Ashvini Kapale Goley

Drama Inspirational

3  

Ashvini Kapale Goley

Drama Inspirational

पोरगी शिकली अन् प्रगती झाली

पोरगी शिकली अन् प्रगती झाली

5 mins
928


दिग्या म्हणजेच दिगंबर आपल्या बायको मुलांसोबत शेताजवळच एका झोपडीत राहायचा. वडिलोपार्जित शेतीचा एक तुकडा, त्यात राब राब राबून कुटुंबाचं पोट भरायचा. त्यात कधी निसर्गाने दगा दिला की खाण्यापिण्याचे फार हाल व्हायचे. दिग्याची बायको त्याला शेतीच्या कामात मदत करायची आणि वेळ आली तर दुसर्‍यांच्या शेतातसुद्धा दोघे कामाला जायचे. दिग्याने मोठा लेक बाळूला गावातल्या शाळेत घातले पण धाकट्या चिंगीला मात्र शाळेत जायची, शिकायची इच्छा असूनसुद्धा दिग्या शाळेत घालत नव्हता. ती म्हणायची, "बाबा, म्या बी जाऊ काय दादा संग शाळेला. मले बी जायचं, शिकायचं..जाऊ का वो बाबा.."


दिग्या मात्र मुलीच्या शिक्षणाच्या विरोधात. तो चिंगीला म्हणाला, "पोरीच्या जातीले कशाले पायजे व पोट्टे शाळा बिळा, गावात हिंडत बसशीन अन् इथं आमच्या जीवाले घोर... गपगुमान इथं तुया आईले कामं करू लाग.. चाल्ली मोठी शाळेला.."


चिंगीला मात्र शाळेचं फार आकर्षण होतं. आईसोबत नदीवर धुणे धुवायला जाता येता वाटेत ती शाळेकडे बघायची. तिथल्या तिच्या वयाच्या मुलींना‌ खेळत बागडताना‌ बघून मनोमन आनंदी व्हायची. भावाचे पुस्तकं मोठ्या कुतूहलाने बघत बसायची. बाबा घरी नाही हे बघून एकदा ती बाळू दादाला म्हणाली, "दादा, आइक ना रं.. तुया शाळेत काय शिकवते... पुस्तकात काय हाय रं हे.. मले बी शिकीव ना.."


बाळूला वाटलं बरं आहे, चिंगीला जरा सांगितलं की हिच्याकडून गृहपाठ करून घेता येईल आणि तितका वेळ आपल्याला खेळायला, भटकायला मिळेल. तो सगळा विचार करून म्हणाला, "चिंगे, सांगतो‌ तुले काय हाय पुस्तकात ते ‌पण शप्पथ घाल, आय-बाबाले नकू सांगू.. म्या सांगीन तितकं करायचं. आय बाबा घरी असताना‌ हात नकू लावू माह्या पुस्तकाले.."


चिंगी मोठ्या आनंदाने म्हणाली, "दिली शप्पथ.. सांग आता.."


बाळू होता दुसरीला, त्याने तिला थोडं फार कशाला काय म्हणता ते सांगितलं आणि म्हणाला, "आता हे समधं लिवायचं हाय.. इतकं लिऊन दे मले.."


चिंगी अगदी आनंदाने पुस्तकात बघून जसेच्या तसे लिहायचा प्रयत्न करू लागली. 


दादाने सांगितलेलं सगळं अगदी मन लावून ऐकायची ती. हा कार्यक्रम आता दररोजचा झालेला. यामुळे चिंगीला घरी बसून जरा मुळाक्षरे, बाराखडी, आकडे यांची ओळख झाली. वर्षभरात लहानसहान शब्द लिहिता वाचता यायला लागले. चिंगी गृहपाठ करून द्यायची त्यामुळे बाळूला बरंच होतं. 


या वर्षी निसर्गाने दगा दिला.‌ इतकी मेहनत घेतली पण अख्खं पीक हातून गेलं. पण दिग्या हिंमत हरला नाही. सावकाराकडून जरा कर्ज काढून परत पीक घ्यायचं त्याने‌ ठरवलं. सावकाराकडे त्यासाठी बोलणी करायला तो‌ गेला. सावकाराविषयी गावात लोकांचं मत काही फार चांगलं नव्हतं पण "अडला हरी अन् गाढवाचे पाय धरी" अशी परिस्थिती झाली. पैसा तर पाहिजे होताच. 


सावकाराने जरा भाव‌ खाल्ला पण शेवटी तो तयार झाला आणि म्हणाला, "स्टॅम्प पेपर घेऊन येतो रे दिग्या तुया घरी.. अंगठा घ्यायले. माया पैसा बुडवायचा लेका तू म्हणून लिहून घेतो तसं पेपरवर.." 


दिग्याला काही लिहिता वाचता येत नव्हते. सावकार म्हणतोय तर अंगठा देऊ, असा विचार करून तो म्हणाला, "चालते पाटील. या तुमी.. देईन म्या अंगठा पण इश्वास ठेवा, पैसा नाय बुडवणार.. पीक आलं का देतो वापस.."


दिग्या घरी आला आणि बायको रमाला म्हणाला, "रमे, आवं ते सावकार देतू म्हणले पैशे.. पुढचं पीक तरी घेता इन आता... पीक निघालं का देऊ वापस त्यायले.. दुसरं काम भेटते का पायजो सोबतीले.."


रमा भाकरी करतच म्हणाली, "पाटलांच्या शेतावर तण काढायचं हाय म्हणे. दोन‌ तीन‌ दीस म्या जाइन तिथं.."


दोघांचं बोलणं बाळू आणि चिंगी ऐकत होती. चटणी-भाकर खाऊन चौघेही झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता, रमा अंगणात भांडी घासत होती, चिंगी घर झाडून काढत होती. बाळू शाळेत गेलेला आणि दिग्या शेताकडे बघत काही तरी विचार करत होता. तितक्यात सावकार घरी आला आणि दिग्या हाक मारत म्हणाला, "दिग्या कसला इचार करतोय रे.. हे घे या पेपरावर अंगठा मार अन् हे हजार रुपये ठीव आता.. बाकीचे लागले तशे घेऊन जाजो.."


सावकाराला बघताच दिग्या म्हणाला, "या पाटील या.. चिंगे, जाय ती बाज टाक आंगणात.. अन् पाणी आण पाटलाले.. रमे चहा टाक वं जरा.."


रमा हात धुवून चहा करायला घरात गेली. चिंगीने अंगणातली बाज म्हणजेच खाट टाकली आणि पाणी घेऊन आली. पाणी दिल्यावर तिथेच पेपरकडे बघत घुटमळत राहिली. दिग्या हळूच सावकाराजवळ येऊन बसला. जरा शेताच्या गप्पा मारल्यावर सावकाराने ते पेपर दिग्याला दिले आणि म्हणाला, "दिग्या, इथं अंगठा लाव रे.. ह्यात लिहिलं आहे तू किती पैशे घेतले अन् कधी वापस करणार ते.."


दिग्याने पेपर हाती घेतले अन् तितक्यात रमा चहा घेऊन आली. दिग्या आणि सावकार चहा घेत असताना चिंगीने ते पेपर हळूच हातात घेतले आणि अडखळत वाचायला‌ लागली, 

" मी दिगंबर, मान्य करतो की मी सावकाराकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी असमर्थ ठरलो आहे आणि माझी सगळी शेती आता मी सावकारांच्या नावी करत आहे."


ते ऐकताच सावकाराला ठसकाच लागला. या चिंगीने चांगली फजिती केली हे लक्षात येताच सावकार म्हणाला, "ये पोरी, काय वाचते हे.. वाचता तरी येतं का तुले.."


दिग्याला तर सगळं ऐकून डबल धक्काच बसला. चिंगी तर शाळेत जात नाही मग हिला वाचता कसं आलं याचं आश्चर्य तर सावकार असा आपल्या अशिक्षितपणाचा फायदा घेत सगळी जमीन लुबाडायला निघाला याचा धक्का. 


दिग्या चिंगीला म्हणाला, "चिंगे, तुले‌ वाचता कसं काय येते.? अन् हे जे लिहिलं आहे हे खरं हाय का?"


चिंगी म्हणाली, "बा, दादानं शिकवलं मले लिहा वाचाले. म्या जे लिहिलं हाय तेच वाचलं.."


दिग्याला आता चिंगीवर चिडावं की तिचं कौतुक करावं कळत नव्हतं. तो म्हणाला, “सावकार, तुमी असं कसं केलं. माह्या परिस्थितीचा फायदा‌ घेत माही जमीन लुबाडायले निघाले तुमी... माह्या चिंगीनं वाचलं नसतं तर ह्या अंगठा दिला असता अन् तुमी माही सारी जमीन..."


दिग्या रागाने लालबुंद झाला. त्याचा अवतार बघून सावकाराने चिंगीच्या हातातले पेपर ओढले आणि तो पळून गेला. 


रमा आणि दिग्या दोघंही पाणावलेल्या डोळ्यांनी चिंगीकडे बघत होते. तिला‌ दिग्याने जवळ घेतले आणि त्याच्या अश्रुंचा बांध फुटला. तो‌ म्हणाला, "चिंगे, तुयामुळं आपली जमीन वाचली‌ पोरी. तुले म्या शिकू नको म्हंटलं, शाळेत नाय जाऊ दिलं पण तुवा घरीच शिकायला सुरु केलं. आमची पोर लिहा-वाचाले शिकली अन् आम्हाले‌ कळलं बी नाय. पोरी तुले म्या शिकायले विरोध केला अन् तुयामुळं आपलं शेत, आपलं सारं काही वाचलं पोरी.. कसं माफी मागू म्या तुही.. मले माफ कर पोरी.. उद्याच्याले शाळेत जाऊ आपण अन् तुले‌ शाळेत घालू.. लय शिकून मोठी व्हय पोरी.. मले माफ कर.."


बाबा उद्या शाळेत घालतो म्हणताच चिंगी आनंदाने नाचायला लागली. 


रमा आणि दिग्या पाणावलेल्या डोळ्यांनी लेकीला बघत होते. 


ते म्हणतात ना, "पोरगी शिकली अन् प्रगती झाली..." तसंच झालं हे. चिंगीच्या शिक्षणाच्या जिद्दीमुळे, ती स्वतःहून लिहा वाचायला‌ शिकल्यामुळे आज दिग्या फसवणूक होण्यापासून वाचला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama