Meera Mahendrakar

Others

3.4  

Meera Mahendrakar

Others

आजोळ माझं गाव

आजोळ माझं गाव

4 mins
63


आठवणीच्या कप्प्यात जमवलेलं एकमेव असं नाव

 नेहमी आनंद वाटणार आजोळ माझं गाव


      लहानपणी उन्हाळी सुट्ट्या लागल्या की नेहमी बाबांच्या (वडिलांच्या) गावी जाण्याचा बेत असायचा आजी आजोबांचे वास्तव्य असणारे खेड्यातले ते दिवस अजूनही न विसरता येणार आहे माझ्या गावाचे नाव लोहारी सावंगा नरखेड तालुक्यातलं एक छोटस गाव.

       पहाटेच आमची स्वारी उठून गावी जाण्याच्या तयारीत असायची कारण उत्साहच असा संचारून जायचा की, पावलं नकळत एसटी स्टँड कडे वळायची पूर्वी गावाकडे जाण्यासाठी एकमेव काय ती एकच एसटी असायची ती जर चुकली तर सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच एसटी मिळायची. आता मात्र भरमसाठ सोयी झाल्या आहे गावाकडे जाण्याचा पण मात्र जाणे क्वचित झाले आहे.

  आम्ही चार छोटे भावंड व आई-बाबा वेळेतच एसटी स्टँडवर पोहोचत असायचो आणि मग एसटी आली तशी जागा पकडण्यासाठी एकच धावपळ उडायची. त्यावेळी तर काही लोक आपली बारकी पोर खिडकीतून एसटीत आत सरकवायची.जागा पकडण्याची त्यांची ती अनोखी तयारी असायची. कसेबसे बसता येईल अशी जागा करून एसटीचा प्रवास सुरू व्हायचा त्याकाळी गर्दीतच काय तो प्रवासाचा आनंद लुटायचा शहर ओलांडून एसटी भरधाव गावाच्या दिशेने निघायची. थोड्याच वेळात थंडी आणि ताजी हवा खिडकीतून आत येऊ लागली की गावात कडे पोहोचल्याची जाणीव व्हायची. भलतीस काय गंमत आणि गोडी असायची गावी पोहोचण्याची त्यावेळी उत्सुकता शिगेला लागायची.

 काही वेळातच एसटी गावाच्या वेशी पर्यंत पोहोचायची. गावाच्या वेशी पर्यंतच एसटी आम्हाला सोडून पुढे दुसऱ्या गावी निघून जायची. मग काय तर, मातीची ती पायवाट धरून आम्ही भावंड नाचतच गावी निघायचो. छोटा हमरस्ता चालतांना चेहऱ्यावर भलताच आनंद असायचा पुढे छोटी छोटी कौलारू तर काही झोपडी सारखी घरे दिसू लागली की चेहऱ्यावरचा आनंद ओठावर यायचा. गावातला रस्ता आधीच छोटा त्यात गाई म्हशी घरासमोर बांधल्या असायच्या, त्यामुळे बेतानेच ओलांडून ओलांडून गल्लीतूनच वस्ती कडे लागायचो. आजी-आजी ओरडतच छोट्या गल्लीतून आम्ही भावंड पळतच घर गाठायचो 

  दारातच आतुरतेने वाट पाहणारे आजोबा दिसायचे. जेमतेम दोन खोलीचे कौलारू असणारे घरात पोहोचताच आल्हाददायक वाटायचे. उन्हाळी दिवस पण कौलाच्या घरातही कमालीचे थंड वाटायचे कसला कूलर व कसला पंखा काही आणि कशाचीच गरज नसायची. आजीने गाईच्या शेणाने सारवलेले अंगण व समोरची सुबक बैठक सुंदर असायची. त्या शेणाच्या सारवणी वरती आजी मोठ्या प्रेमाने चुन्याच्या नक्षी काढायची. घर सजावटी आणि सुंदरता जपण्याची तिच्या या कलेचे कौतुकच वाटायचे.

 आमच्या जाण्याने आजी-आजोबांचे ते छोटे कौलारू घर आनंदाने भरून जायचे. बैठकीसमोरच छोटेसे एक स्वयंपाक घर होते त्या स्वयंपाक घराच्या वरची थोडी कौले उघडी केलेली होती कारण चुलीचा धूर बाहेर जाण्यासाठी केलेला तो मार्ग होता चुलीवरच आजी आमच्या सगळ्यांसाठी स्वयंपाक करायची. स्वयंपाक घराच्या बाजूला एकीकडे मोरी होती समोरच मोठी चौकोनी पाण्याची टाकी होती आजीने तिला बाहेरून शेणाने सारून ठेवली होती व चुन्याचा वापर करून त्यावर फुले काढली होती. सवय असते कर्त्या हातांना कामाची, नीटनेटकेपणा जपण्याची. घराच्या मागच्या बाजूने गाई बैलांचा गोठा होता त्यात एक सुरेख बैल जोडी होती शेतात आजोबांबरोबर ती नेहमी राबत असायची. 

   आजीच्या चुलीवरच्या स्वयंपाकात अशी अस्सल चव असायची की या जेवणाची सर अजूनही कोणत्याच पदार्थाला येत नाही. गरम गरम भाकरीची अशी तीव्र भूक लागायची की आम्हा भावंडाची जेवणासाठी स्पर्धा असायची 'कोण जास्ती जेवणार' यासाठी. अनोखी गंमत असायची बालपणाच्या हट्ट्यात आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद जपत तो वाढवण्यात, आई-बाबा पण आमच्या हट्टात साथ द्यायचे व आनंदाने उन्हाळी सुट्ट्या गावात घालवण्यासाठी आग्रही असायचे. 

 बाल वयातच आपोआप काही चांगल्या गोष्टींची किंमत कळून जायची. भावंडात राहून आपुलकी जपण्याचे संस्कार आपसूक लागायचे शिकवण्यासाठी शिकवणी नसली तरी, प्रात्यक्षिकरित्या आम्हाला गरजा आणि मिळकत, शेतकरी असणाऱ्या आजोबांच्या धान्याचा साठा सगळं बघायला मिळायचे आणि हेच तर दाखवायला आई-बाबा पण आम्हाला गावी घेऊन जायचे.

 रात्र झाली की रॉकेलची चिमणी पेटवून आजी बैठकीमध्ये उजेड करायची तुळशीजवळ अंगणात आणि मोरी जवळ छोटी मातीची पणती लावायची. विजेचे बल्ब गावामध्ये काही वर्षाने आले पण सुरुवातीचे रॉकेलच्या चिमणीच्या रुपातले रात्रीचे गावही आम्ही बालपणीच पाहिले.

  चुलीचा धूर जसा घरात पसरायचा तशी तशी कडाडून भूक लागायची खेळून खेळून दमलेल्या आम्हा लहानग्या भावंडांना मिळणारी गरम भाकरी आणि ठेचाही गोड लागायचा व जेवल्यावर आजोबांकडून गोष्ट ऐकून अशी गाठ झोप लागायची की आता अशी झोप लागणे स्वप्नच वाटते.

 दुसऱ्या दिवशी सकाळीच जाग यायची व शेतावर जाण्यासाठी बाबा व आजोबांची लगबग दिसायची. आजीच्या मागे लागून आम्हीही दुपारी शेतात जायचे ठरवत असू व आजीही आम्हाला घेऊन जायची. वावरात जायच्या आधी नदीवर घेऊन जाण्याचे आजीकडून आम्ही भावंडा कबूल करून घ्यायचो कारण दरवर्षी सारखा ठरलेला बेत असला तरी गावाकडे नदी बघण्याचे वेड कधीच जुने झाले नाही, नेहमी तो बघण्याचा हट्ट असायचा व आजीला तो पुरवावा लागायचा.

   गावाच्या अगदी शेवटच्या टोकावर मग डोंगर ओलांडून खाली गेल्यावर सुंदर अशी जाम नदी लागायची. एक सारखी सरळ खळखळ वाहणारी स्वच्छ पाण्याची नदी. नदी शेजारीच प्राचीन शिवाचे मंदिर होते काळा पाषाणांपासून बनवलेले भव्य दगडी बांधकाम आजकाल कुठेच पाहायला मिळत नाही. शिवाचे दर्शन मंदिरात घेतले की मन प्रसन्न वाटायचे. मनसोक्त नदीच्या पाण्यात खेळून झाल्यावर आजी पायवाटेनेच आम्हाला शेताकडे घेऊन जायची. वाटेत रस्त्यात बोर ,चिंचा वेचून वेचून खायचा आनंद सांगता येणार नाही आजी सोबत भर दुपारी पायवाटेने चालताना देखील ऊन जाणवत नव्हती कारण गावाकडली हवाच वेगळी असायची शेवटी एकदा वावरात पोचलो की आजोबांना घाम गाळताना बघायचो. 

   शेतात भली मोठी विहीर होती आणि लगतच संत्राच्या झाडांची आखीव शेती होती. बागायती शेती असली तरी भरपूर मेहनत घेऊन आजोबा त्यात उत्तम उत्पन्न घ्यायचे. मेहनत करण्याचे उत्तम उदाहरण शेतकरी खेरीज आजही कोणाकडे दिसणार नाही. भरपूर वेळ संत्राच्या बागांमध्ये फिरत दिवसभर संत्री खात मजेत घालवत होतो उन्हाळा ऋतू या शेतात अजिबात जाणवत नव्हता संध्याकाळी बैलगाडीत बसून सगळेच जण घराकडे परतत असू. असे कित्येक दिवस गावात मजेत घालवल्यानंतर शाळा सुरू होण्याच्या मार्गावर असताना गावाचा निरोप घेऊन व आठवणी घेऊन शहराकडे वापस यायचो

 आज गाव आहे ,शेती आहे, बैल जोडी आहे पण आजोबा नाहीत. गाव प्रगत झाला आहे विजेच्या सोयी, रस्त्यांच्या सोयी ,सिमेंटच्या घरांनी बनलेला आहे. प्रगती करणे चांगले असले तरी, आजी-आजोबांचे वास्तव्य नसणारे आजोळ असलेलं माझं गाव हरवल आहे. आता ती गंमत संपली आहे व आठवणीच्या कप्प्यात साठली आहे.


Rate this content
Log in