Meghana suryawanshi

Others

4.3  

Meghana suryawanshi

Others

तारांगण

तारांगण

3 mins
261


      रात्रीच्या चकाकत्या चांदण्यात डोंगराच्या मध्यावर आणि लांबच लांब नजर जावी पण साधं एक माणूस न दिसावं अशा ओसाड हिरवळीवर ती एकाकी पर्णकुटी न्हाऊन निघाली होती. वार्‍याची मंद झुळुक तीच्या कानात निसर्गाची धुन गात होती. प्रातःकाळी दारात रांगोळी रेखाटण्यासाठी सडा टाकावा तसा प्राजक्तांच्या फुलांची चादर अंगणात पसरली होती. सभोवताली तारेचे कुंपण. त्या कुंपणालाच एका बाजूला गुरे बांधली होती. अंगणात विविध फुलांची झाडे. सगळं मर्यादित असले तरी स्वर्गाच्या सौंदर्याला लाजवेल अशी सुंदरता होती त्या नंदनवनाची. अशी सुंदरता की सुंदर हा शब्द फक्त या साठीच तयार झाला असावा आणि निसर्गाने ही आपल्या सौंदर्याची उधळण मुक्तपणे त्या पर्णकुटीवर केली होती.


     जशी ती पर्णकुटी एकटी होती, तशीच त्यात रहाणारी "ती" देखील एकटी होती. पर्णकुटी आणि सभोवतालचा निसर्ग हेच दोघे तिचे सोबती मिञ होते. त्या दोघांनी ही तिला कधी एकटे पणाची जाणीव करून दिली नाही. तीच्या आवडी निवडी, स्वभाव सारं काही निराळं होते. तीला विचारणारं जरी कोणी नसलं तरी ती मनात बोलायची "इतरांना जे आवडतं ते मला आवडत नाही, आणि मला जे आवडतं नाही ते इतरांना आवडत नाही" आणि हळूच हसायची. "ती" एकदम निराळी, चंचल, लहानगीशी परी होती. "ती" वेगळी होती कारण "ती म्हणायची की मी कशाला पण नाही घाबरत पण; साध्या विचारांनी देखील ती कावरीबावरी व्हायची. तीच्यासाठी बाहेरचे जग एकदम वेगळे होते. एकदम बिनधास्त, खुलेपणाने, अल्लड पद्धतीने ते जग ती जगत होती. जसं तिला बाहेरचे जग अनोळखी होते तसेच बाहेरच्या जगाला ती. 


    त्या रात्री ती छोटीशी परी अंगणात असलेल्या मोठ्या दगडावर बसली होती. कसलाही विचार मनात न आणता एकदम शांतपणे. तिची नजर फक्त रात्रीच्या निरभ्र आकाशाकडे होती. रात्रीच्या निरव शांततेत रातकीडे गाणे गात होते. वार्‍याची मंद झुळुक तीच्या अंगाला हात लावून तीची खोडी काढत होते. पण तिला बाकी कशाचीही तमा नव्हती. ती तिच्याच तंद्रीत आकाशाकडे एकटक बघत होती. तिचे सारे सोबती तिच्यावर नाराज झाले होते. आज आकाशातील सोबती तिला साद घालत होते. तिच्या सोबतींनी तारांगण पुर्णपणे भरून गेले होते. तारांगणातील तिच्यासारख्याच तिच्या दोन अल्लड सोबती पाठशिवणीचा खेळ खेळत होत्या. त्या एकदम आनंदात होत्या आणि त्या आनंदाचा पडसाद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. एकदम चमचमता हिर्‍याला ही लाजवेल असा चेहरा! त्यांचा खेळ थांबत नव्हता आणि तिचे कुतुहल. त्या तारांगणाचा आपणही भाग होऊन असंच रहावे, खेळावे असे तिला वाटत होते. असा विचार करीत असताच त्या दोन सोबती तारांगणापासून खुप दूर गेल्या. नजरेच्या पलीकडे! डोळ्यांत भरून येणार्‍या आकाशात कोठेही दिसेनात. त्या क्षणीच तिची नजर एकदम हटली. पापणी नकळत लवली. तारांगणात विसावलेले तिचे मन परत खाली आले. आणि सोबत बरेच काही घेऊन ही आले.


      तिचे मन वेगळ्याच विचारांनी त्रस्त झाले. कोठे गेले असतील दोघे? पाठशिवणी खेळत खेळत भेट झाली असेल का दोघांची? 'अरे काय विचार करतेय मी, मी पण ना' असं स्वतःशीच पुटपुटली. किती आनंदात होते ते दोघे. माझ्यासारखेच ते ही अल्लड भासले मला. नक्कीच भेट झाली असणार दोघांची. दूर का जातील? तारांगण बरे जाऊ देईल. हे तिचे विचार नक्कीच तारांगणपुरते मर्यादित नव्हते. तो पाठशिवणीचा खेळ पाहत पाहत स्थिर डोळे पाणावले होते. तिला आज पहिल्यांदा एकाकीपणा जाणवू लागला. असे वाटू लागले माझ्या सोबत असाच कोणीतरी पाठशिवणीचा खेळ खेळावा. असेच तारांगणाच्या पलीकडचे जग पहावे. पण मनाचा तीर लांब अंतर पार करायच्या आत तिने रोखला. तिने तिचे विचार मनाच्या खोलीत खूप खोलवर तसेच कोंडून ठेवले आणि मिश्किल हास्य करत तिने वार्‍याच्या खोडीला उत्तर दिले.      


Rate this content
Log in