Krishna Shuchi

Horror Classics Thriller

3  

Krishna Shuchi

Horror Classics Thriller

अकल्पित! भाग ७

अकल्पित! भाग ७

7 mins
33


महत्त्वपूर्ण निवेदन :-


सदर कथेचा उद्देश हा निव्वळ शुद्ध-मनोरंजनासाठी असून त्याद्वारे समाजात कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा गैरसमज पसरविण्याचा लेखकाचा उद्देश नाही, हे कृपया वाचकांनी जाणावे.

कथेतील सर्व पात्रे, स्थळे आणि घटना या पूर्णतः काल्पनिक असून केवळ कथेची आवश्यकता म्हणून त्यांचा उपयोग करण्यात आलेला आहे, त्यांचा वास्तवातील कोणतीही जीवित किंवा मृत व्यक्ती, स्थळे अथवा घटना यांच्याशी संबंध नाही. तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

कथेचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव असून, लेखकाच्या परवानगीशिवाय सदर कथा-

१) अन्य व्यक्तीच्या अथवा व्यक्तीसमूहांच्या नावे प्रकाशित केल्यास,

२) गैर अथवा अनधिकृत वापर केल्यास,

३) अन्य प्रकाशनीय माध्यमांमार्फत प्रदर्शित केल्यास,

संबंधित व्यक्तीवर/व्यक्तीसमूहांवर अथवा संस्थेवर कठोर कार्यवाही करण्यात येईल याची कृपया वाचकांनी दखल घ्यावी, ही नम्र विनंती.


रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेल्या त्या बोक्याचं मुंडकं पाहून ड्रायव्हरचे आणि श्रीधरचे डोळे भीतीने पांढरे पडायची पाळी आली होती. चाकाच्या दुसऱ्या बाजूला पडलेलं त्याचं शरीर अजूनही तडफडत होतं... श्रीधरने कशीबशी आपली नजर त्या बोक्याच्या निष्प्राण देहावरून हटवली...

"अरे देवा, हा कसला अपशकून म्हणायचा !?..", अनाहूतपणे ड्रायव्हरच्या तोंडून शब्द बाहेर पडले. 

श्रीधरने त्याच्याकडे चमकून बघितलं. साध्या जनावराच्या मरणाला तो 'अपशकून' म्हणाला यापेक्षा जास्ती तो मराठीतून बोलला याचं श्रीधरला जास्त नवल वाटलं...


"मराठी येतं होय तुला..! मग मगाशी हिंदीतून का बोलत होतास ?", श्रीधरने हसत त्याला विचारलं. 

त्याने चमकून श्रीधरकडे बघितलं... 'इथं घटना घडली काय आणि यांना कशाची पडलीय तर मी मराठीत बोलतो याची...', वैतागून तो मनातल्या मनात म्हणाला. श्रीधरने बहुदा त्याच्या मनातला विचार ओळखला असावा...


"अरे एवढं काय घाबरायचं त्यात ? मांजरच तर मरून पडलंय... आणि आपण मुद्दाम थोडीच गाडी घातलीय त्याच्यावर !! एक्सिडेंटली घडलंय...", घडलेली घटना फारशी मनाला न लाऊन घेत श्रीधर म्हणाला. ते ऐकून ड्रायव्हर त्याच्याकडे विचित्र नजरेने बघू लागला. त्याची नजर थंड पडलेल्या त्या मांजराच्या मुंडक्याकडे गेली आणि खोबणीतून बाहेर आलेले ते डोळे आपल्याकडे क्रूर नजरेने बघत आहेत असा त्याला क्षणभर भास झाला. भीतीने त्याचं हृदय धडधडू लागलं. 


"चल निघू, एवढं काही झालं नाहीये... आपल्याला उशीर होतोय...", बेफिकिरपणे श्रीधर म्हणाला आणि गाडीत जाऊनही बसला. त्याला त्या ड्रायव्हरला उगाच घाबरलेलं बघून राग आला होता.

ड्रायव्हर बिचारा काय करणार ? त्यानेही गाडीत बसत गाडी सुरू केली आणि गावात प्रवेश केला... 

निपचित पडलेलं ते मांजरचं मुंडकं मात्र बेवारसपणे रस्त्यावर पडून राहिलं...!


दगडी कमानीत बांधकाम केलेली गावची वेस ओलांडून गाडी गावात शिरताच डोळ्यांचं पारणं फिटेल असा निसर्गरम्य देखावा श्रीधरला बघायला मिळाला. पाच-सात हजार लोकसंख्या असलेलं हे गाव म्हणजे निसर्गसंपन्नतेने बहरलं होतं. वेशीला लागूनच एक मुख्य रस्ता गावातून जात होता आणि त्याच्या दोन्ही बाजूंना हे अख्खं माणगाव वसलेलं होतं. गावात प्रवेश करणारे प्रवासी गावात न थांबता या मुख्य रस्त्याला लागून थेट पुढच्या गावच्या रस्त्याला लागू शकत होते. त्यामुळे इतर गावे आणि मुख्य नागपूर शहराला अगदी सहजपणे जोडणारा हा रस्ता म्हणजे माणगावच्या राजधानीचा जणू राजमार्गच होता...


या मुख्य रस्त्याला लागूनच गाडी गावात शिरली. वेशीपासून साधारण ५०० मीटर अंतरावरच एक भलं मोठं डेरेदार वडाचं झाड रस्त्याच्या कडेला दिमाखात उभं होतं. १५-२० फुट व्यास असलेला त्या वडाचा घेर मोठा दिमाखदार दिसत होता. झाडाखाली बांधलेल्या प्रशस्त पारावर गावातली चार-पाच म्हातारी खोडं घरातली जेवणं-खाणं उरकून निवांत गप्पा मारीत बसली होती...


माणगावची रचना खूप सुंदर होती. वेस ओलंडताच मुख्य रस्त्याने दोन्ही बाजूला दोन भागात विभागलेलं एक छोटंसं गांव म्हणजे माणगाव. गावाला लागूनच मणीचं जंगल या नावाने प्रसिद्ध असणारं एक खूप मोठ घनदाट असं जंगल विस्तारलेलं होतं. त्या जंगलाच्या सीमेवर गावाच्या बाजूला एक प्राचीन असं भैरोबाचं मंदिर उभं होतं. मंदिरातल्या गाभाऱ्यातली भैरवनाथाची जाज्वल्य मूर्ती बऱ्यापैकी जूनी होती. गावात दरवर्षी भैरवनाथची जत्रा भरायची अन् त्यावेळी देवाचं पूजन माणगावातल्या प्रतिष्ठित अन् जुन्या घराण्यांपैकी लोकांकडून केलं जायचं. बऱ्याच वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही गावाने तितक्याच श्रद्धेने अन् उत्साहाने टिकवून ठेवली होती.

कमी वस्तीचं गांव असलं तरी गावात बऱ्यापैकी नागरी विकास घडून आलेला होता. नुकतीच एक मुंबईची कन्स्ट्रक्शन कंपनी सरकारी टेंडर मिळवून गावात एक खूप मोठं रिसॉर्ट/पर्यटक निवास बांधायला सुरुवात करणार होती आणि त्याला कारणही तसंच होतं. भरगोस निसर्गसंपदा आणि गावरान देखाव्याचे सौंदर्य अनुभवायला शहरी लोकांना याहून सुंदर आणि मोक्याचे ठिकाण मिळणार नव्हते आणि त्यातच कंपनीचा तूफान नफा होता. खरेतर ह्या कंपनीच्या लोकांनी आधी जेव्हा गावात येऊन गावातल्या लोकांशी याविषयी चर्चा केली अन् त्याचं मत विचारलं तेव्हा सुरुवातीस गावकरी या शहरी लोकांच्या प्रस्तावाला नकार देऊ लागले पण कालांतराने गावाच्या संपन्नतेच्या सुरक्षिततेची हमी अन् गावाला या नवीन प्रकल्पातून यथोचित देऊ केलेला मोबदला बघून त्या मंडळींनी आपली नाराजी मागे घेतली.

मणीच्या जंगलाच्या सीमेपासून जवळच भैरवाच्या मंदिराच्या उजव्या बाजूस पसरलेल्या विस्तीर्ण जागेत काहीच दिवसात मग भव्य अन् सर्व सुखसोईंनी युक्त अश्या रेसॉर्टच्या उभारणीचं काम सुरू करण्यात येणार होतं. माणगावातली लोकं म्हणजे साधी-भोळी, काबाडकष्ट करून आपलं अन् आपल्या कुटुंबांचं पोट भरणारी अशी.. त्यात त्यांना ह्या शहरी लोकांचे व्यवहारी मनसुबे अन् आडाखे पाहून भलताच नवल वाटायचं. आयुष्यभर पैशाच्या मागे लागलेली अन् व्यवहारी दुनियेली ही शहरी लोकं आपल्या या छोट्याश्या गवत येऊन काय उपद्व्याप करतात याचंच त्यांना नवल वाटायचं. 


त्या वडाच्या पाराला मागे सोडून गाडी अजून पुढे आली. ड्रायवरला पत्ता माहीत असल्याने श्रीधरला कुठे थांबून विचारायची गरज पडली नाही. पाच दहा मिनिटे प्रवास करून गाडी एका धर्मशाळेपाशी उभी राहिली. श्रीधरने काचेतूनच बाहेर पाहून नाव वाचलं अन् बाहेर उतरला. 


"साहेब, तुम्ही पुढं व्हा, मी तुमचं समान आणतो.", ड्रायवर म्हणताच श्रीधर पुढे झाला. त्या दोन मजली धर्मशाळेच्या मुख्य दारातून तो आत आला. समोर प्रशात हॉल होता. त्याच्या एका बाजूला टेबलामागे एक इसम बसला होता. बहुदा धर्मशाळेचा केयेरटेकर किंवा व्यवस्था बघणार कुणी असावा. श्रीधर त्याच्यापाशी जाऊन उभा राहीला.


"नमस्कार, माझं नाव श्रीधर, पुण्याहून आलोय, माझ्या नावाने इथे एक खोली बुक करून ठेवली आहे का?", श्रीधरने सांगितलं. तसं त्या माणसाने आवाजाच्या दिशेने मान वर केली. 'मानूस दिसतं त शहरीच हाय' त्याच्या मनात विचार चमकला. तसंही हे रोजचाच झालं होतं. रोज गवत कोण ना कोण तरी शहरातली मंडळी उगवतच होती. नवीन रिसॉर्टच कामच इतक्या जोरात सुरू होतं, त्याचाच परिपाक...


"जी, तुम्ही ते मुमईच्या कंपनीचे साईब ना? हाय हाय, तुमच्या नावची खोली हाय, कालच आपलं मोकाशी साईब येऊन गेल्ते त्यांनी बुक्ड केली!", रुंद हसत त्याने सांगितलं अन् टेबलच्या ड्रॅावरमध्ये हात घालून जराशी खुडबुड करत १०२ नंबर असलेली चावी बाहेर काढत ती श्रीधरच्या हातावर ठेवली. 


"तुमची खोली वर हाय बरका पवन..", तो म्हणाला. 


"धन्यवाद" म्हणत श्रीधरने त्याच्या हातून चावी घेतली आणि तो जिना चढू लागला. जिना पार करताच एक रुंद असा पॅसेज लागला त्याच्या बाजूने सर्व खोल्या होत्या. श्रीधर प्रत्येक खोलीच्या दारावर रंगवलेले आकडे वाचत आपल्या १०२ क्रमांकाच्या खोलीसमोर उभा राहीला. दारचं कुलूप काढून दार उघडलं. आत येत त्याने समोर खोलीवर नजर फिरवली. एक पलंग, वर भिंतीला पंखा, एक मध्यम आकाराचं कपाट, शेजारी पलंग, भिंतीला टांगलेला आरसा अन् पलंगाच्या वरच भिंतीत उघडणारी २ झडपांची खिडकी. साधीसुधी रचना. श्रीधरने एक श्वास घेत सोडला. 'वेलकम श्रीधर!' स्वतशीच म्हणत तो आत आला. तोपर्यंत त्याचा ड्रायवर सामान घेऊन यालाच होता. सामान खोलीच्या आत ठेवून श्रीधरचा निरोप घेऊन तो निघून गेला. श्रीधरने शेजारच्या न्हाणीघरात जाऊन हाततोंड धुवून घेतले. भूक सपाटून लागली होती. तसाच तो खोलीचं दर कुलूप लाऊन खाली आला. खाली बसलेल्या त्या इसमाजवळ आला. 


"अं तुमचं नाव काय?... इथे जवळ कुठे हॉटेल किंवा मेस वागारे आहे का ?, जेवणाची सोय पाहीन म्हणतो..", श्रीधरने विचारलं.


"केशव नाव माझं, जी हाय की, हितंन भाईर पडला की कोपऱ्यावरच अक्काची खानावळ हाय !, जाऊन जेवून घ्या पावनं..", केशव म्हणाला. श्रीधरने त्याच्याकडे पाहून स्मित केलं अन् तो धर्मशाळेच्या बाहेर पडला. एक-दोन मिनिटं चालत जाताच त्याला बऱ्याच लोकांची ये जा, वर्दळ दिसून आली. तिथेच खानावळ असल्याचं त्याच्या लक्षात आलं पण तो जय रस्त्याने आला त्याच्या विरुद्ध दिशेला ती असल्याने येतांना मगाशी मात्र त्याला दिसली नव्हती.

जेवणाचीच वेळ होती त्यामुळे बरीच लोकं खानावळीत बसली होती. तिथलं एक रिकामं बाकडं बघून श्रीधर बसला. 'ऑर्डर' घ्यायला आलेल्या पोऱ्याला राईसप्लेटची ऑर्डर दिली. ऑर्डर मिळताच खांद्यावरचा टॉवेल सांभाळत तो पोरगा आत पळाला. श्रीधर आजूबाजूचा देखावा निरखून पाहत होता अन् गावतली लोकं त्याला निरखून पाहत होती. त्यांच्यासाठी आता हे नित्याचंच झालं होतं. शहरी माणसं येत, मंदिरापालिकडल्या कंपनीच्या तात्पुरत्या उभारलेल्या ऑफिसमध्ये जात अन् दोन दिवसांनी कामाची स्थिती पाहून परत आपापल्या शहराकडे निघून जात. मोठमोठ्या आलीशान गाड्यातले, ढेरपोटे श्रीमंत लोक, कंपनीची कामाची माणसं, जाहिरात करणाऱ्या कंपन्यांची लोकं अशी बरीच लोकं गाव नित्य पाहात होतं. त्यात त्यांना आता नवीन असं काही वाटत नव्हतं.

श्रीधरला त्यांची नजर कळली पण त्याने त्याकडे लक्ष दिलं नाही. एकाएकी त्याच्यासमोर एक तरुण येऊन बसला. काटकुळी अंगकाठी, काळा-सावळा वर्ण, उभा चेहरा, लालजर्द डोळे, फेंदारलेल्या नाकपूड्या अन् बेरकी नजर. तो नाम्या होता. समोर बसलेल्या श्रीधरकडे एकटक पाहत तो अचानक दात विचकून हसला. श्रीधर दचकला पण त्यानेही स्मित केलं. 


"मंडळी, गावात नवीन दिस्ता तूमी, कूटनं आलं म्हनायचं ?, पुणा-मुमईचे का ?", उगीच पुन्हा दात विचकत त्याने विचारलं. 


"मी पुण्याहून आलोय, ते रिसॉर्ट उभं राहत आहे ना गावात त्याच्याच कामसंदर्भात..", श्रीधरने सांगितलं.


"असं होय, तरीच म्हटलं.. "स्वतशीच म्हणत नाम्या सूचक असं हसला अन् लगेच उठून गेला. श्रीधर त्याच्याकडे बघतच राहिला. 


"श्याss काय विचित्र लोक असतात.. नुसत्या चौकश्या..!", श्रीधर मनातल्या मनात म्हणाला. जेवणाचं ताट पुढे आलं अन् श्रीधर त्यावर लगोलग तुटून पडला. पोट भरून जेवला. काऊंटरवर पैसे चुकते करत तो धर्मशाळेच्या रस्त्याला लागला. मगाशी त्याच्याकडे टकमक पाहणाऱ्यांची नजर एव्हाना आता सरावली होती.


श्रीधर खोलीमध्ये आला अन् कपडे बदलून पलंगावर पडला. प्रवासाने त्याचं अंग मोडून आलं होतं. काहीवेळ विश्रांती घ्यावी म्हणून तो पलंगावर सरळ होऊन झोपला. काही वेळ गेला अन् पडल्या पडल्या त्याच्या डोक्यात पुन्हा त्या अभद्र स्वप्नांचे विचार घोंगावू लागले. बंद डोळ्यांच्या आड स्वप्नात दिसलेली भेसूर दृश्यं नाचू लागली. ते जंगल तो भयानक सर्प, ते प्रेतात्मे.. 'सगळंच भयंकर होतं अन् त्याहून महत्वाचं म्हणजे खूपच खरं वाटत होतं.. इतकं, की हे स्वप्न नाहीच.!!', श्रीधर मनातल्या मनात विचार करत होता. 'त्यात नंतर ते भेटलेले डॉ. अग्निहोत्री, त्याचं ते बोलणं.. सगळंच विचित्र होतं.. नाही म्हणायला, त्यांनी आपली खूप विचारपूस वैगरे केली पण नंतरचं त्यांचं ते बोलणं.. 'मेडीकलच्या व्यतिरिक्त आणखी काही... 'दुसरी बाजू' वैगरे.. सगळंच कोड्यात टाकणारं होतं..' श्रीधर मनात विचार करत होता अन् विचार करता करता काही वेळाने, शारीरिक अन् मानसिक श्रमांनी थकलेल्या त्याला गाढ झोप लागून गेली...



(क्रमशः)















Rate this content
Log in

Similar marathi story from Horror