Rahul Ingole

Tragedy Others

4  

Rahul Ingole

Tragedy Others

बिऱ्हाड

बिऱ्हाड

7 mins
463


दिवस उजाडत होता. कुठेतरी कोंबड्याचा आरवण्याचा आवाज येत होता. कुणी आपल्या शेताकडे निघाले होते. गावातल्या ग्रामपंचायतच्या आजूबाजूच्या काही पानटपऱ्या व हॉटेलवाले आपापल्या हॉटेल उघडण्याच्या तयारीत होते. तर कोणी हातावर तंबाखू चोळत चोळत बगलेत पाण्याची बाटली धरुन परसाकडं निघाला होता. कोंडबा व लक्ष्मी हे बाहेरगावी कामाला गेलेलं जोडपं फाट्यावर एसटी तुन उतरून गावात पायीपायी येत होतं. त्यांच्या पाठीमागं त्यांचे मन्या व ज्योती हे दोन लेकरं पण चालत होते. जणू हे जोडपं अंतरा बरोबर अंधार पण कापत गावात प्रवेश करत होतं.

एका भल्यामोठ्या पोत्यात बांधलेलं सामानाचं गाठोडं घेऊन कोंडबा सर्वात पुढे चालत होता. त्याच्या मागं मागं साडीच्या फडक्यात बांधलेलं कपड्यांचं गाठोडं डोक्यावर व एक दीड वर्षाची मुलगी काखेत घेऊन लक्ष्मी चालत होती. आपल्या मायबापाच्या मागं मागं ज्योती व मन्या हातात एक एक थैली व डोक्यावर छोटे-छोटे गाठोडं घेऊन अनवाणी पायाने चालत होते. गावाच्या जवळ जवळ येता सकाळी-सकाळी परसाकडं व शेताकडं येणारे-जाणारे कोंडबाच्या या परिवाराकडं पहात आपल्या वाटेनं निघून जायचे. कुणीतर उभं राहून कोंडबाच्या पायापासून डोक्यापर्यंत निरीक्षण करायचं. आपल्या अशा बिर्हाडधारी विचित्र अवताराला पाहून 'लोक काय म्हणतील' याची चिंता कोंडबाला बिलकुल नव्हती. कारण त्याच्याच गावातील कोणी त्याला ओळखत नव्हतं. कारण वीस वर्षांपूर्वी गाव सोडले ला कोंडबा आज गावात परतला होता. गावात प्रवेश करताच ग्रामपंचायतच्या ओट्यावर बसलेल्या एका रिकामटेकड्या म्हाताऱ्यानं कोंडबाला विचारलं, "काय पाव्हणं कंच्या गावचं?"

"कंच्या म्हणजी याच गावचं." कोंडबानं उत्तर दिलं. "पण आम्ही नाही ओळखलं राव!" म्हाताऱ्याने आणखी चौकसपणे विचारलं. अव आण्णा कसं वळखणार वीस वर्षा खाली गावातून बाहेर गेलतो तो आजच आलो. मी संपाचा कोंडू". कोंडबानं काहीसं संतापतच उत्तर दिलं.

"बरं बरं इतक्या दिवस कुठे व्हता र कोंडू?" म्हाताऱ्याने कपाळावर हात लावत म्हटलं.

" हे बघा अण्णा डोक्यावरचं घरी टेकून आल्यावर सांगलं तर जमल का, मी कुठून झालो ते." कोंडबा बोलत-बोलत घराकडे निघाला. कोंडबा व लक्ष्मी आता परिवारासह घराजवळ पोहोचले होते. कोंडबानं आपलं गाठोडं आवारात टेकवलं, तसे लक्ष्मी व लेकरांनी पण आपापले गाठोडे टेकून त्यावरच बैठक मारली. कोंडबाचे घर म्हणजे विटा मातीत बांधलेलं. कोंडबा परिवारासह बाहेरगावी राहत असल्यामुळे घराची पार दुरावस्था झाली होती. 'कंपाउंड वॉल' म्हणून लावलेली काटेरी कुपाटी मोडकळीस आली होती. आवाराच्या मोकळ्या जागेत वाढलेले खुरटं गवत उन्हामुळे जळून गेलं होतं. अशा आवारा कडं कोंडबा चिंताग्रस्त होऊन पहात होता. वीट भट्टी अचानक बंद पडल्यामुळे कोंडबा सर्व बिर्‍हाड घेऊन घरी परतला होता. फाट्यापासून पायी चालत आल्यामुळे ज्योती व मन्याचे पाय दुखत होते. तसेच त्यांना भूक पण लागली होती. लक्ष्मी आपल्या तान्ह्या मुलीला दूध पाजू लागली. कोंडबा त्याने डोक्यावर आणलेल्या गाठोडयाला टेकून बीडी फुंकत होता. 'आता गावात तर आलो, पण काम लागायला हवं.' अशा विचारांच्या तंद्रीत असतानाच "बा मला आता भूक लागलिया." मन्याच्या या केविलवाण्या बोलण्याने कोंडबा विचार चक्रातून बाहेर आला. 

"हे बघ मन्या, तुही माय आता चहा करिल, मग रातची भाकरी तू आणि ज्योति खा." मन्याला जवळ घेत म्हणाला.

आपल्या मुलांना भूक लागलेली पाहून लक्ष्मी उठली. एका थैलीतून एक छोटी कळशी काढून ज्योतीला म्हणाली, "ज्योती एक कळशी आण पाण्याची." कळशी भरून ज्योतीने पाणी आणल्यावर लक्ष्मीने चहा केला. काल सकाळी केलेल्या भाकरी मन्या व ज्योतीने चहासोबत खाऊन आवारात असलेल्या बाभळीच्या झाडाखाली चटई टाकून बसले. लक्ष्मी व कोंडबाने चहा घेऊन घराच्या साफसफाईला सुरुवात केली. दुपारपर्यंत घराची साफसफाई करण्यातच त्यांचा दिवस गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच कोंडबा लवकर उठला. 2-4 बालपणीचे मित्र सोडले, तर कोंडबाच्या ओळखीचे गावात जास्त कोणी नव्हते. म्हणून मित्रांच्या ओळखीनेच गावात काम शोधण्यासाठी कोंडबा नामदेवच्या घरी गेला.

" नामा, अरं कुठं आहेस तू?"

कोंडबाने नामदेवला बाहेरूनच आवाज दिला. रात्री केलेल्या मटणात सकाळी केलेला भात खात बसलेला नामदेव ताट लपवत म्हणाला, "कोण? या घरात."

आपल्या पायातील फाटका बूट वोसरी बाहेर काढून कोंडबा आत गेला. 

"कोण कोंडबा, मला वाटलं पाटीलच आला म्हणून हे मटणाचं ताट लपवून ठेवलं होतं."

नामदेव च्या अगदी जवळ जाऊन बसलेल्या कोंडबाच्या खांद्यावर हात ठेवत नामदेव म्हणाला.

"अरे नामा, कालपासून मी आलोया. तुला शोधायलो पण तूव्हा काही पत्ताच नाही." कोंडबा म्हणाला.

"बरं हे घे ऊलसक जेवण कर." मटणाचं ताट कोंडबा पुढे सरकवत नामदेव म्हणाला.

ते काय हाय माहित आहे का, मी गावात राहतच नाही बघ. पाटलाकडं सालगडी म्हणून राहिलो. त्यामुळे तुही व मही काल भेट झाली नाही."

नामदेव जेवत जेवत बोलत होता. दोघांची जेवणं झाल्यावर दोघं जवळच्या खाटेवर गप्पा मारत बसले.

" बरं असं अचानक गावाकडे बिर्‍हाड घेऊन कसं काय येणं केलं?" बनियनच्या खिशातून तंबाखू काढून चोळत नामदेव बोलला.

अरे आम्ही काम करत असलेली वीट भट्टी मालकांनी पाणी नसल्यामुळं बंद करून काम करणाऱ्या सर्व जोड्यांना तात्पुरतं गावी पाठवलं बघ. होता नव्हता थोडाफार पैसा येण्यासाठी लागला. आता जवळ दमडी पण नाही. आणि त्यातल्या त्यात वीस वर्षापासून गावात नसल्यामुळे मला कोणी वळखना बघ. "म्हणजी तुला पैशाची गरज आहे तर!" नामदेव म्हणाला. अरं नामा मला कामाची गरज हाय. तुझ्या वळखीनं कुठं तरी बघ मह्यासाठी काम." असं म्हणत कोंडबा उठला. 

"आमच्या शेजारच्या शेतमालकाला विचारतो बघ." खुंटीला अडकवलेलं शर्ट अंगात अडकवत नामदेव म्हणाला.

एक-दोन दिवसात कोंडबा गावातील एका मोठ्या जमीनदाराकडे सालगडी म्हणून राहिला. नामदेव प्रमाणे घरून कामावर येणे-जाणे कोंडबाला शक्य नव्हते. कारण त्या शेतमालकाचे शेत गावापासून भरपूर दूर होते. म्हणून कोंडबाला शेत वस्तीवर परिवारासह राहण्याशिवाय पर्याय नव्हता. लक्ष्मी व दोघा मुलांनी ओस पडलेल्या घराला घरपण आणले होते. लक्ष्मीने सर्व भिंतींना सारवण घेतले होते. सर्व आवार झाडून साफ केली होती. गाठोडयामध्ये बांधून आणलेलं सामान लक्ष्मी व ज्योती मन्याने घरात व्यवस्थित लावले होते. अंगणात सडा टाकल्यामुळे सर्वत्र प्रसन्न वाटत होते. शेजारच्या मुलांसोबत पण ज्योती व मन्याची ओळख झाली होती. कोंडबाने पंधरा-वीस दिवस घरुन शेतावर कामावर येणे जाणे केले. परंतु सकाळी चार वाजता उठणे, दिवसभर काम करणे, व रात्री उशिरा म्हणजे दहा वाजता घरी येणे, यात कोंडबाची भरपूर यातायात व्हायची. ज्योती व मन्यां यांना आता करमत होते. ते दिवसभर हसून खेळून रात्री शांतपणे झोपी जायचे.

पण त्यांना कुठं माहित होतं की बापाची किती धावपळ होत आहे ते. लक्ष्मी सुद्धा एक एक करून वस्तू जमवु लागली. त्यामुळे विटा मातीचे घर सुद्धा एखाद्या राजमहाला सारखे भासू लागले. एक दिवस कोंडबाला असाच रात्री येण्यास उशीर झाला. त्यामुळे ज्योती व मन्या बापाची वाट पाहून झोपी गेले. "काय वं एवढा उशीर असतो व्हय?" कोंडबा येताच लक्ष्मी त्यावर फनकारली. दिवसभर काम करून सात-आठ किलोमीटर पायी चालत आलेल्या कोंडबाला थकवा आला होता.

"गेलतो मसणात." हात-पाय धुता धुता कोंडबा म्हणाला.

अवं पण झालं काय, ते तरी सांगा". लक्ष्मी शांत होत म्हणाली.

"अगं, संध्याकाळी सात साडेसात पर्यंत मालक काम घ्यायलाय, त्यानंतर पायी यायला दोन तीन तास सहज लागतात. उशीर होणार नाही तर काय होईल?" लक्ष्मीने वाटीत दिलेल्या चहा घेत कोंडबा बोलत होता. "आता बस झालं." डोक्याचा रुमाल उशाला घेत चूलीच्या जवळच अंग टाकत कोंडबा म्हणाला. "म्हणजी, काय बस झालं?"

कोबीची भाजी व ज्वारीची भाकरीचे ताट वाढत लक्ष्मी म्हणाली.

"अगं दिवसभर काम केल्यावर एक पाऊल सुद्धा टाकायचं अवसान राहत नाही पण सात-आठ किलोमीटर पायी चालत मोठ्या कष्टाने यावं लागतं. जेवण करत करत कोंडबा बोलत होता. 

"मग तुमचा काय विचार हाय?" भांडी आवरत लक्ष्मी म्हणाली. "मला वाटायलय, तुम्हाला पण घेऊन जावं आखाड्यावर. नको रोज रोज जाणे-येणे."

चुलीतली विस्तवाची काडी घेऊन बीडी पेटवत कोंडबा म्हणाला. आवं आता पुढं पोरांना शाळेत टाकलं असतं. इतक्या लांबून येतील का ज्योती व मन्या शाळंत?" लक्ष्मी म्हणाली.

"अगं ती काय एखाद्या कलेक्टरची लेकर हाईत व्हय? सालगड्याची लेकरं हायीत सालगडयाची! येतील आखाड्याहुन शाळंत." बीड्यांचे झुरके मारत मोठ्या ऐटीत कोंडबा सालगडयाची 'महती' सांगत होता.

"बरं पहा तुमच्या इच्चारानं".

खाटेवर टाकलेली दीड वर्षाची पोरगी चुळबुळ करत असलेली पाहून तिच्या जवळ जाऊन शांत करत लक्ष्मी म्हणाली. दिवसभराच्या कामानं कोंडबाला कधी झोप लागली, कळलेच नाही. तो तिथंच चुलीजवळ झोपी गेला.

सकाळी लवकर उठून कोंडबा कामावर गेला. दुपारपर्यंत काम करून शेतात असलेली पडकी झोपडी कोंडबाने तुराट्या व पऱ्हाट्या लावून चांगल्या प्रकारे तयार केली. संध्याकाळी घरी येतानाच कोंडबाने 'बिऱ्हाड' आखाड्यावर नेण्यासाठी बैलगाडी आणली होती. बैलगाडी येताच ज्योती व मन्याने मोठ्या आनंदाने गाडीत बसून उड्या मारू लागले. 'आपण किती श्रीमंत आहोत' असेच जणू ते आपल्या मित्रांना सांगत होते. पण त्यांना कुठं माहित होतं की ह्या बैलगाडीत आपले बिर्‍हाड पुन्हा उचलून शेत वस्तीवर जाणार आहे ते. दुसऱ्या दिवशी सकाळीच लक्ष्मीने स्वयंपाक केला. गाडीत आणलेली कडब्याची पेंडी बैलांना टाकून कोंडबा पसार्याची बांधा बूंध करू लागला.

तशी लक्ष्मी पण कपडे एका गाठोड्यात, बारीक सारीक सामान एका गाठोड्यात, भरण्यात मग्न होती. संसाराचे भांडे, डब्बे, असे 1-1 सामान लक्ष्मी बैलगाडीत नेऊन टेकवत होती. भांड्यांचा आवाज ऐकून ज्योती व मन्या पण जागे झाले. लक्ष्मीने आपल्या शेतात राहायला जायचे असे सांगितल्यानंतर त्यांनी पण लहान-सहान सामान बैलगाडीत टाकण्यास सुरुवात केली. बैलगाडीत सामान, व सामानाच्या वर दोन खाटा पालथ्या बांधल्या होत्या. आता सकाळचे दहा वाजले होते. सर्वांनी जेवणं केली. दिवस आता वर वर येत होता. ऊन चमकू लागलं. अशा उन्हात कोंडबाचं बिऱ्हाड शेत वस्तीवर निघालं होतं. सामानावीना रिकामं घर भकास वाटू लागलं. लक्ष्मीने कुलपं लावली. कोंडबानं बैलगाडी जुंपली. ज्योती व मन्या मोठ्या आनंदानं बैलगाडीवर बांधलेल्या त्या खाटेवर जाऊन बसले. तशी लक्ष्मी पण तान्ह्या पोरीला घेऊन पालथ्या खाटेवर जाऊन बसली. बैल घुंगरमाळांचा आवाज करत वाट चालू लागले. मन्या व ज्योती या प्रवासाचा आनंद घेऊ लागले. कोंडबा बैलगाडी हाकत होता. लक्ष्मी तान्ह्या पोरीला ऊन लागू नये म्हणून पदराखाली घेऊन दूध पाजत होती. 'काय आपले हे जीवन! ाज येथं संसार ,तर उद्या तिथं संसार. कितीही सामानाची उठाठेव. त्यातच मुलांच्या भविष्याची चिंता. आपल्यासारखेच त्यांच्यावर बिर्हाड उचलण्याची वेळ तर नाही ना येणार?' अशा विचारातच बैलगाडी शेत वस्तीवर कधी पोहोचली ते कोंडबाला कळलेच नाही. लक्ष्मी व कोंडबाने या झोपडी रुपी घरात पुन्हा संसार थाटला. पुढे शाळा चालू झाल्यानंतर ज्योती व मन्या यांचे नाव शाळेत दाखल केले. ज्योती व मन्या रोज आखाडयावरून गावातल्या शाळेत येऊ लागले. लक्ष्मी पण शेतातच लागेल ते काम करून संसाराला हातभार लावू लागली. कोंडबाचं कुटुंब आता कष्टाची भाकर मोठ्या आनंदाने खाऊ लागलं.

पण लवकरच वीट भट्टी चालू होणार असल्याचे कोंडबाला कळाले. वीटभट्टी मालकांने अगोदर पैसे दिले होते, ते सर्व पैसे फिटेपर्यंत तरी कोंडबाला वीटभट्टीवर जावंच लागणार होतं. कोंडबाला आता पुन्हा बिराड उचलावंच लागणार होतं.

आता तर संसाराच्या बिर्हाडाबरोबर मुलांच्या भविष्याचं बिर्हाड पण कोंडबाच्या पाठीवर होतं. कोंडबा विचारांच्या समुद्रात आकंठ बुडाला होता पण कोणत्याही परिस्थितीत बिर्हाड तर उचलावंच लागणार होतं.

लेखक-राहूल रतन इंगोले, मु.पो.पुसेगाव, ता.सेनगाव, जि.हिंगोली.

सम्पर्क-9767666148


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy