Radhika Joshi

Drama

3  

Radhika Joshi

Drama

बंध

बंध

8 mins
191


अव्यक्त भावना..अव्यक्त स्वप्नं,

अव्यक्त माझ्यातील मी,

साहवेना नात्यांची झूल..साहवेना

मुखवट्याआडचे रुप,

तोडले पाश..तोडले बंध,

मी मुक्त.. स्वछंद.. बेधुंद.

हे वाचून सोहम सुन्न झाला होता.

वेदविहार अपार्टमेंटची टेरेस..वेळ साधारण पाचची.. गोलाकार मांडलेल्या खुर्च्यांवर बिल्डिंगमधले रहिवासी बसलेले..वातावरणात प्रचंड ताण..या सर्वांसमोर येरझारा घालणारे इन्स्पेक्टर राणे.

घडलेली घटनाच इतकी अतर्क्य होती, की सगळेजण पूर्णपणे हादरुन गेले होते. पहिल्या मजल्यावर रहाणाऱ्या सोनियाचा कोणीतरी गळा दाबून खून केला होता. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार काल रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली असावी. सोनियाकडे घरकाम करणारी हिराबाई, आज सकाळी आठ वाजता आली आणि तिने स्वतःजवळच्या किल्लीने दार उघडले. तिला अंदाज असणं शक्यच नव्हतं. त्यामुळे ती बेधडक आत शिरली आणि बेडरुममध्ये सोनियाला जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेली पाहून काहीतरी विपरीत घडलं असल्याची जाणीव होऊन ती प्रचंड घाबरली आणि फ्लॅटबाहेर येऊन ओरडायला लागली. आवाज ऐकून शेजारच्या फ्लॅटमधल्या सोमणकाकू बाहेर आल्या. हिराबाईची बोबडी वळली होती. तिने नुसतं सोनियाच्या दरवाज्याकडे बोट दाखवलं. काकूपण जरा घाबरतच आत गेल्या आणि आतील दृश्य पाहून त्यांचीपण बोलती बंद झाली. त्यांनी खालच्या मजल्यावरच्या पेंडसे काकांना बोलवून घेतलं. त्यांचा मुलगा केतनही वर आला. सोनियाची अवस्था पाहून सगळेच गर्भगळीत झाले.

केतनने प्रसंगावधान दाखवून पोलिसांना फोन केला. त्या रुममधील कुठल्याही गोष्टीला हात लावू नका असं बजावून सगळ्यांना सांगितलं. त्याने सराईताप्रमाणे सगळी सूत्रं स्वतःच्या ताब्यात घेऊन टाकली होती. हळूहळू बिल्डिंगमधले सगळेच तिथे जमले.

थोड्याच वेळात पोलिसपार्टी तिथे येऊन थडकली. रीतसर सगळी चौकशी सुरु झाली. अतिशय नावाजलेले इन्स्पेक्टर राणे आले होते. केतन पुढे-पुढे करत राणेंना काही समजत नसावं अश्या थाटात त्यांना काय घडलंय आणि ते कसं घडलं असावं हे समजावून सांगत होता.

थोडा वेळ राणेंनी सहन केलं आणि मग अश्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं की तो वरमला आणि गप्प बसला. राणेंचं सूक्ष्म अवलोकन चालू होतं. त्यांच्या तीक्ष्ण नजरेतून काही सुटणं शक्य नव्हतं. अचानक त्यांचा चेहरा गंभीर झाला. सोनियाच्या गळ्याभोवती, ज्या खुणा होत्या त्यावरुन त्यांनी हात फिरवला. बाजूच्या टेबलवरची पर्स उघडून आतल्या वस्तू बारकाईने तपासल्या. तिचा मोबाईल चालू करुन बघितला. तो पासवर्ड प्रोटेक्टेड असल्यामुळे त्यांना बघता आला नाही. मग त्यांनी सबइन्स्पेक्टर पवारांना

डेडबॉडीजवळ बोलवून हलक्या आवाजात काही सूचना केल्या. पवार " येस सर" म्हणत बाहेर गेल्यावर ते हॉलमध्ये आले. त्यांची टीम उरलेलं रुटीन इन्व्हेस्टिगेशन पुरं करायच्या मागे लागली. बिल्डिंगमधले सगळे आता हॉलमध्ये जमले होते. त्यांना ढोबळ प्रश्न विचारेपर्यंत पवार फिंगरप्रिंट मशीन घेऊन आले. त्यांच्याबरोबर मोबाईल अनलॉकिंग टूल वापरुन मोबाईल अनलॉक करणारा एक्स्पर्ट आला होता. बिल्डिंगमधल्या सगळ्यांच्या हातांच्या प्रिंट्स घेऊन होईपर्यंत मोबाईल अनलॉक झाला. काही जणांनी प्रिंट्स घेताना तणतण केली, ज्याचा राणेंवर शून्य परिणाम झाला.

राणेंनी सोनियाच्या सेलफोनमधलं काही चॅट

वाचलं आणि ते सुन्न झाले. त्यांची शंका बरोबर होती तर. केसला वेगळाच टर्न मिळाला होता. त्यांच्या डोक्यात एक प्लॅन आकार घेऊ लागला. त्यासाठी चौकशीसत्रात जरा नाट्यमयता आणावी लागणार होती.

त्यानुसार आत्ता सगळे टेरेसवर जमले होते.

राणेंनी बोलायला सुरुवात केली,

"वेदविहारमध्ये घडलेली आजची घटना अतिशय निंदनीय आहे. सोनिया गेली पाच वर्षं इथे रहात होती. त्यामुळे तिचा स्वभाव, एकूण चालचलन कसं होतं, हे मला जाणून घ्यायचं आहे. तिचा खुनी शोधण्याच्या कामात मला ह्या माहितीचा उपयोग होईल. तुमचा कोणावर संशय असेल तर तेही सांगा. सगळ्यांना एकत्र बोलावण्यामागे माझा हा उद्देश आहे की आमची लाईन ऑफ ऍक्शन खुल्लमखुल्ला सर्वांसमोर ठेवावी. आणि हो, खरा खुनी सापडेपर्यंत सध्या तुम्ही सगळेच संशयितांच्या यादीत आहात. त्यामुळे आम्हाला इन्फॉर्म केल्याशिवाय हे शहर सोडून कुठेही जायचं नाही. हे ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. नाराजी तर ठळकपणे जाणवत होती. त्याकडे लक्ष न देता राणेंनी आपला पहिला मोर्चा सोनियाचे सख्खे शेजारी सोमण ह्यांच्याकडे वळवला.

"बाकीच्यांपेक्षा तुमचं आणि सोनियाचं जास्ती येणं-जाणं असणार, तर तुम्ही.."

त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत सोमणकाकू उसळून म्हणाल्या, "कुठलं काय? ती आपणहून तर कधी घरी बोलवत नव्हतीच, पण आम्ही कोणी गेलो तर दरवाजात थांबूनच बोलायची. आतसुध्दा कधी बोलावलं नाही. गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलायचं नाही, पण स्वतःच्या सौंदर्याचा आणि हुशारीचा फार गर्व होता तिला. या वर्षी ती डॉक्टर होणार होती ना. मी म्हणते, जगातली काय पहिली डॉक्टर होणार होती का ही? आणि देवाने जरा बरं रुप दिलं, त्यात तिचा काय ग्रेटनेस?"

बुटक्या, स्थूल आणि काहीश्या कुरुप सोमणकाकूंना तिच्याबद्दल एवढी असूया का? हे राण्यांच्या लगेच लक्षात आलं. त्यांनी विचारलं," इथे ती रहायला आल्यापासूनच अशी अंतर राखून वागत होती का?"

"अं..नाही," काकू थोडा विचार करत म्हणाल्या," सुरुवातीला छान गप्पा मारायची, घरी बोलवायची, काय काय नवीन पदार्थ खिलवायची. पण वर्षाच्या आतच हे सगळं बंद झालं. का कोणास ठाऊक, ती एकदम अलिप्तपणे वागायला लागली."

राणेंनी मध्येच विचारलं, "सोमणकाका, तुमचा सोनियाच्या बाबतीतला काय अनुभव?"

सोमणकाका जरासे गडबडून म्हणाले, "छे! मी कशाला बोलायला जातोय तिच्याशी. क्वचित जिन्यात भेटली कधी तर दोन शब्दांची देवाणघेवाण. बास! यापलीकडे खूप गप्पा मारल्याचं मला काही आठवत नाही."

"अच्छा! दोन शब्दांची देवाणघेवाण?

नीट आठवून बघा, अजून कसलीतरी देवाणघेवाण करण्याची ऑफर दिली होती तुम्ही तिला."

सोमणकाकू खवळल्या आणि ओरडल्या," काय म्हणायचंय तुम्हाला?

कसले गलिच्छ आणि बिनबुडाचे आरोप करताय तुम्ही ह्यांच्यावर?"

"बिनबुडाचे? तुमच्या ह्यांनाच विचारा. त्यांनी सोनियाबरोबर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. एकदा नाही, दोनदा, तेही पहिल्या वर्षभरातच. म्हणून तिचं वागणं अचानक बदललं होतं. केवळ तुमची बदनामी नको म्हणून ती गप्प बसली."

आता सोमणकाका बिथरले,

"तोंडाला येईल ते बरळू नका. काय पुरावा आहे तुमच्याकडे?"

"हा बघा पुरावा," असं म्हणून राणेंनी सोनियाच्या मोबाईलमधलं चॅट सर्वांना दाखवलं आणि पुढे म्हणाले, "हे वाचल्यावर सोमण जिथे कामाला आहेत त्या ऑफिसमध्ये मी दुपारी जाऊन चौकशी केली. केतनशी बोलताना मी त्यांच्या ऑफिसचं नाव काढून घेतलं होतं. तिथे मला समजलं, सोमण बायकांच्या बाबतीत असेच सैल वर्तनाचे आहेत. सोनियाला मात्र याचा खूप मानसिक त्रास झाला. ती इथे एकटी रहात होती त्यामुळे या दोघांना तिने आईवडिलांच्या जागी मानलं होतं. हे असे वागल्यावर ती पार कोलमडून गेली. तिच्याबरोबर मेडिकलला असणाऱ्या तिच्या क्लासमेटशी, सोहमशी केलेलं हे चॅट आहे.

त्याच्याबरोबर बऱ्याच मनातल्या गोष्टी तिने

शेअर केल्या आहेत. अजूनही बरंच काही आहे. सोनिया हाती येत नाही म्हंटल्यावर ह्यांनी उलटी तिची बदनामी बिल्डिंगभर करायला सुरुवात केली. तसंही तिच्या वयाच्या बिल्डिंगमधल्या बाकीच्या मुली तिचं सौंदर्य, धडाडी, तिला असणारं स्वातंत्र्य यामुळे तिच्यावर जळत होत्याच. पेंडसेंच्या शेजारी रहाणाऱ्या चार वर्षांच्या डॉलीचा मात्र तिच्यावर विलक्षण जीव होता.

बाय द वे, केतनच्या प्रेमात सोनिया आकंठ बुडाली होती हे तुम्हाला माहित असेलच."

"काय?" सर्वांच्याच तोंडून आश्चर्योदगार बाहेर पडले. सोमणकाकूंनी तर एक जळजळीत कटाक्ष केतनच्या दिशेने टाकला.

राणे पुढे म्हणाले, "मलाही हे चॅटवरुनच समजलं. सुरुवातीचं सोहमबरोबरचं चॅट वाचून मला असं वाटलं होतं की सोहम आणि सोनियाचं एकमेकांवर प्रेम आहे. पण पुढे तिने केतनविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्यात. त्यावरुन ती केतनवर प्रेम करत होती हे अगदीच स्पष्ट झालंय. सोहम मात्र तिच्यावर एकतर्फी आणि अगदी सच्च्या दिलाने अजूनही प्रेम करतोय असं दिसतंय.

आता, कालचा एक विलक्षण प्रसंग ऐका.

सोनिया कॉलेजमधून घरी येताना जिन्यात तिला डॉली भेटली. सवयीप्रमाणे हास्यविनोद झाले. पर्समधून चॉकलेट काढून तिला देत सोनिया म्हणाली, "घे, केतनने मला दिलं होतं. मी काही ते खाल्लं नाहीये. चॉकलेट म्हणजे तुझा अगदी विकपॉइंट आहे ना?"

डॉली म्हणाली, "म्हणजे? केतन तुलापण

सगळीकडे टच करतो? मला चॉकलेट दिलं की करतो तसं? कोणाला सांगायचं नाही असंही त्याने सांगितलंय. पण आता मी आईला सांगणार आहे. तो करतो ते मला आवडत नाही. आता मी त्याच्याकडून कधीच चॉकलेट घेणार नाही."

हा धक्का मात्र सोनियाच्या सहनशक्तीपलिकडचा होता. ज्याच्यावर तिने जीव तोडून प्रेम केलं होतं, पूर्ण विश्वास टाकला होता, तोच इतक्या नीच पातळीचा असेल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं.

त्याच नैराश्याच्या भरात तिने..... आत्महत्या केली आणि नैतिकदृष्ट्या याला जबाबदार तुम्ही सर्वजण आहात. तिचा खून झालेला नाही. आत्महत्येला खुनाचा रंग द्यायचा निष्फळ प्रयत्न केलाय."

एकापुढे एक होणाऱ्या या बॉम्बस्फोटांमुळे सगळे जमीनदोस्त झाले होते. डॉलीची आई मात्र ताडकन उठून खाली डॉलीकडे पळाली होती. सोमण पती-पत्नी तर सुन्न झाले होते. काय बोलावं, वागावं हे त्यांना कळण्याच्या स्थितीत ते नव्हतेच.

राणे सगळ्यांना त्याच अवस्थेत सोडून आता सोहमसमोर बसले होते. पहिली रीतसर चौकशी झाली. मग त्याचे फिंगरप्रिंटस घेऊन आणि पडताळून झाल्यावर अचानक राणे बोलले, "एअर एम्बॉलिझम... रिकामं इंजेक्शन शिरेत टोचणे....हा खून किंवा आत्महत्येचा किती सेफ मार्ग आहे ना. संशयाला मुळीच जागा उरत नाही."

सोहमने चमकून त्यांच्याकडे पाहिलं. काही क्षणात त्याच्या लक्षात आलं, आता राण्यांसमोर लपवाछपवी करण्यात काहीच अर्थ नाही. त्याने अगदी म्लान स्वरात बोलायला सुरुवात केली, "तुमची शंका अगदी बरोबर आहे. सोनियाचा खून झालेला नसून तिने आत्महत्या केली होती आणि मी त्या आत्महत्येला खुनाचा रंग देण्याचा प्रयत्न केला. सोनियाची आणि माझी खूप चांगली मैत्री होती. मी मनोमन तिच्यावर प्रचंड प्रेम करायचो पण कधी व्यक्त केलं नाही. तिने केतनबद्दल मला सांगितल्यावर मला खूपच धक्का बसला होता. पण आमची मैत्री मी तशीच अबाधित ठेवली होती. ती वेदविहारच्या सगळ्याच लोकांविषयी अगदी मोकळेपणाने माझ्याशी चॅट करायची. काल रात्रीही सोनियाचा मेसेज मला आला होता. केतनचं खरं रुप तिला समजल्यावर ती पार निराश होऊन गेले होती. खूप संवेदनशील मनाची होती ती. त्यामुळे हा धक्का तिला सहनच झाला नाही. तिचे हे असे मेसेज वाचून मला रहावेना म्हणून मी पाऊणच्या सुमारास तडक तिच्या घरी गेलो कारण फोनवर काहीच रिस्पॉन्स मिळत नव्हता. बेल वाजवूनही तिने दार उघडलं नाही. मग बाल्कनीतून घरात शिरलो. सुदैवाने बाल्कनीचं दार उघडंच राहिलं होतं. तिला जमिनीवर पडलेली पाहून आणि शिरेजवळ इंजेक्शनची खूण पाहून तिने एअर बबल इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याचं मला लगेच समजलं. आमच्या अभ्यासापैकीं तो एक भाग आहे. प्रत्यक्ष तिचा खून केलेला नसला तरी तिच्या आत्महत्येसाठी बऱ्याच अंशी कारणीभूत असलेल्या या बिल्डिंगमधल्या लोकांना काहीतरी शिक्षा झालीच पाहिजे ही पक्की धारणा असल्यामुळे मी तिच्या गळ्याभोवती पेट्रोलियम जेली लावून त्यावर काळ्यानिळ्या रंगाचे पट्टे ओढले. इंजेक्शन तिच्या पर्समध्ये लपवलं."

"गळ्याभोवती फक्त तुझे फिंगरप्रिंटस होते आणि इंजेक्शनचा मार्कही मला दिसला. पोस्टमॉर्टममध्ये हार्टफेल्युअर असं मृत्यूचं कारण आलंय जे एअर बबल इंजेक्शनमुळे होऊ शकतं. चॅटवरुन तर सगळंच चित्र माझ्यापुढे स्पष्ट झालं.. कायद्याने त्या लोकांना शिक्षा नसली तरी जन्मभराची मनाला टोचणी लागणं यासारखी दुसरी कठोर शिक्षा नाही."

सोहमचा बांध आता फुटला आणि राणे त्याला निःशब्द धीर देत राहिले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama