Krutika Kamble

Comedy Romance Fantasy

4  

Krutika Kamble

Comedy Romance Fantasy

वधूची परिक्षा...१

वधूची परिक्षा...१

5 mins
259


नमस्कार मंडळी....

विनोद हा कुठे हि कसा ही होतो. त्याला वेळ काळ स्थळ काही लागत नाही. पण मला विचारलं कि विनोद कुठे होतो तर मी सांगेन माझ्या आयुष्यात... कसा होतो तर दणक्यात... वेळ तर विचारूच नका कारण त्याच टाईम फिक्स नसतं पक्का संधी साधू आहे!!!

मला ज्या गोष्टी आवडतात त्या मला कधी मिळाल्या नाहीत आणि ज्या मिळाल्या त्या मला कधी जमल्याच नाही.... पटवून घेणं मला आवडत नाही आणि दुसऱ्याला पटवून देणं मला जमत नाही.... अशी आहे मी!!

मी कुमारी गायत्री अनिरुद्ध राजवाडे. राहणार मुंबई. पदवी शिक्षण प्राप्त करून नुकतीच कामावर रूजू झाली. आयुष्यात पहिल्यांदा मनासारखं घडत होतं. इतकी आनंदात होती मी... पण म्हणाले ना विनोद हा संधी साधू आहे... आनंद भरभरून जगून पण नाही दिला मेल्याने!! देवाने बहुतेक विनोदच माझ्या आयुष्यात माझा लाईफ पार्टनर म्हणून दिला असावा... लहानपणापासून सोबत आहे... या विनोदापेक्षा एखादा विनोद नावाचा मुलगा तरी द्यायचा आयुष्यात!!! असो!!!!

घरच्यांनी लगेच लग्नाची घाई चालू केली माझी. शिक्षण झालं आहे ना मग आता स्थळ बघूया असं म्हणाले!!!

तशी मी दिसायला सुंदर आहे... आता स्वतःची स्तुती स्वतः कशी करणार ना पण तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते. माझं रंग गव्हाळ... म्हणजे नाही गोरा नाही काळा!! नाकी डोळी छान... असे घरचे म्हणतात. उंची साडेपाच फुट... केस मानेपर्यंतच... थोडे कर्ली... भुवया कधी कोरल्या नाहीत म्हणून थोड्या जाडसर पण रेखीव बरं का... कानात नेहमी छोट्याशा रिंगा गळ्यात एक चेन!!! बस एवढाच काय तो साज शृंगार माझा!! चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात शांतता हे माझं मीच म्हणते बरं का!!

तर अशी आहे पण सगळंच ओके कसं असेल ना कमी काहीतरी असतेच तशी माझ्यात पण आहे ती म्हणजे बोलताना अडखळते... स्पष्ट आणि लवकर बोलता येत नाही मला... पण मनात खूप बोलते प्रसंगी शिव्या पण देते मनातल्या मनात.... पण कोणाचा काही बोलण्याचा कधी माझ्यावर किंवा माझ्या करिअरवर परिणाम नाही झाला!!!

शिक्षण झालं तसं घरच्यांनी लगेच लगीनघाई सुरू केली..‌ माझा बायोडेटा सगळीकडे पाठवला. नातेवाईक ना सांगून झाले. विवाह मंडळात नावनोंदणी केली... राहिल साहिल मला दुसऱ्यांच्या लग्नात नटूनथटून घेऊन पण गेले.

मला हे अजिबात पटत नव्हते पण सांगता ही येत नव्हते. आमचं कुटुंब तसं खूप हसत खेळत राहणार. मी मोठी नंतर एक बहिण (मनवा) आणि मग एक भाऊ (किरण). वडील एअरपोर्ट ला कामाला आणि आई गृहिणी. छोटंसं पण गोंडस असा परिवार आमचा.

बाकीच्या घरात वडील कडक शिस्तीचे आणि आई प्रेमळ असते पण आमच्या या घरात आई म्हणजे सौ. राजलक्ष्मी अनिरुद्ध राजवाडे खूपच कडक शिस्तीच्या आणि वडील प्रेमळ. आईसमोर कोणाचं काही चालत नाही. पप्पाचं पण नाही!!!

लग्नाचं मम्मीनी फारच मनावर घेतलं होतं त्यामुळे तीला विरोध करणं इम्पॉसिबल!!! तरीही एकदा हिंमत करून मम्मीशी बोलायचं मी ठरवलं!!

संध्याकाळची वेळ होती. आज मला सुट्टी होती त्यामुळे दिवसभर मी विचार केला मम्मीशी कसं बोलायचं मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव केली. मम्मी किचन मध्ये रात्रीच्या स्वयंपाकच बघत होती. तीला बघून आधीच मनात धडकी भरली. अन्नपूर्णा देवी कधी दुर्गा रूप धारण करतील आणि माझा उध्दार करतील सांगता येत नाही... बोलण्या आधी जरा मस्का पॉलिश करावी लागणार बहुतेक.... मी किचन मध्ये गेले आणि मम्मीला प्रेमाने हाक मारली...

" मम्मे... मी काय करू का मदत???"

त्यावर आमच्या पुज्य मातोश्रीने एक जळजळीत कटाक्ष टाकला आमच्यावर.... बस काळजात त्याच वेळी धस्स झालं... आज काय काम होत नाही आपलं असं वाटलं... वेळ चुकली की मीच चुकली ते काय समजलं नाही मला!!!

" काय झालं मम्मे... अशी काय बघतेय???"

" नाही म्हटलं...‌ आज दिवस कुठं उजाडला सुट्टीच्या दिवशी राणीसरकार स्वतः स्वयंपाकघरात प्रकट झालात ते हि निमंत्रण नसताना???" मम्मी म्हणाली.

आयला इज्जतीचा पार भाजीपाला केला मम्मीने राव... पण काय करणार महत्त्वाचे बोलायचं म्हणजे समोरच्या पार्टीच गपगुमान ऐकून घ्यावं लागतं मग समोरच्याने पार वाट लावली तरी चेहरा हसरा ठेवावा लागतो.

" असं काही नाही मम्मी... कंटाळा आला बसून म्हणून विचारले काही करू का म्हणून.. पण तुला नको असेल मदत तर मी जाते."

" ओय गाऊ थांब... जे बोलायचं आहे ते बोल आणि मग जा... तुला आज नाही ओळखत मी. बोल काय बोलायचं आहे तुला??"

झोका वरती जाताना अचानक रस्सी तुटावी आणि दणदिशी खाली आपटावं अशी अवस्था माझी झाली.... पण ठरवलं तर ठरवलं.. बोलायचं म्हणजे बोलायचं. एक दिर्घ श्वास घेतला आणि म्हणाले...

" मम्मी... आताच लग्न का करायचं. आताशी कामाला लागले आहे थोडं कमवू दे... जरा इंन्जोय पण करू दे की"

त्यावर टिपीकल आई प्रमाणे तीने उत्तर दिले..." अगं... गाऊ... आम्ही काय लगेच लग्न लावणार आहोत का? वयात लग्न झालं तर सगळं नीट होतं. मुलींच्या जातीनं जपून राहावं. सगळ्या गोष्टी वेळेत व्हायला हव्यात ना. आणि आम्ही काय कोणाच्या ही गळ्यात नाही बांधणार तुला. नीट सगळं बघून तुला पसंत पडलं तर बघूया. नुसतं पोरं बघायला वर्ष दिड वर्ष जाईल. तोपर्यंत घे तुला काय कमवून घ्यायचं ते."

आता यावर मी काय बोलणार ना!! विषय संपला तिथेच. आई ती आई असते. उगाच नाही अख्खं घर बांधून ठेवत ती. गोड बोलून सगळं स्वतःच्या मनासारखं करून घेते ती अशी!

मम्मीने ऐकलं नाही... शेवटचा उपाय म्हणून पप्पांना मस्का मी लावायला गेले. पप्पा नुकतेच कामावरून आले होते. फ्रेश होऊन पेपर वाचत बसले होते. त्याचा मुड बघून मी त्याच्यांशी बोलायला गेले. तसे पप्पा चांगले शांत असतात पण चिडले रागावले तर शंकराचा अवतार धारण करतात. मम्मीला सोडून कोणालाच ऐकत नाही त्यावेळी ते... अर्थात... शंकर पार्वती समोर नेहमी भोळा सांभच राहणार ना!! पार्वती कालिकामातेच दुसरं रूप ना!!! तर वेळ न दवडता मी पप्पा शेजारी बसले आणि बोलू लागले...

" पप्पा... ऐका ना... "

" बोल ना बेटा.."

" मम्मी ला सांगा ना... काय घाई आहे माझ्या लग्नाची.. करू ना आपण नंतर"

" नंतर कधी बेटा.."

" नंतर चार पाच वर्षांनी..."

या वाक्यावर पप्पानी एक नजर माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले...

" गाऊ... तुझ्या आईच लग्न झालं तेव्हा ती अठरा वर्षाची होती... कायद्याने लग्नाचं वय तेव्हा अठरा पूर्ण असावे होतं... आता ती वयोमर्यादा एकवीस वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आता बाळा... तुझं वय तेवीस वर्षे आहे.... मुलगा पसंत पडेपर्यंत एक दोन वर्षे जातील मग झाली ना तुझी चारपाच वर्षे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या मम्मीच्या विरोधात याबाबतीत तरी मी काही जाणार नाही."

यावर आता मी काय बोलणार... नशीबावर सगळं सोडून होईल ते बघावे अशी अवस्था माझी झाली...

झालं.... आता बघण्याचा कार्यक्रम होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही..

तुम्ही पण या माझ्या बघण्याच्या कार्यक्रमाला!!!


Hello buddies....

हि माझी पहिली कथा आहे....

छोटीशी आहे... माझा पहिला अनुभव आहे

माणुस हळूहळू शिकतो आता हे वाक्य मला किती लागू होत मला माहित नाही.

नक्की वाचा... वाचत रहा... आणि कमेंट करून पण सांगा!!!!

धन्यवाद


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy