Manasi Deshingkar

Others

3.8  

Manasi Deshingkar

Others

पैसा की नाती?

पैसा की नाती?

3 mins
299


प्रतीक आणि प्राजक्ताचे लग्न होऊन तीन वर्ष झाली होती. ते दोघ नोकरी निमित्त शहरात भाड्याचे घर घेऊन राहत होते. गावाकडे सासू- सासरे, दिर- जाऊ असा परिवार होता. सणवार, समारंभ हे सगळेजण एकत्र मिळून गावच्या घरात आनंदाने साजरे करत होते. प्रतिकचे बाबा नोकरीमधून निवृत्त झाले होते. त्यांची थोडीफार शेती होती त्यामध्ये ते लक्ष देत होते. प्रतिकचा लहान भाऊ फार काही शिकला नव्हता त्यामुळे गावातच असलेल्या एका कंपनीमध्ये काम करत होता. प्रतिक आणि प्राजक्ताला घरची सगळी परिस्थिती माहीत होती म्हणून ते दोघं न चुकता आपल्या घरच्यांसाठी दर महिन्याला थोडेफार घरी पैसे पाठवत होते. गावी जाताना काही हवं नको ते स्वतः घेऊन जात असत.


काही महिन्यांनी या दोघांनी आपल्या भविष्याचा विचार करून शहरात स्वतःच घर घेण्याचा निर्णय घेतला. मध्यमवर्गीय माणसांसाठी शहरी भागात घर घेणं खूप अवघड असतं तसचं त्यानांही ते अवघड वाटत होतं. पण खूप विचार करून आपल्या होणाऱ्या मुलाच्या भविष्यासाठी म्हणून त्यांनी खटपट करुन, अधिकचे तास काम करून, बँकेमधून लोन घेऊन एक छान घर घेतलं. घर घेताना आई बाबांची परवानगी घ्यायला ते विसरले नाहीत. नवीन घर घेतल्यानंतर प्राजक्ताने वास्तुशांतीसाठी गावाकडून सगळ्यांना बोलवून घेतले. छान पूजा पार पडली. सगळे खूष होते.


प्रतीक त्याच आर्थिक गणित सांभाळत होता. लोनचे हप्ते, महिन्याचा खर्च, गावी द्यायचे पैसे या सगळ्यात त्याची थोडी तारांबळ उडत होती पण तो ते सगळं प्राजक्ताच्या मदतीने सांभाळत होता. काही महिन्यांनी प्रतिकच्या लहान भावाची काही कारणांमुळे नोकरी गेली. तो आता फक्त घरी बसून होता. नवीन नोकरीसाठी काही मेहनत घेत नव्हता. सारखे आई बाबांकडे किंवा प्रतिककडे पैसे मागत होता. प्रतीकसुध्दा सुरुवातीला तो मागेल तसे पैसे द्यायचा. पण त्याच प्रमाण वाढत चालले होते आता प्रतिकचं आर्थिक गणित खूप बिघडत चालले होते.


जेव्हा अगदी अशक्य झाले तेव्हा त्याने भावाला पैसे देणं बंद केलं आता फक्त तो आधी द्यायचा तेवढेच पैसे पाठवत होता. खरं तर प्रतीकला वाईट वाटत होते तो आता जास्तीचे पैसे भावाला देत नव्हता म्हणून पण प्रतिक हतबल झाला होता. आणि तो असेच पैसे देत गेला तर त्याच्या भावाला जबाबदारीची जाणीव होणार नाही हे प्रतिकने ओळखलं होतं म्हणून त्याने पैसे देणं बंद केलं. पण आता त्याचा उलटा परिणाम होत होता. प्रतीकचा भाऊ आणि वहिनी हे दोघे घरात भांडणं करू लागले. प्रतीक आणि प्राजक्ताशी वाटेल तसे वागू लागले. त्यांच्या अशा वागण्यामुळे घरातलं वातावरण बिघडलं होतं. नात्यांमध्ये दुरावा यायला लागला होता.


प्रतीकला आपण घर घेऊन चुक केली का अशी शंका येऊ लागली. तो स्वतःलाच दोष देऊ लागला. प्राजक्ताला त्याची तशी अवस्था बघवत नव्हती. ती त्याची समजुत काढण्याचा प्रयत्न करत होती. पण इकडे भाऊ आणि वहिनी मात्र काही चांगलं वागण्याचं नाव घेत नव्हते. शेवटी प्राजक्ताने एक निर्णय घेतला. काही दिवसांसाठी प्रतीकच्या भावाला आणि वहिनीला ते समजावून त्यांच्या नवीन घरी घेऊन आले. प्रतिकसाठी शहरात नोकरी मिळते का यासाठी प्रयत्न करू लागले. एवढे दिवसात त्याचा भाऊ आणि वहिनी रोज बघायचे प्रतिक, प्राजक्ता किती काम करतात, किती कष्ट करतात, किती काटकसर करतात हे सगळं त्या दोघांना कधी माहीत नव्हतं. फक्त प्रतिक पैसे पाठवतो म्हणजे याच्याकडे खूप पैसे आहेत असा त्यांचा समज झालेला होता, त्यामागचे कष्ट यांनी आता आपल्या डोळ्यांनी बघितले होते.


काही दिवसांनी प्रतीकच्या भावाला त्यांच्या गावामध्ये एक चांगली नोकरी मिळाली. हळू हळू प्रतीकचा भाऊ सगळ्यांशी चांगलं वागायला लागला. भांडणं, वाद कमी होऊ लागले. प्रतिक आणि प्राजक्ताही या सगळ्या मधून सावरले होते. त्यांनी भावाला आणि वहिनीला माफ केले. आपली दोघं मुलं एकमेकांशी चांगली वागत आहेत ते बघून आई बाबांना बरे वाटत होते. पण हे सगळं जरी खरं असलं तरी नात्यांमध्ये पैशांमुळे आलेला दुरावा कोणीच विसरू शकणार नव्हते. नात्यांच्या धाग्यांमध्ये एक छोटी गाठ निर्माण झाली होती.


प्रतीकच्या नात्यांमध्ये पैशांमुळे आलेला हा दुरावा काही काळाने कमी झाला होता. पण सगळ्यांच तसं होईलच असे नाही ना? आजकाल कितीतरी कुटुंब पैशांच्या वादामुळे तुटलेली आपल्याला पहायला मिळतात. पैसा महत्वाचा असतोच, तसचं स्वतःचा विचार करणं यातही काही गैर नाही, पैशांच सोंग नाही करता येत हे सगळं जरी खरं असलं तरी आपली नातीही तितकीच महत्वाची आहेत. पैसा आणि नाती यांची तुलना नाहीच होऊ शकत तरीसुद्धा जर करायची झाली तर नात्यांचं पारडं नेहमीच जड असेल यात शंका नाही.


Rate this content
Log in