Prakash Patil

Horror Others

4.4  

Prakash Patil

Horror Others

साकव

साकव

12 mins
559


सकाळी अकरा वाजता डोअरबेल वाजली. प्रसादने दरवाजा उघडला तर समोर दोन पोलिस उभे होते. त्याने प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे पाहिले.

"साहेब, तुम्हाला चौकीवर बोलावलंय..." दोघांपैकी एक पोलिस म्हणाला.

"का?"

"माहित नाही साहेब. पण पी.आय.साहेबांनी बोलावलंय. थोडी चौकशी आहे."

"ठीक आहे. आत या मी तयार होतोय." म्हणत प्रसादने त्यांना आत घेतलं. त्याचे वडील प्राध्यापक किशोर त्याच्या मागेच उभे होते. 

"मी पण येतोय" ते म्हणाले.

थोड्याच वेळात ते दोघेही निघाले. पोलिस मोटारसायकलवर आले होते. प्रसाद आणि त्याचे वडीलही मोटारसायकलवर त्यांच्या बरोबर निघाले. ते पोलीस चौकीवर पोहोचले तेव्हा पोलीस निरीक्षक शिंदे त्यांचीच वाट पाहत केबिनमध्ये बसले होते.

"या या बसा" म्हणत त्यांनी दोघांना समोर बसायला सांगितले.

"तुम्हाला माहित असेल, सारिका तीन दिवसांपासून बेपत्ता होती." ते असे म्हणत असतानाच केबिनचा दरवाजा उघडून सारिकाचे वडील आत आले. त्यांचा चेहरा अतिशय दुःखी दिसत होता. डोळे रडून लाल लाल झाल्यासारखे दिसत होते.  

"या बसा दीपकराव..." शिंदेंसाहेबांनी त्यांनाही बसण्याची खूण केली.

"पण हे कसे शक्य आहे...? सारिका तर काल मला भेटली होती. साकवापासून तिच्या घरापर्यंत आम्ही चालत आलो. माझ्या डोळ्यांनी मी तिला तिच्या घरात शिरताना पाहिलं." प्रसाद म्हणाला.

सारिकाच्या वडिलांना हुंदका अनावर झाला. "प्रसाद, गेले तीन दिवस ती बेपत्ता आहे. तुम्हाला कशी भेटणार ती आणि ती काल घरी आली असती तर आज मी इथे का आलो असतो?"

प्रसाद गोंधळला. "मी खरं सांगतोय काका... ती मला रात्री भेटली होती."

"प्रसाद, तुम्हाला भास झाला असावा." शिंदेसाहेब म्हणाले. 

"नाही, भास नाही. मी खरोखर भेटलो काल रात्री तिला!"

"तुम्हाला अशासाठी बोलावले, की तिने तिच्या मोबाईल मधून शेवटचा कॉल तुम्हाला केला होता. तुमच्याशी काही बोलणे झाले असेल तर काही क्लु मिळू शकेल."

"हो, बरोबर तीन दिवसांपूर्वी आमचे बोलणे झाले होते. ती म्हणत होती विक्रमला भेटायला जायचे आहे म्हणून. पण त्यानंतर तिचा फोन नॉट रिचेबल झाला. त्यानंतर काल रात्री येताना मला साकवाजवळ भेटली."

"प्रसाद सविस्तर सांगा काय घडले ते!" शिंदेसाहेब म्हणाले. 

प्रसादने सांगायला सुरुवात केली.


"शिंदे साहेब, इथून ऐशी किलोमीटर दूर असलेल्या एम.आय.डी.सी.त एका कंपनीत मी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करतोय. रोज इतके अंतर अप-डाऊन करणे शक्य नसल्याने मी कंपनीच्या क्वार्टर मध्येच राहतो. आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा घरी येतो. कालच मी दोन आठवड्यानंतर घरी आलो. तुम्हाला माहित आहे, खासदार प्रभाकर मोहिते पाटील यांच्या मेव्हण्याच्या विरुद्ध माझे वडील आमदारकीला उभे होते. अतिशय सरळमार्गी, प्रामाणिक आणि अभ्यासू उमेदवार म्हणून सुरुवातीला वडिलांना लोकांचा खूप पाठिंबा मिळाला. पण खासदारांनी आपले वजन खर्ची घालून लोकांना दमदाटी करून वडिलांच्या प्रचाराला फिरू दिले नाही. अमाप पैसा खर्चून त्यांनी लोकांना त्यांच्या मेव्हण्याच्या बाजूला वळवले. शिवाय सोशल मीडियावर एक फौज तैनात करून वडिलांची बदनामी सुरू केली. त्यामुळे साहजिकच वडील आमदारकीच्या निवडणुकीत पडले. तेव्हापासून आमच्या वाडीवर जाणारा रस्ता त्यांनी बनू दिला नाही. शिवाय साकवाच्या ठिकाणी प्रस्तावित पूल होऊ दिला नाही. तर सांगण्याचे तात्पर्य, आम्हाला त्यामुळे मुख्य रस्त्यापासून दोन किलोमीटर चालत यावे-जावे लागते. त्या रात्री मी आठच्या सुमारास मुख्य थांब्यावर कॅबने पोहोचलो. पुढे कच्चा रस्ता होता. मी बॅकपॅक मागे लटकावून चालत निघालो. रस्त्याच्या मध्यावर नदी लागते. ती ओलांडण्यासाठी लाकडाचा साकव आहे. तो अध्येमध्ये तुटलेला असल्याकारणाने खूप जपून चालावे लागते. अंधार हळूहळू दाट होत चालला होता. त्या सूनसान रस्त्यावर आपल्याच पावलांचा आवाज देखील भयप्रद वाटत होता. मी साकवापर्यंत पोहचलो. साकवावरून चालत असताना मला मागे कुणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला. मी एकदा मागे वळून पाहिलं. मागे कुणीही नव्हतं. मी पुन्हा चालू लागलो... आणि माझ्या पाठून कुणीतरी लाकडांचा धपधप आवाज करत धावतधावत माझ्याजवळ पोहोचलं. माझी बोबडीच वळली. मी घाबरून थरथरत मागे पाहिलं. मागे सरिता होती. ती जोरजोरात हसू लागली. 

"माझा जीव घेतला असता तू!" माझा श्वास जोरजोरात वर खाली होत होता.

"कसं घाबरवलं एका माणसाला!" म्हणत ती पुन्हा हसू लागली.

"अगं पण तू इतक्या रात्री इथे काय करतेस?"

"अरे मी विक्रमला भेटायला गेली होती. तुला सांगितले होते ना!"

"हो, पण ते तू दोन दिवसांपूर्वी जाणार होतीस ना?"

"अरे माझी दिवसांची, काळाची गती थांबलीय." ती म्हणाली. मला काही कळले नाही. तोच माझे लक्ष तिच्या कानांकडे गेले.

"हे काय दुसऱ्या कानातील डूल कुठे आहे? की एकाच कानात घालायची फॅशन आलीय?"

तिने दोन्ही कानांना हात लावले. 

"मला वाटते, विक्रमच्या केबिनमध्ये पडले असावे." ती काहीसे आठवत म्हणाली.

"आणि तुझा मोबाईल कुठे आहे? दोन दिवसांपासून किती कॉल केले. तुझा मोबाईल आऊट ऑफ नेटवर्क येतोय."

"तो नदीत पडला. साकवाखाली!" ती म्हणाली. मीही साकवाखालीच विसावा घेतेय..." ती म्हणाली. मला काहीच अर्थबोध झाला नाही.

"म्हणजे?" मी विचारले.

"शोध! म्हणजे कळेल..." असे म्हणत ती धावतधावत माझ्यापुढे निघाली. तिचे घर साकवाच्या पुढे अर्ध्या किलोमीटर अंतरावर होते. मीही तिच्या मागेमागे धावत सुटलो. पण तिच्या अंगात काय संचारले होते कुणास ठाऊक! ती माझ्या हाताला लागत नव्हती. तिचे घर जवळ आले तेव्हा तिला मी तिच्या घरात शिरताना पाहिले.


प्रसादची स्टोरी ऐकून सारे अवाक झाले. शिंदेसाहेब प्रसादच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत होते. 

"हे कसे शक्य आहे? ती तुम्हाला भेटणे निव्वळ अशक्यच आहे." शिंदेसाहेब ठामपणे म्हणाले. ते पुढे म्हणाले, "प्रसाद, सारिका गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होती. ती एडमिशनसाठी विक्रमला भेटायला जाते असे सांगून गेली होती. पण ती घरी परतलीच नाही. त्या रात्री सर्वानी खूप शोधाशोध केली. दिपकराव कॉलेजवर जाऊन आले. पण तिथे वॉचमेन शिवाय कुणीही नव्हते. दुसऱ्या दिवशी ते विक्रांतलाही भेटले पण तो म्हणाला की ती कॉलेजमध्ये आलीच नव्हती. दीपकरावांनी तक्रार नोंदवल्यावर आम्हीही विक्रांतला चौकशीसाठी बोलावले होते. पण तो शेवटपर्यंत आपल्या म्हणण्यावर ठाम होता की ती त्या संध्याकाळी कॉलेजला आलीच नव्हती. उलट तो स्वतः:ही तिच्या बेपत्ता होण्याने दुःखी कष्टी झालेला दिसत होता."

"शक्यता आहे ती तीन दिवस कुठे तरी गेली असेल...आणि काल परतताना मला भेटली असेल." प्रसाद मध्येच म्हणाला.  

"ती तुम्हाला काल भेटणे अशक्य आहे." बोलता बोलता शिंदेसाहेब काही क्षण थांबून म्हणाले, "कारण... तीन दिवसांपूर्वीच तिची हत्या झाली आहे!" 

"काय?" प्रसाद अविश्वासाने किंचाळला. "सारिकाची हत्या झालीय? हे हे अशक्य आहे!" प्रसादला फार मोठा धक्का बसला होता. तो अविश्वासाने शिंदेंसाहेबांकडे पाहत राहिला. सारिकाच्या मृत्यूचं असह्य दुःख आणि विक्रांतबद्दल तीव्र संताप अशा भावना एकाच वेळी त्याच्या मनात दाटल्या. अजून काहीतरी बोलण्यासाठी त्याने तोंड उघडले. पण त्याच्या तोंडातून काही शब्दच फुटेनात. शिंदेसाहेबांनी टेबलावरील तांब्यामधून ग्लासमध्ये पाणी ओतून ग्लास त्याच्या हातात दिला. तो गटागटा पाणी प्यायला.

"अशक्य ते आहे जे तुम्ही म्हणताय! प्रसाद, सारिकाचा खून झाला आहे. आज पहाटे नदीवरील साकवाला तिची बॉडी अडकलेली सापडली. पोस्टमार्टेम रिपोर्टप्रमाणे तीन दिवसांपूर्वीच तिची गळा दाबून हत्या केल्याचे समजते. त्यामुळे काल तुम्हाला ती भेटणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही. तुम्हाला भास झाला असावा. पण भास हा काही क्षणांचा असतो. तुम्ही म्हणालात की साकवापासून तिच्या घरापर्यंत तिने तुम्हाला सोबत केली, तर ते कसे शक्य आहे? की तुम्ही एखादे स्वप्नं पाहिले?"

प्रसाद विचारात पडला. काल भेटली ती कोण होती? सारिका की तिचे भूत? तो काही आठवत म्हणाला, "मला ती भेटली. माझ्याशी बोलली. तुम्हाला सांगितले ना, तिच्या एका कानात डूल नव्हते, त्या विषयी मी तिला विचारले देखील!" तो म्हणाला.

"हो बरोबर, बॉडीच्या एका कानात डूल नव्हते."

"आणि ती म्हणाली कदाचित विक्रमच्या केबिनमध्ये पडले असेल." तो पुढे म्हणाला, "ठीक आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी स्वप्नं पाहिले. तर मग मला सांगा तिच्या कानात एकच डूल होते ते मला कसे कळले?" प्रसादने प्रतिप्रश्न केला. शिंदेसाहेब निरुत्तर झाले. थोडा वेळ थांबून विचार करत ते म्हणाले. 

"प्रसाद, हे बघा सरिता मेलेली आहे. भूता-खेतांवर माझा विश्वास नाही. त्यामुळे तुम्ही रचलेली स्टोरी आम्हाला खरी वाटायचं कारण नाही. मोहिते-पाटील कुटुंबावर तुमचा राग असल्याकारणाने तुम्ही विक्रमला यात गोवण्याचा प्रयत्न करीत नसाल कशावरून?"

"मी स्वतःच संभ्रमित आहे, कालच्या घटनेबाबत... पण मी खोटे नाही बोलत, विश्वास ठेवा!"

"ठीक आहे प्रसाद, काही का असेना, तुझ्या बोलण्यातून पुढील तपासाकरता एक दुवा सापडला आहे. मला कोणतीही शक्यता सोडायची नाहीय, म्हणून विक्रमच्या केबिनची तपासणी करायला हवी. तिथे जर तिच्या कानातले डूल सापडले तर ती कॉलेजला आली नव्हती हा विक्रमचा दावा खोटा ठरेल. आणि त्याने असे खोटे बोलणे म्हणजे तोच तिचा खुनी आहे, हे सत्य समोर येईल. ठीक आहे तुम्ही जा आता. मी कामाला लागतो."

"Thank You साहेब, माझी काही मदत लागली तर फोन करा!" असे म्हणून प्रसाद वडीलांसोबत बाहेर निघाला. सारिकाचे वडील तिथेच बसून स्फुंदत होते. 

"शांत व्हा, दिपकराव..." शिंदेसाहबांनी त्यांच्या डोक्यावरून सहानुभूतीने हात फिरवला. 

"काळे, बाहेर यांना जीपने सोडण्याची व्यवस्था करा!"

"येस सर!" म्हणत काळे दिपकरावांना घेऊन केबिनच्या बाहेर पडला.   

शिंदेसाहेबांनी लायटरने सिगारेट सुलगावली, सिगारेट तोंडात धरून एक मोठा झुरका घेतला आणि ते धुरांच्या वालयाकडे पाहत विचार करू लागले...

"साहेब, हा कार्य प्रकार असावा?" फौजदार काळेंनी आत आल्यावर त्यांच्या विचारांची तंद्री तोडली. 

"मलाही कळत नाही. सारिकाच्या मृत्यूने विक्रमही दुःखी झालेला दिसला आणि प्रसादही! कोण खरोखर दु:खी आहे आणि कोण दुःखी असल्याचे सोंग करतोय तेच कळत नाहीय!"

"पण साहेब, प्रसादला काल सारिका भेटली त्या बाततीत तुमचे काय मत आहे? मला तर अतिशय गोंधळायला झालेय!"

"काळे, कायद्यात भूत, प्रेत, प्रेतात्मा यांना मान्यता नसली तरी काही गोष्टी नजरेआड करता येत नाहीत. एखाद्या माणसाच्या काही तीव्र इच्छा अपूर्ण राहिल्या की कधीकधी त्याच्या मृत्यूनंतर त्याला मुक्ती मिळेपर्यंत त्याचा आत्मा प्रेत बनून भटकत राहतो. असं म्हणतात, जो व्यक्ती भुकेने, तहानेने व्याकुळ होऊन किंवा अपघाताने मरतो, ज्याची हत्या झालेली आहे किंवा ज्याने आत्महत्या केलेली आहे अशी व्यक्ती भूत बनते."

फौजदार काळेंनी मान हलवली.  

"साहेब, सारिकाची हत्या झालेली आहे. मला वाटतं तिला प्रसादला काहीतरी सांगायचं असेल, काही गोष्टी त्याच्या निदर्शनास आणून द्यायच्या असतील म्हणून तिचा आत्मा त्याला काल रात्री भेटला असावा..." फौजदार काळेंनी आपला तर्क मांडला. 

"नाही काळे, असल्या गोष्टींना कायद्यात मान्यता नाही. मला वाटते, कालच्या तिच्या भेटीला मानसशास्त्रीय आधार आहे. कधीकधी असे होते की आपण कुणाचा तरी विचार करतो, कुणाबद्दल बोलतो आणि नेमकी ती व्यक्ती समोर येते. किंवा दोन प्रेमिकांच्या बाबतीत बघा, नेहमी असे होते की जेव्हा "तो" एक विचार करत असतो तेव्हा "तिच्या" मनातदेखील तोच विचार येतो. जेव्हा एकमेकांच्या मनातील तरंगांच्या आवृत्ती एका पातळीवर येतात तेव्हा त्यांना एकमेकांचे विचार कळतात. माझ्या या बोलण्याला काही आधार आहे की नाही, माहिती नाही. पण मला असे वाटते की प्रसाद सारिकावर अतोनात प्रेम करत आहे आणि तिचेही त्याच्यावर अतोनात प्रेम असावे. तिला कुणी मारले हे प्रसादला कळण्यासाठी काही गोष्टीचे संकेत प्रसादला मिळावे अशी तिची तीव्र इच्छा असावी. तिच्या मनातील ते तरंग प्रसादच्या मनापर्यंत पोहोचले असावेत. त्याला ती प्रत्यक्ष न भेटता भास झाला असावा पण तो भास प्रत्यक्षाहूनही खरा वाटावा असा होता."

"मग आता पुढचा प्लान?" फौजदार काळेंनी प्रश्न केला,

"विक्रमकडे मोर्चा वळवायला हवा!" असे म्हणत शिंदे साहेबांनी सिगारेटचे थोटूक पायाखाली चिरडले. 


 त्यानंतर पोलिसांनी वेगात हालचाली केल्या. विक्रमच्या केबिनमध्ये सोफ्याखाली सारिकाच्या कानातले डूल सापडले. विक्रमला तीन दिवसांच्या पोलीस रिमांडवर घेतले गेले. पण तो काही कबूल व्हायला तयार नव्हता. तो आपल्या बोलण्यावर ठाम होता की सारिका त्या दिवशी त्याला भेटायला आलीच नव्हती.त्याला रिमांडवर घेऊन काहीही निष्पन्न झाले नव्हते. त्यामुळे शिंदेसाहेबांचे कमालीचे वैतागले होते. आपल्या केबिनमध्ये येरझाऱ्या मारीत त्यांनी चार-पाच सिगारेट संपवल्या होत्या. त्यांनी पुन्हा एक सिगारेट सुलगावली. पहिलाच झुरका मारला आणि अचानक त्यांच्या डोक्यात काय आले कुणास ठाऊक! त्यांनी फौजदार काळेंना हाक मारली, "काळे जीप काढा! आपल्याला निघायचं आहे."

जीपमध्ये बसल्याबसल्या ते म्हणाले "सुरेश चंदेलिया... कॉलेजचा सफाई कामगार.. पत्ता लिहून घेतला होता ना, चला पटापट!" 

जीप कॉलेजचा सफाई कामगार सुरेश चंदेलियाच्या घराच्या दिशेने निघाली. त्याच्या घरापर्यंत जीप जात नव्हती. दाटीवाटीने बांधलेल्या त्या पंचवीस तीस झोपड्या होत्या. जीप एका गल्लीच्या बाहेर थांबवून शिंदेसाहेब फौजदार काळे आणि इतर दोन शिपायांसह सुरेशच्या झोपडीत शिरले. दारू ढोसत बसलेल्या सुरेशला फरफटत झोपडीच्या बाहेर काढले आणि जीपमध्ये आणून कोंबले. 


दुसऱ्या दिवशी प्रसाद लॉकअपमध्ये होता. शिंदेसाहेबांच्या चामड्याच्या पट्ट्याचे दोन-तीन वळ त्याच्या उघड्या पाठीवर बसले होते. पुन्हा शिंदे साहेबांनी त्याच ठिकाणी पट्ट्याने फटका मारला तसा तो कळवळला. "सांगतो, सांगतो...मारू नका..."

"बोल पटापट!"

"माझे सारिकावर प्रेम होते. पण ती फक्त मैत्रीच्या नात्याने माझ्याशी बोलायची. ती मला अनेकवेळा स्पष्टच तसे सांगायची देखील. तरीही ती आज ना उद्या माझी होईल या आशेवर मी होतो. पण गेल्या काही दिवसांपासून ती विक्रमच्या जास्त जवळ आली होती. मी अध्येमध्ये तिला फोन करायचो तेव्हा तिच्या बोलण्यातून मला ते जाणवायचे. मी माझ्या परीने विक्रमच्या विरुद्ध तिचे कान भरवायचा प्रयत्न करीत होतो. पण त्यांची जवळीक जास्तच वाढली होती. तशातच विक्रमसोबतचे पर्सनल फोटो ती मला शेअर करायला लागली आणि मला तिची चीड यायला लागली. माझ्या मनातील आशेच्या ज्योतीवर विक्रमने अखेरची फुंकर मारली होती. मी बेचैन होऊ लागलो. मला रात्ररात्र झोप येत नव्हती. माझे कामात लक्ष लागत नव्हते. तीन दिवसांपूर्वी मी तिला फोन केला.

"सारिका, कशी आहेस?"

"मी एकदम मजेत! आज संध्याकाळी पुन्हा विक्रमला भेटतेय. इतके छान वाटतेय ना त्याला भेटल्यावर, त्याच्याशी बोलल्यावर!"

"अच्छा! सहज भेटणार आहेस?"

"म्हणजे तसे एक निमित्त मिळाले आहे. माझ्या मैत्रिणीच्या बहिणीला मॅनेजमेंट कोटा मधून एडमिशन हवे आहे. त्यासाठी त्याला फोन केला. त्याने उद्या संध्याकाळी साडे-सातच्या सुमारास बोलावले आहे."

"इतक्या उशिरा?"

"हो, तो म्हणाला सातपर्यंत तो खूप बिझी असतो. त्यानंतर निवांत बोलता येईल."

"सारिका, तुला माहित आहे विक्रम आमच्या राजकीय विरोधकाचा मुलगा आहे."

"हो, पण तू समजातोयस तसा तो मुळीच नाही. तो एक सुसंस्कृत आणि सुविद्य मुलगा आहे. त्यांचे संपूर्ण कॉलेज तो सांभाळतोय."

"तुला एकतर त्याच्याशी संबंध ठेवावे लागतील नाहीतर माझ्याशी...."

"संबंध? तुला किती वेळा सांगितले आहे, मी तुझ्याशी फक्त मैत्री याच नात्याने वागते म्हणून!" ती थोडी चिडली होती. 

"अशी मैत्री काय चाटायची आहे? भोसड्यात गेली तू आणि तुझी मैत्री!"

"प्रसाद! शी असे विचार आहेत तुझे!"

"हो असेच आहेत माझे विचार! आता तुला त्याचेच सगळे बरे वाटेल!"

"मी एक मित्र म्हणून तुझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करत होती. पण तू असा विचार करत असशील असे वाटले नव्हते. यापुढे मला फोन करू नकोस!"

"माझं खेटर अडलेय! तू कोण एवढी ऐश्वर्या रॉय लागून गेलीस! या पुढे तुझं तोंड देखील नाही पाहणार!" असं म्हणत मी रागाने मोबाईल फेकला. सुदैवाने तो बेडवरच पडला. मी रागाने लाल लाल झालो होतो. फ्लॅटमध्ये हाताला येईल ती वस्तू उचलून आपटत होतो. पण माझा राग काही कमी होत नव्हता.रागाच्या भरातच मी गावाकडे निघालो. सारिका कॉलेजवरून घरी परत जाताना कदाचित विक्रम कुणाला तरी तिच्यासोबत पाठवेल म्हणून तिला कॉलेजमध्ये जाण्यापूर्वीच गाठायचे मी ठरवले. साकवाजवळ रस्ता एकदम सूनसान असतो. मी सारिका पोहचायच्या आधी तिथे पोहचून एका झाडाच्या आडोशाला थांबलो. सारिकाला येताना पाहून मी तिच्या रस्त्यावर आडवा आलो. मला अकस्मात समोर पाहून ती दचकली. पण नंतर हिम्मत करून ती म्हणाली, "तू ? हे बघ, माझा रस्ता सोड!"

"सारिका, थांब! मला काही बोलायचं आहे." मी थोड्याशा रागातच म्हणालो.

"तुझी मनस्थिती ठीक दिसत नाहीय! आपण उद्या बोलू!" माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून ती म्हणाली.

"नाही! मला आजच काय तो सोक्षमोक्ष लावायचा आहे."

"प्रसाद, पुन्हा सांगते, माझी वाट सोड!" असे म्हणत ती पुढे चालू लागली. मी धावत जाऊन तिचा हात पकडला.

तिने माझा हात झटकला. "तुझी हिम्मत कशी झाली माझा हात पकडण्याची!" असे ओरडत तिने माझ्या गालावर जोरात थप्पड मारली. माझा पारा चढला. मी चवताळून तिचे दोन्ही हात घट्ट पकडले. तिला खेचत खेचत साकवापर्यंत नेले.

"तू माझी नाहीस, तर कुणाचीही नाहीस!" मी तिचा गळा आवळू लागलो. मला तिला मारायचे नव्हते. तिला अद्दल घडावी म्हणून घाबरवायचे होते. पण ती माझ्या हातून सुटण्यासाठी धडपड करू लागली तसा माझ्या हातांचा तिच्या गळ्यावरील दाब वाढत गेला. अखेरची धडपड करीत ती निष्प्राण झाली आणि मी दचकलो. मला दरदरून घाम फुटला. मी आजूबाजूला पाहिले. दूरवर कुणीही नव्हते. मी तिला हलवूनहलवून हाका मारल्या. पण तिचे प्राणपाखरू उडून गेले होते. माझ्याकडे आता एकच पर्याय होता. मी तिचे मृत शरीर अलगद उचलून नदीच्या प्रवाहात फेकून दिले." असे म्हणून तो शून्यात पाहात राहिला. 

"एका निष्पाप जीवाला तू मारलेस. परमेश्वर तुला कधीच माफ करणार नाही. मी तुला फासावर चढवल्याशिवाय राहणार नाही." शिंदेसाहेब म्हणाले. तो मान खाली घालून गप्प उभा होता. शिंदेसाहेब लॉकअपच्या बाहेर आले. शिपायाने लॉक लावले. शिंदेसाहेबांनी आपल्या केबिनमध्ये आल्यावर सिगारेट सुलगावली आणि त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने ते धुरांच्या वलयांकडे पाहत राहिले. 

"सर, तुम्हाला प्रसादवर संशय कसा आला?" फौजदार काळे विचारत होता. तो आपल्या साहेबांवर भलताच खुश झाला होता. इतक्या तडकाफडकी साहेबानी खुनी शोधून काढल्यामुळे त्याला साहेबांचे फार कौतुक वाटत होते. 

"हे बघा काळे, तुम्हाला आठवत असेल, जेव्हा विक्रमच्या ऑफिसमध्ये सोफ्याच्या खाली सारिकाच्या कानातले डूल सापडले तेव्हा मी तिथल्या सफाई कामगाराला चौकशीला बोलावले होते. त्याला विचारले होते की तू या रूमची रोज सफाई करतो का? तर तो हो म्हणाला. त्याला विचारले सोफा सरकवून झाडू मारतो का? तर तो हो म्हणाला. मी ते पॉईंट तुम्हाला नोट डाऊन करायला सांगितले होते. नंतर आपण विक्रमला रिमांडवर घेतले. पण त्याची चौकशी करून काही हाती लागले नाही. उलट त्याच्याकडून एक गोष्ट स्पष्ट झाली की त्या दिवशी सारिका कॉलेजवर गेलीच नव्हती. त्याने खात्रीसाठी आपल्याला इन-आऊट रजिस्टर दाखवले. त्यात तिच्या नावाची नोंद नव्हती किंवा कुठलेही पान फाडलेले दिसले नव्हते. मी पुन्हा त्या सफाई कामगाराचा चेहरा डोळ्यांसमोर आणला. मला तो काहीतरी लपवत असावा असे वाटले. जर तो रोज सोफा सरकवून सफाई करत होता, तर तीन दिवसानंतर ते कानातले डूल सोफयाखाली कसे राहिले. ते त्याला दिसले कसे नाहीत? हा प्रश्न माझ्या मनात आला. मी अजयच्या ऑफिसमधून अजयचा कार्ड पंचिंगचा रेकॉर्ड मागितला. त्या दिवशी अजयने ३ वाजून ४० वाजता ऑफिस सोडलेले कळले. तो त्या नंतर अजूनपर्यंत ऑफिसला गेलेलाच नाही. म्हणजे तीन दिवस तो कुठेतरी बाहेरच होता. कदाचित एखाद्या लॉजमध्ये. ही सगळी माहीत मिळाल्यावर आपण सफाई कामगार सुरेशला चौकशीला आणले. प्रसादने त्याचे नाव सांगितल्याचे त्याला खोटेच सांगितल्यावर तो पोपटासारखा बोलायला लागला. म्हणाला, प्रसाद त्याच्या घराजवळ राहात होता. कधी कॉलेजचे काही काम निघाले तर तो त्यालाच सांगायचा. प्रसादने ते डूल विक्रमच्या केबिनमध्ये ठेवण्यासाठी सुरेशला पन्नास हजार रुपये दिल्याचे कळले. मग सारेच चित्र स्पष्ट झाले."

"सर, मानलं तुम्हाला!" असं म्हणत फौजदार काळेने एक कडक सॅल्यूट ठोकला. शिंदेसाहेबानी मंद स्मित करीत पुन्हा सिगारेटचा एक दीर्घ झुरका मारला.  

   


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror