Shilpa Desai

Romance

3  

Shilpa Desai

Romance

सुतानुका-देवदिन प्रेमगाथा

सुतानुका-देवदिन प्रेमगाथा

8 mins
296


    अमरनाथ पर्वतरांगेत रेणुकानदी पासून काही अंतरावर रामगढ या सुंदर धर्मस्थळी सुतानका नावाची सुंदर देवदासी राहायची. रामगढच्या जोगीमाढा गुहेत आज सकाळपासून रेलचेल होती. सगळे कलाकार आपापल्या कला सादर करण्यास उत्सुक होते. तिथे धर्माला नाही तर आज फक्त कलेला महत्त्व होते. सुतानुकाही आपल्या नृत्याच्या तयारीत गढली होती. एक मुख्य नृत्यांगणा असल्याने ती सगळ्यांनाच प्रिय होती .नावाप्रमाणे ती सुंदर आणि कलाप्रेमी होती. नृत्याच्याकलेबरोबर तिला भित्तीचित्र बनवायची देखील आवड होती. त्याशिवाय ती कविमनाची होती. सुंदर सुंदर काव्यरचनां ती करायची. अनेक जण तिच्या सौंदर्यावर व कलेवर फिदा होते. अनेक पुरुषांची हृदये तिने जिंकली होती. असे असले तरी पण ती कोणा एकाची होणे शक्य नव्हते, कारण ती देवदासी होती. आपल्या लालसा पूर्ण करण्यासाठी पुरुष तिच्याकडे येत. ईश्वराने भॊतिक सुखाचा उपभोग घ्यावा म्हणून देवतेसमोर नृत्य करण्याकरता व गाणे म्हणण्याकरता आणि समारंभात भाग घेण्याकरता सुतानुकाला देवतेला अर्पण केले होते. थोडक्यात ती देवाची पत्नी होती. देवस्थानातील पुजारी, देवळात दानधर्म करणारे श्रीमंत लोक अशा अनेक पुरुषांशी; तिला खासकरून देवतेला प्रसन्न करण्यास संग करावे लागे. आज तर काय देवाची जत्रा होती त्यामुळे सगळीकडे जोशपूर्ण वातावरण होते. सगळ्या नृत्यांगनांचे नटणे थटने चालले होते. सगळ्या नृत्यांगणाचे सुंदर सुंदर पोशाख लक्ष वेधून घेत होते.

   सुतानकानेही आपल्या लांबसडक वेणीवर फुलांची जणू आरास केली होती. तिने आज निवडक सोन्याचे व रत्नांचे आकर्षक दागिने परिधान केले . ती एखाद्या अप्सरे सारखी दिसत होती. फुलांच्या सुगंधाने आणि अत्तराचा शिडकावाने सगळीकडे सुवास पसरला होता.

   जत्रा असल्याने मंदिराचा परिसर देखील रोषणाईने उजळून निघाला होता. त्याचबरोबर रंगमंचावर आकर्षक पडदे, रंगीत रंगीत दिव्यांचा प्रकाश यामुळे रंगमंच चकाकत होता. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुतानुका आणि तिच्या सखी नृत्य करण्यात मग्न होत्या. कृष्णाची राधा झालेली सुतानुका एवढ्या नजाकतीने लयबद्ध नृत्य करत होती की ,उपस्थितांचे मन रिझवले जात होते. वाह! वाह! च्या आवाजाने आसमंत दणाणून गेला होता.

   त्याचवेळी रामगढच्या त्या मंदिर परिसरात देवदिन नावाचा एक शिल्पकार आणि चित्रकार शिल्प चित्र बनवण्यासाठी त्याच जोगिमाढा परिसरात आला होता. तो एक उत्तम चित्रकार होता. तो जेव्हा अद्भुत अशी शिल्पचित्र बनवत असे तेव्हा लोक आश्चर्याने पहात रहायचे, कौतुकाने काही माणसं त्याला भेटवस्तूही देत असत. देवदिन नाजूक आणि सुंदर रंगसंगती बनवत असे. आजही तो भिंतीवर सुंदर शिल्प चित्र बनवत होता. इतक्यातच त्याला घुंगराच्या तालबद्ध आवाजाने मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटले. आवाजाचा शोध घेण्यासाठीत्याने आजूबाजूला पाहिलं. मग सुतानका आणि तिच्या सहकारी नृत्य करत असलेल्या रंगमंचाकडे त्याचे पाय हळूच वळले. नृत्यांगणा मधून सुतानुका वीज तळपावी तसे नाचत होती. राधेच्या वेशातील तिचे नृत्य पाहून देवदिन स्तंभित झाला. आपण शिल्प चित्र बनवायला आलो हे तो काही वेळासाठी विसरून गेला. सुतानकाचे सुंदर लावण्य पाहून तिथून हलावे असे त्याला वाटत नव्हते. नाचता नाचता सुतानकाचा कटाक्ष त्याच्यावर जाताच नजरानजर झाल्यामुळे देवदिनच्या मनात तिच्याबद्दलचे आकर्षण वाटू लागले.

   त्याचा कार्यक्रम आटोपून सगळ्या गणिका आपापल्या कक्षात गेल्या. देवदीन ही तेथून निघाला. रात्र बरीच झाली होती पण देवदिनला आज झोप येत नव्हती. त्याला जणू निद्रानाश झाला होता. झोप येण्यासाठी त्याने बरेच प्रयत्न केले पण व्यर्थ.. त्याच्या नजरे समोर फक्त आणि फक्त सुतानुका दिसत होती, आणि तिचे सुंदर नृत्य त्याच्या नयनपटलावर स्थिरावले होते. तिची नितळ कांती, लांब सडक केस, काळे टपोरे मृगनयनी डोळे, लयदार कटी, कमनीय बांधा, कमळासारखी गालावरची लाली, कुंदकळ्या सारखे दात नजरेसमोरुन हटत नव्हते. एकाच नजरेत सुतानुकाच्या आकंठ प्रेमात तो बुडाला होता. आता तो आपल्या विचारात गुंतून गेला. कारण एक दोन दिवसानंतर त्याचं चित्र बनवण्याचं काम संपणार होतं. म्हणजे त्याचा इथला मुक्काम संपणार होता. याचा अर्थ रामगढ सोडून जाणे भाग होते. आता त्याला प्रश्न पडला; त्याच्या मनात भरलेली सुतानुका ! तिच्यासमोर व्यक्त व्हायचं कसं. सुतानकाला भेटायची त्याला तीव्र इच्छा होती पण ते शक्य नव्हते. प्रेमात व्याकूळ झालेल्या त्याने काही झालं तरी सुद्धा सुतानका भेटायचे आणि आपले प्रेम सांगायचे असा मनाशी निश्चय केला.

   दुसऱ्या दिवशी सूर्यनारायणाच्या साक्षीने सुतानकाला भेटण्यासाठी त्याने जोगीमाढा गुहेत प्रवेश केला. जोगीमाढा गुहा सुतानुकाच्या अखत्यारीत होती. तिच्या बरोबर अनेक नृत्यांगना तेथे वास्तव्याला होत्या. संपूर्ण जोगीमाढा परिसराची ती जणू मालकीण होती. मंदिरात जाऊन नृत्य करणे आणि देवतेला प्रसन्न करून घेणे हे तीचे काम होते.

   जेव्हा त्याने जोगीमाढा गुहेत प्रवेश केला. तेव्हा सगळ्या नृत्यांगना आपापल्या कामात गुंतल्या होत्या. कुणी नृत्याची सराव करत होत्या, तर काही जणी विश्रांती घेण्यासाठी आपल्या शय्येवर निद्रा अवस्थेत होत्या, काही जणी हास्यविनोदात रंगल्या होत्या. आपल्या कक्षात देवदिनला पाहतात त्या फारच गोंधळून गेल्या. देवदिनलाही आता काय बोलावे हे समजत नव्हते .मग तोच धीर करून म्हणाला, "मी सुतनुकाचे अभिनंदन करण्यासाठी येथे आलो आहे." सुतानुकाकडे पाहत देवदिन नम्र आवाजात म्हणाला ,"तु काल नृत्य केलं ते मला खूप आवडल. त्याला दाद देण्यासाठी मी आज मुद्दाम येथे आलो आहे. खरोखरच तुझी कला स्तंभित करणारी आहे. काल तुझे नृत्य पाहून माणसंच नाही तर देवताही प्रसन्न झाले असतील. तू खरोखरच सुंदर दिसत होतीस. रंगमंचावरील तुझं ते रूप पाहून मी फार भारावून गेलो. तुझे ते विद्युलतेपरी थिरकणारे पाय माझ्या आजही नयनपटलावर स्थिरावले आहेत.'' असं म्हणून त्याने राजाकडून त्याला मिळालेली मोत्याची माळ आपल्या गळ्यातून काढून तिच्या गळ्यात घातली. सुतानुका स्तंभित होऊन हे सगळं पाहतच राहिली. हे सगळं काय चाललंय. खरोखरच तिच्या स्वप्नातलं सत्य होतं की सत्यातल स्वप्न हेच तिला समजत नव्हत. सुतानुकाने काल जेव्हां त्याची सर्व शिल्पे पाहिली होती तेव्हा त्याच्यातिल अस्सल कलावंताला तिने मनापासून मनातल्या मनात दाद दिली होती. आणि आज चक्क तो माणूस आपलं कौतुक करून आपल्याला भेटवस्तू देतो, या गोष्टीमुळे ती पाहिलांदा इतकी सुखावली होती.

  मोत्याची माळ गळ्यात घालताना तिच्या अंगाला त्याच्या हाताच्या झालेल्या स्पर्शाने तिचे अंग शहारून आले. एक गोड लकेर विद्युल्लतेच्या वेगाने तिच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचली. तिचे अंग शहारलं. देवदिनचा तो स्पर्श तिला पुन्हा पुन्हा हवाहवासा वाटू लागला. त्यानंतर तिने सर्व नृत्यांगनांना बाहेर जाण्याचा इशारा केला.

 आता जोगीमाढा गुहेत ते दोघेच होते. आणि सुंदर पलंगावर बसून गप्पात गुंतले होते. कितीतरी वेळ ते दोघे एकमेकांच्या सहवासात होते. देवदिनने त्याच वेळी सुतानुका जवळ आपले प्रेम व्यक्त केले. सुतानुकाची सुद्धा सुप्त इच्छा होती की, आपल्यावर जिवापाड प्रेम करणारा प्रेमी असावा. त्याच्याशी विवाह करून त्याने आपल्याला त्याची जीवनसोबती बनवावं. आपण त्याची प्रेमिका पत्नी व्हावं .मनातली इच्छा मनातच ठेवत सुतानुका एखाद्या स्वप्नातून जागं व्हावं तशी भानावर येत म्हणाली, "मी देवाला अर्पिली आहे. कुणा एकाची होऊ शकत नाही. म्हणूनतर मला देवदासी असे म्हटले जाते."

  नजरेला नजर भिडवत देवदिन सुतानुकाला म्हणाला, "तू देवदासी नाही आहेस आता. या देवदिनची तु प्रेमिका आहेस आणि माझी पत्नी व्हावी अशी माझी इच्छा आहे." तिलाही त्याचा सहवास आवडू लागला. त्या रात्री बराच वेळ ते दोघे एकमेकांच्या सहवासात होते. दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रहरी एकांत मिळावा म्हणून फिरण्याच्या बहाण्याने ते दोघे रामगढ पर्वतरांगांवर गेले तेथे फिरत असताना तेथील सीताबेंगरा या गुहेजवळ असलेली राम सीता पदचिन्हाचे ठसे त्यांनी पाहिली चिन्ह जमिनीत बुजली गेली होती. हे पाहता क्षणी सुतानुकाने आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला . जमिनीत गाढलेली ती पदचिन्हे जमिनीतून उकरून त्या दोघांनी बाहेर काढली. मग दोघांनीही आपल्या हाताने त्या पाऊलखुणा जमिनीत एका बाजुला व्यवस्थित बसवल्या जणूकाही आत्मिक सहवासातून अध्यात्मिक सहवासात प्रवेश केल्याप्रमाणे.

   पर्वत रांगेत फिरताना या दोघांना बऱ्याच लोकांनी पाहिले होते. 'त्यामुळे देवदिनने सुतानकाला मोहित केली आहे.' अशी बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली.गोष्टीचा जाब विचारण्यासाठी मंदिरातील मुख्य अधिकारी तसेच प्रमुख पुजारी या सगळ्यांनी मिळून एक सभा भरवली. मंदिराच्या सभागृहात देवदिनला हजर राहण्यासाठी पाचारण करण्यात आले. जेव्हा देवदिन सगळ्यासमोर हजर झाला तेव्हा मुख्य अधिकाऱ्यांनी विचारले की, देवदिन तुझं सुतानुकावर प्रेम जडलं आहे का आणि तू तिच्याशी लग्न करु इच्छितो असं आमच्या कानावर आल आहे; ही गोष्ट खरी आहे का?

या प्रश्नाला उत्तर देताना देवदिन स्पष्ट शब्दात म्हणाला, "मान्यवर हे खरे आहे. सुतानुका मला हृदयापासून आवडते आणि तिच्याशी मी विवाह करू इच्छितो. जर तिची मान्यता असेल तर." त्यानं असे बोलतच सभेतील सगळ्या मंडळींना आश्चर्य वाटलं आणि त्याच बरोबर राग आला.

  त्यानंतर तेथील मुख्य मान्यवरांनी देवदिनला सांगितले की सुतानुका ही एक देवदासी आहे. आणि तिचे अगोदरच देवाशी लग्न झालेले आहे. तेव्हा तू तिच्याशी विवाह करू शकत नाही. देवदासी ही कोणा एकाची कधीच होऊ शकत नाही. तेव्हा तु इथून निघून जाण्यातच तुझं भलं आहे. अन्यथा तुझ्यावर कारवाई केली जाईल. व तुला कठोर शासन होईल.

   सभेसमोर मांडले जाणारे मुद्दे देवदिनला मुळीच पटत नव्हते. तो मोठ्या आवाजात म्हणाला हे सर्व काही चुकीचे आहे. देवदासीला पण भावना असते. मग प्रेमाला विरोध का, की फक्त मनात नसताना त्यांनीं इतरांची मन रिजवयची हा कुठला न्याय. मी तिच्याबरोबर लग्न करायचे इच्छितो, त्याला तुम्ही पाप म्हणता. हा अन्याय आहे. या बोलण्यावर सभेतील सगळी मंडळी उठली. देवदिन तू चुकीच आहेस तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे असा नारा घुमू लागला पुन्हा एकदा मुख्याधिकार्‍यांनी जोगीमाढा परिसर सोडून जाण्यास त्याला सांगितले. आता देवदिन पूर्णपणे निशब्द झाला होता. सभेचा निर्णय मानणे त्याला भाग होते.

साश्रुनयनांनी त्याने जोगीमाढा गुहेकडे पहिले. सुतानुका गुहेच्या द्वाराजवळ जणू मूर्ती बनून उभी होती. देवदिनने डोळे भरून तिला पाहिले. आणि वाराणसीच्या दिशेने चालू लागला. तो फार व्याकूळ झाला होता. आता तो स्वतःलाच सांगत होता की, आपण अमाप पैसा गोळा करायचा आणि या धर्माचा स्तोम माजवणाऱ्याची तोंड बंद करायची. त्यांना हवा तेवढा पैसा द्यायचा. आणि सुतानुकाला घेऊन दूर जायचं. जोगीमाढा गुहा सोडल्याशिवाय आपल्याला प्रेम प्राप्त करता येणार नाही.

   मनात चंग बांधून देवदिन निघाला. त्यानंतर तो कितीतरी दिवस भटकत राहिला. पण त्याने इच्छिलेली गोष्ट त्याला प्राप्त होईना. शेवटी कंटाळून तो साधू वैरागी यांच्या सानिध्यात आला आणि वैरागी बनला. वाढलेली दाढी, जटाधारी केस, तोंडाने 'अलख निरंजन' म्हणत एक दिवस तो फिरत फिरत रामगढच्या दिशेने निघाला. जेव्हा तो योगीं जोगींमाढा गुहेच्या दिशेने आला तेव्हा त्याला लोकांनी ओळखले नाही. गुहेत प्रवेश करताच तो सुतानुकाची चौकशी करू लागला. तेव्हा त्याला तेथील लोकांनी सांगितले की देवदिन वरील प्रेमामुळे जोगीमाढा गुहेचे सर्व अधिकार तिला गमावून बसावे लागले. तसेच देवदिनच्या वियोगामुळे ती फार खचून गेली. अन्नपाणी ग्रहण करत नव्हती. रात्रंदिवस मंदिरात बसून वियोग गीत गात राहायची. ती देवभक्तीतीत स्वतःलाच विसरून गेली होती. एकटक नजरेने ती देवासमोर पाहत राहायची काही काळ देवदिनच्या शोधात इकडे-तिकडे भटकत राहिली. आणि मग पुन्हा याच मंदिरात येऊन देवासमोर त्यांच्या शोधासाठी देवाला आग्रह करायची वियोगाने थकलेली ती योग गीत गात एक दिवस आपले प्राण देवतेला त्यागते. आणि नष्ट होते. हे ऐकताच देवदिनचे हातपाय लटपटू लागले. आपण सुतानुकाला त्या दिवशी आपल्या सोबत घेऊन का नाही गेलो. आणि देवस्थान धर्माधिकारी यांच्या निर्णयाला विरोध पत्करून आपल्या प्रियतमेला आपल्या सोबत घ्यायला हवे होते,असे त्याला वाटू लागले. आपण सारे काही गमावले आहे याचं दुःख अनावर झाल्यामुळे तो अंधार्‍या भागात जाऊन बसला. बरेच दिवस देवदिन जोगींमाढा गुहेत होता. त्याने अन्न पाणी सोडले होते. तेथे बसून तो भिंतीवर आणि छतावर अतिसुंदर असे शिल्पचित्रे बनवत राहिला. भिंतीवर त्याने साधुसंत आणि अनेक पशु पक्षांची चित्र बनवली. तसेच छतावर देखील सुंदर सुंदर नाजूक नक्षीकाम करत चित्र बनवlली.या सगळ्यात त्याने आपली प्रियतमा सुतानुकाचीही भित्तिचित्र बनवली होती. त्यानंतर त्याने एका भिंतीवर सुतानुकाला उद्देशून काही ओळी लिहिल्या त्यात त्याने लिहिले की

'सुतानुका देवदासीसाठी

सुतानुका नावाच्या देवदासी वर

देवदिन हा वाराणसीचा शिल्पकार

आकर्षित झाला.'

   अक्षरं कोरत असताना त्याचा हात पुन्हा त्याच अक्षरावरून फिरत राहिला. त्याच्या तोंडातून सु ता नू का हा शब्द बाहेर पडला. मग त्याच थरथरतं शरीर जमिनीवर कोसळलं ते पुन्हा न उठण्यासाठी. जीवनाला कायमची मुक्ती देण्यासाठी.


----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रामगड हे छत्तीसगड राज्यातील सर्गुजा जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळ आहे. आणि ते खूप प्राचीन आहे. अंबिकापुर पासून पन्नास किलोमीटर दूरवर जवळजवळ तीनहजार दोनशे फूट उंचावर आहे. तिथे प्राचीन मंदिरे, गुहा व भित्तीचित्र प्रसिद्ध आहे, सम्राट अशोकाच्या काळात या गुहेची निर्मिती झाली, येथील जोगिमारा नावाच्या गुहेत अप्रतिम नाट्यशाळा होती. असे मानले जाते की देवदिन व सुतानका या दोघानी गुहेत भित्तिचित्र बनवली. जोगीमाढा गुहेत मौर्य ब्राम्ही लिपीत एक शिलालेख कोरलेला आहे जो सुतानुका या देवदासिला लिहिला आहे.

तो असा की

शुतनुका नाम देवदाशिक्यि

तां कामयिथ वाराणशेये.

देवदिने नाम लूपदखे।'


ही कथा लोककथावर आधारलेली आहे. त्याला काही प्रमाणात काल्पनिक स्वरूप देण्यात आले आहे .

#lovelanguage


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance