक्षी सर्वत्र होते . त्यांच्यात जणू चुरस लागली होती कोणता पशू जास्त अक्राळ विक्राळ , पण तेथेही एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती ती म्हणजे जीवन , आणि त्याची विविध आकर्षक रूपे .मी नित्य नव नवीन प्रजाती पहात होतो आणि त्यांचे वृत्तान्त पाठवत होतो , त्यातच एक विलक्षण घटना घडली , आणि त्यामुळे निर्मिती आणि नाशाच्या चक्राला एक धक्का बसला.त्या वेळी मी माझ्या कर्मभूमीच्या, उत्तरेकडे निरीक्षण करून येत होतो, त्याच वेळी अवकाशातून एक तीव्र प्रकाश मला दिसला , त्याचबरोबर फार मोठा ध्वनी देखील ऐकू आला . कोणतीतरी मोठी वस्तू प्रचंड वेगाने अवकाशात जात होती आणि आता या ग्रहाचे वातावरण छेदून ती ग्रहावर आदळणार होती. मला त्या वस्तूमध्ये अनेक सजीव असल्याची जाणीव झाली, पण ते सर्व निष्क्रिय होते, किंवा निद्रिस्त म्हणणे जास्त योग्य ठरेल, मला देण्यात आलेल्या नियमावलीत एक महत्वाचा नियम होता तो म्हणजे कोणत्याही प्रकारे घडणाऱ्या घटनांमध्ये सहभागी न होणे , पण समोर दिसणाऱ्या निद्रिस्त सजीवांना पाहून मी द्विधा मनस्थितीत पडलो, जर मी काहीच सहभाग घेतला नाही तर हे सर्व जीव नष्ट होऊन जातील, आणि जर मी सहभाग घेतला तर त्यांना वाचवता येऊ शकेल , मला काहीच सुचत नव्हतं की या क्षणी काय निर्णय घ्यावा , ती वस्तू अजूनही या ग्रहाच्या वातावरणात होती आणि वेगाने पुढे येत होती . माझ्या मनात हेच विचार होते की या सजीवांना नष्ट होण्यापासून कसं काय वाचवता येईल? आणि मी एक मध्यम मार्ग शोधला,ज्यायोगे मी त्या सजीवांना प्रत्यक्ष सहभाग न घेताच वाचवू शकलो असतो . मी त्या वस्तूचा वेग आणि तिचं अवकाशातील स्थान या सर्वांचं परिगणन करून या ग्रहाच्या पृष्ठभागावर ती कोठे आदळेल हे शोधून काढलं, आणि तेथे असलेले मोठे खडक व इतर संभावित धोके कमी करून तेथे मृदा आणि पाणी यांचं मोठ्या प्रमाणात मिश्रण करून ठेवलं , आता जरी ती वस्तू येथे आदळली तरी सर्व सजीव नष्ट होणार नाही, आणि त्यांना प्रत्यक्ष सहभाग न घेता वाचवल्याने माझा नियमही मोडणार नव्हता.मग मी पुन्हा माझ्या निरीक्षणाच्या ठिकाणी येऊन पुढील घटना काय घडतील त्याचे निरीक्षण करण्यासाठी आलो. अपेक्षेप्रमाणे ती वस्तू त्याच विवक्षित ठिकाणी आदळली आणि दुर्दैवाने त्यातील काही सजीव क्षणार्धात नष्ट झाले,पण त्यातील काही सजीव वाचले.माझा नियमही मोडला नाही , आणि त्या सजीवांना वाचवण्यात देखील मी यशस्वी झालो, पण मला त्या क्षणी काहीच कल्पना नव्हती की माझ्या या कृतीमुळे भविष्यात फार विलक्षण घटनांना चालना मिळणार आहे याची. 

          वाचलेल्या त्या सजीवांना त्यांच्या त्या विचित्र यानातून बाहेर पडण्यासाठी काही कालावधी गेला आणि स्वतःला एका नवीनच ग्रहावर पाहून ते सजीव प्रथम तर अतिशय आश्चर्य चकित आणि भयचकित झाले, त्यांना काहीच उमगलं नाही की काय घडतंय? हळूहळू त्यातील काही जण त्यांच्या त्या यातून बाहेर पडून आसपासचा परिसर पाहून आले येथील विचित्र पशू पक्षी, अजस्त्र पर्वत, वृक्षराजी पाहून त्यांना आश्चर्याचे धक्के बसत होते , कदाचित ज्या कोणत्या ठिकाणाहून ते आले होते तेथे असे काही नसावे . त्या सर्वांना या नवीन काहीशा प्रतिकूल परिसथितीशी जुळवून घेण्याची आवश्यकता होती आणि त्यासाठी त्यांना काही कालावधी लागणारच होता . मला सुद्धा काहीतरी नवीन निरीक्षण करण्यासाठी मिळणार असल्यामुळे मी उत्तेजीत झालो होतो. या सर्व घटनांचे अहवाल तयार करून मी माझ्या निर्मात्याकडे पाठवत होतो . जसजसा काळ पुढे सरकत होता , ते सजीव हळूहळू नवीन परिस्थितीशी जुळवून घेत होते आसपासच्या परिसरातील अनेक वृक्ष इत्यादींचा वापर करण्यास त्यांनी सुरू केले होते ,विविध प्रकारची फळे फुले , औषधी वनस्पती तसेच काही लहान सहान प्राणी पक्षी देखील त्यांनी वापरण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या यानात काही अतिशय क्लिष्ट अशी यंत्रणा होती काही उपकरणे होती त्यांचाही ते सजीव वापर करत होते . त्यांना विज्ञान तंत्रज्ञानाची माहिती होती , अर्थात ते सजीव चांगल्या प्रकारे उत्क्रांत झाले होते ,परंतु तरीही या ग्रहावरील काही अजस्त्र पशू पक्षी पाहून ते अजूनही भयभीत होत असत. ते पशू पक्षी विहार करत असताना हे सजीव आपल्या निवासात जाऊन भीतीने लपून बसत असत. त्यांच्याकडे अजूनही या सर्वांशी लढण्यासाठी काही शस्त्रे उपलब्ध नव्हती.

          अशीच काही वर्षे गेली, ते सजीव आता या ग्रहावर अजून थोड्या मोठ्या परिसरात वास्तव्य करून राहू लागले होते. त्यांच्या छोट्या वसाहती निर्माण झाल्या होत्या , त्यांचे आपापसात व्यवहार होत होते , काही नवीन विचार,नवीन गोष्टींची देवाण घेवाण होत होती . त्यातील काही सजीव नवनवीन प्रयोग करण्यात फार निष्णात होते ,ते सतत काही ना काही उद्योग करत असत.कधी काही रासायनिक प्रक्रिया कर, कधी कोणती नवीन शस्त्रे तयार कर असे अनेक प्रकार सतत सुरू असत.एके दिवशी त्यांनी अशीच अवजड अस्त्रे तयार केली , ज्यामुळे ते आता पर्यंत ज्या पशूंना घाबरत होते त्यांच्याशी प्रतिकार करू शकणार होते , परंतु सर्वांना अजून त्यावर तितका विश्वास बसला नसल्याने त्यांना सध्या तरी या अस्त्रांचा वापर न करण्याचे ठरवले होते. त्यांचा वसाहतीत काही सजीव सर्वांच्या वतीने निर्णय घेत असत, एक प्रकारे ते मोजके सजीव इतरांचे नायक होते आणि अशा नायकांचे निर्णय इतर सर्व मान्य करत असत. अनेक लहान मोठ्या वसाहती त्या सजीवांनी स्थापन केल्या होत्या ,त्यापैकी एकातील काही सजीव समूहाने जवळच्याच पर्वतावर गेले होते , त्या भागात अनेक औषधी वनस्पती आणि काही दुर्मिळ खनिजे होती , आणि याच सर्वांचा शोध हे सजीव वेगवेगळ्या भागात घेत असत. तर , तो समूह पर्वतावर जाऊन शोध घेत असतानाच अचानक त्यांच्यावर काही अजस्त्र पशू हल्ला करतात आणि हे सजीव काही प्रतिकार करण्याआधीच त्यांना नष्ट करून टाकतात, केवळ सुदैवाने त्यांच्यातील एक जण आपला जीव मुठीत घेऊन कसाबसा आपल्या वसाहतीत परत जातो आणि आपल्या नायकांना झालेली घटना सांगतो , वसाहतीतील सर्वजण हे ऐकून दुःखी होतात पण ते काहीच करू शकत नाहीत कारण अजून इथे कोणती अस्त्रे तयार केली नव्हती, ज्या वसाहतीत अशी अस्त्रे होती ती यांच्यापासून फार दूर होती आणि ही घटना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था देखील नव्हती. काही काळ लोटला, पुन्हा एकदा एक समूह त्या पर्वतावर गेला होता , यावेळी त्यांच्या नायकाची मुलगी त्या समूहात होती करण तिला औषधी वनस्पतींबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता होती, नायकाचा विरोध न मानता ती संशोधक समूहासमवेत गेली होती, आणि दुर्दैवाचा घाला पुन्हा पडला , त्याही समूहावर पूर्वी प्रमाणेच हल्ला झाला , एकदा या सजीवांच्या रक्ताची चटक लागल्याने आता ते अजस्त्र पशू यांच्या पाळतीवरच असल्याप्रमाणे अचानक आले आणि सर्वच सजीव मरण पावले. इकडे वसाहतीत खूप समय झाल्यानंतर देखील कुणीच परत आले नाही म्हणून काहीजण त्यांना शोधण्यासाठी निघाले , ते सर्वजण पर्वतावर पोचतात न पोचतात तोच पुन्हा एकदा अजस्त्र पशूनी पुन्हा हल्ला केला, पण यावेळी काही जण पळून गेले आणि पर्वतावर असलेल्या काही गुहांमध्ये जाऊन लपले आणि त्यामुळेच ते वाचले त्यांनी सर्व पशू निघून गेल्याची खात्री झाल्यावर लपत छपत पुन्हा आपल्या वसाहतीत जाऊन सर्व घटना आपल्या नायकाला कथन केली.नायक फार दुःखी झाला, आणि त्याच बरोबर त्याला फार क्रोध आला , त्याने कोठून तरी हे ऐकलं होतं की आपल्यासारख्याच एका वसाहतीत काही सजीवांनी अशी अस्त्रे तयार केली आहेत ज्यांच्या साहाय्याने त्या अजस्त्र पशुंचा प्रतिकार करू शकतो. त्याने आपल्या वसाहतीतील निवडक शुर निवडले आणि त्यांना त्या सर्व अस्त्रे निर्माण करणाऱ्या सजीवांना आणायची आज्ञा केली. त्याच बरोबर त्या वसाहतीत जर कुणी विरोध केलाच तर , हे अजस्त्र पशू कसे आपल्या सर्वांच्या नाशाला कारणीभूत ठरतील , आणि आपण सर्वांनी या पशुंचा कसा एकत्र प्रतिकार केला पाहिजे हे देखील समजवण्यास सांगितले. या शुर सजीवांनी आपले कर्तव्य पार पाडले , त्यांना काही प्रमाणात विरोध झालाच पण त्यांनी तो आपल्या बुद्धीने मोडून काढला आणि त्या अस्त्रे निर्माण करणाऱ्या सजीवांना घेऊन आपल्या नायकाकडे सुखरूप पोचवले .

        नायकाने त्या सर्वांचे मनापासून स्वागत केले आणि त्यांना एकूण परिस्थिती सांगितली त्याच बरोबर अस्त्रे निर्माण करण्यासाठी लागणारे साहित्य आणि सहाय्य देण्याचे आश्वासन दिले. अस्त्रे निर्माण करणाऱ्या सजीवांनी देखील सर्व ऐकून घेतले , आणि काही क्षणातच आपली संमती दर्शवली, त्या नंतर अव्याहत कष्ट घेऊन त्यांनी पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी आणि अधिक विनाशक अशी अनेक अस्त्रे निर्माण करण्यास प्रारंभ केला. या कार्यात त्यांना वसाहतीतील सर्वजण सहाय्य करत होते आणि , अपेक्षेपेक्षा त्वरेने नवीन अस्त्रे निर्माण झाली. नायकाने अर्थातच सर्वांचे आभार मानले आणि एक लहानसा उत्सव साजरा करण्यात आला,त्या उत्सवात अस्त्रे निर्माण करणाऱ्या सजीवांचा सत्कार करण्यात आला आणि नायकाने त्यांना काही काळ अजून इथेच वास्तव्य करण्याची विनंती केली, त्यांनीही ती आनंदाने मान्य केली . त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नायक आणि त्याचे काही शुर विश्वासू सहकारी असे त्या पर्वतावर जाऊन पाहणी करून आले , त्यांना त्या अजस्त्र पशूंचे पायाचे ठसे उमटलेले दिसले त्यावरून त्यांनी त्या पशूंचे वसतीस्थान शोधून काढले आणि आपल्या वसाहतीत परत आले , त्यानंतर कसे व कोठून आक्रमण करायचे याचे नियोजन करण्यात आले आणि, लवकरच नायक आपल्या सहकाऱ्यांसोबत अस्त्रे घेऊन त्या पशूंच्या वस्तीकडे गेला, त्याने सर्व पशूंचा नायनाट केला, त्याशिवाय आसपासच्या परिसरातील अनेक पशू पक्षी देखील त्यांनी संपवून टाकले . इतका भयानक विनाश पाहून मी थक्क झालो, यापूर्वी कधीच असे काही भयानक मी पाहिले नव्हते , मांसाहरी पशू पक्षी शिकार करत असत पण कधीच कोणत्या शिकाऱ्याने आपल्या भक्ष्याचा असा नाश केला नव्हता. हे काहीतरी विचित्र आणि भयंकर घडत होतं . मी या सर्व घटनांचा अहवाल माझ्या निर्मात्याकडे पाठवला आणि सोबत एक विनंती केली की या सर्व सजीवांना रोखणे आवश्यक आहे , पण मला फक्त काही सहभाग न घेता केवळ निरीक्षण करण्याचीच आज्ञा दिली गेली, या पूर्वी मीच या सजीवांना नष्ट होण्यापासून वाचवले असल्याने आधीच निर्माता माझ्यावर काहीसा रुष्ट होता त्यामुळे यावेळी त्याची आज्ञा मोडणे सर्वथा अशक्य होते. पण इथे जे काही घडत होते ते पाहून मी द्विधा मनस्थितीत होतो , आणि मला माझ्या कृतीचा पश्चात्ताप होत होता.

          त्या नायकाने सर्व पशुंचा विनाश केल्यानंतर सर्वजण आपल्या वसाहतीत परतले , झालेली घटना समजताच अस्त्रे निर्माण करणाऱ्या सजीवांना भीती वाटली कारण त्यांनी ही अस्त्रे केवळ स्वसंरक्षणासाठी निर्माण केली होती,त्यांचा असा विनाशक उपयोग होईल ते त्यांच्या मनातही नव्हते . त्यांनी आपल्या वसाहतीत जाण्याची इच्छा व्यक्त केली, पण नायकाने ती साफ धुडकावून लावली आणि त्यांना इथेच बंदी बनवण्याची आज्ञा दिली,त्यांच्याकडे दोन पर्याय ठेवण्यात आले , एक तर अशीच अजून अस्त्रे निर्माण करणे , आणि दोन जर हे मान्य नसेल तर दूर जंगलात जाऊन राहणे जिथे अजूनही अनेक हिंस्त्र पशू आहेत, अर्थातच सर्वांनी पहिला पर्याय निवडला, आणि मग सुरू झाली एक अशी विघातक प्रक्रिया जी थोपवणे कुणालाच शक्य नव्हते. हळूहळू या वसाहतीतील लोकांनी आसपासच्या परिसरातील अनेक सजिवांवर आक्रमण करून त्यांना आपल्या वसाहतीत सामावून घेतले, ज्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यांना नष्ट करण्यात आले . आता फार मोठ्या भूभागावर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. केवळ काही संघटित वसाहती होत्या ज्यांनी हे वर्चस्व अमान्य करून आपले स्वतःचे राज्य प्रस्थापित केले होते, दोन्ही राज्यांत अनेकदा युद्ध होत , त्यात अनेक जीव नष्ट होत असत. हे सर्व पाहून मला खूप वाईट वाटत होते, पण मला केलेली आज्ञा मोडली तर माझाही नाश होणार असल्याने मी काहीच करू शकत नव्हतो. सततच्या युद्ध , लढायांनी एकेकाळी सुंदर असलेला हा ग्रह हळूहळू कुरूप होऊ लागला होता , अनेक दुर्धर आजार सर्वत्र पसरू लागले होते .

          सर्व अनिष्ट प्रकार पाहून मला खूप वाईट वाटत होते, आणि आता मला काहीही शिक्षा मिळाली तरी चालेल पण या ग्रहाचा नाश मी होऊ देणार नव्हतो, म्हणून मी हळूहळू या सजीवांना रोखण्यासाठी पावले उचलू लागलो , सर्वप्रथम मी त्यांची अनेक विनाशकारी शस्त्रे निकामी करण्यास प्रारंभ केला.पण जेव्हढी अस्त्रे मी निकामी करत होतो त्याच्या दुप्पट अस्त्रे हे सजीव तयार करत होते , मग मी काही विषाणू त्यांच्या राज्यांत टाकण्यास सुरुवात केली पण त्यांच्याकडे त्याचेही उपाय त्वरित होऊ लागले .मी देखील आता इरेला पडलो होतो , एका सुंदर ग्रहाचा नाश कोणत्या उपऱ्या प्रजातिकडून मी कदापिही होऊ देणार नव्हतो. मी एक ना अनेक उपाय करू लागलो ज्यामुळे हे सजीव त्रस्त होतील, आणि हे सर्व करताना मी माझ्या निरीक्षणाचे अहवाल तयार करण्याचे विसरून गेलो, आणि एके दिवशी माझ्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश आल्याचे मला दिसून आले, ते सजीव प्रथमच कोणती अस्त्रे निर्माण न करता, ज्या यानातून ते फार पूर्वी प्रवास करीत होते त्यासारखे यान निर्माण करण्यात व्यग्र झाले होते . पण , यावेळी माझेच दुर्दैव समोर आले , गेल्या काही काळापासून निरीक्षणाचे अहवाल न आल्यामुळे माझा निर्माता स्वतः या ग्रहावर आला होता, त्याने एकूण परिस्थिती पाहिली आणि त्याला फार संताप आला, त्याने मला याबद्दल इतकेच सांगितले की , या क्षणापासून माझा इथला निरीक्षक म्हणून कार्यभाग संपला असून आता मला कारागृहात ठेवण्यात येणार आहे , मी निर्मात्या कडे फार विनंती केली की या सजीवांना रोखणे अत्यंत आवश्यक आहे ,तसे न केल्यास या सुंदर ग्रहाचा नाश होईल पण निर्माता माझे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता,त्याने मला बंदिस्त केले आणि माझ्या करागृहाकडे घेऊन गेला, मी सुटण्याचा फार प्रयत्न केला पण निर्मात्याची शक्ती आणि त्याच्या क्रोधापुढे काही करू शकलो नाही.ज्या कारागृहात मला ठेवण्यात आले तेथे केवळ अंधकार होता. जीवनाचा लवलेशही नव्हता, माझ्यासारख्याला , ज्याने प्रदीर्घ काळ जीवन आणि त्याच्या विविध स्वरूपांच्या निरीक्षणात व्यतीत केला होता , त्याच्यासाठी हे कारागृह नसून मृत्यूच होता. 

         काही काळ लोटला, मी अजूनही कारागृहात होतो, माझ्या त्या ग्रहावरच्या प्रयत्नांना यश मिळाले की नाही हे मला काहीच समजले नव्हते . कारागृहात बंदिस्त असूनही माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी काही रक्षक होतेच, त्यांचे कार्य हेच की कारागृहातून कोणालाही सुटून जाऊ द्यायचे नाही, या कारागृहात माझ्याप्रमाणे इतरही काही बंदिवान होते , त्यांचे अपराध काय होते मला काही माहीत नव्हते ना जाणून घेण्याची इच्छा होती . आमच्या निर्मात्याने आम्हाला निर्माण करताना आमच्या पोषणाची एक विशिष्ट व्यवस्था केली होती, इतर सजीवांप्रमाणे आम्हाला कोणत्याही प्रकारे अन्न खाण्याची आवश्यकता नव्हती , तर विशिष्ट प्रकारची उर्जाच ग्रहण करत असू. इथेही कारागृहात आमच्यासाठी अशी ऊर्जा आणणारे एक पथक होते , जरी ती ऊर्जा अत्यल्प प्रमाणात असली तरी आमच्या निर्वाहासाठी पुरेशी होती . काळ आपल्या गतीने पुढे जात होता, मी खूप प्रयत्न करूनही मला त्या ग्रहावर काय घडलं याबद्दल काहीही समजले नव्हते, मी प्रतिदिन ऊर्जा पथकाकडे विनंती करत होतो की काहीही करून फक्त एवढीच माहिती मला द्या ,पण त्यांनाही काही यश येत नव्हते. 

         शेवटी कदाचित माझ्या निर्मात्याला माझी दया आली किंवा सततच्या विनंतीला तो कंटाळला म्हणून , पण मला त्या ग्रहावरील परिस्थिती समजली, ती समजताच मला धक्का बसला, माझ्या प्रयत्नांना यश आले होते, ते विनाशक सजीव तो सुंदर ग्रह सोडून इतरत्र जाण्यास निघाले होते , पण मला झालेला आनंद फार काळ टिकला नाही, कारण मला निर्मात्याने हे देखील सांगितले की ते सजीव दूरवरच्या एका सौर्य मालिकेतील एका ग्रहावर अल्पावधीत पोचणार आहेत, जिथे जीवनासाठी पोषक वातावरण उपलब्ध आहे. मी त्या ग्रहाबद्दल अजून माहिती मिळवली, आणि मला पुन्हा एक धक्का बसला, त्या ग्रहावर पूर्वीपासून काही बुद्धिमान सजीव अस्तित्वात आहेत, आणि तो ग्रह देखील फार सुंदर आहे, तेथील अतिशय बुद्धिमान आणि जवळपास पूर्ण ग्रहावर पसरलेल्या सजीवांच्या एका प्रजातीने त्या ग्रहाचे नामकरण देखील केले आहे, तो ग्रह म्हणजे ,पृथ्वी , आणि तेथील ते बुद्धिमान सजीव आहेत मानव, माझी त्या मानवांना ही विनंती आहे , जर कुणी ही कथा वाचत असाल तर, सावध व्हा , एक अतिशय विनाशक प्रजाती तुमच्या सुंदर ग्रहाकडे अतिशय वेगाने येत आहे, तुमचा ग्रह नष्ट होऊ देऊ नका . 


Rate this content
Log in

More marathi story from Avdhoot Bhatwadekar

Similar marathi story from Fantasy