Smita Murali

Inspirational

3  

Smita Murali

Inspirational

बालकथा

बालकथा

3 mins
1.7K


राहूल घरातल्या सगळ्यांचाच खूप लाडका मुलगा होता. राहूलच्या घरी आजी, आजोबा, काका, काकी, आई आणि बाबा राहत होते.घरातला सर्वात लहान सदस्य राहूल हा एकटाच होता. त्यामुळे न मागताच खेळणी, कपडे, खाऊ त्याच्यापुढे हजर व्हायचे. राहुलचे मित्र त्याच्या घरी खेळायला यायचे.पण राहुलला मैदानी खेळापेक्षा व्हिडिओ गेम, मोबाईल गेम फार आवडायचे.

कधी काही हट्ट करुन किंवा काही कारणांनी राहूल रडू लागला कि घरातली मंडळी आईस्क्रीम किंवा आणखी काही आवडता खाऊ घेवून त्याच्यापुढे हजर असायचे. राहूलला सतत काहीना काही खात रहायची

सवय होती.त्याला टिव्ही पाहत कुरकुरे, चिप्स खायला आवडायचे. पिझ्झा, बर्गर,पास्ता,न्युडल त्याला फारच आवडायचे. डब्यातही तो फास्टफूड घेवून जायचा. त्याचा डब्बा पाहून मित्र चेष्टा करायचे म्हणायचे, "अरे जाड्या,खूप फास्ट फूड खाशील तर फास्ट फास्ट वाढशील, मग ढब्बू ढोल, ढेरी गोल होवून बसेल बघ"!

असे चिडवून हसायचे. राहूलला वाईट वाटायचे.

राहूल शाळेवरुन आला कि व्हिडिओ गेम, टिव्ही सिनेमा, मोबाईल गेम खेळण्यात दंग व्हायचा. झोपण्याच्या वेळी मग त्याला शाळेचा अभ्यास आठवायचा. बाई रागातील म्हणून मग ओढून ताणून अभ्यास करायचा. डोळ्यात झोप दाटलेली असे पण तरीही तसाच अभ्यास पुर्ण करायचा. आईने किती वेळा

समजावलं तरीही तो नेहमी तसेच वागायचा. मग सकाळी जाग येत नसे. डोळ्यात झोप घेवून शाळा गाठायचा. शाळेत कधी कधी डुलकी यायची. मित्र त्याची मग टर्र उडवायचे. तेवढ्या पुरतेच राहूलला वाईट वाटायचे. पण पुन्हा तो तसाच वागायचा. आज आईने

डब्यात त्याच्या आवडीचे बटाटे वडे दिले होते. पण मित्रांच्या भितीने आज त्याने डब्बा बाहेर काढला नाही.

राहूल शाळेतून घरी परतला. पाहतो तर आज त्याची आवडती पुजा मावशी मुंबईहून आलेली दिसली.ती डाॅक्टर होती.सुट्ट्या मिळाल्यामुळे ती राहुलच्या घरी आलेली होती. तिला पाहून राहूल पळतच गेला व पुजा मावशीला बिलगला. मावशीही खूष झाली. दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. तितक्यात आई आली. ती म्हणाली, "अरे राहुल, आज डब्बा का नाही खाल्ला?वडे आवडले नाहीत का? " राहूलने मित्रांची सर्व हकिकत आईला व मावशीला सांगितली.मावशीच्या लक्षात सर्व आले. रात्रीचे जेवण आवरल्यावर सगळे हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले होते. मावशी आपला लॅपटॉप घेवून आली. तिने फास्टफूडचे साईड इफेक्ट व गंभीर आजार होण्याची शक्यता याबाबत मार्गदर्शनपर व्हीडीओ लावला. तो पाहून सारेच थक्क झाले. राहूलही मनातून घाबरला.तेंव्हाच मावशीने आरोग्यासाठी हितकारक आहाराबाबत मार्गदर्शन करणारा व्हिडिओ लावला. सगळ्यांना आपली चूक कळाली. त्या दिवशी राहूल मावशीशी गप्पा मारताना तिला विचारु लागला कि "मावशी हे सगळं खरं आहे का? ,खरं असेल तर इथून पुढे मी हे सारं नाही खाणार! "मावशी म्हणाली, "हो राहूल, मी तुला छान छान पदार्थ करुन देईन, चालेल ना? " राहूल आनंदाने हो म्हणाला. आता राहुल मावशीने बनविलेली उसळ, चपाती भाजी, सॅलड आवडीने खावू लागला. सकाळी मावशीसोबत लवकर

उठायचा,फिरायला जायचा, व्यायाम करायचा. त्यालाही वाटायचं आपल्याला कोणी जाड्या, सुस्त आळशी म्हणू नये. दिवसभर मावशीसोबत, मित्रांसोबत

खेळायलाही तो जावू लागला. संध्याकाळी मावशी त्याचा अभ्यास घ्यायची. रात्रीचं जेवणं आटोपून मावशीनी सांगितलेली गोष्ट ऐकत झोपी जायचा. सकाळीही वेळेत लवकर उठायचा. आता त्याला शाळेत झोपही यायची नाही. रोज असा दिनक्रम सुरु होता.राहूलचा समजूतदारपणा पाहून घरात सगळ्यांनाच आनंद झाला. मावशीने मस्तच राहूलवर जादू केली.आता त्याला शाळेतही कोणी चिडवत नव्हते. अभ्यास नियमित केल्यामुळे त्याची प्रगतीही छान झाली.

आज शाळेत मुल्यवर्धन तासिकेला 'माझ्या

आवडीचा व नावडीचा पदार्थ' विषयावर बाईंनी चर्चा करायला सांगितली. राहूलने आज आवडते पदार्थ

सांगितले. नावडते पदार्थ व ते नावडण्याची कारणे सांगितली. बाईंनी राहुलचे खूप कौतूक केले. राहूलने बाईंना मावशीबद्दल सर्व काही सांगितले. बाईंनी राहूलच्या मावशीचेही कौतूक केले.

शाळेत पालकांची मुलांबद्दल नेहमीच तक्रार यायची. मुलं घरी जेवत नाहीत. कुरकुरे, मॅगीचे हट्ट करतात. बाईंना एक कल्पना सुचली, त्यांनी शाळेत पालक परिषद आयोजित केली व या कार्यक्रमासाठी

प्रमुख पाहुण्या म्हणून राहूलच्या मावशीला निमंत्रण दिले. मावशींनी पालकपरिषदेत पालकांना आहाराबाबत

सखोल मार्गदर्शन केले. पालकांनीही अनेक प्रश्न व शंका विचारुन सक्रिय सहभाग घेतला. शाळेने मावशींचा सत्कार केला.

अशा प्रकारे वेळीच मावशीने राहुलला योग्य वळण लावले व राहूलने आरोग्याचा धडा गिरवला. राहुल आता सुदृढ, अभ्यासू, समंजस व उत्साही बनला. सगळ्यांच्या कौतूकाला पात्र ठरला. चला तर मित्रांनो, आपणही जेवण्याच्या, झोपण्याच्या, उठण्याच्या, अभ्यास व व्यायामाच्या चांगल्या सवयी शिकूया. राहूलप्रमाणे निरोगी बनण्यासाठी आता आरोग्याचे धडे गिरवुया!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational