Sarita Sawant Bhosale

Inspirational Others

2  

Sarita Sawant Bhosale

Inspirational Others

आहे मी सौंदर्यवेडी.जगूद्या मला

आहे मी सौंदर्यवेडी.जगूद्या मला

5 mins
762


सौम्या घरात असूनही हातात पेन काही पेपर चेक करत बसली होती...आईने जरा मोठ्या आवाजातच विचारले,"काय ग हा पसारा? घरात आधीच फार कमी वेळ असतेस त्यात पण हे काम घेऊन बसलेस??" 

सौम्या.- "अग दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नवीन वर्षाच्या मुहूर्तावर म्हणजे गुढीपाडव्याला ngo कडून महिलांसाठी काही कार्यक्रम आयोजित केलेत ना त्याचीच तयारी चालू आहे".-

आई - हो का...आता यावर्षी काय नवीन ठरवलंय तुमच्या ngo ने??  

सौम्या - हो यावर्षी नवीन आणि वेगळं आहे कायतरी...आई यावर्षी आम्ही फॅशन शो आयोजित केलाय तोही पतीनिधनानंतर एकाकी जीवन जगणाऱ्या आणि एकाकी लढाई लढणाऱ्या स्त्रियांसाठी. 

आई - काय?? सरळ सरळ मग विधवांसाठी फॅशन शो आहे असं म्हणना..तू शब्द वेगळे वापरून त्यांची ओळख मिटणार आहे का?? आणि तुझं डोकं आहे का ग ठिकाणावर... या स्त्रियांना समारंभातही कोण स्थान देत नाही आणि तुम्ही तर रॅम्पवर चालवणार म्हणतेस त्यांना..बरं तुम्ही ठरवलं पण कोणी सहभागी व्हायला तयार तर हवं ना?? या स्त्रिया नाहीत येत पुढे. बघ माझं ऐकशील तर वेगळा कायतरी कार्यक्रम ठेवा.

सौम्या - माझं डोकं ठिकाणावरच आहे आई..तू जरा तुझे विचार बदल. या स्त्रियांना समोर यायची इच्छा तर असते पण आपला समाज त्यांना येऊ देत नाही. माझी रेश्मा नावाची मैत्रीण जिचा नवरा जाऊन दोन तीन वर्ष झाली.. परवा कोणत्यातरी एका वृत्तपत्राकडून आयोजित केलेल्या सौंदर्यवती फॅशन शोची जाहिरात बघत असतानाच ती बोलली ,"फार इच्छा होती ग मला यात सहभागी व्हायची..माझा नवरा असता तर आता आनंदाने गेलेही असते पण आता इथून पुढे मनात असूनही ते कधीच शक्य नाही."

सुंदरता असूनही आता नसण्यातच जमा आहे." नितळ चेहऱ्याची,गोरीपान, घारे डोळे असलेली रेश्मा कॉलेजपासून प्रत्येक ब्युटी काँटेस्ट मध्ये भाग घेत आलेली.. बुद्धीनेही ती तेवढीच हुशार...सगळ्याच स्पर्धेत हिरीरीने भाग घ्यायची आणि जिंकायचीही पण आज फक्त तिच्यावर नवरा गेल्याचा शिक्का बसला म्हणून ती या जगापासून अलिप्त झाली. साधं कोणत्या चांगल्या दिवशी किंवा सणाला नटावस वाटलं, आरशात जरी पहावंस वाटलं तरी पाप करतोय की काय अस तिला वाटतं... तिच्यासारख्या उभं आयुष्य पुढे असलेल्या प्रत्येक स्त्रीला वाटतं... का??? तर या समाजाने चालवत आणलेल्या बुरसटलेल्या परंपरांमुळेच. रेश्माच्या डोळयांतल पाणी पाहिलं आणि ठरवलं यावर्षी या स्त्रियांच्या चेहऱ्यावर मी हसू आणणार...त्यांच्यातलं सौंदर्य त्यांच्यासोबतच जगासमोरही आणणार..तुझी इच्छा झाली तर तू येऊ शकतेस कार्यक्रमाला. सौम्या आणि आईचं बोलणं तिची आजी आतून ऐकत असते...काही वेळाने तिही बाहेर येऊन म्हणते, "सौम्या कुणी आलं नाही तरी मी नक्की येईन आणि मी सहभागी पण होईन..घे माझं पहिलं नाव लिहून". साठ वर्षाच्या आजीच्या तोंडून हे उदगार ऐकून सौम्याचा आत्मविश्वास वाढला. सौम्याने आजीचं नाव लिहून घेतलं आणि तिचा आशीर्वाद घेऊन जोमाने तयारीला लागली.   सौम्या आणि तिच्या सहकाऱ्यांना जरा धास्ती होती की या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया खरंच तयार होतील का.?? त्यांच्या भोवती नियमांचं,रुढींच,अंधश्रद्धाच,परंपरेचं एक कुंपण समाजाने बांधून ठेवलंय ते कुंपण तोडून त्या बाहेर पडतील का?? पण फॅशन शो मध्ये सहभागी होण्यासाठी पन्नासच्या वर जेव्हा नावे आली तेव्हा सौम्याला खूपच आनंद झाला..या स्त्रिया मनातला आवाज ऐकून हळूहळू कुंपण तोडू पाहतायत याचीच ही प्रचिती होती. सौम्याने सहभागींची संख्या पाहता कार्यक्रम एक दिवसाचा न ठेवता दोन दिवसांचा केला. कोणालाच तिला नाराज करायचं नव्हतं.      

छान रोषणाई, हसरे चेहरे, रंगीबेरंगी वेशभूषा आणि सकारात्मक विचार अशा उत्साहात कार्यक्रम सुरू झाला. महिला सबलीकरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या मोठ्या दिग्गज मंडळींना परीक्षक म्हणून आमंत्रित केलं गेलं होतं. सगळ्या सहभागी स्त्रियांच्या चेहऱ्यावर मनापासून उमटलेला आनंद ओसंडून वाहत होता. परंपरांचे पाश तोडत या स्त्रिया आत्मविश्वासाने हसत स्टेज वर चालत होत्या..रॅम्प वॉक करत होत्या. जितक्या आत्मविश्वासाने त्यांनी वॉक केला तितक्याच आत्मविश्वासाने आणि कुशाग्र बुद्धीने परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही त्यांनी दिली. आज बऱ्याच वर्षांनी त्या पिंजऱ्यातुन बाहेर येऊन स्वतःच्या पंखांच्या बळावर उडत आहेत असंच वाटत होतं. तशा सगळ्यांनीच प्रेक्षक आणि परीक्षकाची मनं जिंकली होती पण नियमाप्रमाणे तीन विजेते नेमले गेले. या विजेत्यांमध्ये रेश्मा आणि सौम्याच्या साठ वर्षांच्या आजीचीही वर्णी लागली.     रेश्माचे घारे डोळे आज पुन्हा पाणावले होते पण आनंदाने. "आजपर्यंत आरशात पाहिलं पण ते कदाचित सगळं ठीक ठाक आहे की नाही हे तपासण्या साठीच..पण नवरा गेल्यानंतर आज पहिल्यांदा आरशात मी स्वतःस बघत होते..या रंगीबेरंगी कपड्यांत,या दागिन्यांत,हातातल्या बांगड्यात,या गुलाबी चेहऱ्यात मी आज मलाच निरखत होते. कितीतरी वर्षांनी आज मी मलाच पुन्हा नव्याने भेटत होते.आयुष्याचा जोडीदार गेला याचं दुःख होतच पण समाजाने विधवा म्हणून दुर्लक्षित सारखी जी वागणूक द्यायला सुरू केली त्याने मन अजुन खचल. मलाही नटण्याची,मेकअपची,नवीन साड्या नेसायची खूप आवड होती...सुंदर दिसण्याची आवड होती पण नवरा गेल्यानंतर ही सौंदर्याची आवड मनातच दाबून टाकावी लागली. पण सौम्यामुळे पुन्हा एकदा या "सौंदर्यसम्राज्ञी" कार्यक्रमात भाग घेता आला आणि जाणीव झाली की माझी अशी स्वतःची ओळख आहे..माझं स्वतःच विश्व आहे...मला सुंदर दिसण्याचा, सुंदर राहण्याचा हक्क आहे...लोक याला 'सौंदर्याचे वेड' म्हणतील पण माझा तो अधिकार आहे आणि यापुढे मी माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी जगणार." रेश्माने व्यक्त केलेल्या तिच्या भावनांवर टाळ्यांचा कडकडाट झाला. जणू सगळ्या स्त्रियांच्या मनातील कथाच तिने मांडली होती.     

सौम्याच्या आजींनीही आवर्जून बोलायला माईक हातात घेतला, "माझं वय साठ..लग्न अठराव्या वर्षीच झालं..'मी संसार माझा रेखीते' म्हणत मी संसारात मग्न झालेले..संसारातून सुट्टी घेऊन थोडं स्वतःसाठी जगावं म्हंटल त्या वयात म्हणजे माझे वय पन्नास असेल तेव्हा आमचे यजमान एकटीला इथे सोडून गेले. त्या दिवसापासून मी फक्त पांढरी साडी नाहीतर फार फिकट रंगाच्याच साड्या नेसत आले....सण, समारंभ, शुभ कार्ये यात बाहेरही आणि घरातही कधीच सहभाग घेतला नाही. एक विधवा म्हणून अपरिहार्य जगणं जगत होते..खरंतर हा देह फक्त जिवंत होता...तो जगत तर नव्हताच. खूपदा वाटलं तोडावी ही बंधने आणि जगावं आधीसारखं स्वतःला आवडतं तसंच..पण या बंधनांची दोर इतकी मजबूत आहे की ती तोडायची धडाडी करताच आली नाही कधी. त्यादिवशी सौम्याचा हा अनोखा उपक्रम ऐकला आणि ठरवलं हीच एक संधी जिथे मनातले सगळे मळभ झटकून नवीन सुरुवात होऊ शकते. आज दहा वर्षांनी मी ही भडक रंगाची पैठणी नेसली..पदरावरचे मोर मनात थुईथुई नाचू लागले. इतक्या वर्षांनी गळयात दागिने चढवले,नाकात नथ सजली...हातात रंगीबेरंगी बांगड्या वाजल्या..पायात पैंजण रुणझुणले.. कपाळावर ठसठशीत चंद्रकोर चमकली. मी जिवंत असतानाच मला पुन्हा असं नटायचं होतं.. शेवटचा क्षण यायच्या आधीच स्वतःच सौंदर्य आरशात मनापासून न्याहाळायचं होतं.   

सौंदर्य हिरव्या पालवीतही असतं आणि पिवळ्या पर्णातही... सौंदर्य पिसारा फुललेल्या मोरात तसं काळ्या दिसणाऱ्या कावळ्यातही...सौंदर्य सुगंध पसरवणाऱ्या चाफ्यात तसं असुवासिक अबोली आणि सदाफुलीतही. सौंदर्य स्वयंपाक घरात अभिमानाने मिरवणाऱ्या स्त्री मध्ये तेच देवाजवळ नंदादीप लावणाऱ्या स्त्रीमध्येही. आम्हाला या सौंदर्यापासून दूर ठेवलं जातं.. घरातील एक अडगळीतली जागा देऊन आमच्या आचार,विचारांच्या सौंदर्यालाही जळमटे निर्माण केली जातात. न केलेल्या चुकीची शिक्षा भोगत आम्हीही अंतर्बाह्य कुरूप होत जातो. आज खूप वर्षांनी या कार्यक्रमामुळे स्वतःला सौंदर्यसम्राज्ञी म्हणून बघता आलं..सौंदर्य आमच्या मनात आहे,विचारांत आहे,बुद्धीत आहे...दुर्लक्षित स्त्री म्हणून न पाहता तुम्ही तितक्याच सुंदर नजरेने आमचं मनाचं सौंदर्यही बघा आणि आमचाही सन्मान करा हीच एक विनंती. आजपासून पुन्हा आरशासोबतच जोडलेलं नातं शेवटपर्यंत टिकून ठेवणार. तुमच्या भाषेतला तो नट्टापट्टा, लिपस्टीक, काजळ यांच्याशी सलगी करणार...सौंदर्याची अतूट मैत्री करणार.मी स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगणार. विधवा किंवा लाचार नाही तर 'सौंदर्यवेडी' म्हणून जगण्यात आनंद मिळेल मला."  आजींच्या या वाक्याने सगळ्याच जणी म्हणाल्या,"हो आहे मी सौंदर्यवेडी..जगुद्या मलाही". सुंदर मनाच्या आणि निरागस हास्याच्या सौंदर्यतेने नटलेला हा कार्यक्रम पाहून सौम्याच्या आईला सौम्याचा आणि सासूबाईंचाही अभिमान वाटत होता. ..................       

प्रत्येक स्त्रीला इथे सूंदर दिसण्याचा,राहण्याचा हक्क आहे. एका व्यक्तीच्या जाण्याने तिच्या मनाचं सौंदर्यही हिरावून घेऊ नका... सौंदर्यवेडी किताब तिच्याकडून हिसकावू नका. कथा आवडल्यास नक्की लाईक करा..याबाबतीत तुमची मतेही नक्की कळवा. कथा नावासहितच शेअर केली जावी ही विनंती. कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव.                           


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational