Radhika Joshi

Drama

3  

Radhika Joshi

Drama

सूरमयी

सूरमयी

13 mins
161


विजेसारख्या कडाडत येणाऱ्या भारदस्त ताना.. अचूक, सुमधुर आणि सहज स्वरांचं पसरलेलं मायाजाल..अप्रतिम लयकारी..

रोजच्याप्रमाणेच मॉर्निंग वॉकला निघालेल्या केतकीची पावलं आजही त्या पांढऱ्याशुभ्र,

डौलदार 'सूरमयी' बंगल्यापाशी थबकली.

आतून येणारे स्वर्गीय सूर तिला रोजच

खिळवून ठेवत होते. केवळ ते अलौकिक होते म्हणून नव्हे तर त्या प्रत्येक स्वराशी, त्याच्या उंची-खोली सकट, तिचं गहिरं नातं होतं. रोज हे स्वर तिला तिच्या भूतकाळातल्या त्या अत्यंत क्लेशकारक प्रसंगाची आठवण करुन देत होते. तिची कधीही बरी होऊ शकणार नाही अशी जखम रोज ह्या स्वरांनी ताजी होत होती.

साधारण आठ दिवसांपूर्वीच पुण्यातल्या लॉ कॉलेज रोडवर असलेल्या गुलमोहर सोसायटीमध्ये केतकी रहायला आली होती.

सगळे बंगलेच होते त्या सोसायटीमध्ये.

तिची नुकतीच मुंबईहून पुण्याला ट्रान्सफर झाली होती.

सेनापती बापट रोडवर तिच्या ऑफिसची नवीन ब्रँच चालू झाली होती. तिथे ऍडमिन हेड म्हणून तिची नियुक्ती केली होती. खरंतर सहसा बरीच लोकं ट्रान्सफर टाळण्याच्या मागे असतात. पण केतकी अगदी आनंदाने इथे यायला तयार झाली होती. त्यामागचं खरं कारण, ती आपल्या भूतकाळापासून लांब पळायला बघत होती.

पण त्या वेदनादायी आठवणी ती कुठेही असली तरी चहूबाजूंनी तिच्यावर ओघळत होत्याच.

आत्ता तिला त्या बंगल्याबाहेर घुटमळताना बघून एक वयस्कर गृहस्थ तिच्याजवळ येऊन तिला म्हणाले, " माफ करा, पण चार-पाच दिवस मी तुम्हाला इथे रेंगाळताना बघतोय. मी पुराणिक, इथे शेजारीच रहातो. ह्या बंगल्यात तुमचं कोणी ओळखीचं आहे का? आत जाताना काही तुम्ही दिसला नाहीत. शेवटी आज राहवलं नाही म्हणून बोलायला आलो."

"काका, बरं झालं तुम्ही आपणहून बोलायला आलात. या बंगल्यात कोण रहातं, हे कोणाला विचारावं ह्याचा मी विचारच करत होते. मी रिसेंटली इथे शिफ्ट झाले आहे त्यामुळे अजून कोणाशी फारश्या ओळखी झालेल्या नाहीत. बंगल्याबाहेर 'हर्षद जोशी' अशी नेमप्लेट आहे. ते एकटेच इथे रहातात का? आणि आतून ज्यांचे गाण्याचे सूर ऐकू येत आहेत, ते कोण हे तुम्ही सांगू शकाल का?"

"तेच ह्या बंगल्याचे मालक, हर्षद जोशी.

अतिशय कसलेला, तयारीचा गायक आहे.

वय साधारण पस्तिशीच्या आसपास असेल पण संगीताची समज जबरदस्त आहे. त्यांना इथे येऊन चार वर्षं होऊन गेली असतील. फारसे बाहेर पडत नाहीत आणि कोणाबरोबर जास्ती बोलतपण नाहीत. मी अगदीच शेजारी रहात असल्यामुळे आमच्या थोड्याफार गप्पा होतात. पण स्वतःच्या खाजगी आयुष्याबद्दल त्यांनी अवाक्षरही काढलेलं नाही आणि आम्हीही विचारलेलं नाही. या स्वर्गीय सुरांच्या वर्षावात इतकं विनासायास चिंब भिजायला मिळतंय यातच आम्ही सोसायटीतील लोकं प्रचंड खूष आहोत."

ते एवढे मोकळेपणाने बोलतायत हे बघून केतकीने जरा धीर करुन विचारलं, "मी आत्ता त्यांना भेटू शकते का? त्यांचा फार वेळ नाही घेणार."

एव्हाना आतला रियाझ थांबला होता.

"तुम्ही असं करा, सिक्युरिटी गार्डला विचारा. तो इंटरकॉमवर जोशींना विचारेल आणि सांगेल तुम्हाला. अरे हो! अजून एक

सांगायचं म्हणजे.."

एवढ्यात सिक्युरिटी गार्ड त्यांच्या जवळ आला आणि कुठे जायचं आहे, इथे इतका वेळ थांबू नका वगैरे सांगायला लागला.

पुराणिक काकांनी मग त्याला जोशींशी

इंटरकॉमवर बोलून, केतकी आत्ता त्यांना भेटू शकते का? हे विचारायला सांगितलं आणि ते जायला निघाले. केतकीने अगदी मनापासून त्यांचे आभार मानले आणि गार्ड काय सांगतो ते पाहण्यासाठी थांबली.

गार्डने इंटरकॉमवर विचारुन, तिला लगेचच आत जाण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला. खरंतर तिच्या मनात प्रचंड चलबिचल चालली होती. आत जाऊन काय बोलायचं?

ओळख नसताना असं अचानक

धडकल्याबद्दल माफी मागायची का? ते जोशी कसे रिऍक्ट होतील, असे नाना विचार येत होते. त्याहीपेक्षा आपल्याला जी शंका येतीये ती खरी असेल तर?

तिचे पाय लटपटायला लागले. त्याच तंद्रीत तिने आतल्या बंद दरवाजाची बेल दाबली.

आतून धीरगंभीर आवाज आला.

"आत या, दार उघडंच आहे."

हे शब्द ऐकून केतकीच्या हातापायाला कापरं भरलं. कसंबसं तिने दार आत ढकललं. समोर, रियाझासाठी बनवलेल्या पांढऱ्याशुभ्र बैठकीवर, दोन्ही खांद्यावर शाल पांघरुन तिचा.. हो, तिचा आदित्य..आदि बसला होता. मग मात्र ती स्वतःला सावरु शकली नाही आणि तिथल्या खुर्चीत कोसळलीच.

हे शब्द..अगदी हेच शब्द तिने पाच वर्षांपूर्वी पहिल्यांदा ऐकले होते.

त्या आधी, साधारण आठ वर्षांपूर्वीची

केतकी..अतिशय सुंदर, फुलपाखराप्रमाणे बागडणारी, गोड स्वभावाची, मनमिळाऊ, अल्लड युवती.

दादरला शिवाजी पार्क जवळ, ऐसपैस ब्लॉकमध्ये, आई, लहान भाऊ कुणाल आणि बहीण सानिका यांच्याबरोबर ती रहात होती. वडील नुकतेच वारले होते. त्याआधी त्यांच्या एका ओळखीतून मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीत एच.आर.डिपार्टमेंटला ती रुजू झाली होती. आई गृहिणी होती, शिवाय तब्येतीच्या काहीबाही तक्रारी सतत असायच्या. त्यामुळे धाकट्या भावंडांची जबाबदारी केतकीवरच येऊन पडली होती. तशी आर्थिक चणचण नव्हती. पण

अकाली सगळी जबाबदारी पेलावी लागत असल्यामुळे केतकीचा अल्लडपणा

कुठेच्याकुठे नाहीसा होऊन ती स्वतःच्याच कोषात रहायला लागली. दुर्दैवाची बाब म्हणजे तिला हे जराही जाणवत नव्हतं.

मैत्रिणींबरोबर हास्यविनोद, शॉपिंग, नाटक- सिनेमा वगैरेला जायचं म्हणजे तर तिला अपराधी वाटायचं. सगळी कर्तव्य चोख पार पाडण्याच्या नादात नकळत ती इतकी पोक्त

बनली होती की पूर्वीच्या सगळ्या मैत्रिणी हळूहळू दुरावायला लागल्या होत्या. जेमतेम एकवीस-बावीसच्या त्या मुली, अकाली प्रौढ झालेल्या आपल्या मैत्रिणीच्या मनाची पर्वा किती काळ करणार?

तशातच केतकीची आई क्षुल्लक आजाराचं निमित्त होऊन वारली. आता तर ती पुरतीच तिच्या भावंडांच्या आईच्या रोलमध्ये घुसली. 'झोपाळ्यावाचून झुलण्याच्या' वयात तिने स्वतःला जणू व्हिलचेअरला जखडून घेतलं होतं. अलगद खांद्यावर येऊन विसावलेल्या या जबाबदारीच्या ओझ्याखाली तिच्या तारुण्यसुलभ भावना पार दबून गेल्या. लग्नाचा तर विचारही तिच्या मनात येत नव्हता. ह्या एकलकोंडेपणामुळे तिची हल्ली फार चिडचिड व्हायला लागली होती. आश्चर्य म्हणजे तिलाही हे जाणवलं. त्यावर एक छोटासा उपाय म्हणून तिने ऑफिसच्याच वाटेवर असणाऱ्या एका गाण्याच्या क्लासमध्ये नाव घातलं. आठवड्यातून

दोनदा ती परस्पर तिथे जाणार होती. आदित्य सबनीस असं त्या सरांचं नाव होतं. त्यांचा अप्रतिम आवाज आणि लहान वय असूनही स्वरांवरची हुकूमत सगळे वाखाणत होते. त्यांचे बरेच स्टेज शो होत होते. रिऍलिटी शोसाठी जज्ज म्हणूनही त्यांना कायम बोलावणं असायचं. हळूहळू ते चांगलेच नावारुपास येत होते.

क्लासमध्ये तर मुलांचा ओघ वाढतंच होता. त्यामध्ये मुलींची संख्या जरा जास्तीच होती.

केतकीच्या वाटेवरच क्लास असल्यामुळे ती हे दृष्य रोज पहात होती. तसा आदित्यचा फोटो पेपरमध्ये तिने पाहिला होता. पण तेव्हा विशेष लक्ष दिलं नव्हतं. सोशल मीडियावर त्याच्याविषयीची बरीच माहिती उपलब्ध होती पण सोशल मीडियावर ती अजिबात ऍक्टिव्ह नव्हती. त्यामुळे आज पहिल्यांदा क्लासला जाताना उत्सुकतेबरोबर जरा धाकधूक पण होती. तिने दारावरची बेल वाजवल्यावर आतून धीरगंभीर आवाज आला,

"आत या, दार उघडंच आहे." ती दार ढकलून आत गेल्यावर त्याचं पहिलं दर्शन..

पांढऱ्याशुभ्र बैठकीवर, हातात तंबोरा घेऊन बसलेली, त्याच्या सुरांइतकीच त्याची अत्यंत देखणी, मोहक, प्रसन्न मूर्ती. क्लासला मुलींची संख्या जास्ती का? हे क्षणात तिच्या लक्षात आलं. तिची स्वतःची नजर तरी कुठे हटली होती त्याच्या चेहऱ्यावरुन.

"या, बसा. आज तुमचा क्लासचा पहिला दिवस ना? थोडं वेळेआधी आलात. ह्या बॅचचे विद्यार्थी येतीलच एवढ्यात."

ती जरा अडखळत म्हणाली, "ते..मी..त्याचं काय आहे, ऑफिसमधून मी डायरेक्ट इकडेच आले. घरी जाऊन यायचं म्हंटलं तर नक्की उशीर होईल. ऑफिसच्या वाटेवर आहे ना क्लास."

"अरे! मग काही चहा, कॉफी घेणार? दमून आला असाल."

आदित्यच्या या सौजन्यशील वागण्याने केतकी अगदी भारावून गेली होती. असं स्वागत तिला अपेक्षित नव्हतं. मग तिची भीड एकदम चेपली. तिथलं वातावरण तिला आवडूनच गेलं.

नवीन आलेल्यांचे, पहिले सूर लावून घेणं, मग सोपी सोपी सरगम घोटून घेणं असा आदित्यचा रिवाज होता. तिच्याबरोबर अजून दोघीजणी आजच आल्या होत्या. केतकीला मूळची गाण्याची समज आणि जोडीला गोड आवाज होता. त्यामुळे आदित्यने तिला अगदी मनापासून शिकवलं.

केतकी घरी आली ती हवेत तरंगतच. आदित्यचं एकूण व्यक्तिमत्त्व, त्याचा आवाज, त्याचं आदबशीर वागणं, ह्या सगळ्याचा तिच्या मनावर खूप प्रभाव पडला होता. आता तर ती क्लासची उत्सुकतेने वाट बघायला लागली. ती क्लासला नेहमीच आधी पोचायची, त्यामुळे आदित्यच्या आणि तिच्या अवांतर विषयांवर गप्पा व्हायच्या. मधूनमधून हास्यविनोद व्हायला सुरुवात झाली. दोघेही साधारण एकाच वयाचे असल्यामुळे लवकरच एकेरी नावाने हाक मारण्याएवढी त्यांची प्रगती झाली. अर्थात बाकीच्या स्टुडंटसमोर केतकी आदित्यला सर म्हणूनच संबोधत होती. पण दोघं एकटी असताना ती आता सहज नावाने हाक मारायला लागली होती. तिच्या वागण्यात, बोलण्यात जाणवेल इतपत चांगला बदल हळूहळू व्हायला लागला होता. टापटीप कपडे, माफक सौंदर्यप्रसाधनांचा वापर यामुळे तिचं मूळचं सौंदर्य अधिकच खुललं होतं. थोडक्यात काय, तर कोषातून बाहेर पडलेल्या सुरवंटाचं फुलपाखरु बनून विहरायला लागलं होतं. तिच्या जवळच्या लोकांना तिच्यातला हा बदल सुखावह वाटत होता. आपली ताई पूर्वीसारखी हसायला, बोलायला लागलेली पाहून कुणाल आणि सानिका पण खूष होते. या बदलामागचा जादूगार, आदि..हो, आता तेवढ्या पायऱ्या क्रमाक्रमाने त्यांनी चढल्या होत्या, तो तर कधीच तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. आता शेवटची अपरिहार्य पायरी, लग्न.. त्याचा निर्णय दोघांनीही लवकरच घेतला. आदित्यला जवळचे नातेवाईक कोणीच नव्हते. केतकीकडेही दुसरी जबाबदार व्यक्ती कोणीच नव्हती. त्यामुळे त्या दोघांनीच सगळं ठरवलं. रजिस्टर

मॅरेज करायचं ठरलं. तारीख ठरली.

या अनपेक्षित सुखाच्या आणि आदित्यच्या सुरांच्या वर्षावात केतकी पुरती न्हाऊन निघत होती.

पाहता-पाहता विवाहाचा दिवस उजाडला. सकाळी अकरा वाजता रजिस्ट्रेशन

ऑफिसमध्ये भेटायची वेळ नक्की झाली होती. दोघांचे दोन दोन मित्र-मैत्रिणी, कुणाल आणि सानिका, बस्स.. एवढीच माणसं होती लग्नाला. अकरा वाजता

सर्वजण ऑफिसमध्ये जमले होते. डाळिंबी रंगाच्या पैठणीत केतकी अगदी दृष्ट लागण्यासारखी दिसत होती. शिवाय चेहऱ्यावरचे लाजरे भाव.. क्या बात हैं!

बाकी सर्व मंडळी जमली होती आणि वाट बघत होती, आदित्यची. त्याचाच पत्ता नव्हता. केतकी तर डोळ्यात प्राण आणून त्याची आतुरतेने वाट बघत होती. त्याचा मोबाईल लागतच नव्हता. आज सकाळी सात-सव्वासातच्या सुमारास त्याचा केतकीला फोन आला होता. प्रचंड खूष होता तो. त्या दोघांच्या भावी आयुष्याची स्वप्नं रंगवून झाली, केतकीची चेष्टामस्करी करुन झाली.

आता अकरा वाजेपर्यंतपण धीर धरवत नाही, हे बोलून झालं. खरंतर वेळेच्या आधीच तो हजर असेल अशी तिची अपेक्षा होती.

त्याच्या घरापासून हे ऑफिस, ट्रॅफिक विचारात घेऊन सुद्धा फारतर वीस मिनिटांच्या अंतरावर होतं. कुठे अडकला असेल याचा विचार करुन केतकीच्या डोक्याचा पार भुगा झाला होता. काही प्रॉब्लेम असेल तर त्याने फोन, मेसेज काहीतरी करायला हवा होता. तितका बेजबाबदार तर तो निश्चितच नव्हता. केतकीबरोबरच बाकीच्यांची काळजीही आता चेहऱ्यावर दिसायला लागली. बारा वाजून गेले तरीही त्याचा पत्ता नाही, मेसेज, फोन काहीच नाही म्हंटल्यावर त्याचे मित्र घरी जाऊन बघून आले. सोसायटीच्या वॉचमनने आदित्य आठलाच कार घेऊन बाहेर पडल्याचं सांगितलं. फक्त त्याने तो ज्या दिशेने गेला असं सांगितलं ती रजिस्ट्रेशन ऑफिसची बरोबर विरुद्ध दिशा होती. एक मित्र वर त्याच्या फ्लॅटमध्ये जाऊन तो तिथे नाही ना, ही सुध्दा खात्री करुन आला. सगळे सतत त्याला मोबाईल लावून बघत होतेच. कुठल्याही गाडीचा हॉर्न वाजला की केतकी इतक्या आशेने बघत होती की तिची घालमेल इतरांना बघवत नव्हती. एक वाजला, दोन वाजले तरीही ही जीवघेणी प्रतीक्षा संपेना. शेवटी सगळे कसेबसे तिथून निघाले. आदित्यचे मित्र आणि केतकी थेट जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये गेले आणि घडलेला सर्व प्रकार सांगून मिसिंग कंप्लेन्ट नोंदवली. खरंतर पोलिस तयार नव्हते. दोन-तीन तास उशीर ही त्यांच्या दृष्टीने मिसिंगची बाब नव्हती. केवळ आदित्यसारखी बऱ्यापैकी नावलौकिक असलेली व्यक्ती होती म्हणून त्यांनी तक्रार नोंदवून घेतली आणि तपास सुरु करण्याचं आश्वासन दिलं.

केतकीसाठी हा जबर मानसिक धक्का होता. तिचं भावविश्वच पार कोलमडून गेलं.

हळूहळू पोलिसांचं तपासचक्र फिरायला लागलं. कुठे अपघात वगैरे नाही ना हे चेक केलं. जसजसे दिवस पुढे सरकायला लागले तसतशी तपासयंत्रणा जोरात फिरायला लागली आणि केतकी तितक्याच वेगाने पुन्हा तिच्या कोषात जायला लागली. तिला कळतच नव्हतं की, आदित्यच्या वियोगाचं दुःख करावं, का त्याने आपल्याला फसवलं, असं मानून त्याचं दुःख मानावं, का हे दुःख आता आयुष्यभर आपल्या बरोबर असणार याचंच दुःख करावं. बिचारीची अवस्था फार वाईट झाली होती.

आदित्य हवेत विरुन जावा तसा गायबच झाला होता. या सगळ्या प्रकरणाचा खूप गाजावाजा झाला. उलटसुलट चर्चा आणि अफवांचा जोरदार धुरळा उडाला आणि काही दिवसांनी तसाच खालीही बसला. कोणाला एवढा वेळ होता इतके दिवस एकच विषय चघळायला! इतकंच काय, शेवटी पोलिसांनीही कुठलेच धागेदोरे हाती न लागल्यामुळे केस क्लोज् केली.

केतकीचं रुटीन मग सुरु झालं. कशातच तिचं मन लागत नव्हतं. छोट्याशा कारणावरुनही ती चिडायला लागली होती. तिला कळत नव्हतं अशातला भाग नव्हता पण तिचाही नाईलाज होता.

यथावकाश कुणाल, सानिका मोठे झाले. त्यांचं करिअर, मग जॉब यात ते गुंतून गेले.

दोघांनी आपापले जोडीदार निवडले होते. सानिकाचं लग्न होऊन ती सासरी गेली. थोड्या दिवसांत कुणालचंही लग्न झालं आणि त्याची बायको घरी आली. कुणाल आणि सानिकाला आपल्या ताईविषयी खूप प्रेम आणि आदर होता. तिने त्यांच्यासाठी घेतलेल्या परिश्रमांची जाणीव होती. पण शेवटी त्यांना त्यांचं आयुष्य होतंच की. दुसऱ्याबद्दल कितीही प्रेम असलं तरी समोरच्याचं आयुष्य, त्याच्या

सुख-दुःखासकट, आपण नाही जगू शकत.

नुकतंच लग्न झालेल्या कुणालची मग कुचंबणा व्हायला लागली. आपली ताई एवढी उदास असताना आपण आनंदात रहाणं त्याला अपराधीपणाचं वाटायला लागलं. उघडउघड व्यक्त केलेली नाही पण त्याच्या बायकोची छुपी नाराजी केतकीला जाणवायला लागली आणि तिने त्याच सुमारास चालून आलेली ट्रान्सफर ताबडतोब स्वीकारली आणि ती इथे आली.

हा सगळा भूतकाळ आत्ता तिच्या

नजरेसमोरुन झर्रकन सरकून गेला. इतकी वर्षं हरवलेला तिचा आनंदाचा ठेवा इतक्या अनपेक्षितरित्या तिला गवसला होता की ती धावत आदित्यच्या जवळ आली. तो हर्षद जोशी म्हणून आता पुण्यात रहातो, पाच वर्षांत त्याने आपल्याला अजिबात काँटॅक्ट केलेलं नाही, तो आदित्यच आहे ना ही तरी खात्री करुन घ्यावी वगैरे गोष्टी तिच्या मनाला स्पर्शून पण गेल्या नाहीत. ती त्याच्या जवळ जाऊन त्याच्या दोन्ही खांद्यांना

धरुन जवळजवळ ओरडलीच, "आदी, आदि

कुठे होतास तू? इतकी वर्षं मी तुझ्याशिवाय कशी काढली , काय सांगू तुला! असं का केलंस तू? आला का नाहीस तेव्हा... नंतर इतक्या वर्षांत? बोल, बोल काहीतरी." ती भावनावेगाने गदागदा त्याचे खांदे हलवत बोलत होती. तो मात्र निश्चल उभा होता. त्या गदारोळात त्याच्या खांद्यावरची शाल ओघळून खाली पडली.

आणि..आणि ती डोळे विस्फारुन पहातच राहिली.

" मिळाली तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला? असं यायला हवं होतं मी?"

असं म्हणत आदित्यने त्याचे कोपरापासून तुटलेले दोन्ही हात समोर केले.

"आदि.. हे, हे..कसं? एवढंच कसंबसं बोलून केतकी मटकन खाली बसली. तिला बसलेला प्रचंड शॉक तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. आदित्यही तिच्या जवळ बसला आणि सांगायला लागला.

"त्या दिवशी मी रजिस्ट्रेशन ऑफिसला यायच्या आधी पनवेलला माझं एक अगदी अपरिहार्य काम होतं तिथे निघालो होतो. इथे वेळेत पोचायचं म्हणून जरा फास्ट कार चालवत होतो. अर्थात तेवढा कंट्रोल होता माझा. पनवेलच्या अलीकडे खाडीवरच्या पुलावर मी आलो असताना अचानक समोरुन एक लोखंडी सळ्या वाहून नेणारा ट्रक आला आणि मला काही समजायच्या आत मुद्दाम केल्यासारखा, सरळ माझ्या गाडीवर येऊन जोरात धडकला. बचावाची संधीच मला मिळाली नाही. मी गाडीबाहेर फेकला गेलो आणि त्या सळ्या माझ्या अंगावर आदळल्या हीच शुद्ध हरपण्यापूर्वीची माझी शेवटची जाणीव. इतके वर्षानी सांगतानाही त्याच्या अंगावर शहारा आलेला तिला जाणवला आणि तिने त्याला आपल्या हातांनी वेढून घेतलं.

तो पुढे सांगायला लागला," शुद्ध आली तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो. सगळीकडे नळ्या होत्या आणि..दोन्ही हात अँप्युट केलेले होते. त्या सळ्या हातात अश्या घुसल्या होत्या की त्याशिवाय डॉक्टरांकडे पर्यायच नव्हता. सगळ्यात पहिला विचार तुझाच आला. तू माझी किती आतुरतेने वाट पहात थांबली असशील, याचं चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं आणि तुला कॉल करायला हात मोबाईलकडे गेला. त्याच क्षणी दाहक वास्तव मला जाणवलं. मी साधा मोबाईलपण आता उचलू शकत नव्हतो, तुझी काळजी कशी घेणार होतो? एक कठोर निर्णय घेण्याची वेळ आली होती. तुला माझ्या आयुष्याशी जखडून ठेवण्याचा मला काहीच अधिकार नव्हता. मी चौकशीसाठी आलेल्या पोलिसांना खूप समजावलं, कसंतरी त्यांना, माझ्याबद्दल बाहेर कुठलीही न्यूज स्प्रेड करु नका, पूर्ण गुप्तता राखा अशी विनंती केली. मुंबई पोलिसांबरोबर बरीच चर्चा करुन पाच-सहा दिवसांत माझी विनंती त्यांनी मान्य केली.

त्यामागे अजून एक कारण असं होतं, तुला आठवत असेल तर, म्युझिक फॉर यू ह्या कंपनीबरोबर माझं कॉन्ट्रॅक्ट झालं होतं. ते माझाच एक कॉम्पिटिटर, शशांकला खूप डाचत होतं. ते कॉन्ट्रॅक्ट त्याला हवं होतं. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असावा अशी पोलिसांना शंका आली होती. ट्रक

ड्रायव्हरने काहीतरी मोघम सांगितलं होतं पण ठोस पुराव्याअभावी शशांकला पकडता आलं नाही. माझ्या गायब होण्याच्या बातमीमुळे शशांककडून मला पुढे काही धोका राहिला नाही. तसंही माझी सगळी उमेद मी गमावून बसलो होतो गं. तुझ्याशिवाय जगण्याला काय अर्थ होता? त्या प्रसंगानंतर मी डिस्चार्ज मिळाल्यावर पुण्याला आलो आणि हा बंगला विकत घेतला. सुदैवाने आर्थिक बाजू भक्कम होती. त्यामुळे अजून वेगळे प्रॉब्लेम्स नाही आले. गाणं तर आता फक्त स्वानंदासाठी आहे. खरे सूर तर कधीच तुला अर्पण केलेत."

केतकीच्या डोळ्यातून अविरत धारा वहात होत्या. ती म्हणाली, "आदि, अरे मला विश्वासात घेऊन हे सांगायचस तरी. एका अनाम दुःखात मी अक्षरशः चुरमडून गेले होते रे. समजा आपल्या लग्नानंतर हा अपघात घडला असता तर? किंवा माझ्या बाबतीत हे घडलं असतं, तर काय केलं असतंस? माझं प्रेम आजमावून तरी बघायचं

होतंस. पाच वर्षं पराकोटीचा मानसिक त्रास सहन करण्यात आपण का घालवली? आपल्या दोघांच्या आयुष्याचा निर्णय तू एकटा घेऊन मोकळा झालास. ऍट व्हॉट कॉस्ट? अरे, माझे दोन्ही हात आपल्या दोघांसाठी पुरेसे नाहीयेत का?"

तिच्या स्वरातला सच्चेपणा आणि डोळ्यातलं अपार प्रेम त्याला जाणवलं. तो तिथल्याच एका कपाटापाशी गेला आणि आतून एक पुस्तक आपल्या थोट्या हातांनी बाहेर काढून तिला दिलं. कव्हरपेजवर तिचा अतिशय सुंदर, हसरा फोटो होता आणि आतल्या पानावर लिहिलं होतं,

' प्रिय केतकी, माझी सूरमयी...

माझा पहिला काव्यसंग्रह

फक्त तिलाच अर्पण...

केतकी काही न बोलता कोपऱ्यात उभ्या करुन ठेवलेल्या तंबोऱ्याजवळ गेली, सूर जुळवले आणि वाजवायला लागली.

थोड्याच वेळात, त्या सुरांमध्ये एक स्वछ, सुंदर असा 'सा' मिसळला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama