Ganesh Khanderao

Others

3  

Ganesh Khanderao

Others

श्रद्धेचा खेळ

श्रद्धेचा खेळ

3 mins
471


एकदा एक माणूस एका मोठ्या धार्मिक संस्थांनात गेला. तिथल्या पुजाऱ्याला भेटून तो म्हणाला की "दहा वर्षांपूर्वी मीआपल्या मंदिरात एक लाख रुपयांची देणगी दिली होती." पुजारी म्हणाला, "ठीक आहे, मग आज किती देणार?" तो माणूस म्हणाला, "आज मी देणगी देण्यासाठी नाही तर परत घेण्यासाठी आलो आहे." पुजाऱ्याने त्याच्याकडे निरखून बघितले. माणूस मोठा सज्जन दिसत होता. त्याने खिशातली पावती काढली आणि म्हणाला, " ही बघा एक लाख रुपयांच्या देणगीची पावती.कृपा करून मला माझे पैसे परत हवे आहेत आणि शक्य असेल तर यावर काही व्याज मिळाले तर मला फार आनंद होईल." पुजारी अत्यंत आश्चर्यचकीत झाला आजपर्यंत अशी विचित्र मागणी कोणीही मंदिराकडे केली नव्हती. पुजारी म्हणाला, " हे शक्य नाही, अाणि असे दिलेले दान कोणी परत मागत असते का? मनुष्य म्हणाला, "दहा वर्षांपूर्वी माझी परिस्थिती खूप चांगली होती पण आज माझा धंदा फार मोठ्या अडचणीत अडकलेला आहे. माझे फार मोठे नुकसान झालेले आहे. आणि मला पैशाची अत्यंत निकड आहे कृपा करून माझे पैसे मला परत मिळाले तर फार बरे होईल." "असे होऊ शकत नाही. हे धार्मिक संस्थांन आहे. दिलेले पैसे व्याजासह परत द्यायला ही काही बँक किंवा पतसंस्था नाही." "मला इथल्या मुख्य पुजाऱ्यांना भेटायचे आहे." पुजारी म्हणाला, "आरतीच्या वेळेस मुख्य पुजारी तुम्हाला भेटू शकतील." नाईलाजाने तो माणूस मुख्य आरतीच्या वेळेपर्यंत थांबला. आरती झाल्यानंतर मुख्य पुजाऱ्यांचे आगमन झाले. हा मनुष्य उठून उभा राहिला आणि सकाळच्या प्रमाणेच त्याने सांगितले की "दहा वर्षांपूर्वी मी या मंदिराला एक लाख रुपयांची देणगी दिली होती . आज मला माझे पैसे परत हवे आहेत." मुख्य पुजाऱ्यांनी त्या माणसाकडे बघितले. त्याच्या शब्दांमध्ये प्रामाणिकपणा होता. त्याच्या चेहऱ्यावर कष्टाचे तेज दिसत होते. डोळ्यात सचोटीचे तेज तरळत होते. शब्दाला प्रामाणिक पणाची धार होती. मुख्य पुजाऱ्यांनी शांतपणे त्याच्याकडे पाहिले आणि त्याला पुन्हा उद्या परत यायला सांगितले.आरतीच्यावेळी उपस्थित असलेल्या हजारो माणसांना त्या गोष्टीचे फार आश्चर्य वाटले उद्या पुजारी काय निर्णय देणार याचे सर्वांना कुतुहल वाटू लागले.. काही लोकांनी त्यांची दान परत मागितल्या बद्दल त्यांची फार निंदानालस्ती सुद्धा केली. रात्री त्या माणसाने देवस्थानातच मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी आरतीच्या वेळेस तो पुन्हा आपली पावती घेऊन तिथे गेला. मुख्य पुजारी आपल्यासोबत कारकुनाला घेऊन आले. त्यांनी त्या माणसाची पावती पाहायला मागितली. कारकुनाने पावती व्यवस्थित पाहिली आणि ती खरी असल्याचे सांगितले. मुख्य पुजारी म्हणाले, "बसा." मुख्य पुजारी आतील दालनात गेले आणि काही रक्कम घेऊन पुन्हा बाहेर आले. त्यांनी त्या माणसाला जवळ बोलावले आणि देवाच्या मूर्तीपाशी त्यांच्या हातातले पैसे ठेवले. त्या माणसाच्या हातावर तीर्थ प्रसाद देऊन त्यांनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्या माणसाला ते घ्यायला सांगितले. त्या माणसाने ते पैसे मोजून पाहिले तर ते पाच लाख रुपये होते. तो म्हणाला, "मी तर फक्त एकच लाख रुपये दिले होते." पुजारी म्हणाले, "दहा वर्षांपूर्वी तुम्ही एक लाख रुपयांची देणगी दिली कारण तुमची परिस्थिती चांगली होती आणि तुमची देवावर श्रद्धा होती. आज तुमची परिस्थिती चांगली नाही पण तुमची देवावरची श्रद्धा अद्याप तशीच कायम आहे. तुम्हाला धंद्यात नुकसान आल्यामुळे तुम्ही देवावर श्रद्धा ठेवून त्याच्या दाराशी आलात आणि सच्च्या मनाने मदत मागितलीत. सच्च्या मनाने मारलेल्या हाकेला परमेश्वर उत्तर देणार नाही असे कधी होईल काय ? जेव्हा तुमच्या धंद्यामध्ये फायदा होईल तेव्हा तुम्ही तुम्हाला हवी तेवढी रक्कम परत आणून देऊ शकता. हा देवाचा प्रसाद समजून तुम्ही कृपा करून याचा स्वीकार करा." संस्थानातल्या इतर अधिकारी व पुजाऱ्यांना या गोष्टीचा फार राग आला. "ते म्हणाले, "अशा पद्धतीने आपण वागत गेलो तर देणगी दिलेले सगळे लोक पावत्या घेऊन परत येतील. आपण कुणाकुणाला पैसे परत करणार?" मुख्य पुजारी म्हणाला, "असे आज पर्यंत किती जण पावती घेऊन पैसे परत मागायला आले आहेत? सगळ्यांची तोंडे बंद झाली. कारण आजपर्यंत एकही व्यक्ती पावती घेऊन पैसे परत न्यायला आलेली कुणी पाहिली नव्हती. पुजारी म्हणाले, "या लाखो लोकांमध्ये परमेश्वरावर ज्याची गाढ आहे असा एकमेव भक्त आज मला सापडला. देव त्याच्या हाकेला धावून येईल अशी त्याला खात्री होती. त्याचा परमेश्वरावरचा विश्वास अबाधित राहिला पाहिजे ही माझी जबाबदारी आहे. हा माणूस कष्टाळू आणि प्रामाणिक होता. त्याने कष्टाचे पैसे देवाला दान केले होते. त्याचा परमेश्वरावरील विश्वास ढळू नये म्हणून मी त्याला ही मदत दिली आहे. आणि त्याची परिस्थिती झाली तर तो ते पैसे नक्की परत आणून वाहील याची मला शंभर टक्के खात्री आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे श्रद्धास्थान आहे, श्रद्धेचा बाजार नाही."

तात्पर्य:-

देवस्थानांनी आपला निधी समाजासाठी विवेकाने वापरून श्रद्धाळू लोकांच्या श्रद्धेशी खेळ होणार नाही याची सदैव काळजी घेतली पाहिजे.


Rate this content
Log in