Jyoti gosavi

Comedy

3  

Jyoti gosavi

Comedy

निर्जळी नाही थोडासा फराळ

निर्जळी नाही थोडासा फराळ

3 mins
206


 एकादशी नाही थोडासा फराळ


अगं सुनबाई, उठ आता, उजाडलं बर! 


आज आषाढी एकादशी आहे ना! मग पांडुरंगाला जायचं आहे . भजनाला जायचं आहे ,शिवाय थोड नामस्मरण पण करावं म्हणते आणि फराळ करायचा आहे .


 अग !खरंतर मी निर्जळीच करणार होते .पण या वयात आता झेपते का ?

मग म्हटलं बरीक थोडासा फराळच करूया, 

तसं काही फारसं करायच नाही . 

असं कसं? उपवास तर वाटला पाहिजे ना !


बघ सकाळच्या नाश्त्याला उपासाचे डोसे करूया ,वरीचे तांदूळ आणि साबुदाणा मी रात्री भिजत घातलाय. काही नाही मस्त मिक्सरला काढायचं आणि आपल्या डोसा सारखे डोसे करायचे. 

बर मिसळ पण असू दे हो जोडीला! 


आहो आई उपासाला मिसळ ?


अगं उपवासाचीच मिसळ असते. 

म्हणजे कस! कोणाला डोसा आवडला नाही, कमी-जास्त पडला, तर आपली मिसळ असावी ना जोडीला !

अहो पण मी नाही कधी केली ,मला नाही माहित. 


अग मी तुला सांगते ना !त्याच काय आहे! 

खिचडी कर साबुदाण्याची, तिला आमच्या गावाकडे शाबूचे तांदूळ म्हणतात ,तर विदर्भामध्ये उसळ म्हणतात. 

तर अशा उसळीची आपण आता मिसळ पण करायची. 


खिचडी करून त्याच्यामध्ये उपवासाचा चिवडा टाकायचा. तिखट गोड दोन्ही बरं का! थोडे शेंगदाणे भाजून टाकायचे, आणि थोडीशी दाण्याची आमटी पण टाकायची बरं! 

मस्त गरमागरम भारी होते मिसळ. 


"नशीब अजून कोणी उपवासाचे पाव नाही शोधून काढले "सुनबाई हळूच बडबडल्या .


काय म्हणालीस ग ?


अहो काही नाही. बर मग दुपारी काय करायच? 


उपवासाची भाजणी असते ना ! त्याची भाकरी करूया. सोबतीला कोचवलेली काकडी किंवा खमंग काकडी आणि गुलाबजाम. 


अहो आई आता गुलाबजाम? 


अग ते खव्यापासून तर बनवलेले असतात . 

तूप आणि खवा दुसरं काही नसतं ,चालतात बर उपवासाला .

शिवाय जोडीला बटाट्याची भाजी आणि थोड्या साबुदाण्याच्या पापड्या, शिवाय उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, भाजलेली रताळी ,रताळ्याचा कीस, उगाच आपलं थोडं थोडं बरं! 


मग संध्याकाळी काय करू? 

एक वेळ तरी आपण उपास केला पाहिजे ना? 


हो ग बाई उपवास तर केलाच पाहिजे .

पण असं कडकडीत उपवास करायचा नसतो ना! 

आता डॉक्टर म्हणाले सार्sss खायचं प्यायचं.

डॉक्टर म्हणाले भाव तेथे देव .

शिवाय आपल्या शास्त्रात लिहिलेच आहे ना! "शरीर रक्षतो धर्म "

म्हणजे आपल्या शरीराचे रक्षण होईल तोच धर्म. शरीर आहे तर सगळ आहे. 


 तर संध्याकाळी असं करूया, थोड हलकंफुलकच घेऊया .

म्हणजे असं कर वरीच्या तांदुळाचा भात कर .सोबत दाण्याची आमटी आणि बासुंदी पण कर .


आता बासुंदी? 


हो दूध म्हणजे पूर्णांन्न त्याच्यामुळे बासुंदी काय आणि दूध काय एकच ना? सकाळच्या गुलाबजामचा खवा उरेलच ना! 

शिवाय कालच मी तीन लिटर दूध आणून ठेवलंय. बासुंदी करूया ,

खोबऱ्याच्या वड्या आहेतच, शिवाय शिंगाड्याच्या पिठाचे लाडू, साबुदाण्याचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, राजगिऱ्याची चिक्की , नाहीच कोणाला वरीचा भात आवडला, तर थोडी थालपीठ पण लावून ठेवूया. 


काय म्हणताय? थालीपीठ?


 अग भाजणीचं नाही ग, आपल उपवासाच. 


बरं ते कसं असतं ?मी नाही कधी केलं. 

अग काय ?त्यात सोपं तर आहे. 

आपलं खिचडीच सगळं सामान घ्यायचं, साबुदाणा दाण्याचं कूट, आणि बटाटे किसून घ्यायचे ,दोन-तीन चमचे त्याच्यामध्ये साखर घाला, तिखट घाला ,आणि मस्त मळून लावा ना तव्यावर थालीपीठ .

अशी झक्कास होतात ना मग !


आई अजून काही शिल्लक आहे का? 

नाही तसं जास्त काही नाही एक दोन चार शहाळी मागून ठेव ,आणि चार वाजता खायला फळ कापून ठेव, आंबा कलिंगड सफरचंद सगळी थोडी थोडी आहेत. 

सगळ्यांची फ्रुट प्लेट, 

फळ म्हणजे हलकंच ना? 

तसं काही जास्त नाही खात गं !

केळी पण आणून ठेवलीत दोन डझन .

बघ पुरतील ना ?


आणि हो उद्या उपास सोडायला "आमरस पुरीचा" बेत करूया अजून बाजारात आंबे घेत आहेत सोबत कुरडया पापड चटणी कोशिंबीर बटाट्याची भाजी आणि भाजीमध्ये वाघाट घालायला विसरू नको बरं ते म्हणे सहा महिने पोटामध्ये विठ्ठल विठ्ठल बोलत


 अहो आई घरात आपण इन मिन पाच माणसं. 

तुम्ही दोघं आम्ही दोघं आणि माझा सौरभ तो पण आठ वर्षाचा इतकं सगळं कशाला लागतय? 


नाही ग, कोणी आले गेले तर कमी पडता कामा नये. आणि आपल्या पण अंगावर दिसलं पाहिजे ना? लोकांनी म्हटलं पाहिजे खात्यापित्या घरच्या बायका आहेत. 


एवढ ऐकल्यावर सुनबाईंनी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला, आणि तयारीला लागल्या. 


याच्यापेक्षा रोजचा स्वयंपाक परवडला असं मनातल्या मनातच बडबडू लागल्या.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy