Vijay Kakade

Tragedy Children

3  

Vijay Kakade

Tragedy Children

चिमण्या आणि माझे सुरक्षित घर..!

चिमण्या आणि माझे सुरक्षित घर..!

4 mins
163


"अहो, टाकी भरली का तेवढे वर जाऊन बघा. " असा आवाज कानावर आल्यावर कोणाही इसमाला विशेषतः विवाहित पुरुषाला कितीही इच्छा असली तरी, घरात लोळत पडणे अशक्य आहे. त्यामुळेच पत्नीचा पहिल्या हाकेचा तो प्रेमळ आवाज कानावर पडल्या बरोबर मी ताबडतोब डोळेचोळत उठून जीना चढू लागलो. साधारणपणे २००८ सालातली ती एक सकाळ होती. स्वतः स्वकष्टाने बांधलेल्या नव्या घरात राहाला येऊन आम्हाला जेमतेम ६ महिने झाले होते. मी टेरेसचा दरवाजा उघडताच... एक चिमणी भुर्रकन उडून सरळ माझ्या डोक्यावरून विमानाप्रमाणे गिरकी घेऊन टेरेसच्या दरवाजातून क्षणार्धात बाहेर गेली. माझ्या अंगावरुन कोणीतरी हलकेच मोरपीस फिरविल्यासारखे झाले. " अरे वा ! चिमणी आणि आपल्या घरात ? " मी स्वतःशीच पुटपुटलो..... पाण्याची टाकी भरल्याचे पाहून मोटर बंद करायला खाली जाण्यापूर्वी मी जिथून चिमणी उडाली ती जागा नीट न्याहळून पाहिली..... जीन्याच्यावर पत्र्याच्या टोपीखाली एका कोपऱ्यात दोन लोखंडी ॲंगलच्यामध्ये छोट्याशा जागेत चारदोन काटक्या आणि गवताच्या काही काड्यांनी बनवलेले ते सुंदर घरटे माझ्या दृष्टीस पडले.... ! " किती कष्टाने बांधले असेल हे घरटे..... ?" माझ्याशिवाय आणखी कोणाला कळणार होते, त्याचे महत्त्व? काडीकाडीकरुन चार खोल्यांचे हे घरटे उभारताना किती दिव्यातून जावे लागले होते मला.... ? पण आज त्यात साखरझोप घेतांना काय आनंद वाटत आहे... ! त्यानंतर दररोज संध्याकाळी- सकाळी नित्याने मला त्या चिमण्यांचे दर्शन होऊ लागले. चिमणाचिमणीची ती जोडी खूपच सुंदर होती. आमच्यासारखेच का ते दोघे कुठे नोकरीला होते......


एके दिवशी दुपारच्यावेळी मला त्या घरट्यात गोड चिवचीव ऐकू आली.... ! थोड्यावेळाने चिमणीबाहेरून चोचीत चारा घेऊन आली आणि पिलांना भरवू लागली...... ते दृश्य खूपच मनोहरी होते... ! ते पाहून मी रोमांचित झालो होतो.... ! आमचीही चिमणी त्यावेळी के जी मध्ये शिकत होती. दुपारच्या वेळी तिची रिक्षा कधी येतेय याची मी वाट पाहत असायचो..... पिल्ले मोठी झाली तसा जिन्यातला त्यांचा चिवचिवाट वाढू लागला. त्यासगळ्यांच्या तिथे राहण्याने त्यांची विष्टा रोज जिन्यात पडू लागली..... सबंध भिंत घाणेरडी दिसू लागली. आई व पत्नी रोज त्या चिमण्यांची घाण काढून वैतागू लागल्या. आई रोज त्यांना घरातून हाकलण्याचे प्रयत्न करू लागली परंतु चिमण्या काही केल्या तिला दाद देत नव्हत्या. एके दिवशी पाहुण्यांना घर फिरून दाखवताना त्यांनी जीन्यातून गॅलरीपर्यंत जाताना नाकाला रुमाल लावला त्यावेळी घटनेचे गांभीर्य माझ्या लक्षात आले..... आईची सततची चिडचिड माझ्या लक्षात आली. मग मी माझे पक्षीप्रेम थोडे बाजूला ठेवून मोठ्या लांब दांडीच्या झाडूने रागाने ते घरटे मोडून खाली पाडले व कचऱ्याच्या डब्यात त्याची रवानगी केली. त्यावेळी एकही चिमणी माझे ते दुष्कृत्य पहायला हजर नव्हती... ! अन्यथा त्यांनी किती आक्रोश केला असता..... !


फेरीवाल्यांची अवैध दुकाने पाडताना त्यांचा होणारा आक्रोश माझ्या डोळ्यासमोर आला.... पण यावेळी खलनायक मी होतो ! त्यानंतर चारआठ दिवस छान गेले. आणि पुन्हा तेच ! चिमण्यांनी होते तिथेच आपले घरटे पुन्हा बांधले होते..... ! फेरीवाल्यांसारखं त्यांनाही आपली लाज वेशीवर टांगण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता..... मागीलप्रमाणे पुन्हा तेच झाले.... रोजची घाण जिन्यात पडू लागली.... भिंती रंगू लागल्या.... घरभर दुर्गंधी पसरू लागली...... आईची चिडचिड वाढली. चिमण्यांच्या चिवचिवाटामुळे माझ्या दुपारच्या वामकुक्षीत व्यत्यय येऊ लागला...... आम्ही पुरते हैराण झालो.... ! शेवटी माझ्या सहनशक्तीचा अंत झाला ! एके दिवशी मी पेटून उठूलो.... ! त्यादिवशी माझ्या अंगात जणू सैतानच संचारला होता... ! एका मोठ्या लांबसडक कळकाच्या एका टोकाला मी चिंधी गुंडाळली. त्यावर रॉकेल टाकून ते पेटवले आणि जिन्यात जावून सरळ घरट्याला आग लावली.......


याहीवेळी घरट्यात कोणी नव्हते त्यामुळे घरटे पूर्णपणे जळाले पण जिवीतहानीचे पाप मला लागले नाही ! काहीवेळातच घरटे जळून खाक झाले ! "आता चिमण्या पुन्हा येणार नाहीत .... " अर्थात हा माझा भाबडा समज होता..... आता तर त्यांनी चक्क आमच्या हॉलच्या मध्यभागी पंख्याच्यावर पीओपीच्या खाचेत आपले नवीन घरटे बांधले होते.... ! मलातर काहीच कळेनासे झाले. समाधानाची बाब एकच होती की यावेळी घाण खाली पडत नव्हती व चारपैकी दोनच चिमण्या म्हणजे एक जोडपेच तेवढे राहायला आले होते. उरलेले दोघे कुठे गेले? कुणी कुणाला विचारण्याचा प्रश्नच नव्हता. घरातल्या या चिमण्यांच्या उच्छादाबद्दल माझे मित्र महेश वेदपाठक यांना बोललो असता त्यांनी सांगितले, " म्हणजे तुमचे घर अत्यंत सुरक्षित आहे. " " ते कसे?" " जे घर सुरक्षित असते तेथेच चिमण्या घर करतात. उगीच कोणाच्या घरी राहायला येत नाहीत ! " मला ही अदभूत माहिती पहिल्यांदाच कळाली होती. खरे का खोटे माहित नाही परंतु आपले घर पशूपक्ष्यांना रहायला सुरक्षित आहे ही गोष्ट मात्र मनाला आनंद देऊन गेली. एकेदिवशी सौ. वंदनाने सकाळीसकाळी घरभर झाडू मारून गरम होत होते म्हणून हॉलमधला पंखा सुरु केला. तेवढ्यात पीओपीमधल्या घरट्यातून एक चिमणी भुर्रकन उडाली... ! दरवाजातून बाहेर गेली... तिच्यामागे दुसरी चिमणी उडाली परंतु उडताना ती वेगाने फिरणाऱ्या पंख्याच्या पात्याला धडकून टपकन खाली पडली..... ! तिचा गळा चिरून रक्त वहात होते... ! ते हृदयद्रावक दृश्य पाहून सौ.वंदनाच्या अंगावर काटा आला.. ! ती खूप हळहळली..... ! पुढे गेलेला तो चिमणा काही क्वेळाने चिमणीला पहायला परत आला. पायरीवरच्या ग्रिलवरुनच त्याने आपल्या पत्नीचा मृतदेह पाहिला. लांबूनच जणू तिचे दर्शन घेतले तोंड फिरवून उडाला....... तो आजतागायत पुन्हा आला नाही..... !


त्या घटनेनंतर गेल्या दहावर्षांत एकही पक्षी माझ्या घराकडे फिरकला नाही. का त्यांना आता आमचे घर असुरक्षित वाटते? पण त्या अपघातात आमचा काय दोष होता..... ! गेली ६ महिने घराच्या भोवतीने व घरात मुंग्यांनी उच्छाद मांडला आहे. किचनमध्ये मुंग्या, हॉलमध्ये मुंग्या, घरात मुंग्या, दारात मुंग्या, बाहेर मुंग्या, बघावे तिकडे मुंग्याच मुंग्या अशी परिस्थिती आहे. लॉकडाऊनमध्ये हातात फिनेलचा पंप घेऊन आम्ही रोज किमान लाख दोनलाख मुंग्यांचा तरी खातमा करत होतो. परंतु रोज तेवढ्याच मुंग्या पुन्हा दृष्टीस पडत होत्या. फिनेल, मुंग्यांची पावडर, लालहिट, पीठ, साखर काय नाही ते करून पाहिले पण मुंग्या काही जायचे नाव घेत नाहीत ! त्रास तर आजही रोज होतच आहे. राहूनराहून एकाच गोष्टीचे समाधान वाटते ते म्हणजे, " बहुतेक आपले घर सुरक्षित आहे.. ! "


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy