Niranjan Niranjan

Comedy Drama Horror

3  

Niranjan Niranjan

Comedy Drama Horror

विचित्र - भाग दोन

विचित्र - भाग दोन

5 mins
279


तो माणूस पुढे सांगू लागला, “आपण आता एक खेळ खेळणार आहोत. वेगवेगळ्या करामती करून मी तुम्हाला हसवायचा प्रयत्न करेन. जर तुम्ही हसलात तर मार खाल. तुम्हाला बडवायला खास तयारी केलीय मी. जरा उजवीकडे पाहा.” असे बोलून तो माणूस मिश्किल हसला. नाम्या आणि मोहनने उजवीकडे मान वळवली तसा त्यांच्या आंगावर सर्रकन काटा आला. काही अंतरावर दोन पैलवान हातात सागवानी दांडूक घेऊन उभे होते. नाम्या आणि मोहनने पाहताच ते दोघेही क्रूरपणे हसले. 

बुटका माणूस पुढे बोलू लागला, “तर आता तुम्हाला हसवण्यात मी कोणतीच कसर सोडणार नाही याची खात्री मी देतो. तुमच्याकडे पंधरा मिनिटे आहेत. या पंधरा मिनिटात जर तुम्ही गुडघे जमिनीवर नाही टेकलेत तर तुम्ही जिंकलात. आणि जर तुम्ही जिंकलात तर मी तुम्हाला खास बक्षीस देईन. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा.” एवढे बोलून तो माणूस थांबला. नाम्या आणि मोहनने एकमेकांकडे पाहिले व नकारार्थी मान हलवली. दोघांच्याही मनात अनेक प्रश्न होते पण ते बोलायच्या अवस्थेत नव्हते. काहीच प्रश्न नाही हे पाहून तो माणूस तिथून डाव्या बाजूच्या खोलीत गेला. नाम्याने एकवार त्या दोन पैलवानांकडे पाहिले व पंधरा मिनिटांचा वेळ जणू त्याला पंधरा तासांसारखा भासू लागला. त्याला शाळेत असताना अनेकदा शिक्षकांच्या हातून प्रसाद मिळाला होता. पण एवढी भीती कधीच वाटली नव्हती. वेड्याच्या हातातली काठी शहण्याच्या हातातल्या बंदुकीपेक्षा जास्त खतरनाक असते असं कुठेतरी वाचल्याचं त्याला आठवलं. मोहनचीही आवस्था नाम्यासारखीच झाली होती.

काही वेळातच तो माणूस दोन्ही हातात एक मोठा बॉक्स घेऊन आला. त्या बॉक्समध्ये वेगवेगळं साहित्य ठेवलं होतं. त्याने एकाला मुख्य दरवाजा लावायची हाताने खूण केली व एखादा कसलेला कलालार आपली कला प्रेक्षकांसमोर सादर करतो तशा आवेशात तो नाम्या आणि मोहन समोर उभा राहिला. त्याचा नुसता आवेश पाहूनच इतकावेळ तणावाखाली असलेला नाम्या खुदकन हासला. बुटक्या माणसाने हातावरील घड्याळाकडे बोट करून वेळ सुरू झाल्याची खूण केली. आता त्याने बॉक्स मधुन एक जांभळ्या रंगाचा स्कार्फ व एक जुना टेप रेकॉर्डर काढला. टेप रेकॉर्डर मध्ये कॅसेट टाकून टेप सुरू केला. गाणं सुरू झालं. बुगडी माझी सांडली ग…..जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला.

गाण्याच्या तालावर तो वेडा वाकडा नाचू लागला. त्याचा नाच पाहून नाम्याची हसून हसून पुरेवाट झाली. मोहन मात्र प्रयत्न पूर्वक हसू रोखण्याचा प्रयत्न करत होता. पाठीवर दांडकं आदळताच नाम्या वेदनेने कळवळला. घरात नव्हते तेव्हा बाबा, माझा मझवर कुठला ताबा. वेड्याचा नाच अजूनही सुरूच होता. ते पाहून नाम्या पुन्हा हसू लागला. पाठ अजूनही दुखत होती पण काही केल्या हसू थांबत नव्हतं. आता तर मोहन ही हसायला लागला. दोघेही एकमेकांकडे पाहून अजूनच जोरात हसू लागले. दोघांच्याही पाठीत एकच वेळी दांडकं आदळलं तसं दोघेही वेदनेने विव्हळले. दोघांनाही विव्हळताना पाहून वेडा अजूनच चेकाळला व अजून बेभान होऊन नाचु लागला. गाणं एकदाचं संपलं. नाम्याची पाठ अजूनही दुखत होती. आता या वेड्याने समोर कसलेही चाळे केले तरी हसायचं नाही असा निश्चय नाम्याने केला. पाठीत मार बसल्यापासून मोहन ही हसायचा थांबला होता. 

आताशी चारच मिनिट संपले होते. म्हणजे अजूनही आकरा मिनिटांचा कालावधी बाकी होता. नाम्याची पाठ चांगलीच सुजली होती. वेडा पुन्हा डाव्या बाजूच्या खोलीत गेला. तो जाताच बाजूला उभ्या त्या दांडूकधाऱ्याला नाम्या म्हणाला, “मित्रा काहीही कर पण पाठीवर नको मारू. जाम दुखतय. हवतर पायांवर मार पण पाठीवर नको मारू.” दांडुकधरी काही बोलला नाही तो फक्त मान हलवून कुत्सित हासला. मोहन मात्र शांत उभा होता. त्यालाही वेदना होत होत्या पण त्याने आधीच मनाची तयारी केली होती. 

वेडा पुन्हा बाहेर आला. त्याच्या अंगावर एक फाटका बनियान व खाली चट्यापट्यांची रंगीबेरंगी बर्मुडा असा वेश होता. त्याने कानांवर दोन कुत्र्यांच्या कानांसारखे खोटे कान व मागे कंबरेला कुत्र्याची शेपटी लावली होती. त्याचा हा वेश पाहून क्षणात नाम्याच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलले पण कसंबसं त्याने स्वतःला हासण्यापासून रोखलं. बाजूला उभ्या मोहनकडे पाहायचं देखील धाडस त्याला झालं नाही. वेड्याने रेकॉर्डर मध्ये दुसरी कॅसेट टाकली व बटण दाबलं. गाणं सुरू झालं. गाण्याचे बोल इंग्रजी होते.

 Who let the dogs out! who who who who!

गाण्याच्या तालावर वेडा कुत्र्याच्या आवाजात भू भू भू असा ओरडू लागला. नाम्याचा संयम सुटला व तो वेड्यासारखा हसू लागला. याची जणू वाटच पाहत असल्याप्रमाणे दंडुकधारीने हातातील दांडका नाम्याच्या पोटरीवर आदळला. दणका इतका जोरात होता की नाम्या किंचाळलाच. हे पाहून वेडा अजूनच जोरात भुंकू लागला. मोहन सुद्धा मनात हसत होता पण त्याच्या चेहेऱ्यावरची रेघही हलली नव्हती. त्याचा स्वतःच्या मनावर जबरदस्त ताबा होता. 

एकदाचं गाणं संपलं. गाणं संपेपर्यंत नाम्या पुन्हा हासला नव्हता. ही वेड्यासाठी चिंतेची बाब होती. तो पुन्हा डाव्या बाजूच्या खोलीत गेला. त्याने घड्याळात पाहिले. अजून फक्त पाचंच मिनिटे बाकी होती. दोघेही अजूनही उभे होते. एवढ्या करामती करून देखील मोहन फक्त एकदाच हासला होता. तर नाम्या एवढा मार खाऊन देखील स्वतःच्या पायांवर उभा होता. दोघांपैकी एक तरी खाली पडायला हवा होता. नाहीतर हा वेड्यासाठी मोठा पराभव ठरला असता. पण काय करावं तेच त्याला सुचत नव्हतं. काहीही केलं तरी या दोघांपैकी कोणी पडेल अशी त्याला आशा वाटत नव्हती. पण तो एवढ्यात हर मानणार नव्हता. त्याने काहीतरी ठरवलं व अंगावरचे कपडे उतरवले. एखाद्या साधारण माणसासारखे शर्ट आणि पँट असे साधे कपडे आंगावर चढवले व तो बाहेर आला व नाम्या व मोहन समोर उभा ठाकला. आता हा वेडा नागडा जरी समोर आला तरी हसायचं नाही असं नाम्याने ठरवलं होतं. पण हा वेडा साध्या कपड्यात येईल असं त्याला किंचितही वाटलं नव्हतं. पण हे या वेड्याचं काहीतरी नाटक असणार असं मोहन आणि नाम्यालाही वाटत होतं. 

वेडा आता नाम्यासमोर येऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव दिसत नव्हते. चेहेरा अगदी गंभीर होता. तो मान वर करून नाम्याच्या डोळ्यात पाहू लागला. नाम्या आता चांगला निवांत झाला होता. आता फक्त तीन मिनिटे बाकी होती. “मी तुला एक जोक सांगतो.” असे नाम्याला म्हणून वेडा जोक सांगु लागला. “एका जंगलात वाघ आणि कुत्रा एकमेकाचे चांगले मित्र होते. वाघ कुत्र्याला रोज एक जोक सांगायचा. पण कुत्रा इतका गंभीर होता की तो कधीच हसायचा नाही. एक दिवस वाघ चिडला व तो कुत्र्याला म्हणाला, आता जर तू माझ्या जोकला हासला नाहीस तर मी तुला खाऊन टाकेन.” एवढे बोलून वेडयाने पँटच्या खिशात हात घालून एक वस्तू बाहेर काढली. ती वस्तू पाहताच नाम्याला जोकचा अर्थ समजला व तो मोठमोठ्याने हसायला लागला. मोहनला सुद्धा जोक समजला व तोही हसायला लागला. दंडुकाधाऱ्यानी बडवायच्या आधीच नाम्या आणि मोहनने गुढगे टेकले. अजूनही एक मिनिटांचा वेळ बाकी होता. वेड्याने एकवार दोघांकडे विजयी मुद्रेने पाहिले व हातातील पिस्तूल पुन्हा पँटच्या खिशात ठेवले.

क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy