Dr. Gaurangi Gujar- Mehta

Abstract Inspirational Others

4.0  

Dr. Gaurangi Gujar- Mehta

Abstract Inspirational Others

नवदुर्गा

नवदुर्गा

2 mins
155


सकाळी लता आली ती तोंड फुगवून. "काय ग लता? रात्री परत नवर्‍याशी भांडलीस वाटतं?" मी नेहमी प्रमाणेच विचारलं. "नाय ओ ताई, काल भांडले नाई! काल मारामारीच केली म्ह्या!" ती रागारागाने बोलली. "मारामारी?" मी डोळे फाडून तिच्याकडे बघू लागले. "व्हय, रोज रोज धमकी देतूया. तुझं थोबाड फोडीन म्हणून सान. मग काल म्ह्या बी म्हणलं दाखीव बघू फोडून... हात तर लाऊन दाखीव...म्हाजं हात काय केळी खायला गेलंत व्हय. तर आला की खरंच अंगावं धावून. मग मी बी लाटणं घेतलं हातात." हे सांगताना लता च्या चेहर्‍यावर मला चंडिकाच दिसली. कोपरापासून हात जोडले मी तिला. "बरं केलंस. परत तुझ्या वाटेला जायचा नाही आता. तू काम आटप, मी निघते आता." म्हणत मी ऑफिस ला जायला निघाले. 

ऑफिस ला पोचले आणि लॅपटॉप ऑन केला. तेवढ्यात माझ्या शेजारच्या cubicle मध्ये बसणारी सानिका आलीच. "Good morning" म्हणत मी तिच्याकडे बघीतले तर 7 महिन्याच्या पोटाचा घेर सावरत हाश-हुश्श करत ती तिच्या खुर्चीवर बसताना जरा कासावीस वाटली. "काय गं? असा का रंग उडालाय? त्रास होतोय का काही?" मी काळजीनं विचारलं. "नाही मॅडम तसा त्रास नाही हो. पण सकाळचा चहा नाश्ता, दोघांचे डब्बे, घरची कामं उरकून ऑफिस ला पोहोचेपर्यंत दमायला होतं हल्ली". "अगं मग तू आत्तापासून marernity leave वर का नाही जात?" माझं आपलं सजेशन मी पटकन देऊन टाकलं. "आत्तापासून leave वर गेले तर 3 महिने पगार कापतील ना मॅडम. त्यात अजून delivery चा खर्च आहे. आता या बाळासाठी तेवढं financial planning करायला हवं ना!" म्हणत ती हलकेच हसली. तिच्याकडे आ वासून पाहत असताना तिच्या चेहर्‍यावर मला लक्ष्मीचा आभास झाला. "काळजी घे," एवढंच मी बोलले आणि कामाला लागले. 

संध्याकाळी घरी निघाले तर बस मध्ये एक कॉलेज च्या पोरांचा घोळका टिंगल टवाळक्या करत होता. पुढच्या स्टॉप वर बस थांबली अन 2 तरुण मुली आत चढल्या. त्यांना बघितल्यावर त्या कॉलेज च्या पोरांना तर काय ऊत आला. जोरजोरात शिट्ट्या, गाणी असला सगळा प्रकार चालू झाला. माझ्या पुढच्या सीट वर एक मध्यम वयिन बाई बसल्या होत्या. साधारण 5-7 मिनिटे त्यांनी पण हा चाललेला पांचटपणा बघीतला. मग काहीसा निश्चय करून त्या उठल्या त्या सँडल हातात घेऊनच! त्या कॉलेज पोरांच्या टोळीच्या म्होरक्या ला त्यांनी फक्त ती सँडल दाखवली लांबूनच. पोरगं काय समजायचं ते समजला. इतर पोरांनाही त्याने गप्प रहायची खुण केली आणि पुढच्याच स्टॉप वर बस मधून उतरून जी धूम ठोकली. त्यांच्याकडे हासत हासत बघत असताना त्या बाईंच्या चेहर्‍यावर मला दुर्गाच दिसली! 

रात्री सगळ आवरून मी झोपायला गेले. आरशासमोर उभी राहून स्वतः कडे रोखून बघत राहिले. शोधत होते माझ्यात मी मला. आणि त्या क्षणी त्या दिवशी भेटलेल्या तिन्ही महान बायकांचे चेहरे मला माझ्यात स्पष्ट दिसले. आरशातील मी मलाच बोलले... शोधतेस कुठे तू नव दुर्गा? ती तर इथेच आहे...तुझ्या आत. 

अश्या अनेक अनेक रुपात भेटणार्या नारी शक्तिला सलाम आणि जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


Rate this content
Log in